भुरळ
भुरळ
शिवालयाच्या पायऱ्या चढता चढता तो एकदम थबकला. समोरून लगबगीने तात्या येताना दिसले. उंचेलसे अंगाने बारीक तात्या आता थोडे वाकलेच होते. सकाळची ही वेळ त्यांच्या पुजेची असते. गेली कित्येक वर्षे त्यांचा हा नियम कधी चुकला नसावा. आजही इतक्या वर्षानंतरसुद्धा त्यांना इथे पाहिले म्हणजे नक्कीच ते येत असणार. तात्या झरझर पायऱ्या उतरून त्याच्या बाजूने निघून गेले. त्यांनी त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. नक्कीच त्यांनी ओळखले नसावे. आता इतकी वर्षे झाली त्या गोष्टीला बाबांच्या एका निर्णयामुळे गाव सोडावा लागला. बिघडले तसे काही नव्हते उलट शहरात गेल्याने चांगले शिक्षण मिळाले अन नोकरीही सहज मिळाली. गाव तेवढा कायमचा सुटला. पण बाबा येत राहिले अधून मधून. जमिनीच्या देखभालीसाठी. जेवढी वर्षे पिकवत होते तोपर्यंत ठीक होती नंतर मात्र तण वाढले. बाबाही थकले त्यांनीही विश्रांती घेणेच पसंत केले, अन सरतेशेवटी जबाबदारी त्याच्यावरच पडली. अन बऱ्याच वर्षानंतर त्याच जमिनीसाठी त्याला थोड्याशा नाखुषीनेच यावे लागले.
एरवी तो कदाचित आनंदी असता. गावी यायचेय पुन्हा असे म्हटल्यावर तो एका पायावर तयार असता. पण आताच लागलेली नोकरी आणि त्यातही जबाबदारीचे पद म्हटल्यावर सुट्टी घेणे त्याच्या जीवावर आले होते. दादाला सांगून पाहावे म्हणून त्याला कॉल केला तर वहिनीने उचलला. आईशी वाजल्यापासून आजकाल वहिनी त्याच्याशीही तुटक बोलू लागली होती. दादा दिल्लीला गेलाय असे काहीसे सांगून तिने फोन ठेवलाही. सदाण्णाने तातडीने ये म्हणून सांगितले होते. कुठलासा सरकारी प्रोजेक्ट येतोय असे म्हणत होता बाबांना. आजकाल त्यांना ऐकू कमी येते. वर सदाण्णाचा फोन लागेना म्हणून त्याने कशीबशी दोन दिवसाची रजा मिळवली आणि पहाटेच्याच गाडीने तो इथे निघून आला.
गावात शिरता शिरता एवढ्या वर्षांत गावात झालेले बदल त्याला दिसू लागले होते. फाट्यापासून सुरु झालेल्या डमडम हा एक मुख्य बदल. नाहीतर पूर्वी तीन-चार किलोमीटर चालत यावे लागायचे. आता पाच रुपये दिले की अगदी ग्रामपंचायतीच्या ऑफीसापर्यंत आणून सोडतात. रस्ता पण बराच सुधारला होता, नाहीतर पावसात याच रस्त्यावर पोटरीपर्यंत चिखल असायचा. आता डांबर टाकून चकचकीत केला होता रस्ता. समोर सरपंचाच्या दारासमोरली अम्बेसेडर जाऊन नवी टोयोटा आणि होंडासिटी आली होती. त्याच्या पुढे पाटलाच्या अंगणात जीपचा सांगाडा तसाच धूळ खात पडला होता. याच जीपमधून पाटील आख्ख्या तालुक्यात फिरत असत. मागच्याच वर्षी ते मेल्याचे बाबांकडून कळले होते. त्याच्या वाड्याखाली क्वालीस, होंडासिटी झुलत होत्या नि बाजूला एक मोठा अजस्र बुलडोझर उभा होता. आता याही धंद्यात आले वाटते, तो मनाशीच म्हणाला.
