पत्र प्रिय प्रेमाला..!
पत्र प्रिय प्रेमाला..!


प्रिय प्रेम,
कसा आहेस? खरं म्हणजे तू जीवनात आहेस म्हणून जीवनाला अर्थ आहे. आणि तू नाहीस तर जीवन व्यर्थ आहे बघ..!
तू म्हणजे विश्वासाचे दुसरे नाव, तू म्हणजे प्रत्येक प्रेमळ नात्याची गुंफण, तू म्हणजे मनात साठवलेली आठवण, तू म्हणजे आपल्या प्रियजनांना भेटण्याची आस आणि म्हणूनच तुझे असणे जीवनात खास असते. तू असल्याने जीवाला लागतो, अगदी मनापासून.
तू म्हणजे युगल प्रेमींना जाणवलेली एकमेकांविषयीची ओढच. असं सगळं असताना तू म्हणजे रुसणं, हसणं आणि रागे भरुन येणंसुद्धा. अशाच परिस्थितीत तुझं चोर पावलांनी येऊन एकमेकांना सावरून घेणं, एकमेकांच्या विचारांना समजून घेणं, एकमेकात एकरूप होऊन जाणं.
तुला व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा आधार घेतला जातो, तर कधी मनातल्या भावना सांगण्यासाठी पत्रांचासुद्धा उपयोग होतो. अशा विविध रंगांनी नटलेला, संपूर्ण विश्वात वास असलेल्या तुला शब्दात वर्णन करताना उपमा कमी पडतील असा सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजस्वी तू आहेस. असाच माझ्या पाठिशी राहा आणि माझ्यावर प्रेम करत राहा...
तुझीच
मी..!