पथ भ्रष्ट
पथ भ्रष्ट
भारताच्या अगदी बॉर्डरवर ते तिघं उभे होते. धडधडत्या ह्रदयानं आणि कोरड्या पडलेल्या घश्यानं ! आता ते मोठं धाडस करायला निघाले होते. मधे पसरलेलं एल.ओ.सी. आणि त्या पलिकडे पाकिस्तानची बॉर्डर. एल.ओ.सी.चे दाट जंगल, पहाड मध्यरात्रीच्या अंधारात अगदी गुडूप झालेले होते. होत्या त्या फक्त नितळ आकाशात चमचणारया चांदण्या.
जंगल ओलांडलं की पलिकडे लश्कर-ए-तायबाचा एक माणुस त्यांना तिथे वाट बघत असलेला दिसेल. इथल्या मौलवी अब्दुल हमीदनं यांची सगळी माहिती त्यांना दिलेली आहे. तो मग सरळ त्यांना ‘लश्कर’मधेच भर्ती करणार आहे, पुढच्या ट्रेनिंग साठी.
ते आता कश्मीर सोडून जाताहेत. पण लौकरच ते जिहादी बनून इथे येतील त्यांच्या प्यारया कश्मीरला भारताच्या तावडीतून सोडवतील, गरीबीत खितपत पडलेले सगळेच मग सुखी होतील. काम-धंदा मिळेल. खरया अर्थानं कश्मीर जन्नत बनेल. त्यासाठी आत्ता त्यांना कडवा लढा द्यावा लागेल. थोडी कुर्बानीही द्यावी लागेल, हरकत नाही. तसंही ते बुतपरस्त हिंदु गुलाम होते आणि तसेच राहण्याच्या लायकीचे आहेत. खरं राजे तर आम्ही आहोत.
ते इथून पळून चालले आहे तर खरं पण मौलवीनं वचन दिलय. इथल्या त्यांच्या रिश्तेदारांकडे ते खूप लक्ष देणार आहे. काळजी घेणार आहे. कारण आता ते अल्लाच्या नेक कामात सामिल होण्यासाठी जाताहेत ना...! म्हणूनच जाताना ते अगदी निर्धास्त आहेत.
ते एकेक करुन पलिकडे जाणार तोच अंधारातून एका आवाजानं मोठ्यानं त्यांना दरडावलं, “ए पोरांनो, एवढ्या मध्यरात्रि बॉर्डर ओलांडून कुठे निघालात? आं... परवाना आहे का?”
मिट्ट काळोखातून चार पांच जवानांनी त्यांना पुढे येऊन घेरलं. आणि मग घाबरुन त्यांची बोबडीच वळली.
“आज रात्रि कुणी तीन पोरं लश्करमधे भर्ती होण्यसाठी बॉर्डर ओलांडून पळून चालले आहे.” त्यांना खबरीयानं बातमी दिली होती. म्हणून मग अंधारात ते केंव्हाचेच बोक्यासारखे दबा धरुन वाट बघत होते. अश्या वाट चुकलेल्या वासरांना वेळेवर पकडून कँप्टन आनंदच्या हवाली करायचं ही त्यांच्या युनिटची ड्युटी होती.
कँप्टन आनंद तिथल्या युनिटचे प्रमुख होते. रोज असे वाट चुकलेले तरुण त्यांच्या जवळ आणले जात. त्यांना सुधारुन त्यांचं मन कसं बदलायचं, हा त्यांच्या पुढे फार मोठा प्रश्न होता. कश्मीर मधल्या रोज-रोज होणारया चकमकीत तिथली जनता भरडली जात होती. काम-धंदे बंद होण्याच्या मार्गावर होते. गरीबी, बेकारी वाढतच चालली होती. त्याचाच फायदा घेऊन मौलवी अब्दुल त्यांना भारताच्या विरोधात भडकवत होता. लश्कर-ए-तायबाची खूप मोठी लालूच त्यांना दाखवली जात होती. बेकार तरुण मुलं त्या मृगजळाच्या मागे धावून बळी चढवले जात होते.
