तबाह
तबाह
हृदय तबाह करून तो त्या कुच्याबाहेर पडला, ती गल्ली त्याच्या रोजच्या रहदारीची, हि रोजची राहगुजारी त्याच्या सवयीची.त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिच्या तिलस्मि डोळ्यांच्या किनाऱ्यावरल्या सुरम्याच्या लकेरीतून अश्रुंचे काही थेम्ब गालावर ओघळले. तो आता पुन्हा येणार नव्हता हे तिला माहित होते. हृदयात कुणीतरी खंजीर खुपसावा अन तसाच न खेचता सोडून द्यावा, म्हणजे जीव हि जाणार नाही अन चैन हि पडणार नाही अशी अवस्था आता तिची झाली होती. या अलम दुनियेत 'सिताराबाईचे' हृदय जिंकणारा फक्त एकच होता, 'कुंवर अजयसिंग'. त्या तिच्या या आशिकाला आज तिने झिडकारून, फटकारून, पार बेइज्जत करून तिने त्याच्या कोठीवरून हाकलून दिले होते.
वयाची पस्तीस वर्षं तिने या हृदयाच्या तिजोरीचा पत्ता तिने कुणाला दिला नव्हता. तिचे कदरदान पार इराण, काबुल पासून ते तंजोरपर्यंत होते. तिच्या स्वर्गीय आवाजाचे तलबगार लाखो होते. कोलकात्यात आलात अन सितारा बाईचे गाणे ऐकले नाही असा रसिक विरळाच. हिंदुस्तानची मल्लिका ए तरन्नुम होती सिताराबाई. कोलकात्याच्या नामचीन जिसमफरोशीच्या मंडीत तिची माडी होती. तिची आई बेगम रुखसारबाई एक उच्चकुलीन तवायफ होती. हिंदुस्थानातल्या अनेक नवाब अन राजांचे पाय त्या कोठीला लागत अन अनेक रात्रींचे दिवस उगवत नसत. मुजरा गजरा अत्तर अन संगीत यांची लयलूट होत असे. अश्या सुगंधी रसिक वातावरणात सिताराबाईचा जन्म झाला होता. तवायफ आईच्या पोटी जन्म घेण्याचा शाप तर होताच. पैसा वस्त्र एशोआराम यांची ददात नव्हती, शिकवायला अनेक दर्दी संगीतबाज गवय्ये अन वादक अवतीभवती होतेच. रोजच्या रोज रंगणाऱ्या मैफिलींमुळे सिताराचा कान तर तयार झाला होताच. पण तवायफचे प्राक्तन म्हणून पाचव्या वर्षांपासून पायात चाळ बांधला गेला अन पुढ्यात पेटी आणून ठेवली गेली.
गळा गोड होताच, सुर प्रसन्न व्हायला वेळ नाही लागला. पाय हि असे थिरकायचे कि साक्षात गंधर्व खुश झाले असते. ती जसजशी मोठी होऊ लागली तसतशी या साऱ्यांत पारंगत होत गेली. रुखसार बेगम नी काटेकोरपणे तिला पडद्यातच ठेवली होती. पण फार काळ त्यांना ते शक्य झाले नाही. रुखसार बाईंचे वय हि वाढत चालले होते. अन आज ना उद्या हे करावेच लागणार म्हणून जराश्या नाखुशीनेच सितारा जगासमोर आली. पहिल्याच मैफलीत लखनौचा नवाब शमशाद सिताराबाई चा कायल झाला अन काही दिवसांतच तिची नथ उतरवण्यात आली. सितारा कधीच तो पसंत नव्हता. पण हि जगाची रीत म्हणून तिने हे सारे स्वीकारले. या अश्या विरोधाभासात तिने आपले गाणे जिवंत ठेवले. ती जेव्हा मालकंस गायला सुरुवात करे तेव्हा आसपासचे रस्ते शांत होत, आजूबाजूच्या कोठ्यांतून येणारा गोंधळ खुडबुड बंद होई, त्या ताना , त्या हरकती, त्या मुरक्या ऐकत ऐकणाऱ्याच्या तोंडातून अहाहा चा उद्घोष होत राही अन रात्र पार समेवर येई.
