"पोर्ट आदेन "
"पोर्ट आदेन "
"त्याला" अजूनही आपण स्वप्नातच आहोत असं वाटत होतं! क्षितिजापर्यंत काळ्या काळ्या अंधारात समुद्र झोपला होता. मंद आवाजात लाटाही किनाऱ्याकडे जात होत्या. खूपश्या चांदण्या मात्र वर पसरलेल्या तेवढ्याच अंधाऱ्या आकाशात सांडलेल्या होत्या.
पण दूरवरचं ‘अदेन’ मात्र "त्याला" जळताना दिसत होतं! फायरिंगचे अस्पष्ट आवाज इथपर्यंत ऐकू येत होते. लागोपाठ होणाऱ्या बॉम्बस्फोटानं ते सारखं हादरत होतं!
खरंच "तो" तिथं उभा होता. आणि पुढे होणारी प्रत्येक घटना ही चित्तथरारक स्वप्नासारखी वाटणारी असली तरी ती सुद्धा वास्तवच असणार होती!
अगदी परवां परवां पर्यंतच नाही का "त्याची" छोटीशी ‘वॉरशिप’ “सौमित्र” अरेबीयन सी ला लागून असलेल्या अफ्रिकन देशात जिबूतीत उभी होती. तो अगदि छोटासा देश, त्याचं राशन पाणी, इंधन भरुन घेण्याचं "त्याचं" नेहमीचं ठिकाण होतं! आणि बातमी आली, “सौदी अरेबीयाच्या टायफून जेटसनं ‘यामेन’वर नियमीत बॉम्ब हल्ले सुरु केलेले आहेत”.
"त्याच्या" मनात एक विचार अचानक आला, आणि "तो" दचकलाच. कारण सध्या "त्याची" एकट्याचीच ‘वॉरशिप’ यामेनच्या अगदि जवळपास उभी होती. आणि नाही म्हटलं तरी ‘यामेन’मधे सुद्धा बरेच भारतीय असणारच की! ते तिथंच आता अडकणार?
“अर्थातच”, "त्याचं" मन बोललं. “एवढ्या गदारोळात त्यांना सोडवून सुखरुप आणण्यासाठी “वाली” कोण असणार?”
खरं तर "त्याची" छोटीशी वॉरशिप अगदि आत्ताच जन्म घेऊन पाण्यात उतरली आहे.
‘तो’, कँप्टन आणि "त्याचा" इन-मीन-दिडशेचा ‘क्र्यू’. समुद्रात राहून त्यांनी तेव्हढच छोटंसं काम करायचं होतं!
इंडियाच्या मर्चंट नेव्हीच्या जहाजांना अरेबीयन समुद्रातून ये-जा करताना सोबत करायची आहे. म्हणजेच समुद्री चाच्यांपासून त्यांना वाचवायचं आहे. त्या दृष्टीनंच "त्याच्या" ‘सौमित्र’वर दारुगोळा राशन-पाणी इंधन नेहमीच असणारे!
पण आता? कदाचित आपल्यालाच ‘सामोरं’ जायची पाळी आली तर?
"त्याच्या" मनात तेंव्हाच पाल चुकचुकली होती! पण ती पाल इतक्यातच खरी ठरेल, असं "त्याला" स्वप्नातही वाटलं नव्हतं.
२८ मार्चला बातमी कळली आणि ३१ मार्चला हेडक्वार्टर वरुन आदेश येऊन धडकलाच!
“तुमचं ‘सोबत’ करण्याचं काम आत्ताच बंद करा. जहाज लागलीच वळवून “यामेन”च्या “पोर्ट ऑफ अदेन”ला वेगानं धावून जा! तिथं अडकून असलेल्या भारतीयांना सोडवून “जिबूती”ला सुखरुप आणायचं आहे!”
साधारण सगळ्याच “शिप कँप्टन” मधे ठासून भरलेली दूरदर्शिता "त्याच्या"ही अंगात होतीच!
ती ‘पाल’ बोलली आणि "त्यानं" लगेचच हाताखालच्या सगळ्या “एक्सओज”ना बोलावलं होतं.