पण अश्या पळून चाललेल्या मुलांच्या विरोधात ते प्रत्यक्ष असं काही करु शकत नव्हते. शिक्षा करायची मनाई होती. कारण “अश्यानं इंडियन आर्मीची डागाळलेली प्रतिमा आणिकच वाईट होईल” असा वरुन आदेश होता.
तसेच आधी पासून जनतेच्या मनात खूपसा गैरसमज मुल्ला भरुन देत होतेच. राग धुमसणारा आक्रोश मग “दगड फेकीत” व्यक्त होत होता.
कँप्टन आनंदला हे सगळं दिसत होतं, जाणवत होतं! एकेकाळी त्यांनी साइकोलॉजी मधे मास्टर्स केलेलं होतं. त्यांच्या मतानं हा जर गुंता सुटायचा असेल तर अश्या पकडून आणलेल्या तरुणांचे प्रश्न वैयक्तिक रीतीनं हाताळायला हवे. तरुण पीढीच्या मनातलं विष जर काढलं गेलं तर कश्मीरमधे बरीचशी शांतता स्थापन होण्या सारखी आहे. म्हणूनच ते अश्या मुलांना काउंसलिंग करुन त्यांचं मन वळवायचा प्रयत्नात असत.
“तें तिघं” कँप्टन आनंदच्या ऑफिसमधे केंव्हाचे चुळबुळत बसले होते. घाबरलेले! आता आपल्याला नक्की शिक्षा मिळणार, काय असेल ती? विचार करुन थकलले.
“अरे, तुम्ही केंव्हा पासून बसले आहात इथं?”
भल्या सकाळी कँप्टन आनंद घाईनं आपल्या ऑफिसमधे आलेले होते. खरं तर त्यांनीच “बसवून ठेवा त्यांना” म्हणून आदेश दिला होता.
“काही त्रास तर झाला नाही ना?” उंच, धिप्पाड पण शांत चेहरयाचे कँप्टन त्यांना विचारत होते.
ते तिघं घाबरुन घाई-घाईनं उभे राहिले.
“अरे, अरे, बसा बसा! चहा पाणी झालं कां तुमचं? भुक पण लागली असेल?”
आणि मग त्यांनी सगळ्यांसाठी चहा नाश्ता मागवला.
त्या तिघांसाठी तो तर प्रचंड मोठा धक्का होता. मुकाट्यानं समोरचा नाश्ता गिळताना त्यांना आपण स्वप्नात तर नाही ना? असं वाटत होतं. अजूनही आपल्याला शिक्षा नाही? कोठडीत टाकलं गेलं नाही? हा समोरचा माणुस तर आर्मीचा वाटतच नाही! एवढा साधा? छे!
त्यांच्या सोबतच कँप्टन पण नाश्ता करत होते. शांतपणे त्यांचे चेहरे वाचत होते.
"बरं, आता नावं सांगाल का तुमची? म्हणजे दोस्ती करायला बरं होईल. मी स्वतः कँप्टन आनंद..." त्यांनी हात पुढे केला.
ते दचकलेच. दोस्ती? कँप्टनशी? अरे बाप रे? कसं शक्य आहे ते?.
“मी... अनीस..., सर”. त्यातला सगळ्यात छोटा मुलगा बोलला. तो जेमतेम पंधरा-सोळा वर्षाचा असेल.
कँप्टन मनातून हळहळले.
“माझं नाव... शौकत..., सर! मी पलिकडे गनी मोहल्ल्यात राहतो”. दुसरा बोलला.
तो आता थोडा आश्वस्त झालेला होता. इंडियन आर्मी त्यांना वाटलं तेवढी वाईट नव्हती तर.
पण तीसरा मात्र घुम्म्या सारखा खाली फरशीकडे टक लावून बघत बसला होता.
“हो का? मी येत असतो तिथं बरं का, कामानं. आणि मिया तुमचं नाव काय?”
पण तरीही तो “तीसरा” काहीही बोललाच नाही.
