झुंज एका वादळाची
झुंज एका वादळाची
"बे आॅफ बंगालच्या" समुद्रातली ती सकाळ प्रचंड वादळाची ठरेल, याची कुणालाच कल्पना देखील नव्हती. अगदी पहाटेच सूर्यानं आपलं तांबडं सोनेरी जाळं समुद्रात फेकलं असेल नसेल, क्षितिजावरचा तो लालभडक गोळा काळ्या मोठाल्या ढगांनी लगेच गिळून घेऊन टाकला. वार्यासोबत मुसळधार पावसाचे कट-कारस्थान सुरू झाले. आणि मग उंच - उंच लाटा हि उसळून थैमान घालत त्यांच्या कारस्थानात सामील झाल्या.
आता यांच्यासमोर कोणाचेही काही खरं नव्हतं...!
एरवी सबमरिन शंकुश अशा वादळात कधी वर डोकावलीच नसती. खोल पाण्यातच ती सुरक्षित राहून वाट बघत उभी राहिली असती. खरं तर त्यांची शंकुश दूरवरच्या समुद्रातून तिचा नेहमीचा एक्सरसाइज आटपून रिफिट साठी परतीचा प्रवास करत होती. आता एकदाची डागडुजीसाठी ती किनार्याला लागली, की मग सगळ्यांनाच आपल्या घराकडे जाता येणार होतं. बस आणखीन दोन दिवस कि मग" होम स्वीट होम" - -
पण काय झालं कुणास ठाऊक?! आदल्या रात्रीच लेफ्टनंट कमांडर मोगल यांना एक विचित्र आवाज अस्वस्थ करू लागला- तसेही ते कधीच स्वस्थ बसणारे नव्हतेच. त्यांच्या अनुभवी कानांनी त्यांना सांगितलं, सबमरीनच्या बाहेरच्या आवरणात काहीतरी गडबड नक्कीच झालेली आहे. पण आत्ता रात्री तिला वर काढून काहीच करण्याजोगं नाहीये, म्हणून मग दुसर्या दिवशी पहाटे - पहाटेच शंकूशनं पाण्या बाहेर डोकं काढलं. खरंच शंकूशच्या" स्टार बोर्ड फ्लॅप" म्हणजे उजव्या बाजूच्या बाह्य आवरणात काही बिघाड झालेला होता, आणि काहीही झाले तरी, तो सुधार वेळेवारी करावाच लागणार होता..
आजची वादळी सकाळ आणि तो समुद्राचा बिघडलेला नूर- त्या तिघा सेलर्स आणि इंजिनियरची सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरणार होता- त्यांना" वर जाऊन बोर्ड वर काय तो बिघाड नीट करून या" असा मोगलनं ऑर्डर दिला होता. सीनियरची ऑर्डर मगत्यावरटंगळमंगळ करण्याची सोयच नव्हती. ते तिघं आपली लाईफ जॅकेट आणि हेल्मेट घालून सबमरीनच्या वरच्या लांबलचक निमुळत्या छतावर उतरले.
तिथं उंच- उंच लाटा आणि बेफाम वारा मनसोक्त धुडगुस घालत होते. पण कसाबसा तोल सावरत पावसात ती नेमकी जागा शोधून काढली. त्यांच्या पाठोपाठ लेफ्टनंट कमांडर मोगलहि वर येऊन, काळजीने त्यांच्या हालचाली टिपत होते.
"यार लवकर- लवकर आटपा, या वाऱ्यांमुळे तर धड उभेही राहता येत नाहीये--"
टूलबॉक्स घेऊन उभा असलेला सेलर वैतागून म्हणाला. वाऱ्यामुळे तो अक्षरशः डोलकाठी सारखा डुलत होता. "बडी इथं काय मी पिकनिकला आलोय"?
