सवय (भाग २)
सवय (भाग २)


दिवसांमागे दिवस चालले होते. सीमाचीही चिडचिड कमी होऊन तिने गोष्टी अंगवळणी पाडून घेतल्या होत्या. प्रत्येक गोष्टीतून चांगले कसे घ्यायचे, इतका समजूतदारपणा तिच्यात होता. अगदी तसेच करायचे तिने ठरवले. घरातले प्रत्येक काम ती अगदी आवडीने करू लागली. अगदी सुरुवातीला या घरात आली होती तेव्हासारखे! कामावरून दमून आल्यावर आपल्या निवांत वेळेत सासऱ्यांशी गप्पा मारत बसू लागली. सासूबाईंकडे नवनव्या गोष्टी शिकण्याचा हट्ट धरू लागली. त्यांच्या टोमण्यांपेक्षा प्रेमळपणावर जास्त लक्ष देऊ लागली. आता तिचा दिवस तिला हवा तसा जात असे.
तुषारकडून अपेक्षा करण्यापेक्षा तीच त्याला डोळे भरुन पहात असे. त्याच्या त्या शांत अन् निरस चेहऱ्यावरही तिला प्रेम दाटून येत असे. जेवणात पदार्थही तितक्याच आवडीने बनवत असे. त्यासाठी तुषारच्या स्तुतीची तिला आता आवश्यकताच वाटत नसे.... त्याचे पोटभरून जेवणेच तिच्यासाठी पुरेसे असे. अजूनही ती स्वतःसाठी आणि तुषारसाठी नवनवीन गोष्टींची खरेदी करत असे. तिला वाटेल त्यावेळी छान आवरून तयार होत असे. स्वतःच आरशात बघून समाधान मानत असे. आता तुषारच्या कौतुकाचीही तिला आवश्यकता वाटत नसे. अन् हे सगळे बळजबरीने किंवा परिस्थितीला वैतागून अजिबात नव्हते. ह्या सगळ्यात ती खूश होती.
या आनंदात अजून एक भर पडली. सीमा आई होणार असल्याचे समजले. सर्वजणच या बातमीने खूष झाले. सर्वांच्याच आयुष्यातला हा एक मोठा टप्पा होता. सीमाही फार खूष होती. हळूहळू दिवस सरू लागले, अन् तिची काळजी करण्याचे प्रमाणही वाढले. सासऱ्यांचे ते क्षणोक्षणी सूचना देणे, गप्पा मारण्याऐवजी सीमाला शूरांच्या कथा ऐकवणे आणि अगदी मुलीप्रमाणे तिची काळजी घेणे चालू होते. सासूबाई आता तिला घरातले कुठलेच काम करू द्यायला तयार नव्हत्या. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत त्या तिची काळजी घेत होत्या. काय करावे, काय करू नये हेही तिला समजावत. टोमण्यांची भाषा अजूनही चालूच होती, पण त्यामागे दडलेले प्रेम, काळजी आता कुठे सीमाला जाणवू लागली होती आणि ती होती ते तिने केव्हाच हेरले होते. ती फक्त बाहेर येण्याची वाट सीमा पहात होती आणि ह्या निमित्ताने ते शक्यही झाले होते.
तुषारच्या वागण्यातही विशेष फरक जाणवला नव्हता. तोही प्रचंड खूष होता. त्याला माहीत असतील किंवा शक्य असतील अशा अनेक गोष्टी तो तिच्यासाठी आणत असे. स्वतःच्या हाताने मात्र कधीच तिला देत नसे. तिच्याशी अजूनही तो खूप गप्पा मारत नसे, पण तिच्या वाचनासाठी अथवा करमणुकीसाठी विविध प्रकारची पुस्तकं आणून ठेवत असे. त्याचेही सीमावर खूप प्रेम होते. फक्त त्याची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. त्या सर्व गोष्टींतून तो तिच्यापुढे व्यक्त होत असे. दिवस जसजसे पुढे जाऊ लागले, तशी त्याची काळजीही वाढू लागली. नेहमी शांत असणाऱ्या तुषारमधे अचानक चलबिचल जाणवत असे. त्याचे हे रूप सीमा प्रथमच पाहत होती.
सीमाचे दिवस भरले आणि तिला दवाखान्यात नेण्यात आले. दुसऱ्याचा दिवशी सीमाला मुलगी झाल्याची बातमी कळली, अन् सगळेच आनंदीत झाले. त्या दिवसापासून तुषारने कामावर सुट्टी टाकली, अन् आपले पूर्ण लक्ष सीमाकडे वळवले. तिची उत्तमप्रकारे काळजी घेऊ लागला. त्या छोटीशी खेळण्याच्या निमित्ताने या दोघांमधीलही वातावरण बदलले. संवाद वाढले. गप्पा सुरू झाल्या. सीमाजवळ बसून दिवसदिवसभर तुषार बोलत बसू लागला. त्या छोटीच्या निमित्ताने कुटुंबातल्या सदस्यांची खरी रूपे बाहेर आली होती. सर्वांचीच प्रेमळ बाजू प्रकर्षाने जाणवत होती. सीमा आणि तुषारच्या नात्याला एक वेगळी झालर त्या निमित्ताने मिळाली होती.