“याचं नाव इकबाल आहे सर. हा पण आमच्या जवळच राहतो.” शौकतनं आपण हून बातमी पुरवली.
कँप्टन मनात समजले. याच्या मनात काही तरी दुखरी जखम झालेली आहे. त्याचाच फायदा घेऊन आर्मीच्या विरोधात विषही भरवून दिलेलं आहे.
“बरं... घरी कोण कोण आहे तुमच्या? शादी झाली का?”
“माझ्या घरी आंधळी दादी आणि दोन छोटी भावंड आहेत सर. मी कार मँकनीकच्या गँरेजमधे... त्यांना मदत करायचो सर. पण आता तर ते केंव्हाचच बंद झालय सर.” अनीस दु:खानं म्हणाला.
“मग आता काय करतोस?”
“काय करणार? घरात बसून आहे... मुश्किल से घर चल रहा है.” तो उसासा सोडून म्हणाला.
“तू एकटाच कर्ता, आणि तूही पळून जात होतास? काय वाटलं असतं त्यांना?” कँप्टन म्हणाले.
“बरं, शौकत तुझं काय? घरी सगळी आहेत ना?”
“आहेत ना. मम्मी, अब्बू. फळांच दुकान होतं आमचं. छान चाललं होतं. पण ते सुद्धा दहशतीत बंद करावच लागलं. मी, अब्बू आता रोज रोजगार शोधत बाहेर भटकत असतो. कधी मिळते, कधी दोन-तीन दिवस मिळतही नाही. शादी कसली होणार सर.”
“खरंच, काय दशा झाली आहे या तरुण पिढीची.” कँप्टनच्या मनात विचार आला. शौकत खरंच सांगतोय, हे त्याचे डोळेच बोलत होते.
“आणि इकबाल मिया, तुम्ही काय करता? घरी कोण कोण आहेत?”
पण इकबालच्या जसं कानावरच येत नव्हतं.
“बरं, नका सांगु.” पण हाच खरा दुखरा आहे.
“मग शाळा कॉलेजचं काय? जात होता?”
“हो ना, मी आणि इकबाल तर कॉलेज मधे जाणार होतो. मला क्रिकेट टीममधे सामिल व्हायची इच्छा होती. आणि हा अनीस बारावीत होता. पण शाळा कॉलेजही बंद पडलेत ना.” शौकत बोलला.
“खरंच फारच वाईट होत चाललय. या दहशतीमुळं सगळं कसं ठप्प झालय. त्यांच्याशी मुकाबला करायला खरं आम्ही इथं आहोत पण काय करणार? तुमच्या लोकांचा सपोर्ट मिळत नाही. उलट आमच्यावरच दगड फेक होते. ती सहन करत तुम्हा लोकांना वाचवायचं. फार फार कठीण बनून बसलय.
"खेर, आता तुम्हाला मी घरी पाठवतोय. माझ्या खाजगी कोट्यातून थोडं राशन पण सोबत देतोय. पण आता परत बॉर्डर ओलांडायची नाही, बरं का. खूप मोठी शिक्षा असते त्यासाठी.”
“आणि हो..., दोस्त समजून मला भेटत रहाल का?”
दोघांनी माना डोलवल्या. इकबाल मात्र अजूनही रागातच होता.
ते बाहेर पडले आणि कँप्टननी एक दोन खबरीयांना त्यांच्यावर सारखं लक्ष असू द्या असं सांगून त्यांच्या मागावर पाठवलं.
दुसरया दिवशी कँप्टन आनंद आपण हून त्यांच्या घरी गेले होते. अनीसची दादी भावंड, शौकतचे अम्मी-अब्बू सगळे खूप छान बोलले. थोडसं कां होईना राशन मिळालेलं होतं. मदतीचं आश्वासनही त्यानी दिलेलं होतं. इकबालच्या घराला मात्र कुलूप होतं. दुश्मनचा असूनही कँप्टन भला माणुस होता.