“फ्रेंड्स, आत्ताच बातमी आली आहे. “यामेन”ला तर मोठ्या प्रमाणात युद्ध पेटलं आहे. कदाचित तिथं अडकलेल्या भारतीयांना सोडवून आणण्याची वेळ आपल्यावरच येणार आहे. तर आपण....”
“सर...एक सुचवू का? कदाचित एखादं मोठं वॉरशिप तिथं निघालंही असेल.”
“हो ना....”, दुस-यानं दुजोरा दिला.
त्यांच्या “घरी जाण्याची” स्वप्न "त्याला" स्पष्ट दिसत होती. पण आधी ‘ड्यूटी’, मग बाकीचं.
"त्याच्या" कडक नजरेनं तिसऱ्याचे शब्द घशातच अडकले.
“तरीही “बडीज”, आपण तयार असलं पाहिजेच. लंच पर्यंत आपण कशी आणि काय काय तयारी करायची याची कल्पना माझ्या टेबलावर आली पाहिजे.”
“आणि... यू... टू... आज नो लंच फॉर यू....”
लंचपर्यंत तयारीच्या सगळ्या कल्पना "त्याच्या" टेबलावर तयार होत्या.
रात्रिच त्यानं एक व्यवस्थित आराखडा तयार केला होता आणि लागोलाग परत एकदा ‘त्या’ सहा जणांना बोलवून त्यांना समजावलेलं होतं. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ‘सौमित्र’चा सगळा ‘क्र्यू’ एक नवीन ट्रेनिंग घेत होता. त्यामुळे आता जो ‘आदेश’ आलेला, त्याचं कुणालाच फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं. फक्त प्रश्न होता तो, त्यांच्या जवळ ‘अदेन पोर्टचा मॅप अगदि काहीच नव्हतं! अवघ्या दहा मिनिटात त्यांचं जहाज ‘अदेन’च्या दिशेनं निघालं सुद्धा! ‘त्या’ कठिण वेळेत कुणालाच फारसं झोपायला सुद्धा मिळालेलं नव्हतं.
आणि दुपारचंच “अदेन” दुरुन दिसायला लागलं.
आता या पुढे आणखी सरकणं फारच धोक्याचं होतं! याच्या पुढचा समुद्र अगदि ‘तुसड्या’ स्वभावाचा होता. शिवाय महिन्या भरा पूर्वीच नाही का, इथंच ते भलं थोरलं अमेरिकन जहाज “कोला”, जिहादींनी १० मिनीटात उठवून दिलं होतं! एका छोट्याश्या फायबर ग्लासनं बनलेल्या ‘डिंगीत’ (अगदि लहानशी होडी) दोन जिहादी ५०० किलोग्राम स्फोटकं भरुन वेगानं आले आणि त्या ६००० टनाच्या वॉरशिपवर सरळ जाऊन धडकले. क्षणात वॉरशिपनं पेट घेतला आणि कुठलीही मदत येण्याच्या आधीच समुद्रतळ गाठला!
अश्या आणीबाणीत एव्हढी मोठी वॉरशिपही किती आगतिक होते, ते या घटनेनं सगळ्या जगाला दाखवून दिलं. आणि म्हणूनच इंडियन वॉरशिपही आता ‘वेगळ्याच’ तर्हेनं ट्रेनिंग घेऊन तयार करण्यात आलेल्या होत्या.
आता दुपार पर्यंत त्यांचा “सगळा क्र्यू” त्याच्याच प्लानिंग प्रमाणे आणखी ‘वेगळ्या’ तयारीत सुसज्ज होऊन वाट बघत बसला होता.
“आम्ही “यामेनच्या” २० किलोमीटर अंतरावर येऊन पोचलो आहोत”. त्यानं हेडक्वार्टरला कळवलं.
“मग तिथंच थांबा! तिथल्या आपल्या खास खबऱ्याला राजदूताला संपर्क करा.”
त्यानं त्याप्रमाणे लागलीच फोन केलेला.
“सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी, मी आता इथे नाहिये! मी आता ८०० किलोमीटर दूर राजधानी “सना”त आहे (यामेनची राजधानी) पण...
“...पण काय? अं? पण म्हणजे?” त्याच्या आवाजात राग उतरला.
