Priyanka Kumawat

Children Stories Comedy

3  

Priyanka Kumawat

Children Stories Comedy

गावातील गमती जमती

गावातील गमती जमती

7 mins
1.1K


लहानपणी आम्ही नेहमी सुट्टी लागली की मामाच्या गावाला जात. मामाचे घर असे आगगाडीच्या डब्यासारखे होते. पुढे अंगण, मग एक रूम जिथे धान्य किंवा कापूस भरलेला असायचा. मग पुढच्या रूममध्ये कपाट वगैरे, त्यानंतर किचन. किचनमध्ये छोटासा हौद आणि बाजूला अर्धवट भिंतीचे बाथरूम. मागे परत अंगण. सकाळचा चहा तिथे नेहमी आजोबाच करत. त्यांना आम्ही बाबा म्हणत. गावाकडच्या घराच आम्हाला जाम कौतुक. मावशी जेव्हा हंडा घेऊन पाण्याला जायची तेव्हा आम्ही छोटी कळशी अथवा जग घेऊन हट्टाने तिच्या सोबत जात. त्यावेळी आम्ही गच्चीत झोपत असू. बाबांच्या भूत कथा ऐकत. 

बाबा सांगायचे की एकदा त्यांना शेतमालाची राखण करायला रात्री शेतात झोपावे लागले. मध्यरात्री त्यांची खाट खालून जोरजोरात हलू लागली. ते वाकून पाहू लागले तर कोणीच नव्हते. असे २-३ वेळा घडले. ते रामरक्षा म्हणू लागले आणि मग त्यांना काही त्रास झाला नाही. बस त्या दिवसापासून मी रट लावली की आपण रात्रीचे शेतावर झोपायला जाऊ. पण त्यांनी कसेबसे समजावले की दिवसा घेऊन जाईल. मला भुताला एकदा तरी पाहायचे होते. 


दुसऱ्या दिवशी मी नानीच्या मागे लागली की भुताची गोष्ट सांग. ती सांगत होती की एका बाईने सासूच्या जाचाला कंटाळून शेतात फाशी लावून घेतली. तिला मरून १५-२० दिवस झाले असतील. त्यानंतर मी एकदा दुपारी शेतात जात असताना ती मला दुपारी त्याच झाडाला लटकलेली दिसली आणि डोळे उघडून माझ्याकडे बघत होती. मी खूप घाबरले आणि जो पळाली तो सरळ शेत आल्यावर थांबले. 


नानीची गोष्ट ऐकून मी शेतात जायचेच असे ठरवले. भुताचे कुतूहल काही मला शांत बसू देत नव्हते. काही दिवसांनी ते एकदा दुपारी आम्हाला घेऊन गेले. मस्त बैलगाडी मध्ये बसून जायला खूप आनंद वाटला. मी सारखी आजुबाजूच्या शेतात पाहत होते. आम्ही शेतात मस्त हुरडा खाल्ला. कापूस वेचला, जसा येईल तसा थोडासा. कडुनिंबाच्या झाडाखाली पहुडलो. थोड्यावेळाने परत निघालो. आजूबाजूच्या शेतात मी सारखे पाहत होती पण मला झाडाला लटकलेली बाईचे भूत काही दिसलेच नाही. माझा हिरमोड झाला. 


आम्ही एकदा रात्रीचे गच्चीवर दंगा करत होतो. बाबा म्हणाले, अरे पोरांनो असा दंगा करू नका. तिथून दुरवर दिसणाऱ्या पडक्या घराकडे बोट दाखवून म्हटले की तिथे एक भूत बाबा राहतो. रात्री जे लहान मुले जागी असतात त्यांना घेऊन जातो. हे ऐकताच माझे बाकीचे भावंडे घाबरून झोपू लागली. भिती मला पण वाटली पण भूत बाबाला पाहायला मी खूप उत्सुक होते. सगळे झोपल्यावर मी घाबरत घाबरत उठले. थोडे पुढे जाऊन पडक्या घराकडे पाहू लागले. बऱ्याच वेळ मी जागी होते पण भूत बाबा काही आला नाही. दुसऱ्या दिवशी मी बाबांना सांगितले की भूत वगैरे काही नाही. तुम्ही उगाच सांगता. मी मुद्दाम त्यांना काल जागी असल्याचे सांगितले नाही. नाहीतर ते ओरडले असते. 


माझ्या मनातील भुताला बघणे हे जातच नव्हते. मी ठरवले की दुपारी सगळे झोपले की त्या पडक्या घरात जाऊन पाहूया. दुपारी सगळ्यांचा डोळा चुकवून मी पडक्या घराजवळ गेले पण गावातील काही म्हातारी माणसे जवळपासच विडी फुकत गप्पा मारत होते. मला तिथे पाहून ते म्हणाले की, काय गं पोरी, इथे काय करते? मी बोलले, काही नाही असंच फिरतेय. मनात विचार केला हे इथे का आहे? ते म्हणाले की, या घराजवळ नको जाऊ, भूतबाधा होईल. हे ऐकून मी घाबरले आणि तिथून पळून घरी आले. घरी आल्यावर विचार केला की, म्हणजे बाबा खरं सांगत होते तर. मग मला रात्री का नाही दिसले? मी विचार केला की आज रात्री पण जरा निरीक्षण करूया. 


