"पोर्ट ऑफ आदेन"(भाग दुसरा )
"पोर्ट ऑफ आदेन"(भाग दुसरा )
थोडसं थांबून मग तो बोलला, “काही कागदांच्या चिटोऱ्यासाठी निरपराध बाईला माणुसकीची मदत नाकारायची? छे!”
थोड्याच वेळात शेवटची होडी जहाजाला लागली. अगदि फाटक्या, मळक्या कपडयांमधे ‘ती’ चाळीशीची बाई सतत रडत होती. तिच्या सोबत भेदरलेली खूप घाबरलेली तिची सहाही मुलं होती.
त्यानं पाहिलं आणि “आपण केलं ते बरोबर होतं” याची त्याला खात्री झाली. खूप समाधानानं मग त्यानं हेडक्वार्टर्सला फोन लावला.
एवढ्यात.... खालून एक छोटुकलं डेकवर आलं आणि बघता बघता खूप सारी मुलं वर येऊन नवलानं इथं तिथं फिरु लागली, खेळू लागली. त्यातली दोघं तिघं जहाजाच्या कठडयाकडे पळाली. मजेनं वाकून वाकून खालचा समुद्र बघू लागली. दोघं तिघं ‘सेलर्स’ तिथंच उभे राहून बोलण्यात दंग होते.
“अरे...अरे... लक्ष कुठय तुमचं? त्यांना आवरा जरा...पाण्यात पडले तर?” ‘तो’ जोरचा ओरडलाच. “मुलंच ती... खाली खोल्यांमधे डांबून कशी राहणार? त्यांच्याशी खेळा, बोला. त्यांचे आई-वडील खोल्यांमधे झोपले असतील. त्यांना आराम करु द्या. पाहुणे आहेत ते सगळे जण आपले.”
ते तिघं सेलर्स मग मुलांकडे धावले.
‘आता एवढच काम काय ते बाकी राहिलं होतं!’ एक जण पुटपुटला.
पण “त्याचे” ऑर्डर टाळणे शक्य नाही.
“ते आपले पाहुणे आहेत.”
जहाज अदेनला पोचायच्या आधीच त्यानं सगळ्या ‘क्र्यू’ला बोलवून डोज पाजला होता. त्यांनी काय काय दु:ख भोगलं आहे याची कल्पना नाही आपल्याला. कुणाची घर दारं जाळली आहेत, नातेवाईक मारले गेले आहेत, पैसा अडका सगळं सोडून नेसल्या कपड्यात त्यांना पळून जावे लागले असेल जीवाच्या भीतीनं. किती प्रचंड टेंशन खाली ते असतील. अश्या लोकांना मदतीचा हात आपण पुढे करतोय ड्यूटी म्हणून. माणुसकीच्या नात्यानं करतोय, उपकार नाहीत. तर त्यांच्याशी वागताना खूप प्रेमानं पण शिस्त पाळून वागायचं..बोलायचं. आपली नेहमीची सैनिकी घिसाडघाई, आरडा ओरडी चालायची नाही. आपल्याला खूप त्रास झाला तरी चालेल. त्याची सवय आहे आपल्याला. पण त्यांची विशेष काळजी घ्यायची.
पुढच्या सतरा तासात त्याच्या सगळा ‘क्र्यू’ तंतोतंत तसाच वागत होता. स्वतः उपाशी राहून ‘पाहुण्यांच्या’ पोटाचा विचार करत होता.
आणि “आता” यशस्वी होऊन “तो” आपल्या घरी पोचलेला होता. मुलांत बायकोत खूप रमून गेलेला होता. त्याच्या “मिशन”चा जवळ जवळ त्याला विसरच पडला होता. आठवडा निघून गेला.
एक दिवस सकाळीच एक अगदि अनोळखी जोडपं त्याला भेटायला आलं.
“सलाम...आलेकुम...सर...” त्यातला पुरुष बोलता झाला. “आम्ही दोघं तुमच्या “सौमित्रवरच” होतो सर. आम्ही मुस्लिम आहोत हे तुमच्या लोकांना चांगलच माहित होतं...”
“हो ना सर...” त्यांच्यातल्या बाईनं बुरखा सारला आणि ती पुढे सांगु लागली... “तुमच्या माणसांच कौतुक करावं तेवढं कमीच. कुठलाही भेदभाव न करता तेवढ्याच प्रेमानं आणि काळजीनं ते आमच्याशी सुद्धा वागले सर. तुम्ही आमचा जीव वाचवलात. तुमचे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर. कसे फेडणार ते कळत नाही.” तिचे डोळे पाण्यानं भरुन आले.
ती दोघं खाली गुडघ्यावर बसून वाकली, हात मागे बांधून अल्लास सजदा करावा तसं त्यांनी त्याच्या पायाजवळ केलं.
तो क्षणभर अगदी स्तब्ध झाला. आणि मग हडबडलाच.
“अरे...अरे...हे काय करताय? मी तुमचा अल्ला नाही रे... मी फक्त माझी ड्यूटी केली.
भारावलेली ती दोघं खूप काही बोलत राहिली. पण तो मनात विचार करत होता...
‘मी जे केलं त्यासाठी सरकार माझा गौरव करेल की नाही माहित नाही पण हा माझा खरा खरा सत्कार आहे.
