ती सावत्र २
ती सावत्र २


ती तशी खूप हुशार होती. स्पर्धा परीक्षामध्ये तर नेहमी पुढे असे. कधी तिला कळले की कुठे भाषण, स्पर्धा असतील तर ही तिच्या मैत्रिणीकडून पटकन भाषण लिहून देई. ते भाषण ऐकून कोणाला असे वाटेचना की हे तिने सराव न करता दिले. त्यामुळे सगळे शिक्षकपण तिला ओळखत. त्यातले एक शिक्षक गोडेसर तिला खूप आवडत. तेही तिची विचारपूस करत. ती कधीही ती दुःखी आहे असे दाखवत नसे. ती शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करे. तिला बघून कोणाला जाणवत नसे की ती आतून खूप दुःखी आहे. पण गोडेसरांच्या नजरेने तिचे दुःख आपोआप टिपले. त्यांनी तिला खूपदा विचारले पण ती काही नाही म्हणून हसून देई. पण आज तिला वाटले की त्यांना सांगावे तिच्या मनःस्थितीबद्दल. महणून टयूशनला जाताना तिने तिची डायरी सोबत नेली आणि टयूशन संपल्यानंतर त्यांना वाचायला दिली.
डायरी गोडेसरांनी वाचल्यावर त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी त्यांच्या बायकोलापण वाचायला दिली. दोघेही विचार करू लागले की ही आतून किती एकटी आहे. त्यानंतर सर टयूशन संपल्यानंतर तिला कधीकधी थांबवत. गोडे सरांच्या पत्नी तिला प्रेमाने खायला घालत. एकदा गोडेसरांकडून यायला तिला जरा उशीरच झाला तर तिची सावत्र आई दारातच तिची वाट पाहात होती. तिने नीताला प्रश्न विचारुन भंडावून सोडले. तिला धमकी दिली जर परत उशीर झाला तर ती तिच्या वडिलांना सांगेल.
दिवसामागून दिवस जात होते. कुणालची दहावी झाला आणि
तो पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेला. नीताला खूप वाईट वाटले कारण एकच तर होता जो तिच्या वडिलांसमोर तिची बाजू घ्यायचा. पण आनंदही झाला कारण त्याची प्रगती हाेईल. तोही फोन करून तिची नेहमी चाैकशी करे. याउलट अतुल जरा मठ्ठच होता. नीता घरी आली की त्याचा अभ्यास घेई. तिच्या वडिलांनी तिला तसे सांगितलेले. पण त्याला कमी मार्क आले की तिची आई तिलाच जबाबदार धरे. पुढे नीताची दहावी झाली आणि ती पण कॉलेजला जाऊ लागली. तिच्या आईला ते खूप खटकत असे. तिला वाटले की अतुल आधीच मठ्ठ आणि त्याच्यासाठीपण पैसा शिल्लक राहावा. तिने तिच्या वडिलांपुढे तिचे लग्न लावून द्यायचा तगादा लावला. पण तिच्या वडिलांनी ते साफ धुडकावून लावले. नीताला खूप बरे वाटले.
तिला ते कॉलेज खूप आवडले. तिच्या जुन्या मैत्रिणीपण तिथे होत्या आणि काही नवीनपण झाल्या. तिच्या मनात मुलांबद्दल आकर्षण वाटायला लागले. ते तर साहजिकच होते. ते वयच तसे होते. तिला वाटे इतर मुलींसारखे नटून यावे कॉलेजात. पण ती जरा नटली की तिची आई तिला खालून वर पाही आणि घालूनपाडून बोले. त्यातच तिला एक मुलगा आवडायला लागला. त्याचे वागणे-बाेलणे तिला मोहीत करायचे. त्याला बघत राहावे, असे तिला वाटे. तिचे एक मन तिला हे करू नये सांगायचे पण दुसरे मन तिच्यावर हावी होत होते.
ती तशी त्याच्याशी कधी बाेलत नव्हती पण चोरुन त्याला दुसऱ्याशी बोलताना ऐकायची.
(क्रमशः)