सरिता-३ (सरीताचे लग्न)
सरिता-३ (सरीताचे लग्न)
बोरगावच्या नवरदेवाने डीजे आणि वरात मिरवणुकीत खूपच उशीर लावल्यामुळे बाभूळगावच्या तरुणा सोबत, संजू सोबत सरीताचे लग्न लावून देण्यात आले. यात बिचारीला किती मनस्ताप सहन करावा असेल हे केवळ तिलाच माहीत, आपल्या सारख्याला काय कळणार त्यातलं? झालं हे योग्य की अयोग्य याचा विचार करण्याच्या पलीकडे तिची मानसिक स्थिती झालेली होती. सायंकाळ पर्यंतही बोरगावचा नवरदेव मांडवात आला नाही तेव्हा आता आपल्या लग्नाचं काय? असा विचार तिच्या मनात येत होता. अशा तरुणा सोबत आपलं लग्न झालं तर आपण सुखी होऊ शकू का? असा आपल्याच मनाचं ऐकणारा, मनाप्रमाणे वागणारा, मनमानी करणारा, अशा पतीपासून सुखाची काय अपेक्षा करायची त्याच्या पत्नीनं? 'जे होतं ते बऱ्यासाठीच होतं' असं म्हणतात, ते कदाचित खरं असावं. असंही सरीताला वाटून गेलं.
बोरगावच्या मंडळीला त्यांच्या गावच्या शिवेपर्यंत सोडून तरुण परत आले. इकडे बाभूळगावच्या पाहुण्यांचे जेवण बाकी होते. तसेच गावातील तरुण मंडळी जेवायची बाकी होती. स्वयंपाक खूप लवकर केलेला होता. थंड झाला असेल म्हणून पुन्हा स्वयंपाक केला. अगदीच अडचणीच्या काळातून सर्वकाही गोड झाले म्हणून या सर्वांसाठी पुन्हा नव्याने गोड शिरा बनवला गेला. सर्वांचे यथेच्छ जेवण झाले. या स्पेशल पंगतीला संजू आणि सरीताला सुद्धा सोबत घेतले. सर्वांचे हसत खेळत जेवण झाले. नवरदेव नवरीला पुन्हा राहिलेल्या विधीसाठी लग्न मंडपात बोहल्या समोर बसवण्यात आले. चवरी भवरी, कन्यादान, सप्तपदी, हे कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे सुरू झाले. या विधी मध्ये सहभागी नसलेली पुरुष मंडळी निवांतपणे बाजूच्या वाळूच्या गंजावर बसले, आजचे घडलेले ताजे प्रकरण चघळत.
"कुणी काही म्हणा, पण त्या बोरगावच्या मंडळी सोबत हे जरा वाईटच झालं. लई अपमान झाला त्यांचा." बाभूळगावच्या मंडळी पैकी एक जण म्हणाला.
"अपमान? अहो, तोंडात मारल्या सारखं झालं असेल त्यांना. जेवणं झाले हे तरी बरं झालं, नाहीतर उपाशीच जावं लागलं असतं." दुसरा एकजण.
"मग मी म्हणतो, लग्नात दारू साठी खर्च करावाच कशासाठी? अन् तो डीजे? त्याची खरंच गरज आहे का? उगाच खर्च. आपल्या काळात मस्त वाजंत्री वाजायची. सूर सनईची मजा काही औरच होती, नाही का?"
"अहो, सूर सनईची मजा तर होतीच. पण ते नसेल तर बँड बाजा होताच. त्यातला ढोल वाजायला लागला की, अंगात आल्या सारखं डोलायला व्हायचं. माझ्या लग्नात बँडवाल्यानं ऐनवेळी धोका दिला अन् मग काय डफडे आणि सूर सनई. अहो काय मजा आली म्हणून सांगू?"
"हे आसलं काय नव्हतं बाबा. सनई आणि चौघडा वाजायचा, ब्राह्मण सांगंल तसं उजवा पाय डावा पाय पुढं टाकून पाटावर बसायचं. त्यो सांगंल तसं त्येच्या मांग मांग, 'मम, आत्मना' आसं कायतरी म्हणायचं.' त्येच्या नंतर सगळ्या मोठ्या माणसाईच्या पाया पडायचं. आन बायकुला घिऊन निंघायचं."
अशा गप्पा सुरु होत्या तेवढ्यात कुणीतरी एका किटलीत बगर दुधाचा मस्त काळा कुळकुळीत चहा घेऊन आले. एका जणाच्या हातात छोट्या आकाराचे कागदी ग्लास होते. त्यात तो चहा ओतायचा आणि प्रत्येकाच्या तोंडापुढं धरायचा.