‘इकबालला जरा वेगळ्या तरहेनं हाताळावं लागेल’. कँप्टन आनंदनं आता मनात पक्की खुणगाठ बांधली होती; कारण रात्रि एका खबरीयानं सांगितलं, “तो दिवसभर इथंच बाहेर भटकत होता, मात्र संध्याकाळी मज्जिदमधे मौल्वी हमीदशी खूप वेळ बोलत बसला होता.”
दोन दिवसातच कँप्टन आनंद परत अनीस आणि शौकतला भेटले. विशेषतः शौकतच्या आई-वडिलांची विचारपूस झाल्यावर त्यांनी विचारलं, “मियाँ, फळांच दुकान परत सुरु करायचं आहे का?”आणि सगळ्यांचेच चेहरे एकदम उजळले. शौकतला आश्चर्यच वाटलं, “या वातावरणात...आणि परत दुकान? अशक्यच.”
“अरे...मी आहे ना...! तुला मदत करीन. बैंकेतून लोन मिळवून दईन. सुरक्षित जागा बघून ठेव जरा, काय? प्रयत्न तर कर.”
“जी जनाब. एकदम दुरुस्त बात.” वडिल उत्तरले. “आपका बहोत शुक्रिया जी.”
“आणिक एक बातमी. आमच्या इथे कॉलेजची अँडमिशन सुरु होतीये. शौकत, परत शिक्षण सुरु करणार ना?” क्रिकेटचं तुझं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल.”
शौकतच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. खरंच आहे. प्रत्यक्षात इंडियन आर्मी शैतानांनी भरलेली नाहीये. किती ही इंसानियत. तो अगदी गदगदून गेला. त्याचा आनंद तर मनात मावत नव्हता. आज रात्रि त्याला स्वप्नही बहुतेक क्रिकेटचीच पडणार आहेत.
यानंतर कँप्टन आनंद अनीसच्या घरी जाऊन त्यांच्या आंधळ्या दादीला भेटले. खुशाली विचारली. आणि मग सरळ अनीसकडे मोर्चा वळवला.
“अनीस, यापूर्वी तू कार-गँरेजमधे मदतीला होतास ना? बरचसं माहित असणार तुला.”
“हो सर, पण आता काय त्याचं?” अनीस दु:खानं म्हणाला.
“अरे असा निराश कां होतोस? मी आहे ना तुझा दोस्त. हे बघ, आमच्या इथे गँरेजला एक असिस्टंटची जरुरत आहे. तू येशील? आधी थोडं ट्रेनिंग घ्यावी लागेल.”
“हो...हो... सर यईन की. उद्याच येतो.” उत्साहानं अनीस म्हणाला. त्याच्या रोजी-रोटीचा प्रश्न तर सुटत होता.
“तुमचे किती आभार मानू...”. अनीस मनापासून बोलला.
“हे बघ...आमच्या इथे रात्रीचे स्कूल्स पण आहेत. तुला तुझं शिक्षणही पूर्ण करता यईल... काय? पुढे शिकायचं आहे ना? दिवसा तुझ्या भावंडांनाही येऊ दे त्या शाळेत.”
आणि अनीसला आनंदानं काही सुचेनासं झालं. कँप्टन आनंदच्या रुपात त्यांना एक फरिश्ताच भेटला होता. पण त्याची आंधळी दादी म्हणत होती, “अरे....हा तर प्रत्यक्ष खुदाच आहे रे....!”
दुसरया दिवशी अनीस आणि शौकतला कँप्टननं आपल्या घरी बोलवलं होतं. चहा आणि नाश्ता झाल्यावर त्यांनी इकबालचा विषय काढला होता. आणि थोडी माहिती हाताला लागली होती.
तो आणि त्याची बहीण असा त्याचा परिवार होता. मामूनं वाढवलं होतं. पण ते ही जन्नतला निघुन गेले होते. मामूंचच किराणा दुकान मग इकबाल बघत होता. पण या दहशतीत ते सुद्धा जाळलं गेलं.
