सोहळा
सोहळा
छत्रीच्या काड्यांवरून ओघळणारे पाणी जमिनीवरच्या चिखलात पडत होते अन त्यातून उडणारे थेम्ब पांढऱ्या कपड्यांवर डाग पाडत होते. जमलेल्या लोकांच्या गैरसोयीपेक्षा व्हीआयपी म्हणून आलेल्या पाहुण्यांची तारांबळ जास्त होत होती. हातातले फुलांचे गुच्छ सावरत एकेकजण पुढे सरकत होता. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी चेंगराचेंगरीत आपले कॅमेरे सावरत हा सोहळा टिपत होते, या गोंधळाला टाळत सराईतपणे वृत्तांकन करत होते. नेते मंडळी ठेवणीतली वाक्ये फेकत वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
शहीद जवान स्मारक आज फुलांच्या माळांनी सजवले गेले होते. एरवी दुर्लक्षित असलेल्या स्मारकाची गेल्या आठवड्याभरात डागडुजी केली गेली होती. तुटलेल्या फरशींची जागा संगमरवरी फरश्यांनी घेतली होती. पुसट झालेली नावांना नवा सोनेरी रंग दिला गेला होता. दशकभरापूर्वीच्या वादळात कोसळून गेलेल्या दगडी कमानीच्या जागी लोखंडी कमान बसवण्यात आली होती. आजूबाजूला वाढलेली झुडुपे अन गवत काढून टाकून तिथे फरसबंदी करण्यात आली होती. आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. शेवटचे युद्ध संपून पंचवीस वर्षे होत होती. या निमित्त शहीद वीरांना मानवंदना देण्याचा हा कार्यक्रम होता.
एकवीस बंदुकांच्या फैरी झडल्या, खड्या सलामीत सैन्याच्या बटालियनचा ध्वज फडकला, सैन्य प्रमुखांनी आदरांजली म्हणून अग्नी प्रज्वलित केला, देशाचा झेंडा फडकवण्यात आला, आकाशाकडे पाहत सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले, शहराच्या महापौरांनी खणखणीत भाषण केले, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, नारेबाजी करण्यात आली,व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण केले व सर्वांना शहीद वीरांचा आदर्श घेऊन देशासाठी समर्पित राहण्याचा सल्ला दिला. पावसाने जसा जोर पकडला तसा सोहळा आटोपता घेण्यात आला. शाही इतमामात सोहळा संपन्न झाला.
शहीद स्मारकापासून निघणाऱ्या मोठमोठ्या वाहनांची एकच झु
ंबड उडाली. शिट्या व हॉर्न्स च्या आवाजांनी परिसर भरून गेला. थोड्या वेळानी सारे काही सामसूम झाले. मगाशी असलेली शेकडो लोकांची गर्दी आता मावळून गेली. आकाश सुद्धा आता निरभ्र झाले. संध्याकाळच्या सूर्याची किरणे त्या संबंध परिसरावर पसरली. लोकांच्या पावलांचे ठसे आता पुसटसे तिथल्या मातीत होते. संगमरवराचा रंग हि मातकट झाला होता. आदरांजली म्हणून वाहिलेल्या सुमनांच्या, हारांच्या पाकळ्या इतस्ततः पसरल्या होत्या. शहिद स्मारकांवरची ज्योत आता छान तेवत होती. पावसाच्या थेंबांच्यावर सूर्याची किरणे पडून परावर्तित होत होती अन त्यामुळे भवताल थोडा अधिक प्रकाशित झाला होता.
त्या वृद्धाने आपल्या बरोबरच्या वर्तमानपत्राच्या कापट्यातून आणलेला छोटासा हार त्या शहिद स्मारकाच्या चौथऱ्यावर ठेवला अन आधाराची आपली काठी सावरत डोळ्यांतले अश्रू टिपत त्या ज्योतीकडे पाहिले. खिशातून आणलेला आपल्या दिवंगत मुलाचा फोटो त्या चौथऱ्यावर काही वेळ ठेवला, त्याला न्याहाळले अन मग पुन्हा आपल्या खिशात ठेवला. आभाळाकडे पाहिले अन त्याने हात जोडले. काही क्षण तिथे घालवल्यावर तो वृद्ध तिथून निघून गेला.
थोड्याफार फरकाने सीमेच्या पलीकडे सुद्धा असाच सोहळा चालू होता, शहिद स्मारकाला आज तिथेही सजवण्यात आले होते. तिथल्या राष्ट्राध्यक्षाने हि लोकांना मातृभूमीच्या रक्षणाची शपथ देत जाज्वल्य भाषण ठोकले. बंदुकीच्या फैरी, पुष्पवृष्टी, मेणबत्या, झेंडावंदन, ज्योतप्रज्वलन सारे काही शाही इतमामानुसार झाले. पावसाच्या आगमनाची लक्षणे दिसू लागली तशी तिथली गर्दी हि पांगली. इथून गेलेले ढग आता तिकडे बरसू लागले होते.
तिथे हि एक वृद्ध बाप आपल्या शहीद मुलाच्या आठवणीत अश्रू ढाळत, त्याची तस्वीर सांभाळत, आधाराच्या काठीवर तोल सावरत त्या गर्दीला जाताना पाहत त्या स्मारकाकडे जायला खुरडती पावले टाकत होता. त्याचाहि कोवळा मुलगा पंचवीस वर्षांपूर्वीच्या त्या युद्धात मारला गेला होता...