शोध सुखाचा
शोध सुखाचा
आजची मेजवानीही चांगली होती. शहरातील सर्व नामवंत उद्योजकांनी हजेरी लावली होती. कंपनीतील कर्मचारीही उपस्थित होते. उतरवाय असूनही चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणि सहकुटुंब आलेले. स्वतःला हवा तितकाच पैसा कमवून सुखी.
आज त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान पाहिले आणि मनाला कसलीशी रुखरुख लागून गेली. हे समाधान कधी अनुभवायला का मिळाले नाही? आपल्या चेहऱ्यावर तसले हसू कधी आलेच नाही! गाडीत बसलो. ड्रायव्हरला घराकडेच घ्यायला सांगितली गाडी. त्या दोन मजली आलिशान बंगल्यासमोर अजून एक गाडी जाऊन उभी राहिली होती. आधीच दोन उभ्या होत्या! त्या सर्वांकडे एकदा पाहिलं, पण काही कौतुक वाटलं नाही. घरात प्रवेश केला. एक एक वस्तूला निरखून पाहू लागलो. एवढ्या वर्षांच्या कष्टानंतर हा डोलारा उभा केला होता. तो सजवताना अत्यंत काळजीपूर्वक विचार करून, एक एक गोष्ट निवडून वापरली होती. ती घेताना त्या काळी भारी कौतुक वाटायचे; पण आता त्याचे काहीच नवल वाटत नाही! त्या वस्तू, वस्तू म्हणूनच राहिल्या. घराचा भाग कधी बनल्याच नाही....
त्यांना मनाशी जोडणारा काही दुवाच नाही. घरातल्या कुठल्याच कोपऱ्यापासून विशेष अशा आठवणी नाहीत. मुले- मुली दुसऱ्या देशात जाऊन संसार थाटून बसली. अर्धांगिनी मुलांना जन्म देताच सोडून गेली आणि स्वतःला काम सोडून कधी काही सुचलेच नाही. त्यामुळे त्या घराला कधी घरपण आलंच नाही. मुलांनाही कधी ते प्रेम मिळालेच नाही.
आज जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा बऱ्याच गोष्टींविषयी खंत वाटते. त्यावेळी मात्र या सगळ्याचा मागमूसही नव्हता. आयुष्यात खूप सारी स्वप्ने पाहिली होती. त्यासाठी प्रचंड काम करण्याची तयारी आणि पैसे कमावण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी होती. जमेल तितके कष्ट केलेही अन् यशाच्या उंच उंच पायऱ्या सर करतही गेलो....कुटुंबाच्या गरज भागवण्यासाठी फक्त पैसे एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे, अशी समज होती तेव्हा. पण त्याबरोबरच कुटुंबासोबत वेळ घालवणे, त्या वास्तूला घर बनवणे, हेही तितकेच आवश्यक होते.
पण आता मात्र वेळ निघून गेली होती. जगातली सारी सुखे पायाशी एकवटली होती, हवं ते सर्व मिळवून झालं होतं, पण रात्री दमून आल्यावर पाण्याचा एक पेला विचारण्यासाठी कोणी नव्हतं! नोकर - चाकर भरपूर होते पण हक्काने एखादं काम सांगून मोकळं व्हावं असं कोणीच नव्हतं. कार्यक्रमांमध्ये गप्पा फार रंगात. पण मनात काय चाललंय हे जाणून घेणारं कोणीच नव्हतं. सर्वकाही मिळवूनही काहीतरी राहिल्याचं जाणवून गेलं...
काहीतरी करावं असं वाटू लागलं. जवळ असलेली संपत्ती मातीमोल वाटत होती. आयुष्यभर घेतलेल्या या कष्टांचा कुठेतरी सदुपयोग व्हावा, अशी इच्छा झाली. सगळी संपत्ती दान करून टाकण्यात आली. जवळ होते त्या सर्व पैशांतून एक अनाथाश्रम काढण्यात आले. आयुष्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाल्यासारखे वाटले. एक नवे कुटुंब मिळाले. या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची, त्यांना प्रेम करण्याची, त्यांच्याजवळ बसून चार शब्द बोलण्याची संधी आता होती. उरलेसुरले आयुष्य सुखात घालविण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली होती. त्या विचारानेच मन आनंदून गेले होते. हृदयावरचा भार कमी झाला होता. नवी उर्मी मिळाली होती. एक नवी सुरुवात झाली होती....