एक दिवस बाजारात गेलेली त्याची 15-16 वर्षाची बहिण परतून आलीच नाही. तिला शोधत इकबाल जेंव्हा बाजारात गेला, तिथं नुकतीच आर्मीची आणि दहशतवाद्यांची चकमक घडून गेलेली होती. खूपसे निरपराध बळी गेलेले होते. त्यातच त्याची बहीणही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
तेव्हां पासून इकबाल हा कट्टर भारतविरोधी झालेला होता. दिशाहीन फिरत होता. मौल्वी मात्र रोज भेटत होता.
आणि मग कँप्टन आनंदने त्या दिवशीची फाइल शोधून खरं काय घडलं होतं याची माहिती मिळवली होती. एक कात्रण काढून बाजूला ठेवून दिलं होतं.
कँप्टनच्या प्रयत्नांना बरंच यश मिळालेलं होतं. शौकतचं फळांचं दुकान परत सुरु झालं होतं. त्यामुळे तोही कॉलेजमधे भर्ती झालेला होता. अनीस प्रामाणिकपणे कार-मँकेनीकचं ट्रेनिंग घेत होता.
सुट्टीच्या दिवशी कँप्टननं त्या तिघांना चहासाठी बोलवलं होतं. ते आता तिघांच्या रिश्तेदारा सारखे झालेले होते. त्यांचा भरवसा वाढायला लागला होता. इकबाल आला पण खूपच नाखुशीनं.
“और मिया इकबाल..., आता काय चाललय तुमचं?” कँप्टननी विषय सुरु केला. “अरे हो...मी विसरलोच. तुम्हाला एक कात्रण दाखवायचं होतं.” आणि एका फाइली मधून त्यांनी एक कात्रण काढून दाखवलं.
तो फोटो होता, एका 15-16 वर्षाच्या मुलीचा, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला.
“ही मुलगी कोण आहे? माहित आहे का? भारतीय आर्मीच्या फायरिंग मधे हिचा दर्दनाक बळी गेला असा आमच्यावर आरोप करण्यात आला आहे. पण तसं घडलेलं नाहिये. त्या दिवशी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला तो प्रसंग कसम घेऊन सांगणारा एक साक्षीदार आम्हाला सापडलाय.”
फोटो बघून इकबलचा चेहरा पांढरा फट्ट पडला. मुठी आळवून तो म्हणाला, “सर ती माझी बहीण होती हो. जर असा कुणी खरंच असेल तर मला त्याला भेटायचं आहे.”
“इकबाल, मला तुझ्या वेदना समजताहेत. तुला मदत करावी म्हणूनच मी त्याला आज इथे बोलवलं आहे. मिया कमाल जरा इकडे आत या.”
आणि मग कमालनं त्या दिवशी डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग जसाचा तसा सांगितला....
“आतंकींनी त्या दिवशी भर बाजारात गोळीबार सुरु केला होता. उद्देश हा होता की तिथल्या जमलेल्या लोकांमधे दहशत पसरावी. तसंच झालं. घाबरुन लोकं वाट फुटेल तिकडे पळू लागली. काही दुर्दैवी लोकांना मात्र गोळी लागली होती. त्यातलीच एक ही मुलगी होती. पवित्र कुराणची कसम घेऊन मी खरं सांगतोय. इंडियन आर्मी तर थोड्या वेळानं गोळीबाराची बातमी ऐकून मग तिथं पोचली होती....”
इकबाल आतून पूर्णपणे ढवळून निघाला. चीड, राग, अविश्वास अश्या किती तरी भावना झरझर त्याच्या चेहरयावरुन सरकत होत्या.
आणि त्यानंतर ते सगळे खूप वेळ सुन्न बसून होते.
“इकबाल, तुझं दु:ख मी जाणतो रे. मलाही खरोखरच फार वाईट वाटतय.” ते निघाले तेंव्हा कँप्टन त्याच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले.
आणि एकदा इकबाल आपणहून कँप्टनला भेटायला आला. “सर मला खूप बोलायचं आहे तुमच्याशी.”
