राखी - धागा प्रेमाचा, आपुलकीचा
राखी - धागा प्रेमाचा, आपुलकीचा


"केल्या का तुझ्या राख्या पोस्ट, पूर्वी? चारच दिवस राहिले रक्षाबंधनाचा दिवस यायला..." आईने पूर्वीला फोनवर बोलता बोलता विचारले.
"नाही गं आई... काय राखी पाठवायची...! आता इतकी वर्षे झाली माझे लग्न होऊन.. मी दरवर्षी राखी आठवण ठेऊन पाठवते, पण कधीच कोणत्याच भावाने मला फोन करून म्हटलं नाही की, आम्ही तुझ्या राखीची वाट पाहतो, किंवा खूप छान वाटलं तुझी राखी बघून. मग का पाठवू मी राखी ज्याला त्याचं महत्त्वच माहिती नाही.." पूर्वी जरा रागातच आईला बोलत होती..
"अगं वेडी, असं कुठं असतं का? काही पण वेड्यासारखी बोलू नकोस." आईने पूर्वीला समजून सांगण्याच्या प्रयत्नात सूर काढला.
"मग काय म्हणू..? १५ वर्षे झाली आता... आजपर्यंत कोणताच भाऊ आला नाही माझ्या घरी रक्षाबंधनाला..."
"असं काही नाही गं बाळा आणि तू तुझ्या भावांना ओळखत नाही का..? प्रत्येक जण या दिवसात आपापल्या कामात व्यस्त असतात. कॉलेज, ऑफिस असल्याकारणाने आणि पावसाच्या अचानक येण्याने तुझ्या गावी इतक्या दूर येणं कोणालाच जमले नाही..." आई म्हणाली.
"असू दे आई, तू त्यांचीच बाजू घेणार.." नाराजीचा सूर करत पूर्वी म्हणाली...
"बरं एक सांगू पूर्वी, तू इथे उन्हाळ्यात सुट्टीत येते तेव्हा सगळ्यात जास्ती आनंद तुझ्या भावांनाच होतो. कारण त्यांची सगळ्यात लाडकी बहिण काही दिवस त्यांच्यासोबत राहणार म्हणून. तू येणार म्हणून तुझे भाऊ घरी सगळ्यांना कामाला लावतात. तुला काय आवडतं, काय आवडत नाही याची संपूर्ण माहिती त्यांना असते. तुला आवडणाऱ्या पदार्थांची सगळी यादी तयार असते. तू आल्यावर हे सगळे बनले पाहिजे ही सक्त ताकीद तुझ्या लाडक्या वहिनींना तुझेच भाऊ देतात."
"खरंच का गं आई.." आईचे बोलणे ऐकून पूर्वीच्या चेहऱ्यावरचे हावभाव हळूहळू बदलत होते...
"वर्षातून एकदाच त्यांची बहिण येणार म्हटल्यावर तुला हवे ते सगळे हट्ट पुरविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणखी काय हवं गं बाळ तुला... ! आपले पहिले रक्षण कर्ता कुलदैवत आहेतच. त्याचबरोबर एका स्त्रीचे, बहिणीचे, बायकोचे रक्षण करणारा तिचा नवरा, तिचा भाऊ किंवा तिचे वडीलदेखील असू शकतात. महत्त्व रक्षण करणाऱ्या आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नात्यात असतं , हे लक्षात असू दे बरं का..! राखी, एक साधा धागा आहे, पण हाच धागा तुझ्या भावना तुझ्या भावांपर्यंत पोहोचवीत असतो. त्यात त्यांना तुझा जिव्हाळा, प्रेम, आपुलकीची भावना जाणवते. तुझ्या राखीची आतुरतेने वाट बघत असतात तुझे भाऊ. दाखवत नसले तरी भावांना काळजी असतेच बहिणीची. तुझ्याकडे येऊन राखी बांधून घ्यावी, असे सगळ्यांनाच वाटते पण काहीतरी अडचणी येतात आणि राहून जातं. तू इतक्या दुरुन येऊ शकत नाही म्हणून तुझे सगळे भाऊ त्यांच्या मुलीकडून तुझी राखी आठवणीने बांधून घेतात. गेल्या दोन दिवसांपासून तुझी राखी आली का म्हणून सगळ्यांनी विचारुन झाले आहे..."
"आई मी चुकलेच गं. नेहमी मलाच त्यांनी समजून घ्यावे असा आग्रह मी करते, पण त्यांना समजून घेण्याचा मी आजपर्यंत प्रयत्नच केला नाही. आजच सगळ्यांच्या राख्या पाठवते..." भरुन आलेले डोळे पूसत पूर्वी म्हणाली.
मैत्रिणींनो, खरंच भाऊ-बहिणीच नातं हे असंच असतं. काही गोष्टी न बोलता आपण समजून घ्यायला हव्या. एकमेकांशी भांडण करणारे, चिडवणारे, एकमेकांचे सिक्रेट पोटात ठेवणारे आणि वेळप्रसंगी एकमेकांना समजून घेणारे असे हे बहिण-भावाचे नाते. हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आनंदाने सगळे साजरे करूया. तुमच्या गावात तुमचा एखादा भाऊ राहत असेल तर वेळ काढून त्याला राखी नक्की बांधा आणि आनंदाने साजरा करा हे रक्षाबंधन...