पूर्ण अपूर्ण
पूर्ण अपूर्ण
नेत्राचा आज ६१ वा वाढदिवस होता . घरातच छोटीशी पूजा झाली , जवळच्या गणपतीला नेत्राच्या इच्छेनुसार अभिषेक झाला आणि आता एक छान पार्टी ठेवली होती .
सून श्वेताने तिला ती नको म्हणत असताना सुध्दा छान तयार केले होते . एका विधवेला स्वतःची हौस करायची इच्छा असू शकत नाही का ? असे म्हणत श्वेताने सगळं आवरून होई पर्यंत नेत्राला आरसा पाहूच दिला नाही .मग मात्र स्वतःला एका नव्या रुपात न्याहाळत नेत्रा हरखून गेली .श्वेताने तिला कोणाची नजर लागू नये म्हणून नेत्राच्या कानामागे काजळाचे बोट लावले .
तयार होवून त्या दोघी पार्टी हॉल मध्ये आल्या , सगळ्यांच्या नजरा नेत्रावर खिळल्या होत्या .या वयातही ती खुप सुंदर दिसत होती .
केक कापण्याचा प्रोग्राम झाला , सगळे जण नेत्राला मन भरून शुभेच्छा देत होते .
शेवटी मुलगा श्री आणि श्वेता तिच्या जवळ आले आणि म्हणाले , " आई , आजवर बाबांच्या मागे तू मला खुप कष्टाने वाढवले , मला एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी तू जे काही सोसले आहेस ते मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही . पण आता मला तुझे आयुष्य सुखाने भरून टाकायचे आहे .जेव्हा पासून मला आठवते तेव्हापासून मी तुला कायम स्वतःचे मन मारून जगताना पाहिले आहे पण आता इथून पुढे तू तुझे आयुष्य तुझ्या इच्छेप्रमाणे जग . तिथे मी कायम तुझ्या सोबत उभा असेल . तुझे आयुष्य तू आनंदाने जग . मी तुला शेवटपर्यंत कशाचीही कमतरता पडू देणार नाही . तू फक्त आदेश द्यायचा आम्ही दोघे तुझ्या सेवेला कायम हजर असू . "
श्रीचे बोलणे ऐकून नेत्रा सुखावली . श्वेता सुध्दा खुप छान काळजी घेणारी अशी सून तिला मिळाली होती . सारं काही सुरळीत होतं.
कार्यक्रम सुध्दा मस्त पार पडला . पाहुणे मंडळी निघून गेली .
नेत्रा तिच्या रूम मध्ये बसली होती . तिला तीचा भूतकाळ आठवला .
वयाची २५ शी ओलांडली तरी तिचे लग्न जमत नव्हते ,घराची परिस्थिती बेताची , अश्यातच १० वर्षाने मोठ्या असणाऱ्या मुलासोबत चौकशी न करता वडिलांनी तिचे लग्न लावून दिले , तो पूर्ण व्यसनी , बाहेरख्याली , घरी फक्त विधवा आई . जमिनजुमला बऱ्यापैकी होता . सासूने जीव लावला आणि मरताना राहते घर आणि कर्जातून वाचलेला छोटासा जमिनीचा तुकडा नेत्राच्या नावे करून ठेवला .लग्न होवूनही ५-६ वर्षात नवऱ्याने साधे बोट सुध्दा लावले नाही . आई गेल्यावर अनवधानाने एक दोन वेळा जवळ आला आणि त्याचे फळ श्रीच्या रूपात तिला दिलासा देणारे ठरले . हे मूल माझे नाही म्हणून त्याने कधीच त्याला स्वीकारले नाही आणि बायको बदफैली आहे असा आरोप करून अति दारू पिण्याचे कारण होवून तो हे जग सोडून गेला .
छोट्या श्रीला सांभाळत तिने त्या छोट्याश्या जमिनीवर नंदनवन फुलवले . कष्टाची तमा न बाळगत मुलाला भरपूर शिकवले आणि योग्य संस्कारात वाढवले . तिच्या कष्टाचे चीज झाले होते ती समाधानी होती . सून सुध्दा सुसंस्कारी आणि सासूला जीव लावणारी मिळाली . गावातून शहरात येत,तिथे मोठा बंगला बांधून मुलाने भरपूर नाव कमावले .
आईच्या सुखासाठी आज तिला तो म्हणत होता तू आता तुझे आयुष्य आनंदाने जग .
नेत्रा विचारात गढून गेली आनंद आणि सुख म्हणजे नक्की काय ? आजवर नेत्रा तिचे स्वतःचे आयुष्य कुठे जगली होती ?
ज्या वयात एका जोडीदाराची गरज होती ते सुख सुध्दा तिला लाभले नाही , कष्ट तर भरपूर केले , पैसा पण खुप कमावला पण त्यातला तिने स्वतःसाठी किती खर्च केला ? मुलासाठी जगले याची जाणीव मुलाला आहे . मुलाचे प्रेम शेवट पर्यंत मिळेल पण जे प्रेम मला हवे होते , आज हवे आहे ते कसे मिळेल ? कोणीतरी फक्त माझ्यावर प्रेम करणारे असावे हे माझे स्वप्न कधीच पूर्ण नाही होवू शकत . किती स्वप्न मी पाहिली होती पण ती कायम अपूर्णच राहिली . मन तर गुंतायचे कुठेही गुंतवले की पण त्या निसर्ग सुलभ भावनानी कित्येक रात्री हे शरीर जाळले होते .
आज जगाच्या नजरेंत मी खुप सुखी आणि एक परिपूर्ण स्त्री आहे पण ही परिपूर्णता मात्र अपूर्णतेतून आयुष्य जगत आली आहे .
मनातल्या त्या अतृप्त भावना , ती स्त्रीसुलभ गोड स्वप्न कायमच अपूर्ण राहिली . रोज तीळ तीळ मारणारे ते क्षण पूर्ण आयुष्य जगुनही कधी जगलेच नाही .
आज या वळणावर मुलगा म्हणतो आहे जग आज पुन्हा नव्याने ....पण शक्य आहे का ते कोवळ , निरागस वय पुन्हा परतून येणं ? प्रेमाच्या त्या पहिल्या वहिल्या स्वप्नाच्या पूर्णत्वाची जादू आता मनावर जादू करेन का ? होईल का पूर्ण ते अपूर्ण आयुष्य ??
