घात
घात
'मानवी जीवांच्या आपापल्या तऱ्हा आहेत. आपापल्या विचारपद्धती आहेत. कोणाला कशात स्वारस्य वाटेल आणि कशाचे दुःख वाटेल हे सांगता येत नाही.या अश्या भानगडीत देखील दोन अनोळखी जीव एकत्र येतात.त्यांच्यात मैत्री होते, स्नेह तयार होतो अन प्रेमभाव निर्माण होतो हि आश्चर्याची गोष्ट आहे. अन या स्नेहाचे, प्रेमाचे वैषम्य वाटेल, असूया वाटेल असेही जीव या जगात आहेत.'
रात्रीच्या अंधारात चिखल तुडवत ते दोघे वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळत होते. हृदयाचे ठोके अजूनही जोरजोरात पडत होते. तांबडं फुटायला अजून थोडासा अवकाश होता. वारा भुरभरत होता अन त्यामुळे त्या दोघांच्या घामाने ओल्याचिंब झालेल्या शरीरांत अजून शिरशिरी येत होती. लवकरात लवकर त्यांना हमरस्ता गाठायला हवा होता तर तिकडे त्यांना एखादा दूध घेऊन जाणारा ट्र्क मिळाला असता किंवा एखादी सकाळची आडगावकडली एसटी तरी मिळाली असती. पार जिवाच्या आकांताने धावणाऱ्या त्यांनी एकमेकांची साथ अजूनतरी सोडली नव्हती. पायांच्या पोटऱ्यानी कधीच जवाब दिला होता तरी थांबलो म्हणजे संपलो हे त्यांना माहित होते अन ती भीतीच त्यांना पळायला बळ देत होती.
'' सिद्धार्थ, थांब न थोडं.'',ती ओरडली तसा तो थबकला. मागे वळून त्याने तिला सावरले.
'' नाही चालवत रे, पाय गळून गेल्यात रे!'', तिने त्याच्या कुशीत स्वतःला झोकून दिले.
'' अंजु, चल कि, हायवे जास्त लांब नाही. मिळेल तिकडे काहीतरी. एकदा शहरापर्यंत पोहचलो कि काही चिंता नाही बघ.'', तो तिचा हात हातात घेत म्हणाला.
तिने त्याच्या डोळ्यांत पाहिले. डोक्यावरच्या जखमेतुन ओघळलेले रक्त त्याच्या डाव्या पापणीवर येऊन साकळले होते. तिने पटकन तिच्या ओढणीने ते पुसले. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले. तसा तोही भांबावला. पण त्याने स्वतःला सावरले. तिच्या धपापणाऱ्या छातीची आवर्तने त्याच्या मिठीत शांत होत होती.
'' अंजु, तुझ्या घरचे मला जिता नाही सोडणार जर आपण आता सापडलो तर...'' तो कळवळ्याने म्हणाला.
'' अस नको न बोलू.'', ती रडवेल्या स्वरात बोलली.
'' ... दादा आईची काय हालत झाली असेल गं... नाही सोडलं असणार तुझ्या पप
्पाने... '' , असं बोलून तो हमसून हमसून रडू लागला.
'' मी भुलले रे त्यांच्या बोलण्याला...आईच्या आजारपणाचे नाव सांगून हे असं करणारेत हे माहित असतं तर कधीच नसतो आलो असतो रे राजा आपण इथे...'' , असं म्हणत तिने त्याला मिठी मारली. तिच्या खांद्यावर त्याच्या अश्रूंचा महापूर ओघळला. त्याच्या आवंढ्याचे कढ तिच्या कानात मोकळे झाले. तिने त्याचे मुके घेत त्याचे हुंदके दाबले अन त्याचा हात धरून तिने हिसका दिला तसा तो भानावर आला.
पहाट फाटू लागली होती, दूर मंदिरांच्या आरतीच्या स्वर घुमू लागले होते. ते पुन्हा पळू लागले. मध्येच गाड्यांचे आवाज येत अन त्यांना पळायची उर्मी मिळे.
समोर हायवे दिसू लागला तसा त्यांचा वेग मंदावला. त्याने तिच्याकडे आश्वासक होऊन पाहिले. तिच्याही डोळ्यात चमक आली.
'' सिद्धू ...'' , ती जोरात किंचाळली. पण तोपर्यंत कुदळीच्या एका सणसणीत फटक्याने तो हेलपाटत खाली पडला.
अचानक पाच सहा जण त्यांच्यावर तुटून पडले.
आधीच गलितगात्र असलेल्या त्या दोघांच्या कुडी निश्चेष्ट पडल्या. शरीरातली धग संपता संपता तिने त्याच्याकडे शेवटचे पाहिले तेव्हा त्याच्या देखण्या चेहऱ्याला ओळखू न येण्याइतके विच्छिन्न केले गेले होते, डाव्या डोळ्यांत रुतलेल्या सळईने त्याचा जीव आता वाचणार नव्हता. उजव्या अर्धोन्मलित डोळ्याने तो तिला पाहत होता.
तिचे सुंदर रेशमी केस कवटीला लोंबकळत होते.ज्या सुंदर लालचुटुक ओठांनी ती त्याच्यासाठी गाणी गायची, ते आता तलवारीच्या वाराने विभागले गेले होते. आतड्यांची गाठोडी छातीच्या कडेने बाहेर पडू पाहत होती. त्याला बघून शेवटचे ती शेवटची हसली अन कापल्या ओठाने पुटपुटली... '' आय लव्ह यु , सिद्धू...''
तो उत्तरादाखल काही म्हणूहि शकला नाही... फक्त त्याचा विटंबलेला चेहरा हसला...
पेट्रोलचा तरल वास वातावरणात पसरला. आगकाडी पेटण्याआधीच त्या दोघांचे प्राण देह सोडून निघून गेले होते.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती;
'बापानेच केला मुलीचा घात.आंतरजातीय विवाहाच्या रागातून नवदांपत्याची हत्या...'