STORYMIRROR

Tejashree Pawar

Others

3  

Tejashree Pawar

Others

साथ

साथ

2 mins
16.9K


सकाळची पूजा, दिवसभर वाचन, दुपारी आराम, संध्याकाळी मंदिरात दर्शन आणि उद्यानात एक फेरफटका एवढेच काय तो दिनक्रम. आलेला दिवस पुढे ढकलणे, एवढेच रोजचे काम. मुलगा आणि सून दिवसभर कामासाठी बाहेर आणि नातवंडे शिक्षणासाठी... अर्धांगिनी केव्हाच साथ सोडून गेलेली आणि तेंव्हापासून हा प्रवास तर जीवाचे ओझे बनलेला. दिवस कसाबसा निघत असे आणि रात्री झोप लागत नसे. तारुण्यात जेव्हा खूप काही करायची इच्छा असते तेव्हा झोप काही सुधरू देत नाही आणि उतारवयात जेव्हा करायला काहीच उरत नाही, तेव्हा झोप आसपासही भटकत नाही.

आजचा दिवसही असाच सुरू झाला होता. दुपारी आराम करून झाल्यावर स्वारी मंदिराकडे निघाली. योगायोगाने आज आरती चालू होती. कानावर तो आवाज पडला आणि मन तृप्त होऊन गेले. मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती प्राप्त झाली. आरती संपली आणि पुढे जाऊन डोकावले तर एक समवयस्क स्त्री समोर पेटी आणि माईक घेऊन बसलेली होती. पाहून अगदी प्रसन्न वाटले. आता मात्र आरतीची वेळ चांगलीच लक्षात राहिली. रोज ती काटेकोरपणे पाळलीही जाऊ लागली. रोज तो आवाज ऐकून मन प्रसन्न होत असे आणि आयुष्य पुढे चालत ठेवायला हुरूप येत असे!

काही दिवस असेच गेल्यावर हळूहळू त्यांच्याशी ओळख झाली. गाण्यात जितका मधुर आवाज तितकेच बोलणेही मृदू आणि स्वभाव तर त्याहून निर्मळ. नवऱ

्याचे निधन झालेले. बाकी कशात मन रमत नाही, म्हणून देवाच्या आराधनेत वेळ द्यायचा. केवळ मनःशांतीसाठी..... हळूहळू गप्पा वाढत गेल्या आणि सायंकाळच्या फेरफटक्यासाठी एक संगत मिळाली. दिवस अधिकच चांगले वाटू लागले. एकमेकांच्या मनातले ऐकायला, सुखदुःखे जाणून घ्यायला कोणीतरी भेटलं होतं. हळूहळू एकमेकांची सवय लागत गेली आणि ह्या वयातही सोबतीची आवश्यकता असते, ते कुठेतरी जाणवले. दोघांनाही त्या गोष्टीची गरज होती. दोघांनीही ते स्वीकारले आणि सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

पण या सर्वांना मान्यता मिळणे अवघड वाटत होते आणि तसेच झाले. दोघांनीही हा प्रस्ताव आपापल्या मुलांना कळवळा आणि प्रकर्षाने विरोध दर्शवला गेला. जी वेळ तारुण्यात मुलांवर आली होती ती आता यांच्यावर येऊन ठेपली होती. या सर्वांची जाणीव आधीपासूनच होती, त्यामुळे निर्णयही आधीच ठरला होता. आपापले घर सोडण्याचा! किमान उरलेले आयुष्य सुखाने जगण्यासाठी. आपल्या इच्छांचा त्रास इतरांना होऊ नये यासाठी.

दोघांचाही निर्णय पक्का झाला. आपले एक नवे आयुष्य सुरू करण्याचा. या नात्यात प्रेम नव्हते. त्यामुळे लग्नाची आवश्यकता नव्हती. तशा कुठल्याच गोष्टीची गरज नव्हती. गरज होती ती फक्त सोबतीची. एकमेकांना सावरण्याची आणि सुखदुःखात सामील होण्याची. ही उतरतीची कळा थोडीशी सुखाची करण्याची....


Rate this content
Log in