“अश्या आणिबाणिच्या वेळेस त्यांच्याच राजदूतानं तिथून पळून जावं?”
“सर..सर..प्लीज ऐकून घ्या.” राजदूत ओशाळत म्हणाला, “पण माझ्या ऐवजी तिथलाच एका शाळेचा प्रिंसिपल माझं काम सांभाळत आहे. तो नक्कीच तुम्हाला मदत करेल... त्याचा फोन नंबर.....” तो पुढे चाचरत सांगू लागला...”सर तो खूप चांगला....”
त्यानं नंबर ऐकताच फोन कट केला. आता त्याचा एक-एक क्षण मोलाचा होता. ‘त्यानं’ मिळालेला नंबर फिरवताच पलिकडून मात्र शांत, सौम्य आश्वासक असा आवाज बोलता झाला. लगेचच त्यानं सर्व प्रकारची मदत करण्याचं वचन दिलं.
आणि थोड्याश्या वेळातच पलिकडून तोच आवाज बोलता झाला, “सर, तुम्हाला ‘ह्युमेनटरी ग्राउंड’वर इथं येण्याची परवानगी मिळालेली आहे, पण....पोर्टवर लागताच ४५ मिनिटात तुमच्या माणसांना उचलून घेऊन जा. त्या पुढे काहीही भयंकर घडू शकतं, त्याची जवाबदारी आमच्यावर नाही. तुमचा वेळ संध्याकाळी ६ वाजे पासून सुरु होतोय.’
‘तो’ मनात चांगला फूटभर तरी उडालाच. एवढ्याश्या वेळात पोर्टवर त्यांना शोधायचं, एकत्र करायचं, त्यांची तपासणी करायची आणि मग घेऊन जायचं?
“छे...अशक्यच...”
‘तो’ खूपच अस्वस्थ झाला. त्याची नजर भिरभिरत त्याच्या ‘क्र्यू’वर जाऊन थांबली.
‘होमवर्क’ करुन अगदि सज्ज बसलेलं त्यांच्यातलं प्रत्येक जण अधीर होऊन त्याच्या ‘ऑर्डर’ची वाट बघत होतं.
“बडी”, अगदिच अशक्य आहे असं पण नाही रे... पुढचं पुढे बघता येईल.....‘तो’ मनाशीच पुटपुटला आणि लगेचच त्यानं “हेडक्वार्टर्स”ला फोन जोडला. ....आणि आता या क्षणी तो अगदि सावध चित्यासारखा दबा धरुन, वरुन येणाऱ्या “परवानगीची” वाट बघत होता. पण अजूनही ती काही आलेली नव्हतीच!
दिवस मावळत आला. सूर्य लाल भडक होत असतानाच अधीर समुद्रानं त्याला गिळून टाकलं. आणि आता उरलीये ती शांत अंधाराची नीरवता.
दिवस मावळायच्या आधीच ‘रेस्क्यु ऑपरेशन’ उरकून निघून जावं असा ‘त्याचा’ बेत होता. पण त्याच्यावर आता पाणि फिरलं.
वाढत्या अंधारा बरोबरच ‘त्याचं’ काम ही आता खूप धोक्याचं, कठीण झालं होतं-! कारण ‘आदेन’ पोर्टचा फिरता फ्लॅश लाईट, चांगला चौदा मैलापर्यंत दूर जात सतत फिरत होता. आणि या पुढचं प्रत्येक काम त्याला चुकवत करावं लागणार होतं. जोडीला... त्यांनी घालून दिलेली वेळेची मुदत केंव्हाच निघून गेलेली होती. आता सगळ कसं ‘भगवान भरोसे’ असणार होतं.
भरवश्याचा तेवढा ‘त्याचा’ ‘क्र्यू’ होता. काय करणार ना?
हेडक्वार्टरवरुन आदेश तर आला पाहिजे!
आणि तो आला एकदाचा-!
‘सौमित्र’च्या उत्साहि ‘मार्कोज’नी आनंदानं एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या.
“चल यार, याचीच तर केंव्हाची वाट बघत होतो”.
“आता सगळेच जणं एकत्र पाण्यात उड्या मारुया”.
