लेट्स बी इन टच
लेट्स बी इन टच


काल एका मित्राच्या फियॉन्सेने मेसेज केला. त्याचा वाढदिवस जवळ येत आहे तर तिला या लॉकडाऊनच्या काळात त्याला जरा हटके सरप्राईज द्यायचंय अन् त्यासाठी मी तिला त्याचा जुना फोटो अन् एक मेसेज लिहून द्यायचा आहे. आता ही पंचाईतच म्हणा, कारण मित्र चांगलीच चार-पाच वर्षे भारताबाहेर राहिलेला, त्या काळात तो आम्हाला भेटल्याचे आठवत नाही, मग फोटो कुठून मिळणार. शेवटी मी माझे सर्व इमेल्स धुंडाळले. ड्राइव्हमध्ये सेव्ह करायला का कुणास आजदेखील सरावलो नाहीय तर १०-१२ वर्षांपूर्वी कधी सेव्ह करणार. शेवटी सगळे जुने मेल्स उकरले. अन् काही फोटो सापडू लागलेले. आमच्या ग्रुपमधल्या त्या काळात टेक्नोसॅव्ही असलेल्या मित्राने कॉलेज संपल्यावर तीन-चार वर्षांनी पाठवून ठेवलेले अगदी १५-१६ वर्षांआधीचे फोटो. काळ झरझर मागे गेला. प्रचंड नॉस्टॅल्जिक झालोय, आता रात्रीचे दोन वाजून गेलेत अन् मी त्या जुन्या काळात रममाण झालोय.
मध्यंतरी एका न्यूरोसर्जरीमुळे मधल्या काही वर्षांचे डिटेल्स पुसले गेलेत स्मरणातून. तुम्हाला सांगू दोस्तांनो, प्रचंड खजिना हाती लागल्यासारखे झाले हे फोटो पाहून, त्या मित्रालाच त्याचा फोटो दाखवला तर तो ओळखेल की नाही ही शंका आहे, एक लिस्ट सापडलीय ज्यात जुन्या मित्रांचे नाव आणि संपर्क लिहिलेत. यातले कित्येकजण तर सोशल मीडियावरदेखील सापडत नाहीयेत, कित्येकांना मी मेसेज केलेत पण आता त्यांचे चेहरे पार बदललेत, माझ्याही चेहऱ्यात कमालीचा बदल झालेला असावा.
पण या फोटोंमुळे काही काही गोष्टी आठवू लागल्यात की हा फोटो साधारण कधी घेतला होता, कुठली वेळ होती, कुठली जागा होती, पूर्वीच्या VGA किंवा १ किंवा १.५ मेगापिक्सेल कॅमेरातून घेतलेले फोटो आहेत हे. त्यामुळे यांना खरा अर्थ आहे. अगदी निरागस फोटो आहेत. आम्ही सारे १५-१६ वयाचे असू तेव्हा, मोबाईल काहीच जणांकडे असण्याचा हा काळ होता. घरापासून दूर राहणारे गरजेपोटी हा फोन बाळगत किंवा ज्यांच्या आई-बापांनी मुलांनी दहावीला चांगले मार्क काढले तर मोबाईल घेऊन देईन या बार्गेनिंगचा मोह ज्या मुलांना दिला होता त्याच कार्ट्यांकडे मोबाईल असायचे अन त्यातल्या त्यात कॅमेरावाले मोबाईल म्हणजे चंगळच. काय तो रुबाब, काय तो भाव असायचा या महानुभावांचा. मॉडेल पण काय नोकिया ३११०, ११३०, ६५१०, कायच्या काय... त्यावेळी सोनी एरिक्सन वगळता इतर कोणती कंपनी मार्केटमध्ये नसायची. रिलायन्सने, कर लो दुनिया मुठ्ठी मे म्हणत ते एक डबडं मोबाईल वाटायच्या पण आधीचा हा काळ, पार सापशिडीच्या गेमचे पण अप्रूप वाटायचं राव... पोरी अजून पण टी शर्ट आणि जीन्स मोजके वार ठरवून घालायच्या, बाकी सारा वेळ पंजाबी सूटच्या ओढण्या सांभाळत यायच्या एवढा वाईट काळ होता तो. तर या अशा प्रिमिटिव्ह, पार प्रागैतिहासिक माहोलवर आमच्या कॉलेजचे दिवस चालू झालेले. मित्रांनो खरे सांगतो, नंतरच्या आयुष्यात तीन कॉलेज बदलली पण त्या दिवसांची सर इतर कुठल्याच कॉलेजच्या दिवसांना नाही
. मोबाईलचा विषयच पार दुर्मिळ असल्याने अख्या पिढीकडे अजूनही बरेच मनोरंजनाचे मार्ग उपलब्ध होते. पोरांच्या माना ताठ असायच्या त्यामुळे बागेतल्या हिरवळीकडे उत्तम लक्ष असायचे. मुलीही पार टवटवीत असायच्या. मेकअप न करताही काही मुली (सगळ्याच नाही) इतक्या गोड दिसायच्या की क्या कहने...
