Tejashree Pawar

Drama Others Tragedy

3  

Tejashree Pawar

Drama Others Tragedy

राधा (भाग 3)

राधा (भाग 3)

3 mins
9.7K


सर्वकाही मनाजोगते चालले होते. पूर्ण दिवस कामात जात. शरदने एक सायकल घेतली होती. त्यावरच मागे बसून राधा सोबत जात. तिच्यासाठी तीच शाही स्वारी होती. रात्री आल्यावर कंदिलाच्या प्रकाशात शरदला न्हाहाळण्याची मौज काही वेगळीच होती. स्टोव्हवर बनवलेल्या त्या जेवणाला पक्वान्नाची सर होती. कारण घरात भांडी कमी असण्याचं होतं; पण त्याची फिकीर नव्हती. त्या निमित्ताने एक ताटात जेवण होई. त्यातला आनंद वेगळाच होता. एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सजवलेल्या बिछान्याची गरज कधी पडलीच नाही. जमिनीवर टाकलेले ते अंथरूण पुरेसे होते. एकमेकांच्या कुशीत ती रात्र कशी निघून जाई, याचाही थांग लागत नसे. खरंच राधामुळे त्या संसारात स्वर्गच अवतरला होता......

पण सर्वच सुखासुखी होईल ते आयुष्य कुठलं? नियतीला काही औरच हवे होते. शरदचा स्वभाव तसा तापटच. कामावरही छोट्या मोठ्या गोष्टींवरून त्याचे खटके उडत. राधाने अनेकदा त्याला समजावले होते. पण शरदच्या वागण्यात काही फरक पडला नाही. एक दिवस कामावर असताना अचानक गोंधळ कानी आला, म्हणून राधानेही तिकडे धाव घेतली. बघते तर शरदचे पुन्हा कोणाशीतरी भांडण सुरू होते. पण ह्यावेळी गोष्ट अगदी हाणामारीपर्यंत पोहोचली होती. थोड्याच वेळात ठेकेदार येऊन पोहोचला आणि सर्वच जमा झाले. ठेकेदार तोंडात येईल ते शरदला बोलला आणि सर्वांसमोर त्याला ओरडून कामावरून काढूनही टाकले. राधा हे सर्व पाहत स्तब्ध उभी होती. शरद रागाच्या भरात तसाच घरी गेला. राधाही कामावरून तडक निघाली आणि घरी पोहोचली.

शरद प्रचंड रागात होता. राधाने भरपूर समजावले; पण त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता. सर्वांसमोर झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. त्याचे हे असे रुप ती प्रथमच पाहत होती. शेवटी वैतागून तिनेही समजावणे थांबवले. एक - दोन दिवस असेच गेल्यावर शरद थोडाफार शांत झाला. राधाने त्याला नवीन ठिकाणी काम शोधण्यास सांगितले. खूप प्रयत्न केल्यावर एके ठिकाणी काम मिळाले. तेथेही तोच प्रकार. तेही काम बंद झाले. दिवसेंदिवस शरदची चिडचिड वाढतच होती. घरी बसणे त्याला सहन होईनसे झाले आणि अशातच दारूचे व्यसन जडले.

होत्याचे नव्हते झाले. शरद दिवस रात्र घराबाहेर राहू लागला. केव्हाही घरी परते आणि तेही दारूच्या नशेत. राधाची नीट बोलत नसे. नेहमी शांत राहत असे. राधाची चिंता दिवसेंदिवस वाढतच होती. तिच्या लाखो प्रयत्नांनंतरही परिस्थिती सुधारत नव्हती. शरदची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली होती. त्याच्या ह्या मानसिकतेचा परिणाम त्याच्या शरीरावरही होऊ लागला होता. आता तो घरातच पडून राहत असे. दिवस- दिवसभर झोपून राही. राधाचे ह्या सर्वांत फार मरण होई. ती हरएक प्रकारे परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत होती. तिला तिचा शरद, त्यासोबतचे ते सुखद दिवस परत हवे होते. पण आता मात्र गोष्टी हाताबाहेर चालल्या होत्या.

शरदची प्रकृती फारच बिघडली होती. डॉक्टरही चिंता व्यक्त करत होते. राधाच्या एकटीच्या कामावर संसार आणि शरदच्या औषधांचा खर्च भागवणे कठीण जात होते. तरीही तिचे अतोनात प्रयत्न चालूच होते. तिला हवी होती ती फक्त साथ. तिच्या शरदची !! पण त्यात सुधारणा होण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. एक दिवस शरदने अंथरुणच धरले. तो दिवस कसाबसा काढला. दुसऱ्या दिवशी राधाला कामावर जाण्याची इच्छा होईना. पण जाणे भाग होते. मनावर दगड ठेऊन राधा गेली. तेथे गेली आणि थोड्याच वेळात चक्कर येऊन पडली. तातडीने तिला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरने आनंदाची बातमी कळवली. राधाला आशेचा एक किरण सापडला.... या रुपात तिला एक नवी उमेद मिळाली. ती तडक घरी निघाली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ही गोष्ट कधी जाऊन शरदला सांगते, अशी तिची अवस्था झाली होती. आता सर्वकाही ठीक होईल अशा आशेपोटी ती चालली होती. अगदी धावतच ती घरी पोहोचली. दार उघडले आणि आत गेली. सरळ शरदजवळ जाऊन बसली. आणि त्याला त्याच्या वडील होण्याची बातमी सांगितली. राधा आनंदून गेली होती पण शरदने काहीच उत्तर दिले नाही. तिला आश्चर्य वाटले. तिने त्याला उठवायला हात पुढे केला आणि ती थरारून गेली. त्याचे सर्व शरीर थंड पडले होते !!

राधा घाबरली. कावरीबावरी झाली. ओरडू लागली. पण त्या सर्वांचा आता काहीच उपयोग होणार नव्हता. तिचा शरद ते काहीच ऐकू शकत नव्हता. तिला सोडून गेला होता तो. असाच या आयुष्याच्या वाटेवर.... संसाराच्या अशा टप्प्यावर ज्याची प्रत्येक स्त्री आतुरतेने वाट पाहत असते !!

राधाने जीवाचा आकांत केला आणि शेवटी शांत झाली. नियतीपुढे शेवटी तिनेही हार मानली.....


Rate this content
Log in