आणि ते सहाजणं पटपट त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या छोट्याश्या होडीत उतरले.
‘मार्कोज’ हे पाण्यातले खास ‘कमांडोज’ होते. समुद्रात कितीही खोलवर जाऊ शकत होते. शिवाय जमीनी वर घात-पात करण्यात ते निष्णात होते. ते कुशल हेरगिरीही करु शकत होते, कुठल्याही अद्यावत स्निपर उडवण्यात ते ‘मास्टर्स’ होते. कुठल्याही लढाईत त्यांची ‘खास’ राखून ठेवलेली ‘टीम’ महत्वाच्या कामी वापरली जात होती.
पण ‘सौमित्रच्या’ उत्साहानं सळसळणाऱ्या ‘मार्कोज’साठी ही मिळालेली पहिली वहिली संधी होती. आणि तिच ‘सोनं’ करायची वेळ आलेली होती.
खांद्यावर त्यांची ‘स्निपर रायफल’ आणि होडीत भरपूर दारुगोळा घेऊन ते निघाले! त्यांच्या योजनेप्रमाणे त्यांच पहिलं ‘सुरक्षा कवच’ कामाला लागलं-!
‘आदेन पोर्ट ते सौमित्र’च्या मार्गाच्या आजूबाजू काही धोका तर नाही? ‘ऑलबेल’ आहे ना? याची टेहाळणी करत पोर्टवरच्या सगळ्या भारतीयांच्या ठिकाणाचा नेमका शोध लावायचा, हे त्यांचं पहिलं महत्वाचं काम होतं.
कुणी ‘उपटसुंभ’ उपटलाच तर त्याचा ‘निकाल’ लावायची त्यांना मुभा होती. पण कुठलाही आवाज नको.
मांजरीच्या पावलानं त्याची बोट पोर्टच्या दिशेनं सरकली आणि ‘त्यानं’ नि:श्वास टाकला. लगेचच ‘त्यानं’ दुसऱ्या नंबरच्या “सुरक्षा कवचाला” ऑर्डर दिला.
“बडीज...यू...टू...स्नीपर घेऊन तुमच्या जागेवर पळा. मी ‘आदेश’ देईन तेंव्हाच तुम्ही ती जागा सोडायची.”
आणि ‘चातका’च्या नजरेनं, वाट बघत तिष्ठत उभे असलेले ‘ते दोघं’ मार्कोज जहाजावरच्या सगळ्यात उंचावर महत्वाच्या आणि मोक्याच्या जागेकडे पळाले.
त्यांच्या पैकी एक बायनाक्युलरने चौफेर लक्ष ठेवणार होता. अचानक कुठूनही काही संकट उपटलं तर आपल्या दुसरया ‘बडीज’चं लगेचच लक्ष वेधणार होता.
आणि दुसरा त्याची इझराईली ४.६२ची स्निपर रायफल घेऊन बसला होता. त्याची वाकलेली मान या पुढे सतत स्निपरला लागलेल्या टेलिस्कोपवरच राहणार होती.
“सर, आम्हाला ते सगळेच सापडलेत सर.”
“पोर्ट” वरुन एका मार्कोजचा आवाज फोनवर बोलला.
अरे सापडले देखील-! म्हणून "त्यानं" खरोखरच मनात देवाचे आभार मानले.
पोर्टवर उतरताच मिट्ट काळोखात, ते सहाही, सहा दिशेत पांगले होते. अंधारात सहजतेनं वावरायची त्यांना सवयच होती म्हणा.
१० मिनिटं, १५ मिनिटं... पण कुणालाच काही माग लागत नव्हता.
एवढ्यात दूरवरुन एका लहान मुलानं ‘टाहो’ फोडला.
आणि त्या सगळ्यांना त्यांची दिशा सापडली. थोडंस पुढे जाताच उजेडाची मंद रेषा त्यांना बोलावू लागली. अंधारात दूर रिकाम्या कंटेनरची काळी सावली जराशी जास्तच उठून दिसत होती. हा मंदसा उजेड तिथूनच येत होता.
“सर... पण... त्यांची संख्या जरा जास्तच आहे. म्हणजे साडे तीनशे असेल तर.....”. तोच ‘मार्कोज’ पुढे चाचरत सांगु लागला.