तर या साऱ्यांत मित्र असणे मस्ट, बरे आम्ही जुनिअर कॉलेजला असल्यामुळे पार ग्रुपिझम हा विषय डोक्यात घुसला नव्हता त्यामुळे पोरे सगळी जमिनीवर असायची. अन् यातूनच चांगल्या मैत्रीची सुरुवात झाली. दोन वर्षांत आम्ही सारे एकमेकांचे मित्र झालो होतो, कोवळ्या वयात एकमेकांच्या सुख-दुःखाचे साक्षीदार झालो. ही मैत्री आता आयुष्यभर पुरेल.
मित्रांनो, थोड्याफार फरकाने तुमचेही असेच असेल. गतकाळ सुटल्याची खंत अन् म्हणून त्या जुन्या आठवणींची, ठिकाणांची ओढ वाटणे फार स्वाभाविक आहे. मी माझ्या कॉलेजच्या दिवसांत एक सुंदर पण विचित्र प्रसंग पाहिला होता. साधारण डिग्री कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे ते दिवस, त्यासाठी तंगडतोड चाललेली असायची. फॉर्म घेऊन रुईया महाविद्यालयाच्या समोरच्या मैदानाच्या कट्ट्यावर मी माझ्या मित्राबरोबर गप्पा मारत बसलो होतो. एक साधारण एक कपल आमच्यापासून दहा पावलांवर बोलत बसले होते. संध्याकाळ होत आलेली अन कट्ट्यावर अन् फुटपाथवर गर्दी बऱ्यापैकी होती. पण त्याचवेळी एक अलौकिक गोष्ट घडली. त्या जोडप्यांतला तरुण उभा राहिला अन् तिच्या समोर उभा राहून त्याने तिच्या मानेभोवती हात गुंफले, अन तिचे एक दीर्घ चुंबन घेतले. मी अन् माझा मित्र अवाकपणे त्यांच्याकडे पाहू लागलो, चालणारी गर्दीची गतीही थोडी मंद झालेली वाटली. मागे खेळणारी मुलेही चुळबुळू लागली अन बस स्टॉपवरच्याही माना वळल्या. काही क्षणांचा हा सारा खेळ, पण बऱ्याच जणांसाठी तो धक्का असेल यात शंका नाही. तुम्ही म्हणाल यात काय एवढे, हे तर काय शहरांच्या कट्ट्यावरचे नेहमीचेच दृश्य... पण त्या दोघांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट होती... ते म्हणजे त्यांचे वय साधारण पन्नाशीच्या पलीकडले होते. सर्वसाधारण घरातल्या एका कर्त्या पुरुषाचे पोट जसे सुटलेले असते, डोक्यावरचे केस करडे विरळ झाले असतात तसा तो ही होता, ती देखील बाळंतपणे अन् मुलांचे संसाराचे करून दमलेली निस्तेज अन् बेढब वाटत होती. पण तरीही मी त्यांना तरुण म्हणतो कारण वय ही संख्या आहे, अन् हे मी त्यांनाच पाहून शिकलो त्या दिवशी... ते कदाचित नवरा-बायको असतीलही किंवा असेच फार वर्षांनी भेटलेले कॉलेजच्या दिवसांतले प्रियकर-प्रेयसीही असतील, ज्यांनी त्याच महाविद्यालयाच्या साक्षीने आजही आपले प्रेम जिवंत ठेवले असेल...
तर हा असा नॉस्टॅल्जिया...
मित्र हो, या मनाच्या जाणिवे-नेणीवेच्या तळाशी किती मोठा महासागर अन् त्यातदेखील आत खोल एक डोह आहे ज्यात अशा अनेक आठवणी पडलेल्या आहेत. तुमच्या मनाला साद द्या... बघा, ओ मिळते का... लेट्स बी इन टच...