संध्या
संध्या


घरी आधीच खाणारी दहा तोंडं त्यात स्वतःहून चालून आलेले स्थळ म्हणून बापाने जास्त चौकशी न करता संध्याचे लगीन लावून दिले. अर्थातच त्यात संध्याची मर्जी विचारली गेली नव्हती. संध्याचा पण त्याला नकार नव्हता. तिला परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. आपल्यानंतर आपल्या बहिणी पण लग्नाच्या आहेत हे जाणून तिने लग्न केले. वय आणि शिक्षणापेक्षा परिस्थिती माणसाला जास्त शिकविते. लहानपणीच मोठे म्हणून मन मारून जगायला शिकविते. जबाबदारी ही ओझे म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून निभवायला शिकविते.
संध्याच्या सासरीपण काही वेगळी परिस्थिती नव्हती. फक्त माणसे चांगली होती. कसेतरी नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारात संसार चालू होता, आजारी सासऱ्यांची औषधे चालू होती. तिचा नवरा एका खाजगी मिलमध्ये काम करायचा. कधी तेल नसे तर पाण्यात भाजी व्हायची. पण एवढ्या दयनीय परिस्थितीत एक गोष्ट त्यांना आनंदून गेली की तिला दिवस गेलेले. तिचा नवरा आता जास्त तास काम करायचा कारण संध्याने आता सकस आहार खायला हवा होता जेणेकरून बाळ सुदृढ होईल. सासूही बऱ्याचवेळा भूक नाही म्हणून तिच्यासाठी ज्यादा जेवण ठेवत असे. गरिबीच्या परिस्थितीमध्ये एवढे चांगले माणसे मिळणे म्हणजे एक प्रकारची कमाईच.
एवढ्या सगळ्यांची मेहनत, बलिदान कामी आले. संध्याने एका सुदृढ मुलाला जन्म दिला. आता तिचा नवरा अजून जास्त काम करायला लागला. पण कमी झोप, ज्यादा काम यामुळे कामावर त्याचे नीट लक्ष राहिले नाही. मशीनमध्ये काम करता करता त्याला अपघात झाला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. रोज रात्री उशिरा घरी येणारा तिचा नवरा आज संध्याकाळी लवकरच घरी आला. रोज सायकलवरून
येणारा आज चारचाकीमध्ये आला. रोज येताच हसणारा तिचा नवरा आज निपचित पडून होता. सगळे दुःख विसरून तो अनंतात विलीन झालेला. घरातल्यांनी एकच टाहो फोडला. परमदुःख ते कुटुंब आणि संध्या भोगत होतं. घरात खायला दाणाही नव्हता. अशा परिस्थितीत नवऱ्याचे दुःख बाजूला सारून संध्या उठली. तिने बाजूच्या एका इमारतीत धुण्याभांड्याचे काम धरले. छोटा राजू तिच्याशिवाय राहत नसे. त्यालाही ती कामावर नेत असे. काही बायका तिला याबाबत ओरडत पण तिचा नाईलाज होता. एकदा अर्धे भांडे धुतल्यावर मुलाला भूक लागली म्हणून तिने त्याला छातीशी धरले तर मालकीण बाई खूप ओरडल्या. बऱ्याचवेळा पोराला रडत ठेवून तिला काम करायला लागत असे. संध्या तरी काय करणार होती.
पण पैसे काही पुरेनात. तिने जवळच्या हॉटेलात पोळ्या बनवायचे काम धरले. हॉटेल मालकाला सांगितले की मुलालापण सोबत आणायला लागेल. मालक म्हणाला की स्वयंपाकघरात गॅस चालू असतो कायम, मुलाला नको आणू. पण तिने गयावया केल्यावर तो मानला. मुलाला भूक लागल्यावर ती तशीच त्याला छातीशी घेत पोळ्या करायची. इतरांच्या तशा नजरा आपल्या छातीवर खिळून आहे हे तिला जाणवायचे पण ती काय करणार होती? गरीब असले की लाज बाळगायची नाही. कामाची नाही की लोकांची नाही हे ती जणू आईच्या पोटातून शिकून आलेली.
सासू सासऱ्यांना, मात्र तिने नवरा गेल्यावर टाकले नाही. त्यांना जमेल तेवढी सगळी औषधे ती आणायचीच. कोण म्हणतं बायका काही करू शकत नाही. संध्यासारख्या बायका पोरगं कडेवर घेऊन आजही संसाराची लढाई लढताहेत, सासू सासऱ्यांना आईवडील मानून त्यांना पण सांभाळताहेत. संध्यासारख्या असंख्य बायकांना माझा सलाम.