मिलन (भाग २)
मिलन (भाग २)


एक दिवस गणेश अचानक कामावरून घरी निघून आला. मित्राकडून पैसे उधार घेऊन, कामाला सुट्टी घेऊन तो आला होता. घरी आला. सुधाला तयार व्हायला सांगितले आणि घरच्यांना काहीतरी कारणे देऊन तिला घेऊन बाहेर पडला. कुठे जातोय हे तिलाही सांगेना. पण मनोमनी तो अत्यंत खुश होता. इतक्या दिवस दाबून ठेवलेल्या भावनांना आज कुठे मोकळी वाट मिळणार होती. सुधाच्या फक्त चेहऱ्याकडे पाहून समाधान मानत इतके महिने त्याने काढले होते. सुधानेही आपल्या मनावर प्रचंड ताबा ठेवला होता. पण आज ते सारे संपणार होते.
ती ओढ, ती आतुरता, ती पहिल्या स्पर्शाची जाणीव, त्यासाठी असलेली उत्सुकता सारे काही दाटून आले होते. अगदी लग्नाच्या दिवशी असावे त्याप्रमाणे दोघेही आतुर होते. थोड्याच वेळात एका लॉजसमोर येऊन दोघेही थांबले. त्याने फक्त सुधाकडे पाहिले आणि सरळ तिला घेऊन आत गेला. काहीही बोलायची त्याला आवश्यकता नव्हती. सुधाला सारे समजले होते. तिला क्षणभर प्रचंड वाईट वाटले. आपल्या परिस्थितीची कीव आली. पण दुसऱ्याच क्षणाला पुढच्या विचाराने ती मोहरून गेली. तिच्या चेहऱ्यावर आनंद साफ दिसत होता. तिच्या मनाची चलबिचल सुरू झाली. काही केल्या ते थाऱ्यावर येईना. सुधा प्रचंड खुश होती.
नाव नोंदवले. पैसे दिले अन दोघेही खोलीकडे निघाले. खोलीत पोहोचले अन गणेशने दरवाजा लावून घेतला. त्या आवाजानेच सुधा दबकली. हृदयाचे ठोके वाढले. दोघे पहिल्यांदाच एका खोलीत बंदिस्त होते ! दोघांनीही एकमेकांकडे पाहिले अन पाहातच राहिले. इतक्या दिवसात एकमेकांजवळ बसून एकमेकांकडे पाहावे, प्रेमाने न्याहाळावे हेही कधी जमले नव्हते. कितीतरी वेळ दोघेही एकमेकांना निरखू लागले. अन...
अचानक गणेशने सुधाचा हात पकडला. ती स्तब्ध झाली. तिला पलंगावर बसवले आण
ि तोही बसला. एकमेकांकडे बघता बघताच इतके तल्लीन झाले, की एकमेकांच्या बाहुपाशात जाऊन प्रेमाच्या त्या अथांग सागरात केव्हा उडी घेतली, त्यांनाही जाणवले नाही. एकमेकांसाठी आसुसलेले दोन जीव आज शेवटी एकत्र आले होते. त्या प्रेमरंगात न्हाऊन जाण्यासाठी दोघेही सज्ज होते.... सुधाने स्वतःला पूर्णपणे समर्पित करून टाकले होते. त्या समर्पणाला साजेसा न्याय देण्याचा गणेशही त्याच्यापरीने प्रयत्न करत होता आणि तितक्यात खोलीचा दरवाजा बाहेरून वाजला. दोघांनाही त्याची जाणीवदेखील झाली नाही. थोड्या वेळाने पुन्हा आवाज झाला, अचानक गडबड गोंधळ ऐकू आला आणि पोलीस - पोलीस म्हणून कोणीतरी आरोळ्या देऊ लागले. ते ऐकून दोघेही खडबडून उठले. दोघांनीही स्वतःला सावरले आणि गणेशने जाऊन दरवाजा उघडला.
समोर बघतो तर पोलीस उभे !!! काही प्रतिक्रिया देण्याच्या आत त्या दोघांनाही खोलीबाहेर खेचण्यात आले. काही कळायच्या आतच दोघांनाही इतर अनेक लोकांप्रमाणे दोन वेगवेगळ्या गाड्यांत बसवून चौकीत आणण्यात आले होते. क्षणभराच्या सुखासाठी किंवा मौजमजेसाठी ह्या गोष्टी करणाऱ्यांमध्ये, एकमेकांवर हक्क असूनही केवळ जबाबदाऱ्या अन परिस्थितीमुळे इतके दिवस स्वतःला रोखून धरणाऱ्या या दोघांचीही गणना झाली होती. इतक्या दिवसांची आतुरतेने वाट पाहिलेल्या गोष्टीची सुरुवात होताच ती हिरावून घेण्यात आली होती. अचानक दाटून आलेल्या भावना कल्लोळाला थोपवून टाकण्यात आले होते. एकमेकांसाठी आसुसलेल्या त्या देहांना क्षणात वेगळे करण्यात आले होते. पण मनाला मात्र ती हुरहूर लागून गेली.
समोरची सगळी दृश्ये पाहिल्यावर आपल्यासोबत काय झाले आहे, याची जाणीव त्यांना झाली. पण वेळ निघून गेली होती आणि आयुष्यभर स्मरणात राहील असे काहीतरी घडून गेले होते....