नूरभाईच्या स्टोव्ह रिपेरिंगचे दुकान जाऊन त्या जागी सलून आले होते. आणि त्याला खेटून आणि समोर मिळून पंचवीसेक दुकाने तयार झाली होती. बाजारच तयार झाला होता. पंचायतीच्या ऑफिसात तो घुसला तेव्हा सकाळचे दहा वाजत होते. एक पोरगेलसा कारकून तिथे रजिस्टरमध्ये काहीतरी खरडत होता.
'माफ करा.' असे त्याने म्हणताच त्या माणसाने त्याच्याकडे अचंब्याने पाहिले. उत्तरादाखल काही बोलायचे असते हे बहुदा त्या बिचाऱ्याला माहित नसावे हे जाणून त्यानेच सांगायला सुरुवात केली...
'मी शिदाप्पांचा मुलगा...'
'शिदाप्पा अण्णाचा का? कोण दिनेश भाऊ का?'
'नाही नाही माधव, दिनेश माझा मोठा भाऊ.'
'तेव्हाच दिनेश भाऊंनी ओळखले असते न मला पटकन...'
'तुम्ही?'
'मी शिरीरंग, दिनकर नानांचा मुलगा...'
'अच्छा अच्छा, कसे आहेत नाना?'
'जुने खोड ते, आहेत टामटुमीत, आता काय फक्त खायचे नि झोपायचे, तुम्ही सांगा शिदाप्पा अण्णा कसे आहेत?'
'मजेत. अधे मध्ये वयामुळे थोडा होतो त्रास. बाकी सर्व नॉर्मल...'
'बरे काय काम काढलंत?'
'सदाण्णा म्हणत होता की गावात सरकारी प्रोजेक्ट येणार आहे आणि आपली जमीन त्यात जाणार म्हणून..'
'..खूळा का काय तो, प्रोजेक्ट येणारेय पण तुमची जमीन थोडीच जाणारेय...'
'हुश्श, वाचलो बुवा. नाहीतर या सरकारी प्रोजेक्टची भन... एकतर जमिनीचे पैसे बाजारभावाने देणार नाहीत आणि वर सरकारदरबारी खेटे मारायला लागतील ते वेगळे...पण कसला प्रोजेक्ट येतोय?'
'काय ते नीटसे माहित नाही पण वीज बनवणार म्हण
त होता सरपंच. त्यांचे ऑफिसर लोक येतात न गावात अधनं मधनं सूटबुटात...'
'सरकारी लोक सुटाबुटात...'
'नाही नाही प्रायव्हेटवाले पण येतात न, फोरेनर पण येत्यात. सरपंच नि पाटील दोघं बी फिरत असत्यात त्यांच्या पाठी...'
'आपली जागा नक्की नाही गेली न?'
'थांब हा तुम्हाला सर्वेच दाखवतो.' असे म्हणत त्याने टेबलाखालून एक सुरळी केलेला एक कागद काढला आणि उघडून टेबलावर पसरला.
'हा इथे सदाण्णाचा बांध संपतो आणि त्या नंतर तुमची जमीन चालू होते, बरोबर?'
'हं..'
'मग नाय जात न. सदाण्णाच्या जमिनीपर्यंतचीच जमीन हाय न प्लानमध्ये...'
...पंचायतीच्या पायऱ्या उतरताना त्याला बरे वाटत होते पण तरीही त्याला खंतही वाटत होती. सदाण्णाची संपूर्ण जमीन प्लानमध्ये जात होती. याच जमिनीवरून तर बाबा आणि सदा अण्णांच्या वडिलांचे, नरहरी काकांचे वाद झाले होते. शेवटी ती दहा एकर जमीन नरहरी काकांना देऊन बांधापलीकडल्या पडीक जमीनीचा तुकडा घेऊन बाबांनी वाद मिटवला. आणि त्याच आठवड्यात गावाला राम राम ठोकून मुंबईत आले…
नरहरी काकांनंतर सदाअण्णा पाहत होता जमीन. तो सगळ्या भावंडात मोठा. त्याचा संसार. बहिण विधवा होऊन माघारी आलेली, तिची दोन पोरे अशी आठ तोंडे घरात खायला. तसा खाऊन पिऊन सुखी होता. त्याचा मोठा मुलगा आताच कंपनीत कामाला लागला होता. बरे चालले होते त्याचे. पण आता संपूर्ण जमीन जाणार तर अण्णाचे उत्पन्नच संपणार, या विचाराने तो काळजीत पडला.