इंजिनियर भडकून म्हणाला. "हा पाऊस आणि या दुष्ट लाटा, काहीही सुचत नाहीये त्यामुळे- हातात टूल सुद्धा नीट धरता येत नाहीये--
पावसा मुळे खरंतर त्याला धड दिसतही नव्हतं! बाकी दोघं त्याच्या मदतीला लागलेले. वादळ वाऱ्याचा जोर वाढता झालेला.! खरंतर आता, त्यांना आपल्या जीवाची भीती वाटू लागली होती. कधी एकदा सुखरूप सबमरीनच्या बिळात उंदरासारखे दडी मारून बसतोय
असं त्यांना झालेलं होतं. कामही तसं पूर्ण झालेलं होतं, पण तेवढ्यात त्यांना एक अनपेक्षित धक्का बसला--
एका उंच लाटेनं त्यांना वेगात येऊन धडक मारली. त्यांच्यापैकी तीन सेलर पाण्यात दूर भिरकावले गेले. पण चौथा मात्र लाईफ जॅकेटचं हुक अडकून बसल्यामुळे तिथेच लोंबकळत राहिला होता. त्याच्या पायाला जोरदार इजा झालेली होती. त्याला काही हालचालही करता येत नव्हती. तो जवळजवळ बेशुद्ध झालेला होता--
"ओ गोड नो" त्याला लांबून बघत असलेल्या मोगलीच्या तोंडातून नकळत उद्गार निघाले. आणि कसलाही विचार न करता त्यांनी क्षणात उसळत्या लाटांवर उडी मारली- त्या सेलर पर्यंत पोचणं सोपं काम नव्हतं- ते थोडं पुढे जात, आणि लगेचच एक लाट त्यांना मागे ओढून नेई. त्यांचा दम भरू लागला- पण त्यांच्या नजरेसमोर तो लटकलेला सारखा दिसत होता. त्याला वाचवायचंच, त्याची मुलं-बाळं घरी वाट बघत बसली आहे. त्यांच्या मनानं सारखा घोषा लावला होता. शेवटी ते त्याच्यापर्यंत पोचले" कमाॅन मॅन डोळे उघड" त्याचा अडकलेला बेल्ट सोडवत, आणि त्याला थापड्या मरून जागवत ते म्हणाले--" मी तुला न्यायला आलोय घाबरू नकोस, घरी जायचय की नाही?"
त्यानं डोळे उघडले - - -
" सर मला पायच हलवता येत नाही - मी काय करू? तो तळमळत होता. खरंच त्याची अवस्था फारच वाईट होती. वरून जोरदार लाटांच्या थापड्या त्याच्या या पायाला आणखीनच दुखवत होत्या." अरे गड्या, एवढा बहाद्दर तू- चिंता काय करतोस? मी आहे ना. मी नेतो तुला- अरे पाय नाही... पण हात आहे तर आहेतच ना?! हा म्हण वन - टू - थ्री -फिरसे.. वन.. टू.. थ्री.. आपण असे हात मारु या काय?" त्यानं मन डोलावताच मोगलीनं त्याच्या कमरे भोवती आपल्या एका हाताचा घट्ट विळखा घातला आणि, वन टू च्या तालावर त्यांचे तीन हात पाणी कापू लागले. आताची काम फारच अवघड होऊन बसलं होतं. पाण्याच्या प्रचंड उंच लहरीं सोबत ते एकदम उंचावर जात आणि तेवढेच खाली येत.. कधी आडव्या, तिडव्या लाटा त्यांना शिडी पासून खूप दूर दूर फेकून देत. शेवटी मोगली नेटाने त्याला शिडीपाशी घेऊन आले. पण आता वेगळेच संकट समोर उभं होतं.. सेलरचा पाय तर पूर्ण निकामी होऊन बसल्यामुळे त्याला शिडी चढणंच काय.. साधं उभं राहणं देखील अशक्य झालेलं होतं. आणि त्यातून ती सरळसोट.,. चिंचोळी शिडी चढायची.? अगदी अशक्य.! -
"आपण बहुतेक असेच मरणार" त्याचं मन म्हणालं. "डोन्ट वरी यार, आता बघ माझी जादू" - मोगली ने परत एकदा त्याला धीर दिला. मग त्यांनी इंडियन नेव्हीत सुरुवातीचे दिले गेलेले ट्रेनिंग वापरायचे ठरवले. त्यांनी ते अचूक वापरले. त्याला सरळ आपल्या बळकट पाठीवर टाकले आणि एक पाऊल पहिल्या पायरीवर टाकले मात्र,ते सटकन निसटलं.!" अरे बापरे" - मोगलच्या तोंडातून शब्द आले. लाटांनी भिजून सगळ्याच पायऱ्या खूप निसरड्या झालेल्या होत्या. मग मात्र, तेखूपच सावधगिरीने, प्रत्येक पायरी चाचपडून बघत, अगदी कासवाच्या गतीने पुढे पुढे जाऊ लागले--
- - - आणि शेवटी ते सबमरीनच्या "पुल "-पाशी --दारापाशी पोचले! तिथं खूप गर्दी जमलेली होती.
त्यांच्या हवाली सेलरला करून ते अगदी क्षणभरच, विसावले असतील.!
त्यांची नजर परत समुद्रात दूरवर काही शोधू लागली.
"आता ते तिघं कुठे असतील?" त्यांचा शोध घ्यायलाच हवा.
लाईफ- जॅकेट घातलेले तीन ठिपके, दूरवर हेलकावे घेत होते, हात उंचावून इशारे करत होते-
"एक तर वाचला, कदाचित आता आपणही असेच वाचवले जाऊ," - त्यांच्या निराश घाबरलेल्या मनाला धीर आलेला होता.
आणि खरंच तसं झालं. दोन गोताखोरांना मदतीला घेऊन, मोगल त्यांच्या दिशेनं परत निघाले होते. वरून सब मरी नही त्यांच्या दिशेनंच निघालेली होती--
सुदैवानं त्यांच्या पैकी कोणीच फारसं जखमी झालेलं नव्हतं. मग जीवात- जीव येऊन, ते हि सबमरीनच्या दिशेने पोहू लागले.
मोगलन त्यांना एकत्र केलं, आणि मग ते सगळेच शिडी पर्यंत पोचले.
आणी - एकेक सेलर शिडीवर चढू लागला. मागे गोताखोर, आणि सगळ्यात शेवटी मोगल होते - -
पण निसर्गाला अजूनही मोगलच्या धीराची परीक्षा घ्यायची होतीच -
एक लाटेनं उसळत येऊन शिडीला जोरचा तडाखा दिला. ती झोके घेऊ लागली - - आणि आधीच्याच निसरड्या
झालेल्या पायऱ्या वरून, सगळे खाली पाण्यात कोसळले--
आता मात्र मोगल निसर्गाच्या या अरेरावी मुळे- रागानं लाल झाले!! "बास्टर्ड - अॅम नाॅट गोईंग टू क्वेट" - ते जवळजवळ ओरडलेच!
खर तर ते आता पूर्ण थकून गेलेले होते. त्यांना अतिशय दम लागत होता. श्वास घेण्यासाठी सारखे थांबावे लागत होते.! पण ते पूर्ण वेडावले होते.
"आपलं काही झालं तरी चालेल, पण त्या तिघांना वाचवायचं!.! मोगल तू हरणं केवळ अशक्यच--"..!
त्यांनी पाहिलं- ते सेलर्स फारसे दूर गेलेले नव्हते, परत एकदा गोताखोरांच्या मदतीने, त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं., सबमरीनच्या शिडी जवळ येऊन, त्यांनी" पुल" जवळ जमलेल्या सेलर्सना"येतोय" म्हणून खुण केली--
- पण आताची प्रत्येकाची दमछाक झालेली होती.
ते सगळेच खूप थकून गेलेले होते. उंचावर असलेल्या शिडीच्या पहिल्या पायरीपर्यंत देखील, कुणालाच पोचता येत नव्हते.! हातपाय गाळून ते नुसतेच तिच्याभोवती फिरत होते.! मोगलना ते जाणवले. "यांना वाचवायचे असले तर, परत एकदा सगळी इच्छाशक्ती एकवटून त्याना मदत केलीच पाहिजे"
ही त्यांच्या शौर्याची सत्वपरीक्षा होती. आणि क्रूर निसर्गानं ती घेण्याचा ठाम निश्चय केलेला होता.! शिडीच्या शेवटच्या पायरी भोवती मोगल पोहू लागले, आणि मग एकेक सेलर त्यांच्या बळकट खांद्यावर पाय देऊन वर चढू लागला. अजूनही वादळ- वारा- पाऊस अगदी वेड्यासारखे थैमान घालत होते. वाऱ्याने शिडी सारखी झोके घेत होती. पाय घसरत होते तर, कधी हाताची पकड सुटत होती. वरून पावसाच्या सतत अभिषेकाने डोळ्यांना काही दिसत नव्हते.पण शेवटी मुगल जिंकले.! त्यांच्या धैर्या पुढे निसर्गालाही हार मानावी लागली. सगळे सुखरूप वर पोचले.
मोगल तेवढे वर यायचे राहिले होते.
पण आता रागाने खवळलेल्या निसर्गाला आपली हार मंजूर नव्हती.! त्याला एक तरी बळी हवा होताच.
एका वेगळ्याच समाधानं ते एक- एक पायरी चढू लागले.
सेलर्सच्या मुलाबाळांचे आनंदी चेहरे त्यांच्या डोळ्यासमोर समोर येत होते. आपण त्यांची घरटी आज वाचवू शकलो, याचं अगदी आंतरिक समाधानानं ते भारावून गेले होते.
पण- पण एक प्रचंड लाट त्यांच्यावर धावून आली. तिनं त्यांना पूर्ण गिळून टाकले,.! आणि बघताबघता मोगल दिसेनासे झाले. लाट ओसरली तेव्हा मोगल पाण्यावर फक्त हेलकावे खाताना दिसले. कुठलीही हालचाल नव्हती,! मोगल लाटा सोबत दूरवर निघाले होते.! अंतिम प्रवासाला.!
लाटेचा तडाखा नेमका त्यांच्या डोक्याला बसलेला होता.! आणि तेव्हाच त्यांनी प्राण सोडले होते!
पण शेवटपर्यंत या भारताच्या वीर पुत्रानं आपलं कर्तव्य
बजावत प्राण सोडले होते...
जय हिंद