"घ्या! पाव्हणं च्या घ्या."
"नगं, नगं ह्यो चहाचा टाइम हाय का? आमचं द्या लवकर आटपून. जाऊ द्या आता घरला. रात खूप झालीय. झोप येतीय."
"बस्स! झालंच आता. फकस्त पाय धुणाळ राह्यली. त्येवढं झालं की झालंच. सुरुवातच उशीरा झालीय, तरी बऱ्याच घाई घाईत चालू हाय सारं."
"जाऊं द्या ना राव! कुठं पायाला चिखल लागलाय कुणाच्या? कुठं पाय धुताय?"
"आसं करून कसं चालंल? परंपरा हाय ती. त्ये करावंच लागंल. बायकायचं काम लय बारकाईचं आसतं. त्येवढ्या साठी भांडणं हुत्यात लग्नात."
"बरं बाबा, चालू द्या तुमच्या हिशोबानं. आम्हाला काय तुम्ही जेव्हा वाटं लावाल तेव्हा जाऊ."
सर्वांचा चहा पिऊन झाला. चहा वाला निघून गेला. पुन्हा यांच्या पहिल्या सारख्याच गप्पा सुरु झाल्या.
"काही म्हणा, पण आपला संज्या लय भाग्याचा निंघाला. काही न करता आयतंच ताट वाढून आलं पुढं."
"व्हय नाही तं काय? शिक्याचं तुटलं अन् बोक्याचं बनलं. त्याला बी नशीबच लागतं."
"व्हय ना! शंकरराव दोन वरसापसून फिरत व्हत्ये पोरगी पाहात. एक दोन ठिकाणी तर हुंडा बी द्यायला तयार झालते. पर शेती कमी आसल्यामुळं कोण्हीच तयार व्हईना पोरगी द्यायला."
" आरं बाबा, जमाना लय खराब आला. पोरीच्या बापाला आजकाल लय भाव आलाय. सारं काही उलटंच झालंय. पह्यले पोरीच्या बापाच्या पायातले जोडे झिजत व्हत्ये, नवरदेव बघायला हिंडून हिंडून. पर आता घरी बसून त्यो लैच तोरा मिरवाय लागला."
"आमच्या एका पाव्हण्याची गोष्ट अशीच झाली पहाय. त्याह्यचा एकुलता एक मुलगा तालुक्याच्या ठिकाणी स्वतःचं दुकान टाकून बसला. दुकान व्य यवस्थित चालू रहावं म्हणून त्याने घराकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यो बापाच्या सोबत पोरगी पाहून आला. पोरगी पसंत केली. पोरीच्या बापाचं घर नुसतं विटा रचून वर पत्रे लावलेलं. पण मुलाचं घर पत्राचं म्हणून स्थळ नाकारलं, आत्ता बोला."
"चला, आटपलं वाटतं भटजी बोवाचं. नवरी, नवरदेव पाया पडायला येतायत." खरोखर नवरदेव नवरी जोडीनं पाया पडायला आलेत. साऱ्या वडील धाऱ्यांच्या पाया पडले. प्रत्येकाने आपापल्या खिशातून पाच रुपये, दहा रुपये त्यांच्या हातात कोंबले. सर्वांच्या पाया पडून झाल्यावर शेवटचा कठीण असा प्रसंग आला, नवरीला वाटं लावायचा.
बराच वेळ पासून गणपतराव गुमसुम झालेले होते. कुणाशी फारसे बोलत नव्हते. तेवढ्यात समोरून सरिता आली आणि त्यांना राहवले गेलेच नाही. त्यांना भरून आले होते परंतु त्यांनी बळेच दाबून धरले होते. सरीताला पाहून दाबून धरलेला हुंदका त्यांच्याही नकळत बाहेर पडला. सरिता त्यांच्या गळ्यात पडून मोठ्याने रडत होती. नकळत सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. आपापल्या रुमालाने प्रत्येक जण डोळे पुसत होते. आई, वडील, भाऊ, मावशी, आत्या, या सर्वांच्या गळ्यात पडून रडणे सुरू होते. तिचे असे रडणे ओसरत आले की कुणी तरी हळूच कळ करायची,
" रडू नको बरं बाई, डोकं बिकं दुखायचं. चांगलं नसतं एवढं रडणं. एक दिवस सगळ्याच पोरीयला जावं लागतं ह्ये सोडून." तिनं असं म्हणताच सरीताला आणखी रडू यायचं. तिच्या मैत्रिणी तिच्या गळ्यात पडायच्या काही न बोलता रड रड रडायच्या. तशा रडारडीत नवरदेवाची अवस्था अतिशय केविलवाणी होत असते, संजूची परिस्थिती काही वेगळी नव्हती. हे सारे वातावरण पाहून त्याच्याही डोळ्यात पाणी यायचं पण नकळत आपल्या रुमालाने तो डोळे पुसायचा. तिला 'चल' म्हणू शकत नव्हता आणि सोडून जाताही येत नव्हते. ब्रह्मगाठ जी बांधली गेली होती. ती अशीच थोडी सोडवता येते? बराच वेळ रडारड चालली. तेवढयात बाभुळगावचं कुणी तरी ओरडलं,
"बस करा आता. आटपा बरं. आधीच खूप उशीर झालाय."