'सदाअण्णा...'
'आलो हो...' सदाअण्णा हातातली चोपडी सारून बाहेर आला.
'ये ये माधवा, बस.' त्याने एक लाकडी खुर्ची पुढे सरकवली, 'तुझीच वाट पाहत होतो बघ...'
'अण्णा, आताच पंचायतीच्या ऑफिसात जाऊन आलो. ते जमिनीचं पाहून आलो. थोडक्यात बचावलोय. पण तुझी जमीन जातेय अख्खी...?'
'हो, संपूर्णच जातेय. त्यांना इथे इलेक्ट्रिसिटीचा प्लांट बनवायचाय.'
'बरोबर… पण सदाण्णा कसे होईल रे तुझे? एवढ्या माणसांची जबाबदारी… जमीन आहे तोवर पिकवतोयस. नंतर काय?'
'माधवा, नंतर काय याचे आता टेन्शनच नाही. भरघोस मोबदला देताय ते या जमिनीचे. आणि वर त्याच प्लांटमध्ये नोकरीसुद्धा. अजून काय पाहिजे?'
'पण जमीन कायमची जाणार न हातातून...'
'जाऊ दे रे, तसे पण काय राहलंय त्या जमिनीत. आजकाल काय उत्पन्नपण येत नाही. वर्षाकाठी सगळ्यांना पुरेल एवढेच कसेबसे निघतेय. उत्पन्न असे काही नाही बघ.'
'पण, एकतरी जमिनीचा तुकडा असावा रे एवढा मोठा प्रपंच आहे तुझा. उद्या त्यांनी कुठे संसार थाटायचे?'
'त्याचा विचार येतो कधीकधी, पण ज्याने चोच दिली तो दाणाही देणार. आणि आख्ख्या गावाचे मत पडलंय, की जमिनी द्यायच्याच. आणि रेटपण तेवढाच भारी दिलाय न माधव त्यांनी, एकराला पंधरा लाख रुपये, म्हणजे बाजारभावापेक्षा लाखभर रुपये जास्तच. करोडपतीच होतोय न मी.'
यावर त्याला काय बोलावे सुचेनासे झाले.
'बरोबर…' एवढेच बोलून माधव गप्प झाला. ताटे आली तसा जेवून सदाण्णाचा त्याने निरोप घेतला अन झपझप पावले टाकत मुख्य रस्त्याकडे चालू लागला. रस्ता आता चांगलाच रखरखत होता. दुपारचे झुकते ऊन चांगलेच चटके देत होते.
'...बिल्डरने ऑफर दिल्यापासून वाडीत उत्साह संचारला होता. रतनकाका तर जणू लीडरच झाला होता. पटापट सगळ्यांनी सह्या केल्या. वाडीत एकूण पन्नास घरे. पण चांगली ऐसपैस. दोन-तीन खणांची, ज्याला जमतील तशी बांधलेली. पण बिल्डरची ऑफर मस्तच होती. वन बिएचके आणि वर पन्नास लाख आणि बिल्डींग बांधून होईपर्यंत घराचे भाडेही देणार. सगळे मान्य. पण एकटे बाबा नडले, नाही म्हणाले. ते म्हणत होते, अरे जमीन जातेय तुमची. कशाला इमल्यांची स्वप्ने बघता. पैसे काय आज आहेत उद्या नाहीत. पण कशीही असली तरी मुंबईसारख्या ठिकाणी अशी ऐसपैस घरे आहेत. पण कोणी ऐकले नाही. मीही. नाखुषीनेच शेवटी हो म्हणाले... आणि आधी प्रायव्हसी मिळत नाही म्हणून नंतर फ्लॅटच्या मालकीसाठी वहिनी भांडू लागली. मग वेगळी झाली. पन्नास लाख कसे, कधी संपले तेच कळले नाही...'
'टेप' आला तसा तो थबकला. आता गाव शेवटचा दिसणार, म्हणून शेवटचे वळून पाहावे म्हणून तो मागे वळला. एकवार त्याने सगळीकडे नजर फिरवली. दूर सदाण्णाच्या घराची कौले दिसत होती…