त्याचं छोटसं “घर” हे फक्त दीडशे लोकांपुरतच आहे याची त्याला चांगलीच कल्पना होती. आता त्यांत हे थोडे थोडके नाही, चांगले तीनशे पन्नास लोक कशी मावतील? पण नेहमी प्रमाणे त्यानं हा ही प्रश्न घराच्या कर्त्या-धर्त्या पुरुषाच्या खांद्यावर नेऊन टाकला होता.
पण आता मात्र “त्याच्याकडे” दचकायलाही वेळ नव्हता.
“ते नंतर पाहून घेईन. आत्ता लगेच सगळ्यांना ओळीत उभं करा. दोघं त्यांचे कागदपत्र नीट चेक करतील, एक त्यांची शारिरिक तपासणी करेल आणि तिसरा त्यांना दहा-दहाच्या संख्येत होडी मधे नीट बसवून देईल. बाकी दोघं पडेल ती कामं करतील. मी आत्ताच होड्या पाठवतो. मुख्य म्हणजे त्यांची तपासणी अगदि कसून करा. एखादा “ह्युमन बॉम्ब” त्यांच्यात लपून बसला असेल, घातपात करण्यासाठी. कुठलाही आवाज, वाद, भांडण अगदि नकोत. त्यांना बजावून सांगा, जो कुणी शिस्त मोडेल, आवाज चढवेल त्यास इथं जागा मिळणार नाही. तिथंच सोडून निघून जाऊ. हरी... गेट स्टार्टेड... वी आर लूजिंग द टाइम.”
आणि ‘तो’ “कर्त्या बाई” प्रमाणे जहाजाचं घर आवरायला वळला.
“सर...”, पलिकडून परत एकदा एक ‘मार्कोज’ केविलवाणा बोलला.
“आता काय?” ‘तो’ ओरडलाच.
“नाही...म्हणजे सर...इथं बायकाही तर आहेत. त्यांची तपासणी…अं...म्हणजे कशी करणार?”
खरं की? आता वॉरशिप म्हटल्यावर त्याच्यावर कुणी लेडीज ‘क्र्यू’ ठेवणं शक्य होतं का?
“आता आपण कुणाला पैदा करु शकतो का? मूर्ख..!! त्यांच्यातलीच एखादी प्रौढ, हुशार बाई बघ आणि तिला हे काम दे. लक्षात ठेवा, आपला वेळ केंव्हाचाच संपून गेला आहे.”
त्याची तिन्ही “सुरक्षा कवचं” आता कामास लागली होती. थोडासा निश्चिंत होऊन ‘तो’ त्यांच्या छोट्याश्याच स्वैपाकघराकडे वळला.
‘आता इथले ‘कुक’ वाढवायलाच हवेत. तीन-तीनच्या पाळ्या वाढवून द्याव्या. राशनचाही अंदाज घ्यावा लागेल. त्यानुसारच बेत ठरवून द्यायचा; मुख्य म्हणजे अन्नाची नासाडी होता कामा नये.’
तो तिथं पोचलाच असेल.
तर तेवढ्यात त्याचा नेहमीचा सेलर फोन हातात धरुन धावत आला.
“सर...हेड ऑफिसचा फोन...”.
“धीस इज इमर्जंसी. अत्ताच्या आत्ता निघा तिथून”, पलिकडून आवाज आला.
“यस सर... डूइंग द सेम...”
पण आता तो थोडासा वैतागला. अजून ही अर्धी मंडळी यायची बाकी होती. पोर्टवरचे त्याचे ‘मार्कोज’ शिस्तीत आणी वेगानं काम पार पाडत होते.
तोच अचानक अंधारातून एक काळी सावली बाहेर आली. कंटेनरच्या बाहेरच उभा असलेल्या एक मार्कोज त्याच्या जवळ धावला. तो तिथला वॉचमन होता. आत्ता या वेळी तो पिऊन उगाचच दंडुका आपटत इकडे तिकडे फिरत होता.
“का...रे... लोकांनों... काय चाललय इथं?” त्यानं दरडावून विचारलं.