आश्चर्यानं आनंद मग बघतच राहिले.
“चल...बोलू या न. पण आधी चहा घेऊया का?”
“हं... सांग. काय म्हणतोस?”
“सर, आमच्या गनी मोहल्ल्यात ती मज्जिद आहे ना? तिथं मौल्वी अब्दुल राहतो. मला नेहमी भेटत असतो. त्यानं मला सांगितलं होतं की त्या दिवशी भारतीय आर्मीच्या गोळीबारातच खूप जण मारले गेले. त्यातच माझी बहीण देखील होती.”
“पण आता तर तुला खरं कळलं ना? आणिक काय सांगतो तो?”
“आपण भारताच्या गुलामीत आहोत म्हणून आपली ही अशी दुर्दशा आहे. आपलं खरं तर वतन पाकिस्तान आहे. आणि म्हणूनच लश्कर-ए-तायबाची माणसं जिहादी बनून इथे येतात. आणि कश्मीरला मुक्त करण्याचा प्रयत्न करतात.” इकबाल सांगत होता.
“आणिक?” कँप्टननं विचारलं.
“आपलाच धर्म खरा आहे. म्हणून बाकीच्या धर्मांना पार नाहीसं करुन टाकायचय. पूर्वी तर भारत सुद्धा आपल्या गुलामीतच होता ना. तो आता ही तसाच असायला हवा. खरं तर राजे आम्ही आहोत.”
“अरे पण....हे बघ. तुमचाच एक धर्म खरा असता तर आत्ता पर्यंत बाकीचे धर्म जीवंत कसे? ते टिकून आहेत कारण अल्ला कडे पोचायचे ते वेगळे वेगळे रस्ते आहेत. आणि अगदी पूर्वी म्हणायचं झालं तर हे हिंदू राष्ट्रच होतं. मुस्लिमही बाहेरहून आले. बरं मग पुढे...?”
“तो म्हणतो तुम्ही लश्कर कडून ट्रेनिंग घेऊन या. इथं प्राण-पणानं लढा द्या. शहीद झालाच तर तुम्हाला नक्की जन्नतच मिळणार. मी सांगतो ना तसं. इथली काळजी करु नका. आम्ही तुमच्या परिवाराची पूर्ण काळजी घेऊ.” इकबाल सांगत होता.
“मग त्याला विचार ‘तू पाहिली असशील ना जन्नत?’ तो तर जीवंत आहे, मग खात्रिनं कसं संगतोय? बरं... दुसरी गोष्ट म्हणजे...ही बघ एक फाइल.”
कँप्टन आनंदने त्याला एक जाड फाइल दाखवली.
“यात चकमकीत मरण पावले त्या जिहादिंची लिस्ट, फोटो वगैरे आहेत. सगळे इथून तिथं पळून गेलेले तुझ्या सारखेच तरुण आहेत रे. पण त्यांच्या मागे त्यांच्या इथल्या परिवाराला विचारायला कुणीही आलेलं नाही. मौलाना तुमची दिशाभूल करतोय. गोड-गोड बोलतोय. तुमच्याच कडून इथलं वातावरण अशांत राहिलं तर भारत सरकारची कुठलीही मदत तुमच्या पर्यंत पोचणारच नाही. नीट समजलं का तुला? आणिक?”
“सर, तो मला म्हणत होता की असेच तरुण जिहादी बनायला घेऊन ये. मी तुला पैसे देत जाईन. मला थोडे फार पैसे ही देतो तो सर.” इकबालनं शेवटचं सत्य सांगितलं.
त्यालाही लश्क़र कडून पैसे मिळत असतात या कामाचे.
“मग? आता? अजूनही तुला “खरं” कळलं नाही का?”
“हो सर...आता अजिबात गैर-समज नाही माझा. यापुढे मी तुम्हालाच मदत करणारे.” तो अगदी प्रामाणिकपणे म्हणाला.
त्यानंतर तो कँप्टनला वारंवार भेटत राहिला. त्यावर जणु कँप्टन आनंदची मोहिनी पडली होती. तो सारखा त्यांच्या अवती भोवती असायचा.