रात्री सगळे झोपल्यावर माझे निरीक्षण चालू झाले. तितक्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी जोराने ओरडून चेहरा हातात लपवून खाली बसले. म्हटले आता काही माझे खरे नाही. भूत मला घेऊन जाणार. बाबांनी सांगितलेले मी ऐकायला हवे होते. घाबरून मला देवाचे नावही आठवेना. राम राम म्हणण्याऐवजी मी राम नाम सत्य हे बोलली आणि मी काय अभद्र बोलली महणून मी जिभ चावली. तेवढ्यात मला नानीचा आवाज आला की अगं काय झाले? नानीचा आवाज आला म्हणून मी चेहऱ्यावरचा हात काढला आणि बघते तर काय सगळे माझ्या भोवती गोळा होऊन मलाच पाहत होते. 

मला म्हणाले की, तू का ओरडली? मी फक्त अवाक् होऊन पाहत होते. तितक्यात माझी बहिण म्हणाली की मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तर ती दचकून ओरडली. पुन्हा माझ्या समोर येऊन मला म्हणाली की, तू काय करत होती इथे. अजूनही मला थरथरत होते, वेळ मारून नेण्यासाठी मी म्हटले की पाणी शोधत होते. बहिण म्हणाली की तुझ्या खाटेखाली ठेवलंय ते. हाताला धरून मला माझ्या खाटेवर घेऊन आली. पाणी पिल्यावर मला जरा बरे वाटले. मी स्वतःलाच म्हणाले की हाश ती बहिण होती, भूत नाही. मग माझी भिती पळाली. दुसऱ्या दिवशी निरीक्षण करायचे ठरवून मी झोपले.

 

दुसऱ्या रात्री मी परत निरीक्षण केले. आधी भीती वाटत होती पण काहीच दिसले नाही. मग मी ठरवले की पडक्या घरात जाऊन पाहावे. दुसऱ्या दिवशी दुपारी सगळे झोपल्यावर मी हनुमानाचा फोटो हातात घेतला आणि निघाली. मनात ठरवले की भूत समोर आलेच तरी हनुमान माझ्या सोबत आहेच. भूत हनुमानाला घाबरतात असे मी नानीकडून ऐकलेले. पडक्या घराची गल्ली लागल्यावर आधी वाकून पाहिले तर कोणी रस्त्यावर नव्हते. खुश होऊन मी निघाले. घर जवळ आल्यावर मला जरा भीती वाटू लागली. जावे की नाही हा विचार करून मी तिथेच थोड्यावेळ घुटमळली. पण परत अशी संधी मिळणार नाही म्हणून हनुमानाला समोर धरून पडक्या घरात प्रवेश केला. 


आतमध्ये सगळे गवत वाढलेले. कचरा होता. मी मध्येच मागे वळून पाहि कारण न जाणो भूत असेल तर ते मागून येऊन धरेल म्हणून. नंतर मला अचानक आठवले की सिनेमात भूत छताला लटकलेले दाखवतात. घाबरत घाबरत वर पाहिले पण काहीच नव्हते. तितक्यात एका कोपऱ्यात हालचाल जाणवली. मी घाबरून हनुमानाला समोर केले. तिथले गवत हलत होते. जसे काहीतरी तिथून बाहेर येत होते. भितीने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. पळून जायची किंवा ओरडायची पण मला सूद नव्हती. मी जशी जागच्या जागीच थिजली. तिथून उंदीर बाहेर पडला आणि दुसऱ्या कोपऱ्यात पळाला. त्याला पाहून मला हायसे वाटले. ५-१० मिनट अजून थांबले पण तिथे भूत वगैरे काही नव्हते. हनुमानाला तिथे एका जागेवर ठेवून मी बाहेर पडले. 

मी बाहेर पडायला आणि माझ्या मामाला तिथून जायला एकच वेळ झाली. त्याला पाहून मी असले घाबरले. तो पळत माझ्याकडे आला, माझा हात धरून खेचतच घरापासून लांब घेऊन गेला. मग थांबून जोरात ओरडला की त्या घरात का गेलेली. मला काय बोलावे सुचत नव्हते. मी म्हणाले की, माझा बॉल गेलेला आत. त्यावर मामा म्हणाला की घर सोडून तू इकडे खेळायला का आली? आणि एकटीच? माझ्याकडून उत्तराची वाट न पाहता तो मला अक्षरशः पळवून घरी घेऊन आला. नानीला आवाज देऊन तिला त्याने सगळे सांगितले आणि लक्ष ठेव मी आलोच म्हणून पळत कुठेतरी गेला. नानी लांब उभी राहून मला रागवायला लागली जसे माझ्या अंगात भूत आहे. मी खाली मान घालून ऐकत होती. 


