व्यथा (भाग १)
व्यथा (भाग १)


संध्याकाळ झाली होती. दिवसभराचे काम संपवून मीनल दमली होती. आता घराकडे निघायचा विचार करून ती आवरू लागली. ऑफिसातून तोपर्यंत सगळेच निघून गेले होते. मीनलही बाहेर पडली. आज जरा जास्तच दमली होती. रिक्षानेच घरी जावं, म्हणून पलीकडच्या चौकाकडे निघाली. रस्त्यात मधेच शिट्टीचा आणि हसण्याचा आवाज आला आणि ती थांबली. वळून मागे बघतील तर रोजचीच रिकामटेकडी टोळी बसलेली होती. हे त्यांचा नेहमीचंच काम !! आज मात्र मीनलचा संताप अनावर झाला. ती तडक गेली न शिट्टी मारणाऱ्याच्या कानशिलात लगावून दिली आणि तशीच रस्त्याकडे चालायला लागली.
थोड्या वेळात पोहोचली. कॉलनी त प्रवेश केला आणि समोरच्या अन बाजूच्या काकूंच्या गप्पा कानावर पडले... 'अहो लग्नाचं वय होऊन गेला तरी घरच्यांची काही हालचाल नाही. पोरगी ऐकतच नाही म्हणे. कसा व्हायचं कोणास ठाऊक.' मीनलचा संताप अजूनच वाढला, पण आता प्रतिकाराची इचछा तिच्यात उरली नव्हती. ती तशीच घरात गेली आणि आपल्या खोलीत जाऊन शांत बसली... समोरच्या आरश्यात स्वतःला न्याहाळू लागली आणि आपल्याच विचारांत हरवून गेली ....
शांत बसावं, सर्वांचं ऐकून घ्यावं तर फुगीर आहे, कोणाशीच बोलत नाही. मनमोकळं राहावं, सर्वांशी बोलावं, येण्याऱ्या-जाण्याऱ्याची विचारपूस करावी तर उनाड आहे, बोलायची अक्कलच नाही. कॉलेजला जावं. मुलांशी बोलायची सवय नाही, म्हणून चार मैत्रिणी बनवाव्यात आणि त्यातच राहावं, तर आगावू आहे, किती भाव खाते. मुलंही तितकी वाईट नसतात. मित्रच शेवटी म्हणून मैत्री करावी, चार मुलांमध्ये चालता-बोलताना दिसावं तर चारित्र्य खराब. हिला तर मुलाचं लागतात फक्त. अंगभर कपडे घालावे, तेल चोपून वेणी घालून कॉलेजात यावं, तर गावठी आहे. सिनेमासारखे कापडेपण छान वाटतात, कधीतरी घालून बघावं आणि कॉलेजात जावं तर संस्कारच नाहीत...
घरकाम येतं म्हणून सगळं करावं, तर हेच करणार का आयुष्यभर, नवरा कसा मिळणार चांगला? खूप अभ्यास करावा, मार्क्स चांगले मिळावे अन स्वप्नांनी गगनाला भरारी घ्यावी, तर बाई कितीही मोठी बन, घरी जाऊन भांडी घासावीच लागतील. तेवढंतरी तुला आलंच पाहिजे. मित्र म्हणून जीव लावावा, काळजी घ्यावी तर त्यानेच प्रेमात पडावं अन ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, हवं नको ते सर्व केलं, त्याला ती फक्त मैत्रीचं वाटावी. शिक्षण पुरे झालं, घरासाठी काहीतरी करावं म्हणून नोकरी कर बाई. पण कामासाठी रात्री उशीर झाला तर, हे कुठलं काम? बंद कर असचं असेन तर. शिक्षण झालं. नोकरीपण चालू झाली, म्हणजे झालंच की सगळं. लग्नाच वय झालं आता. "उरकायला" पाहिजे (वयात फक्त मुळीच येतात). मुलीला "बघायला" जातात. नोकरीवाली सूनबाई हवी पण सुगरण पाहिजे मुलगी. हुंडा वगैरे काही घेत नाही आम्ही. लग्न फक्त तेवढं थाटात करा. चांगला हॉल बुक करा अन जेवण तेवढं चांगलं असलं म्हणजे झालं. बाकी दोन्ही बाजूच्या बस्त्याचं काय असेल ते बघा. एवढी काय ती छोटीमोठी तीन-चार कामं वडिलांच्या अंगी. "थाटात" लग्न उरकावं. परक्याच्या घरी जाऊन स्थायिक व्हावं. आईसारखी जीव लावणारी सासू मिळाली तर नवऱ्याचं प्रेम मिळेल ठाऊक नसतं. जीवाला जीव देणारा नवरा मिळाला तरी घरचे चांगले मिळतील, याची शाश्वती नसते. लग्नाचा नवरा तोच आपलं सर्वस्व अन त्याचं घर हेच आपलं विश्व. लग्नानंतर "मित्र" ह्या शब्दाला आयुष्यात जागा नाही. मग तो नवरा कितीही समजूतदार असो. एवढी गोष्ट फक्त समजूतदारपणाला अपवाद. आयुष्य त्याच्याभोवतीच गुरफटून घ्यायचं. त्याच्या आवडीनिवडी जपायच्या. त्याला हव्या त्याच गोष्टी करायच्या. घरात सर्वांची मनं जपायची. माहेरी जे प्रेम हक्काचं होतं, तेच इथे मिळण्यासाठी एवढं झुरायचं.
ह्या सर्वातून कुठे नवीन आयुष्य सुरू झालंय, असं वाटायला लागलं तर एक जबाबदारी अंगावर असते. निसर्गाचं वरदान ना ते. सासू-सासऱ्यांना, आई-वडीलांना नातवंड पहायची असतात. नातूच तसं पाहायला गेलं तर. करण तसं झालं नाही तर पुढे किती दिवस टोमणे ऐकायचे किंवा आत्तापर्यंत कष्टाने "मिळवलेलं" प्रेम झटक्यात कसं गमवायचं, हे वेगळ्याने कुठं सांगायचं. नोकरी आणि संसार यात निवड करावीच लागते. "आई" व्हायचं असतं ना! संगोपनाची जबाबदारी फक्त तिचीच असते. संसारात हातभार म्हणून बायकोने नोकरी करावी ही त्याची अपेक्षा असते अन बाकी मुलांप्रमाणे माझ्या आईनेही माझ्या प्रत्येक गोष्टीत सोबत असावं, असं मुलाला वाटतं. ही ओढाताण आयुष्यभर पुरते. मुलं आणि नवरा यांतला दुवा असते ना ती!
मुलगा मोठा होतो, घरात सून येते. परक्याच्या लेकरू म्हणून मोठी जबाबदारी अंगावर असते. तिची फाफ काळजी करावी, सर्व शिकवावं तर सासू नाक खुपसते आणि तिचं स्वातंत्र्य तिला देऊन टाकावं तर सासूला कसली काळजीच नाही. सर्वातून अंग काढून घेते. मुलगा पहिल्यासारखा राहिलेला नसतो, नवरा हयात नसतो, आयुष्य पुन्हा दुसऱ्याच्या अधीन होऊन जाते आणि शेवटी एकदाचा ह्या चक्राचा शेवट होतो. हो असाच...