सवय ( भाग १)
सवय ( भाग १)
सीमा आणि तुषारचे नवीनच लग्न झाले होते. सारे काही छान चालले होते. आपल्याकडे असणारी लग्नाची पद्धत अनोखीच. मुलाच्या आधी त्याच्या घरचे मुलीला पसंत करणार. त्यावर होकार असेल तर मुलगा मुलीला "पाहायला" येणार. त्या एक भेटीत किंवा फार तर त्यानंतर अजून एक- दोन भेटीत समोरच्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचं की नाही, हे ठरवायचं असतं!!! अशाच प्रकारे वर्षानुवर्षे ही प्रथा चालत आली आहे, अन बहुसंख्य कुटुंबे सुखाने नांदतही आहेत.
या सर्वांमध्ये एक मजा आहे. एक कुतूहल आहे. एक भेटीत आयुष्याचा जोडीदार ठरवायलाही धाडस लागते. पण खरी मजा त्यातच असते. समोरच्या व्यक्तीविषयी कुतूहल, त्याच्या आवडीनिवडी, स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता, एकमेकांसोबत राहण्याची आतुरता, तो नवा संसार, नवे जीवन अन बरेच काही...सुरुवात फार छान होते अन निभावलं तर पुढची वाटचालही.
सीमा अन तुषारचीही सुरुवात अशाच प्रकारे झाली. एक- दोन भेटीतच दोघांनीही एकमेकांना पसंत केले होते. दिसायला दोघेही छान होते. उच्चशिक्षित होते, अन एकमेकांकडून विशेष अपेक्षाही नव्हत्या. लग्न झाले अन संसाराला सुरुवात झाली.... एकमेकांना जाणून घेण्यातच सुरुवातीचे काही दिवस गेले. हळूहळू आवडीनिवडी कळू लागल्या. स्वभावही कळू लागले. सीमा तशी गुणी मुलगी. घर सांभाळून ती नोकरीही करत असे. सासू- सासरेही सोबतच राहत. लग्नानंतर सर्वांनाच तिने आपलेसे करून टाकले होते. दिवसभर काम अन मग घर यातच तिचा दिवस संपत असे. तुषार तसा स्वभावाने शांत. अगदी कामापुरते बोलणार. कॉलेजपर्यंत आयुष्यात अभ्यास सोडून काही केलेच नाही. कुठली मजा मस्ती नाही, की मित्र नाहीत. कसली हौस मौज नाही की अगदी कशाची विशे
ष आवडही नाही. कॉलेजनंतर नोकरी आणि मग लग्न. घरातही तुषार अगदीच शांत राहत असे. समजूतदार आणि आज्ञाधारक. याउलट सीमा अत्यंत बडबडी अन निखळ मुलगी. जीवनाचा आनंद घेण्याची कला तिच्याकडे होती. हव्या नको त्या सर्व गोष्टींची मजा तिने घेतली होती. चेहऱ्यावर नेहमी हसू अन अंगात चंचलपणा....
सीमाच्या ह्या स्वभावामुळे ती झटक्यात कोणालाही आपलेसे करून घेई. सर्वांची ती आवडीची होती. तशीच सासऱ्यांचीही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची ती काटेकोरपणे काळजी घेत असे. सासूवरही तिचे तितकेच प्रेम होते. पण सासूबाई मात्र खट्याळ. प्रत्येक बाबतीत काहीतरी कमतरता काढल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. समोरच्याच्या प्रत्येक वाक्याला अगदी टोमण्यातच उत्तर असे! सुरुवातीस सीमा काहीच मनावर घेत नसे. पण गोष्टी पुन्हा पुन्हा झाल्या तर कोणालाही कंटाळा येणे साहजिकच. सीमालाही हळूहळू ह्या गोष्टीची चीड येऊ लागली. त्यात भर तुषारच्या स्वभावाची. त्याचा शांत स्वभावही तिला हळूहळू खायला उठला होता...
त्याने आपल्यासोबत खूप साऱ्या गप्पा माराव्यात. दिवसभर काय काय झाले, एकमेकांना सांगावे. कधी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले, तर खुश व्हावे. भाजी चांगली झाली तर कधीतरी कौतुक करावे. तिखट मीठ कमीजास्त झाले कधी तर ते ही सांगावे. कधी आपण नवे कपडे घातले अथवा छान तयार झालो, तर त्याने डोळे भरून पाहावे. कधीतरी स्तुतीही करावी. अशा एक बायकोच्या नवऱ्याकडून असतात तश्या साध्या अपेक्षा सीमाचा असत. पण तुषारच्या कधी सीमाने त्याच्यासाठी आणलेली कापड्यांकडेही पाहायला वेळ नसे. जे हाती येईल ते तो घालत असे. जेवणाला कधीही नावे ठेवत नसे, अन तोंड भरून कौतुकही करत नसे! सीमाला मात्र यातले काहीच पटत नव्हते.