नानीचा ओरडण्याचा आवाज ऐकून माझे भावंडे बाहेर पडले. नानीने त्यांना दारातच थांबवले. बाहेर येऊ नका म्हणून दटावले. एव्हाना आजूबाजूचे लोक पण जमा होऊ लागले. त्यांना पाहून मी अजून मान खाली घातली. ते कुजबूज करू लागले की पडक्या घरात गेलेली ती आता काही भूत हिला सोडणार नाही. तितक्यात मामा गावच्या पंडिताला घेऊन आले. पंडित जोरजोरात मला ओरडून विचारू लागले की, का गेलेली पडक्या घरात. आता मात्र मी रडू लागले, मला पाहून नानी, माझे भावंडे पण रडू लागली. पंडितांनी माझ्या अंगावर पवित्र जल फेकले. अगरबत्ती लावली, रूद्राक्ष माळ गळ्यात घातली आणि मला म्हणाले की ही काढू नकोस. नंतर मामाला काही सांगून निघून गेले. 


त्यानंतर सगळे असे लांबून माझ्याकडे पाहू लागले. माझे भावंडे माझ्या जवळ पण यायला घाबरू लागले. त्यांना वाटत होते की माझ्यात भूत आहे. रात्री जेवताना पण सगळे लपून माझ्याकडे पाहू लागले. अंदाज बांधू लागले की मी अघोरीसारखे जास्त जेवले तर माझ्यात भूत आहे नाही तर नाही. रात्री मला नानी आणि बाबांसोबत एका खोलीत झोपवले ते पण दाराला आतून आणि बाहेरून कडी घालून. ८ दिवस असेच चालले. मी कंटाळले पण बोलू शकत नव्हते कारण मी भूत बघायला गेले होते हे कळले असते तर खूप हाणले असते मला. त्यांची खात्री पटली मग माझ्या भावडांसोबत मला खेळायला सोडले. मग थोडे दिवस मी भूताचे कुतूहल जरा बाजूला ठेवले. 


तिथे जिना होता गच्चीवर जायला आणि त्याच्या ८ व्या पायरीवर सिमेंटने एक नक्षी झालेली. माझी मोठी बहिण नेहमी तिथेच बसे. तिची आवडती पायरी म्हणजे माझी पण आवडती. एकेदिवशी शेजारी लग्न होते. तेव्हा लग्न अंगणात व्हायचे. आमच्या अंगणात बॅण्डवाले बाजा वाजवत होते. मी आणि माझी बहिण ८ व्या पायरीवर मला बसू दे म्हणून भांडत होतो. तसा माझ्या बहिणीचा माझ्यात खूप जीव. पण ती त्या दिवशी त्या पायरीवर मला बसूच देईना. मी पण हट्टाला पेटले. मी तिचा हात ओढू लागले. तिने हात जोरात झटकला आणि मी तोल जाऊन पडले. 


कसेबसे अंगणात पडण्याऐवजी २ पायऱ्या आधीच पडून थांबले. अंगणात पडली असती तर सगळ्यांना कळले असते आणि मार मिळाला असता तो वेगळा. माझी मोठी बहिण मी पडलीय तर मला उठवायचे सोडून रडत वर पळाली. ती का रडतेय हे बघायला मी माझीच उठून गच्चीवर गेले. तिला म्हटले, तू का रडतेय? ती म्हणाली की तुला माझ्यामुळे लागले. नंतर घाबरून मी तिला सांगू लागले की मला नाही लागले पण तू हे कोणाला सांगू नको. मला असे वाटले की हे कळले तर तिची धुलाई होईल. ती म्हणाली की नाही सांगणार पण तुला खरच लागले तर नाही ना? 


खरंतर मला डोक्याला टेंगूळ आलेले. पण तिच्यासाठी कोणालाच काय मी तिलाही न कळू देता सहन केलेले. आजही ते आठवून हसू येते की मला माझ्या दुखण्यापेक्षा तिची धुलाई होईल का हे टेन्शन होते आणि तिला तिची धुलाई होईल यापेक्षा मला किती लागले हे टेन्शन होते. आमचा एकमेकींवर लहानपणापासून खूप जीव आहे. 


आता गावी कोणीच नाही आणि घर पण नाही पण आजही ते सगळे आठवून हसू येते. बाबांचा चहा, नानीचे जेवण, शेत, हुरडा सगळे खूप आठवते कारण आता दोघेही हयात नाही. रात्री गच्चीवर झोपणे, चांदण्या पाहणे हे आता फ्लॅटमुळे शक्य नाही. भुतांवरचे प्रेम मात्र माझे अजूनही कमी झाले नाही. भुतांच्या गोष्टी ऐकणे आणि त्यांना शोधणे अजूनही चालूच आहे.


Rate this content
Log in