शाळेचे ते रम्य दिवस (भाग २)
शाळेचे ते रम्य दिवस (भाग २)
रम्य ते शाळेचे दिवस( भाग २)
पण याच घटनेनं , मी आमच्या वैद्य बाईंच्या मनातून पार
उतरून गेले होते.
दुसऱ्या दिवशीच- मधल्या पटांगणात, जांभळाच्या झाडाखाली, आमचा पूर्ण वर्ग ,उगाचच वेळ काढूपणा करत होता. त्या तासांच्या बाई आल्याच नव्हत्या !बघता- बघता वर्गातल्या दोघे तिघींनी, मोठ्या आवाजात वाद घालायला सुरुवात केली, आणि त्याचं मग सहजच भांडणात रूपांतर झालं!
शेजारच्या वर्गात शिकवणाऱ्या वैद्य बाईंना त्याचा फारच त्रास होऊ लागला- आणि मग त्यांनी बाहेर येऊन,सरळ येऊन आम्हाला फैलावर घ्यायला सुरुवात केली.
मी आपली गरिबडी, नुसतीच , बाजूला उभी होती.-, गंमत बघत! त्यांची नजर माझ्यावर गेली ,आणि त्या जास्तच भडकल्या!
"शोभा तू पण ह्यांच्या सारखीच? मला वाटलं नव्हतं की तू पण अशा प्रकारच्या उनाड मुलीं मधे आहेस !फार वेगळं मत होतं माझं तुझ्याबद्दल '!आणि त्यांचा सगळ्या रागाची दिशा मग माझ्याकडे वळली.! आतापर्यंत दात विचकत, उगीचच गंमत बघणारी मी,- खाली मान घातली ,आणि तिथून निघून गेले !
माझ्या नशिबात बहुतेक "करतो कोण, अन भरतो कोण ?"असंच आलेल, आहे.
या घटनेनंतर आमच्या शाळेच्या वार्षिक मासिकात नियमाने येणारी माझी कथा, त्यावर्षी आलीच नाही, कारण याच बाई मासिकाचे संपादन करणारे होत्या. माझ्या लेखनावर त्या खूप खूप खुश असायच्या. मला प्रोत्साहनही द्यायच्या, आणि गेली दोन-तीन वर्ष त्या माझ्याकडून काहीतरी लिहून घ्यायच्या .पण नंतर त्यामाझ्याशी कधी बोलल्याच नाही!
अकरावी बोर्ड वर्ष आलं- माझी तयारी चांगली चाललेली होती! पण तेवढा गंभीरपणा वयात नव्हताच! तरीही अनिखिंडि बाई, इंग्लिश च्या बाई, समोर दिसल्या की माझ्या उत्तर पत्रिकेतील "भोपाळा"माझ्यासमोर येऊन मला चिडवायचा! मी अजून मन लावून अभ्यास करायची.
सर्व वर्गा समोर केलेल्या त्या अपमानाची भरपाई काढायची माझी तीव्र इच्छा होती-
आणि अकरावी बोर्डच्या वर्षानं, माझ्या मागल्या सगळ्या अपमानाची भरपाई केली .!आर्टस चे विषय असूनही मी चांगल्या मार्क्सनी, ऐशी टक्के मिळवून ,फर्स्ट क्लास मध्ये पास झाले !त्या वेळेस आर्टसच्या विषयांना काहीही केलं तरी, खूप छान मार्क्स दिले जातच नव्हते !
मग आमचा मान शाळेत खूपच वाढला! कॉलेजच्या सुरुवातीला, वडिलांनी एक सुंदर रीस्टवाॅच आणून, माझ्या हातात बांधलं,
आमच्या घरात आलेलं,ते पहिलं रीस्टवाॅच! वडिलांनी स्वतःसाठीहि कधी घेतलेलं नव्हतं! आम्हाला दहावी कडून फेअरवेल पार्टी मिळाली!
-- आणि एका मोठ्या यशाचा आनंद -समाधान घेऊन मी कॉलेज कडे निघाले-