शेवटी नवरदेव, नवरी गाडीत बसले. त्यांचे पाय धुतले गेले. दोन्ही कडच्या मंडळींनी एकमेकांना 'राम राम' केला. बाभूळगावच्या दोन्ही गाड्या आणि नवरदेव नवरीची गाडी रस्त्याला लागली.
गाड्या गावाच्या बाहेर जाई पर्यंत सर्व जण जागे वरच उभे राहून पहात होते. हळूहळू एकेक जण तिथून काढता पाय घेऊ लागला. एक दोन जण घरी गेले सुद्धा. आणि तेवढ्यात.....
"अरे, गणपतराव पडले. उचला कुणी तरी. पाणी आणा लवकर. पाणी पाजा."
"नको नको. पाणी नका पाजू. छाती चोळा त्यांची. गर्दी कमी करा. बाजूला व्हा बाकीचे. दवाखान्यात न्यावे लागेल त्यांना. गाडी बघा लवकर." अनुभवी एकजण म्हणाला.
सारी धावपळ सुरू झाली. एकदोन जण गणपतरावांची छाती चोळायला लागले. सारा गाव पुन्हा एकदा तिथे गोळा झाला. कुणी काही तर कुणी काही मनाला येईल ते बोलत होते. एक डॉक्टर, दामू अण्णांचे पाहुणे लग्नासाठी आलेले होते. ते दामू अण्णांकडे मुक्कामी थांबलेले होते, त्यांना कुणी तरी बोलावले. दामू अण्णा आणि डॉक्टर तिथे आले. डॉक्टर आल्या बरोबर बाकीची मंडळी बाजूला झाली. एकदोन जणांनी गणपतरावांना मंदिराच्या ओट्यावर घेतले. डॉक्टरांनी तपासणी केली. आपल्या जवळ असलेले एक इंजेक्शन दिले. त्याने थोडी तरतरी आली, तेव्हा त्यांना घरी नेले आणि एक सलाईन लावले. सलाईन मधून आणखी दोन इंजेक्शन सोडले. तासाभरात गणपतराव ठणठणीत बरे झाले.
"दिवसभराची दगदग आणि जेवणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे अशक्तपणा आला, तसेच बीपी लो झाला होता, काळजी करण्या सारखं काही नाही. दवाखान्यात जायचीही आवश्यकता नाही. थोड्या वेळाने त्यांना थोडे जेवायला द्या. दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या आहेत, त्या घ्या. नंतर आपण परत एकदा तपासणी करून घेऊ." डॉक्टरांनी जवळच्या गोळ्या दिल्या. इंजेक्शन आणि गोळ्यांचे पैसे घेतले. तपासणी फीस बद्दल विचारले असता,
"अहो, पाहुण्यांकडून पैसे कसे घेऊ? आणि मी काही दवाखान्यात नव्हतो. अनायासे येथे हजर होतो म्हणून हजर झालो. फीस कशाची घ्यायची? औषध इंजेक्शनचे घेतले की." असं म्हणत डॉक्टर निघून गेले.
"या कलियुगात अजूनही भली माणसं शिल्लक आहेत, म्हणून बरं आहे. नाही का?" दामू अण्णा म्हणाले.
"हो ना. ऐनवेळी शंकर रावांनी मनावर घेतलं म्हणून बरं झालं, सरीताचं लग्न उशिरा का होईना सुखरूप पार पडलं." अशोक शेठ.
"सगळं काही ठीक झाले. पोरीचं भलं झालं, चांगली माणसं भेटली. पोरीचं नशीब चांगलं म्हणायचं, दुसरं काय?" कुणी तरी बोललं.
"व्हय व्हय. पोरीचं नशीबच तसं. आक्शी मायच्या वळणावर गेली पोरगी. तिच्या मायचं लगीन बी आसंच झाल्तं. न्हाई का?" सखुबाई म्हणाली तसे सारेच भूतकाळात पोहोचले. सर्वांच्या डोळ्यासमोर सरीताची आई, गांगुबाईचे लग्न उभे राहिले. ......
क्रमशः