मोठमोठे गव्वये तिच्या तारिफीचे पूल बांधत, त्या कोठीच्या बाहेर संध्याकाळनन्तर वर्दळ लागे. वादकांचे हात थकत पण सिताराबाईचा आवाज थकत नसे. तिची मर्जी असलीच तर ती पायात चाळ बांधे अन काही वेळासाठी पदन्यास हि करी. हे ज्यांना पाहायला मिळे ते तर देव पाहिल्यासारखे खुश होत. तिचा चेहरा पाहण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळे. तिच्या अंतःपुरात येण्याची परवानगी फक्त काही कदरदानानंच मिळे. त्या साठी बेगम रुखसार ची मनधरणी करत हजारो रुपये खर्च करावे लागत.
अश्या या सिताराबाईला भावणारा एकही पुरुष नव्हता. कळायला लागल्यापासून तिने तिच्या मर्यादा, आब तिच्या मर्जीनुसार राखला होता. बेगम रुखसारला पण खडे बोल सुनवायला ती कमी करत नसे. तिला तिचे आशिक नको असत, तिला तिचे चाहते हवे असत. गाण्याची खरी ओळख असलेले, अभ्यासू असलेल्या लोकांशी ती तासनतास वेळ घालवी. पैसे मोजून तिच्या शरीराची आशा बाळगणाऱ्याना ती काही क्षणांत घालवून देत असे. वय वाढत चालले तशी बेगम रुखसार थकली अन सिताराबाई ची पकड त्या कोठीवर आली. पैसा अन प्रसिद्धी पायाशी लोळण घेत होती. पुरुषी तर्हा पाहून तिचे मन कडवट होत चालले होते पण धंद्याचे वसूल म्हणून साऱ्यांशी हसतखेळत ती या वातावरणात स्वतःला गुंतवून ठेवत होती.
एका रात्री मैफिल उत्तरार्धात असताना बाहेर गोंधळ उडाला. शिवीगाळीचे आवाज येऊ लागले, अन दारावरच्या दोन पठाणांना अक्षरशः जमिनीवर लोळवत तो आत घुसला अँड सरळ सिताराबाईच्या शेजारी बसलेल्या तबलजींच्या पुढ्यात येऊन पडला. बाजूला लोडाला टेकून बसलेल्या रईस पाहुण्यांपैकी कुणीतरी त्याचे नाव घेऊन त्याला दोन शिव्या हासडल्या. तोपर्यंत दारूच्या नशेत असलेल्या त्या अभ्यागताची शुद्ध हरपली. कपड्यांवरून व अंगावरच्या श्रीमंतीच्या लक्षणांवरून कुण्या बड्या घरचा हा मेहमान असावा असे वाटून सिताराबाईने त्याला त्या रात्री तिच्याच कोठीत पनाह दिली.
'' कुंवरसाब, गरिबांच्या घरी असे न कळवता येत नका जाऊ. या शहरांत तुमच्यासारखे बरेच रईस आहेत, त्यांचा अंदाज खराब होतो. '' , अगदी अदबीने पण नापसंतीनेच सिताराबाई त्या अभ्यागताला दुसऱ्या दिवशीच्या सकाळी बोलली.
'' माफी असावी , मी तुमच्याच शोधात होतो काल. तुमचा फक्त आवाज ऐकत होतो आजपर्यंत, मला तुम्हाला पाहायचे होते. म्हणून आलो...'' , एका दमात कुंवर अजय सिंग बोलून गेला.
सितारा एक क्षण त्याच्या कडे पाहत बसली. फार फार तर अठरा किंवा एकोणीस वयाचा हा मुलगा तिच्या समोर धिटाई दाखवत होता.
त्याच्या डोळ्यांत निळसर झाक होती. कपडे विस्कटलेले होते पण अंगावर कमखाब अन रेशीम होते. गळ्यात जाडजूड सोन्याचा गोफ होता. भाषेतला लहेजा लखनवी होता. वागण्यात अदब अन तहजीब होती.
त्यांनतर बराच वेळ ते फक्त एकमेकांना पाहत राहिले.
