STORYMIRROR

Deepali Aradhye

Classics Inspirational

3  

Deepali Aradhye

Classics Inspirational

पत्रलेखन

पत्रलेखन

2 mins
186

आवडते छंद कोणते, असा प्रश्न विचारला तर उत्तरं फक्त तीन आहेत - एक म्हणजे वाचन, दुसरा म्हटलं की लेखन आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तो म्हणजे पत्र लेखन!

  पूर्वी 'मैत्र'विषयी अज्ञानी असताना, कोणालाही पत्र लिहिण्याची खुमखुमी असायची. सोबतच ज्या व्यक्तीला पत्र लिहिलं गेलं आहे, त्या व्यक्तीला 'मी लिहिलेलं पत्र वाचून, हमखासच एकदम लय भारी फीलिंग येणार', असं मनाचे मांडेही खायले जायचे. आता लक्षात येतं, अरे ते पण एक एक वय असतं, त्या वयाचे ते टप्पे असतात. सगळ्यांसाठी काही टप्पे सारखे असतात, पण बरेचदा त्यात फरक असतात, परिस्थिती-वातावरण-विचारपद्धती-स्वभाव यांनुसार!

  मग मी एक पत्र लिहिलं! कोणाला? पत्रालाच पत्र लिहिलं. हीदेखील मला भन्नाट कल्पनाच वाटली, पण नसावी कदाचित, मला मात्र मनापासून आवडली आणि ती अंमलात आणली. पत्राला पत्र लिहिण्याची. त्या पत्राजवळ त्यांच्याविषयीच्या सगळ्या भावना मांडल्या, बोलून दाखवल्या, तसंच स्वतःचं मनही मोकळं केलं. त्या एका काळासाठी मनही शांतावलं वाटलं.

  पण जग चालत राहतं, आपल्या गतीने. काळ कोणासाठी थांबतो थोडाच, कोणासाठी ही!

  यानंतर मी स्वतःलाही एक पत्र लिहिलं होतं. भावनिक वगैरे नव्हतं. व्यावहारिक ही नव्हतं. पण स्वतःच स्वतःसाठी लिहिलेल्या त्या पत्राचाही एक अंदाज अनोखा होता. आजही वाचायचं म्हटलं तरी, मन हरखून जातं. मनात-विचारात स्पष्टता आहे, भावनांवर नियंत्रण करणं आवश्यक आहे ते लक्षात आलं, ती गोष्ट जमायला लागली, सवयीची झाली. म्हणजेच माझ्या अनुभवांमध्ये भर पडली. विचार करण्याचा अजून एक पैलू समजला, दृष्टिकोन सुदृढ होण्याची, विस्तृत होण्याची अजून एक संधी उपलब्ध झाली. आणि मी आयुष्यात अजून एक पायरी वर चढू शकले, यापरता दुसरा आनंद - समाधान अजून काय शोधणार!

पत्ररूपी, पत्र लेखनामुळे एक अनवट पायवाट सापडली आहे, स्वतःला 'माणूस' म्हणून घडवण्याची गुरुकिल्ली म्हणावं आणि रुळत जाणाऱ्या या पायवाटेला, आपल्याच जीवनाचा 'राजरस्ता' करावा, या विचारापाशी येऊन, पत्रलेखनात एक छोटासा विश्राम-अल्पविराम घ्यावा म्हटलं. आशावाद कायम ठेवत, पुन्हा भेटुयाच!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics