Second Hand साडी..
Second Hand साडी..


मानसी आपल्या आईला दाराबाहेर उभी राहून जोरजोरात आवाज देत होती, "आईSs आईSs लवकर ये. आईSs.."
"अगं हो गं बाई थांब जरा. गॅस बंद करू दे."
"ये ना गं लवकर."
"हं बोल काय झालं तुला ओरडायला."
"अगं आई, माझी ती मैत्रिण आहे ना, अंकिता."
"कोण गं..?"
"अगं असं काय करतेस तिची आई नाही का तुझ्यासोबत नेहमी यायच्या, मार्केटला..?"
"अरे हा ती पाठीमागे राहणारी ना??"
"हो.."
"मग असं बोलायचं ना. बरं म काय त्यांचं..?"
"अगं आई तुला काय सांगू त्या काकूंनी इतकी भारी साडी घेतलीय ना मी तर पाहतच राहिले. ती साडी अंकिता आता आमच्या दहावीच्या निरोप समारंभाला नेसून येणार आहे."
"हो तुझ्या आधीच मला ही गोष्ट कानावर पडली."
"मग चल ना आपणदेखील घेऊ. मला सुद्धा हवीय गं तशीच साडी. आई चल ना.. प्लीज.. प्लीज.. प्लीज.."
"हे बघ मनु, तुला आधीच सांगते. मागच्या महिन्यातच तुला लेहंगा की काय तो घेतला होता आता नाही. तुझ्यामुळे मी स्वतःला साडी घेऊ शकले नाही."
"आई ही साडी तुझीच असणार आहे फक्त मी एकच दिवस नेसणार."
"नाही तसंही आता महिना अखेर आहे. इतकी भारी साडी नाही आता अफोर्ड करू शकत आपण."
"महाग नाहीये ती साडी. फक्त दोनशे रुपयात घेतलीय."
"क्काय..?"
"हो मला अंकिताने सांगितलं. एक साडीवाला आहे. जो कधीतरीच फेरी मारतो, त्याच्याकडूनच घेतलीय ती साडी. पाच हजारांची दिसणारी साडी, ते पण फक्त दोनशे रुपयात."
"अरे बापरे. थांब मी जाऊन ती साडी पाहून येते."
असं म्हणून आई चौकशी करून आल्या. पण आल्यानंतर गप्प गप्पच होती. मानसी सतत आईच्या पाठी भुणभुण करत होती. आईने दटावल्यावर शांत झाली. आईने जेवायला बोलवलं पण नाही आली ती. दुपारी जेवण न करताच झोपी गेली. आईला खूप वाईट वाटलं. झोपेतून जाग आली तशी थोडावेळ डोळे मिटून बसून होती. डोळे उघडून पाहते तर बाजूला सुंदर काठापदर असणारी साडी होती. ती साडी भारी नव्हती पण त्याचा रंग आणि काठावरचे नक्षीकाम सुरेख होते. मानसीला साडी खूप आवडली. आई किचनमध्ये काम करत होती. तिला जाऊन तिने मिठी मारली आणि तिची माफी मागितली. मानसीने विचारताच ही साडी आईने बाजारातून खरेदी करून आणल्याचं मानसीला सांगितलं. पण आईने दोनशे रुपयाची साडी विकत न घेता त्याहून जास्त असणारी किमतीची साडी विकत घेतल्याचं मानसीला आश्चर्य वाटत होतं. पण तो विषय काढताच आई गप्प व्हायची. मग मानसीने तो विषय मनातून काढून टाकला.
निरोप समारंभाचा दिवस उजाडला. सगळ्या मुली सुंदर नटून थटून आल्या होत्या. मानसीदेखील तिच्या आईने घेतलेल्या साडीत खूप सुंदर दिसत होती. सगळ्याजणी सेल्फी काढत होत्या. मानसीला तहान लागली होती म्हणून ती तिच्या बेंचजवळ आली. पाहते तर शेवटच्या बेंचवर अंकिता डोकं टेकवून झोपली होती. तिला जाऊन मानसीने उठवलं. तिचे डोळे लाल झाले होते. नेहमी खळखळून हसत असणारी अंकिता आज खूप निस्तेज आणि कोमेजलेल्या फुलासारखी गळून पडली होती. मानसीने लगेच तिच्या शिक्षकांना बोलावून तिला बरं वाटत नसल्याचं सांगून टाकलं. बिचारी अंकिता आजच्या दिवशी काय काय करायचं ते ठरवून आली होती पण तिची तब्येत ठीक नसल्याने तिच्या बाबांना बोलावून तिला घरी सोडण्यात आलं. घरी आल्यावर आज झालेल्या गमती जमती सोबत तिने अंकिताचा किस्सादेखील आईला सांगून टाकला. आईच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली. तितक्यात त्यांच्या इथेच राहणाऱ्या दोघी तिघी काहीतरी कुजबुजत होत्या. आईने विचारताच त्यांनी सांगितलं, अंकिताची तब्येत खूप बिघडली आहे. डॉक्टरदेखील येऊन तिला तपासून गोळ्या इंजेक्शन देऊन गेले, पण तिची तब्येत जास्तच बिघडत चालली आहे.
आई सगळ्यांना घेऊन अंकिताच्या घरी पोहोचली. तिथे पाहिलं तर अंकिता अजूनही ती साडी नेसून होती. तिला अजिबात उठता येत नव्हतं म्हणून तिच्या आईने तसंच तिला साडीमध्ये ठेवलं. मानसीच्या आईने सगळ्यांना विनवणी करून कसंही करून ती साडी तिच्यापासून काढलीच पाहिजे म्हणून निक्षून सांगितलं. आता बाकीच्यांनादेखील समजून चुकलं की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. अंकिताच्या आईने पुढे होऊन तिची साडी काढू लागल्या पण ती साडी त्यांना खूप जड वाटू लागली. मग मानसी तिची आई, अंकिताची आई आणि बाकी दोघी मिळून सगळ्या तिची साडी उतरवू लागल्या. पण साडी तिच्यापासून लांब होतच नव्हती. मानसीच्या आईने तिला त्यांच्या बाजूला राहणाऱ्या आंटी कडून holy water आणायला सांगितलं. ते आणल्यानंतर त्यांनी तिच्यावर थोडं शिंपडलं. तशी साडी आपोआप खाली पडली आणि अंकिता चक्कर येऊन पडली. सगळे घाबरले पण मानसीच्या आईने सांगितलं तसं पटापट स
ाडी काढून त्यांनी ती बाजूला ठेवली मग सगळ्यांनी तिला बेडवर झोपवून बाहेर निघून आले. मानसीच्या आईने त्या साडीला सोसायटीच्या मागच्या बाजूला नेऊन जाळून टाकलं. मग वरती येऊन निवांत पडली. सगळ्यांना प्रश्न पडला होता की का आणि मानसीच्या आईला कसं याबद्दल माहिती. सगळ्यांचे प्रश्न पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"आम्ही लहान असताना आमच्या चाळीत, आमच्या घरासमोर स्मिता काकू राहायच्या. काकूंना खूप हौस होती साड्यांची. भारीतल्या साड्या तर खूप आवडायच्या पण घरची परिस्थिती बेताचीच असल्याने महागड्या साड्या खरेदी करू शकत नव्हत्या. एकदा असाच एक फेरीवाला चाळीत आला. त्याच्याकडे भरपूर सुंदर अशा साड्या होत्या. हजारांच्या साड्या केवळ पन्नास-शंभर रुपयांच्या भावाने तो देत असल्याचं पाहून सगळ्या जणू त्या साड्यांवर तुटून पडल्या. त्यात सगळ्यात सुंदर साडी काकूंचीच होती. त्या खूपच आनंदात होत्या. आता योग्य मुहूर्त पाहून साडीची घडी मोडायची म्हणून त्यांनी ती कपाटात ठेवून दिली. पण त्या दिवसानंतर काकू अचानक वेगळ्या वाटू लागल्या. त्या सगळ्यांना सांगायच्या की रोज ती साडी मला, "मुझे पेहनो.. मुझे पेहनो..मुझे पेहनो.. मुझे पेहनो.." असं म्हणत कपाटातून आवाज येतो. मुळात काकूंचा स्वभाव मिश्किल असल्याने आम्ही हसून त्या गोष्टीला दुर्लक्ष करायचो. त्या रात्री काकांची नाईट शिफ्ट होती. काकूला एकटं झोपण्याची सवय होती. त्या मध्यरात्री कपाट जोरजोरात हलू लागलं. काकूंनी भास समजून डोळे मिटून घेतले. आता पुन्हा आवाज येऊ लागला. कापाटाचं दार हळू हळू उघडायचं आणि बंद होत होतं. किती तरी वेळ हाच खेळ चालू होता. मग काकू ते दार बंद करण्यासाठी बेडवरून उतरल्या. त्यांनी दार बंद केलं. मागे वळल्या तशा पुन्हा कर्कश आवाज करत ते दार उघडलं. काकूंनी हळूच वळून पाहिलं तशी ती साडी अचानकपणे खाली पडली. ती त्यांनी खाली वाकून उचलली तसं त्यांना कोणत्या तरी बाईच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. मध्येच ती बाई मुसमुसायाला लागली. काकू हळूच उठत ती साडी पुन्हा त्या जागी ठेवायला जाणार म्हणून उठल्या तर पाहिलं की एक पांढरी फटक बाई त्या कप्यात बसली होती. तिचं तोंड त्यांच्या खूप जवळ होतं आणि ती एकटक त्यांना पाहत बसली होती. काकूंच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. तिचं भयानक रूप पाहून त्या खाली पडल्या. तशी ती रांगत रांगत त्यांच्या जवळ येऊ लागली. अचानक जोरात किंकाळी ऐकल्याने सगळे बाहेर धावत आलो. काकूंचा आवाज असल्याने आम्ही सगळे दार वाजवू लागलो पण काकू काही दार उघडत नव्हत्या. मग सगळ्यांनी दार तोडायचा निर्णय घेऊन दार उघडलं. काकू खाली कुठेच दिसत नसल्याने माळ्यावर जाऊन पाहिलं तर काकू तिथे बेशुद्ध पडल्या होत्या. काकांना कळवून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवेना. दोन दिवस त्या वेड्यासारखं वागत होत्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच अनुभव आल्याने त्या काही दिवसांनी गतप्राण झाल्या. काही वर्षांनी काका हे घर विकून दुसरीकडे राहायला गेले. त्या वेळी सगळ्यांनी आणलेल्या साड्या जाळून फेकून टाकल्या. एकदा आमच्या इथल्या बाईला पुन्हा तोच फेरीवाला दुसऱ्या चाळीत साड्या विकताना दिसला. आम्हाला त्यांनी फोन करून तातडीने बोलावून घेतलं. आम्ही त्याला खेचत आमच्या चाळीत आणून झालेला प्रकारचा जाब विचारला. तसा तो रडू लागला. गरीब असल्याने तो जुन्या साड्या कमी पैशात विकून त्याचं पोट भरायचा. त्या साड्यांमध्ये काही साड्या, श्रीमंत लोकांचे कपडे थोड्या फार प्रमाणात जुने झाल्याने ते आम्हाला देऊन टाकायचे त्यात काही कपडे देवाघरी गेलेल्या व्यक्तींच्या असायच्या. त्यात बऱ्यापैकी साड्या, ड्रेस नवीन असल्याने त्या विकायला काढून पैसे मिळत. आम्हाला बेसावध असताना पाहून तो तिथून पळून गेला आणि पुन्हा कधीच दिसला नाही.
काही महिन्यांनी आम्हाला ज्या व्यक्तीने त्यांच्या साड्या दान मध्ये घेतल्या होत्या, त्याच्याकडून कळलं ती साडी एका पारसी बाईची होती, तिला ती साडी खूप प्रिय होती. ती कोणालाही त्या साडीला हात लावू देत नव्हती. तिच्या लग्नाच्या वाढदिवशी तिला घालायची होती म्हणून तिने खूप जपून ठेवली होती पण एकदा घाई घाईत रस्ता क्रॉस करताना तिचा अपघात झाला व ती जागीच गतप्राण झाली. त्या साडीला त्यांनी ती दान केली. त्या ओढीनेच आज तिचा आत्मा त्यासोबत इथपर्यंत आला होता. सगळ्याच साड्या तशा नसतात पण कोणत्या कशा असतील हे सांगता येत नव्हतं म्हणून त्या दिवसापासून आम्ही कानाला खडा लावला. पुन्हा कधीही वरवरच्या रूपाला भुलून असे कपडे कधीच विकत घेणार नाही. आज अंकिताला त्यामुळेच त्रास होत होता."
मानसीच्या आईच बोलणं ऐकून सगळ्याजणी थक्क झाल्या. कोणी काहीच न बोलता निरोप घेऊन निघून गेल्या.
अंकिताला दुसऱ्या दिवशी बरं वाटू लागलं. तिला सुखरूप पाहून अंकिताच्या आईने मानसीच्या आईचे आभार मानले.
समाप्त..