त्याला माहित नव्हतं, अंधारात त्याच्याच मागे दुसरा मार्कोज सुरा उपसून ‘तयारीत’ उभा होता.
“सर...काही नाही हो... या लोकांना जरा मदत करत होतो. तुम्ही इथले मोठे साहेब का? अरे वा व्वा! छान झालं भेट झाली. तुम्हालाच शोधत होतो. सर... आमच्या कडून ही ‘छोटीशी’ भेट घ्या ना.” म्हणत त्यानं एक उंची “व्होडका” त्याच्या समोर धरली.
‘त्याचा’ सूर लगेचच मावळला.
“बरं बरं ठीकय. पण लगेचच निघून जा इथून.”
“हो..हो.. हा काय निघालोच परत!”
तसा वॉचमन डुलत डुलत अंधारात निघून गेला.
“बरं झालं, जास्त चौकशी केली असती तर... मेला असता साला. उगाचच बीचवर एक पुरावा ठेवायला नको”, उगारलेला हात खाली करत ‘मागचा’ बोलला.
खरंच मोठं विघ्न टळलं होतं-! कारण त्यांना घालून दिलेली ‘वेळ’ तर केंव्हाचीच संपून गेली होती. आत्ता सुरु होतं ते सगळं नियम मोडून चाललं होतं. उगाचंच जरासाही बोभाटा झाला असता तर? कुणी ‘त्यांनाच’ वाचवू शकलं नसतं-!
‘सैपाकाचं’ आटपून ‘तो’ घाईनं ‘खोल्यांकडे’ वळला. अजून पंधरा तरी रिकाम्या करुन हव्या होत्या. त्या नीट झाल्या आहेत की नाही ? बायका-मुलांची आणि वृद्ध-आजारी मंडळींना व्यवस्थित जागा मिळाली आहे की नाही? लागलीच त्यांना जेवा-खायला मिळतय ना? आजारी व्यक्तिंसाठी ‘त्यांचा’ डॉक्टर ‘मार्कोज’ लागलीच कामाला लागला आहे ना?
सगळ्यांची ‘उस्तवारी’ करताना तो अगदी भान विसरला होता.
तेवढ्यात... “सर...सर... हेडक्वार्टर्स...” त्याच्या ‘क्र्यू’नं धावत येऊन परत फोन पुढे केला.
‘सर...’ ‘तो’ उत्तरला.
“व्हाय यू आर डिसओबेईंग द ऑर्डर्स? लगेचच निघा सांगितलं होतं ना? माइंड इट. याचे परिणाम वाईट होणारेत.” पलिकडून त्याचा “बॉस” ओरडला.
आणि आता मात्र तो तडकलाच.
‘सर...तुमच्या माहितीसाठी आम्ही इथे डबे घेऊन पिकनिकला आलो नाहीये. या क्षणी अर्ध्या लोकांना तिथं सोडून मी निघून जाऊ शकत नाही. सॉरी, ही माझी पहिली ड्यूटी आहे. तुम्ही यासाठी काहीही अॅक्शन घेऊ शकता सर”. त्याला आवाजावर ताबा ठेवताना खूप प्रयत्न करावा लागत होता.
पण मग शांतचित्ताने तो परत कामाकडे वळला. त्याचे येणारे ‘पाहुणे’ हे प्रचंड टेंशन मधून आलेले होते. त्यांची ‘विशेष’ काळजी घेणं हे त्याच पहिलं काम होतं. सगळे जणं बहुतेक आता बोटीवर पोचले होते. शेवटची नावच काय ती यायची राहिली होती.
तेवढ्यात फोन आलाच.
“सर, सगळे नीट पाठवले पण एका बाईचं काय करायचं, ते कळत नाहीये. कारण तिचं चेकिंग तर व्यवस्थित झालय. तिचे पेपर्स आहेत. पण तिच्या सहा मुलांचे कुठलेच पेपर्स तिच्याजवळ नाहीत. तिला इथंच सोडून द्यावं कां?”
“तो” चांगलाच पेचात पडला. काय करावं?
“त्या मुलांना उघडं करुन नीट चेक करा-!” “ह्युमन बॉम्ब” असण्याची खूप शक्यता असू शकते.
