त्याचे जीवन
त्याचे जीवन


ही गोष्ट आहे एका माणसाची. त्याचे नाव सुनील. घरात सगळ्यात धाकटा. त्याच्या भावंडांची आधीच लग्न झालेली. हा त्याच्या वडीलांचा बांधकाम व्यवसाय पुढे नेऊ लागला. स्वभावाने अंत्यंत मवाळ. समोरच्याची चूक असेल तरी हाच माफी मारणारा. त्याच्या आई वडीलांना त्याचे हात पिवळे करायची घाई लागलेली. वयात आलेल सुकुमार संस्कारी मुलाला चांगली बायको मिळावी यासाठी कितीतरी स्थळे ते पाहत होते. शेवटी ३-४ गावात शोधल्यावर त्यांना मनाजोगती मुलगी मिळाली.ज्योतीषाला पत्रिका दाखवली. ज्योतिषाने त्याला खालून वर पाहिले. बहुतेक त्याला त्याच्या पुढील आयुष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज आलेला, पण ते अटळ होते. त्यांनी लग्न करायला होकार दया सांगितले. आईवडिलांना आवडली म्हणून त्याने पण हो म्हटले. महिन्याभरातच लग्न झाले.
त्याचा संसार सुरू झाला. तिचे नाव कविता. ती घरातील सर्व नीट पाही. सगळ्यांचा आदर करे. एकूणच दोघे एकमेकाला पूरक असे होते. फक्त ती इतकी भोळी होती की तिला कोणी काही सांगितले की तिला ते खरेच वाटे. हळूहळू पाणी घ्यायला जाताना, शौचास जाताना तिची गावातील बायकांशी ओळख झाली. ती सोबतीनेच सगळीकडे जाऊ लागली. त्याचे आईवडील पण तिच्याशी फार चांगले वागत. नातवंडे आल्यावर त्यांना खाऊ आणताना तिचे सासरे तिला पण खाऊ आवर्जून आणायचे.
तिच्या नवीन झालेल्या मैत्रिणी तिला विचारत, काय ग तुझी सासू कशी आहे? कशी वागवते तुला? ती म्हणायची की छान आहेत त्या. तिला बाकीच्या म्हणत की नवीन नवीन वागतात चांगले मग दाखवतील रंग. सगळ्या मिळून घरातल्या गोष्टी रंगवून सांगत. बस त्यांचे ऐकून ही पण सासरच्यांच्या हर एका बोलण्याला, वागण्याला त्यांच्या घरातल्या गोष्टींशी जोडू लागली. मनात गैरसमज करून घेऊ लागली. तिच्या मनातल्या गैरसमजांनी विषाच रूप कधी घेतले ते तिचे तिलाच कळले नाही. तिच्या मैत्रीणींपैकी एक जण कायमची माहेरी निघून गेलेली सासूच्या जाचाला कंटाळून. बस कवितेच्या डोक्यात पण तेच आले. दिवाळसणाला ती माहेरी गेल्या वर तिने घरी सांगून टाकले की आता ती परत सासरी जाणार नाही. पण घरच्यांनी तिला समजावून परत सासरी धाडले.
ती परत सासरी आली. परत सगळे जुळवून घेत राहू लागली. तिला दिवस गेले. सगळयांना खूप आनंद झाला. सुनील तिला घेऊन शहरातील डॉक्टर कडे आला. पण डॉक्टर ने त्यांना सांगितले की मुल जगणार नाही. ते मुल त्यांना पाडाव लागल. ती खूप दुखी झाली. सासूने तिला खूप समजावले की होईल पुन्हा. तिची काळजी घेऊ लागली. तिला खाऊ पिऊ घालू लागली. पण एका पाठोपाठ २ मुले तिला परत पाडावी लागली. तिच्या मैत्रीणी म्हणा
लया की तुझी सासू तुला काही बरेवाईट खाऊ घालत असेल. तिच्या डोक्यात तेच बसले. तिने माहेराला जाऊन येण्याचा तगादा लावला. त्यांनी पण परवानगी दिली की जरा आराम करेल. मग तिने माहेरी सांगितले की ती तिकडे आता कधीच जाणार नाही. तिची मनधरणी वगैरे सगळे करून झाले पण शेवटी घटस्फोट झालाच.
वर्ष होत आलेले म्हणून घरच्यांनी पुन्हा त्याचे लग्न लावून द्यावे असे ठरवले. त्याची संमती नव्हती पण आई वडिलांसाठी तो परत बोहल्यावर चढला. तिचे नाव सुनिता. पण नंतर त्यांना कळले की ती जरा मंद आहे. तिला जेवणपण बनवता येत नसे. त्याच्या आईने तिला खूप शिकविले पण तिला काहीच जमेना. ६ महिने होत आलेल्या लग्नाला पण अजून सुनेची एकही जबाबदारी तिला पार पाडता येईना. त्याच्या आईने कंटाळून तिला काहीतरी शिकवून पाठवा सांगून माहेराला पाठविले. खरंतर तिला सावत्र आई होती. वडीलपण तिच्याकडे फारसे लक्ष देत नव्हते. झाडेझुडपे वाढतात तशी ती वाढली. माहेरी तिची आई तिला बोलू लागली की अशी माहेराला येण्यापेक्षा तिकडेच जळून मेली असती तर आम्हाला त्यांच्याकडून पैसेतरी मिळाले असते. ती डोक्याने जरा मंदच होती. आईचे बोलणे तिने खरंच मनावर घेतले.
सासरी गेल्यावर भल्या पहाटे उठून दाराला बाहेरून कडी घालून अंगणात तिने स्वतःला जाळून घेतले. तिला दवाखान्यात भरती केले तेव्हा तिला तिने का हे केले असे वाटून गेले. ९०% टक्के भाजल्यामुळे ती वारली. सुनीलला, त्याच्या आईवडिलांना तुरूंगात टाकले. त्याला खूप दुःख झाले. आईवडील तर सुटले. पण त्याला ६ महिने तुरूंगात काढावे लागले. सुनिताच्या बापाने सुनिता वेडसर होती ही जबानी द्यायला लाख रुपये घेतले. तेव्हा कुठे ते सुटले. त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना काही महिने तुरूंगात राहून काढावी लागली. सुनीलला आईवडिलांना म्हातारपणी हे दिवस बघायला लागले म्हणून खूप वाईट वाटले.
५-६ वर्षे उलटली. घरच्यांना त्याचे एकाकीपण बघवत नव्हते. त्यांनी पुन्हा त्याचे लग्न लावून दयायचा चंग बांधला. तो नकोच म्हणत होता पण त्याच्या मवाळ स्वभावाने याहीवेळी घरच्यांपुढे हार मानली. नयना नावाच्या बाईशी त्याचे लग्न झाले. ती मुळातच हेकेखोर स्वभावाची होती म्हणून तिचे एवढे दिवस लग्न झालेले नव्हते. यांचे स्थळ आले तेव्हा तिच्या आईवडिलांनी यांना काही कळायच्या आत लग्न लावून दिले. आगीतून निघालेला फुफाटयात पडला होता. तो परत आगीत पडला. सध्या तो कसाबसा जुळवून राहतोय. पर्याय नाही. ज्योतिषाने त्याला तिसऱ्या लग्नानंतर सांगितलेले, ३ लग्नाचा योग होताच तुझ्या कुंडलीमध्ये पण बायकोचे सुख नाही.