“सर, माझी इंडियन आर्मी जॉइन करायची इच्छा आहे.” एक दिवस तो आपण हून बोलला.
“वा! खूपच छान. शाब्बास!” कँप्टन आनंदचे उदगार होते.
कँप्टन आनंदनी आणखीन तिघांना टेररिस्ट होण्यापासून वाचवलं होतं. “माझा मार्ग बरोबर आहे तर” त्यांचं समाधानी मन आतून बोललं.
“गड्यांनो, माझ्याशी जर खरी खुरी दोस्ती करायची असेल तर माझं एक काम यापुढे निष्ठेने करायचं.”
ते तिघं एकत्र जमून जेव्हा कँप्टन आनंदला भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्या तिघांना बजावलं होतं.
“तुमच्या सारख्याच बॉर्डर ओलांडून लश्करमधे जाणारया मुलांना समजूत घालून माझ्याकडे आणायचं. काय? कराल ना एवढं माझ्यासाठी?”
आणि त्या तिघांनी माना डोलवल्या.
त्यानंतर त्यांनी जवळ-जवळ तीस मुलांना गोड-गोड बोलून कँप्टन कडे आणलं होतं.
आणि कँप्टन हा हृदय परिवर्तनाचा त्यांचा उपक्रम पुढे पुढे चालवतच होते. स्वतःच्या पगारातले बरेचसे पैसेही याच कामासाठी खर्च करत होते. वरच्या व्यक्तिंशी ओळखीचा वापर करुन अश्या मुलांना त्यांचे आवडते क्षेत्र उपलब्ध करुन देत होते.
इकबाल तसा मूळचाच हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. एके काळचा भारताचा कट्टर दुश्मन, आता भारतालाच मायभूमि मानून आर्मीत देखील सामिल झाला होता. आता त्याच्या डोळ्यात खरे अंजन पडले होते. मुल्ला, मौल्वी, लश्कर, जिहाद या सगळ्या ‘मृगजळा’च्या मागे धावून तो आपला जीव देणार नव्हता. कश्मीर मधे खरी शांतता येऊन त्याचं जन्नत बनेल, याचा मार्ग कँप्टन आनंदने त्याला दाखवून दिला होता. त्याच्या बहीणीच्या आत्म्यास खरी शांतता मिळेल असंच तो करणार होता.
लौकरच त्याला विशेष ट्रेनिंग दिले गेले. तो आता आर्मीच्या “घातक टोळ्यामधे” सामिल झालेला होता. ह्या विशेष घातक “टोळ्या” आतंकी जिथं लपलेले असतील तिथला सुगावा काढून गुपचुप तिथं पोचत होत्या. त्यांना नकळत वेढा घालायचा. शक्यतो “बोलणी” करुन या वेळ पडल्यास फायरिंग करुन त्यांना पकडत होत्या. फक्त या “घातक टोळ्यांनाच” हे काम नेमून दिलेलं होतं.
इकबालची टोळी चार जणांची होती. त्यात रेडियो-सेट घेऊन फिरण्याचं इकबालचं काम होतं. कारण त्याला रेडियो ऑपरेटरचं ट्रेनिंग दिलं गेलं होतं. प्रत्येक टोळीत असा एक असणं जरुरी होतं. वेळ-प्रसंगी आणखी मदत मागवण्या करता किंवा काय काय घडतय हे देखील मुख्य चौकीत कळवत राहणं फार जरुरी असतंच.
तीस ते चाळीस किलोचा रेडियो-सेट घेऊन जंगलात मैलोन मैल तुडवत चालत राहणं फार कठीण असतं. पण इकबाल ते काम खुशीनं न थकता करत होता. ‘थकणं’ हा शब्दच त्याच्या कोषात नव्हता.
आणि ‘त्या’ भल्या पहाटे त्यांच्या जवळ मेसेज आला, “पुलवामाच्या बाहेरच्या हद्दित एका पडक्या घरांत आतंकी लपलेले आहेत. आजच्या रात्रीच घातपात करण्याचा त्यांचा बेत आहे.”