दुपारनंतर कुंवर निघून गेला, अन पुन्हा रात्र आणि मैफल समेवर असताना उगवला. अंगावर उंची कापडे, उंची अत्तराचा सुगंध अन दौलत जादा करण्यासाठी बऱ्यापैकी पैसे घेऊन तो आला होता. त्या रात्री सिताराबाईचा सूर देखील नेहमीपेक्षा वेगळा भासत होता. त्यात नेहमीची सहजता नव्हती तर थोडी चंचलता होती.त्या मैफिलीत आज सुरांचा नवा अविष्कार झाला होता. त्या स्वरांनी वातावरणात जादू पसरली होती.
त्यांनंतर कुंवर नियमितपणे त्या कोठ्याच्या पायऱ्या चढताना दिसू लागला. तो आता सिताराबाईचा खास मेहमान झाला होता. तो तिचा दिवाना झाला होता. तिच्याही मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली होती. तिच्या जवळपास अर्ध्या वयाचा हा पुरुष तिला भावला होता.दोघे एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकायला लागले होते.
...
'' सिताराबाई, त्यांच्या पिताजींची इच्छा आहे, कुंवरनी आता विवाहबंधनात अडकायला हवे. त्यांच्या कानापर्यंत कुंवरजी अन तुमच्या नजदिकीबद्दल गेलं आहे. त्याने ते थोडे नाराज आहेत. शेवटी एकुलता एक मुलगा आहे. तो असा किती दिवस तवायफच्या कोठीवर पडून राहणार?'' कुंवर अजय सिंगच्या वडिलांचा मुनीम सिताराबाईच्या समोर उभा राहून बोलत होता.
सिताराबाईनी एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला तसा तो वरमला अन सावरत म्हणाला, '' म्हणजे हे त्यांचे बोलणे पडले, माझं आपलं ... ''
सिताराबाई जागेवरून उठली ,'' मुनीमजी, तुमच्या मालकाला सांगा, त्यांचा मुलगा येईल परत त्यांच्याकडे लवकरच. अन हो हि तवायफ ची कोठी नाही, हि सिताराबाईची कोठी आहे, हे हि सांगा तुमच्या मुजोर मालकाला! ''
...
''कुंवरसाब, किती दिवस या कोठीच्या जीवावर फुकट रोटी तोडणार आहेस ?'' , सिताराबाई त्वेषाने बोलत होती.
'' सितारा काय झालंय तुला आज? प्रिये मी म्हटलं न काही दिवसांची गोष्ट आहे ... '', कुंवर सिताराबाईचे बाहू पकडून बोलत होता.
'' मी आज काहीही ऐकून घेणार नाही, हि सिताराबाईची कोठी आहे, धर्मशाळा नाही कि तुझ्यासारख्या अनाथांनी येऊन महिनेमहीने पडून राहावे. '' सिताराबाई फणकाऱ्याने म्हणाली.
'' सितारा, असं कसं बोलू शकतेस तू माझ्याशी, या हातांनी मी तुझ्यावर हजारो रुपये उधळलेत, अन त्याहून हि जास्त मी प्रेम करतोय तुझ्यावर...'', कुंवर काकुळतीला येऊन बोलत होता.
'' नकोय मला तुझे हे असं गरीब प्रेम, चाहत्यांची कमी नाही मला या शहरात अन लाखो रुपये उधळणाऱ्यांची हि, तू गेलास तर दहा उभे राहतील रांग लावून... '' , सिताराबाई अगदी कुत्सितपणे म्हणाली.
कुंवर अजय या बोलण्याने तळमळून उठला अन त्याने दिलेल्या धक्क्याने सितारा जाजम्यावर कोसळून पडली.
सिताराबाई कुंवरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अश्रूना रोखण्याचा प्रयत्न करत होती. तो हेलकावे खात त्या कुच्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता जणू वाळलेले पान झाड्याच्या फांदीवरून तुटून खाली पडले. आयुष्यातलं पहिले प्रेम असं निसटून जाताना पाहताना तिच्या डोळ्यांतून आसवे टपटपू लागली.
त्या रात्रीची मैफिल स्वर्गीय होती. त्या रात्रीइतकं हृदयाला हात घालणारं गाणं कधी झालं नव्हतं असं तिच्या चाहत्यांना वाटलं, त्यांना कुठे माहित होते कि त्या रात्री सिताराबाईचं हृदय गात होते. त्या रात्रीनंतर कधीच त्या कोठीतून गाण्याचे सूर ऐकू आले नाहीत...