लागलीच त्यांची टोळी ‘त्या’ घराचा वेध घेत तिथं पोचली. घराच्या भोवती बरीच मोकळी जागा होती. त्यानंतर मात्र दाट झाडीनं वेढा दिलेला होता. घराचे सगळे दरवाजे खिडक्या बंद होते. त्यांच्या फटीतून मंद लाइट तेवढा दिसत होता. आतल्या हालचालीही जाणवत नव्हत्या.
सगळीकडे धुक्याचं दाट आवरण पसरलेलं. त्यामुळे घराच्या थोडसं जवळ-पास गेल्या शिवाय खरा अंदाज लागणं शक्यच नव्हतं. आंत किती जणं होते? कितपत तयारीनं बसले होते? थोडं फार समजायला घराच्या जवळ म्हणजे उघड्यावर जाणं भागच होतं.
तरीही त्यांनी बरीच वाट बघितली. शेवटी इकबालनं एक युक्ति सुचवली. “मी घरा जवळ जाऊन बघू कां? मला कश्मीरी भाषा येतेय. बघू तर खरी काय बोलतायत ते. त्यांच्याच भाषेत बोललं तर कदाचित कुणी तरी बाहेर येईल आणि मग थोडासा अंदाज येईल.”
तसं करणं धोक्याचं होतं खरं पण दुसरा काही मार्ग नव्हता. त्याला परवानगी मिळताच त्यानं रायफल पाठीशी बांधली, हात मोकळे ठेवले आणि तो घराच्या अगदी जवळ जाऊ लागला. त्याचे सहकारी सुद्धा त्याच्या मागे हळूहळू पुढे सरकत होते.
ते घर जसं-जसं जवळ येऊ लागलं, आतल्या हालचाली थोड्याश्या जाणवू लागल्या. पंधरा-वीस फुटावर येताच तो मोठ्यानं कश्मीरी भाषेत बोलला, “जनाब, बाहेर या, मला कही बोलायचं आहे तुमच्याशी. मी राशन देखील घेऊन आलो आहे, भाईजान.”
आणि एक गोळी सट्ट्कन त्याच्या काना जवळून निघून गेली. त्याच्या ‘हम-जुबान’ असल्याचं हे ‘उत्तर’ होतं.
तो लगेचच सावध झाला आणि रायफल काढून त्यानंही गोळ्या चालवायला सुरवात केली. त्याचे सहकारीही भराभर गोळ्या चालवत पुढे झाले. घराला वेढाच घातला त्यांनी.
काचा फुटल्याचा, गोळीबाराचा आवाज त्या माळरानांत घुमू लागला. पण ते आतंकी घराच्या बिळात बरेच सुरक्षित होते. यांना मात्र बाहेरुन, उघड्यातून लढा द्यावा लागत होता. आतून सटासट गोळ्या येत होत्या. किती आतंकी लपून बसले होते, काहीच कळायला मार्ग नव्हता.
...आणि अचानक एक गोळी सरळ इकबालच्या छातीत घुसली. तो उभ्या उभ्याच कोसळला.
मग मात्र त्यांच्या मुखियानं वेळ घालवला नाही. तो ओरडला, "इकबालला घेऊन सगळे जण मागं या. कम बेक इमिजीएटली. मी ग्रेनाइड बॉम्ब टाकत आहे."
आणि मग त्यानं सरळ एक ग्रेनाइड बॉम्ब काढलं आणि घरावर फेकलं. आणि...आगीच्या मोठ्या गोळ्यात ते घर धडाधड खाली कोसळलं. आतले तीनही आतंकी मरण पावले होते. घातपाताचा एवढा मोठा प्रसंग टळला होता.
पण.... इकबाल मात्र शहीद झालेला होता.
कँप्टन आनंदनी प्रयत्नांनी पेटवलेली ही ज्योत भारतासाठी विझली होती.
