Pratibha Tarabadkar

Comedy

4.5  

Pratibha Tarabadkar

Comedy

प्री वेडिंग शूट

प्री वेडिंग शूट

4 mins
341


 'अगं मम्मे काय सांगू तुला, डिंपीदीदीच्या हळदीला अश्शी मज्जा आली ना', संगीची टकळी पूर्ण रस्ताभर चालू होती.आत्याची मुलगी डिंपलच्या लग्नाच्या तयारीपासून आत्याकडे राहिलेली संगीता लग्न समारंभ आटोपून मम्मी, पप्पा, जॅकी आणि आज्जी बरोबर घरी येत होती.आज्जीला बरं नसल्याने सगळेजण आयत्यावेळी डायरेक्ट मांडवात आले होते. त्यामुळे संगीला काय सांगू अन् काय नको असे झाले होते.'गप ग संगे, किती वटवट चालू हाय तुजी कवापासून! कान दुखाय लागल्यात माजं', जॅक्या खेकसला तशी संगी त्याच्यावर ओरडली ,'म्हायतीये यवढा का चिडलाय ते! स्वतः ला यायला मिळालं न्हाई ना नाचायला, पोरींवर लाईनी मारायला!' जॅक्याच्या वर्मावर बोटच ठेवलं संगीनं तशी जॅकी अजूनच उसळला पण घर जवळ आल्यानं तो विषय मागे पडला.

 सकाळी मम्मीने नाश्त्याच्या प्लेटी भरल्या.संगीता इकडे तिकडे नाचत मम्मीला सांगत होती, 'मम्मी, माझा बाजीराव मस्तानी मधला डॅन्स सगळ्यांना इतका आवडला म्हणून सांगू' संगीता नाचून दाखवू लागली.

 'अगं संगे, काय सांगू तुला, मी पण अशी छान नाचायची ना आमच्या गॅदरिंगला', मम्मी आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागली, 'मेरे हातोमें नऊ नऊ चुडीयां है, इतकी फेमस होते ना मी की आजूबाजूच्या गावातली समदी मुलं यायची खास माझा डॅन्स बघायला.'

'कशाला?'पप्पा उप्पीटाचा बकाणा तोंडात भरीत म्हणाले,'बरणी कशी नाचतेय ते बघायला?'

'खिक्' आवाज आला.मम्मीने दचकून मागे बघितले. आजी खुर्चीवर बसत होती.' म्हातारी बहिरेपणाचं सोंग करती पण समदं ऐकू जातं तिला', मम्मीला दाट संशय होता.

 'मम्मी मला प्री वेडिंग शूट करायचंय.' संगी मम्मीच्या गाऊनशी खेळत म्हणाली.

 'शू, हळू बोल. प्रीती वेडी हाय खरं पन ती तुझी ननंदबाय हाय. आदुगर आक्काबाय आक्काबाय म्हणायचं आनि मंग प्रीती कशी वेडी हाय ते नवऱ्याला पटवून द्याचं', यशस्वी संसाराची सूत्र मम्मी संगीला शिकवित होती. मम्मीने खाकरल्याचा आवाज ऐकून दचकून मागे वळून पाहिले. आजी मख्ख चेहऱ्याने शेपू निवडत बसली होती. 'जवा बघावं तवा म्हातारी समूरच बसली आसती' मम्मी फुणफुणली. मम्मीच्या समजण्यात काहीतरी घोटाळा झालाय हे संगीच्या मठ्ठ डोक्यात शिरायला जरा वेळच लागला. 'अगं मम्मे, प्री वेडिंग शूट म्हणजे लग्नाआधी जोडीने फोटो काढायचे.' मिथुनच्या बरोबर फोटो काढण्याच्या कल्पनेने संगी लाजली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 'अगं बया', मम्मीने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. 'मम्मी,ते डिंपीदीदीच्या लग्नात नाही का तिच्या नवऱ्याबरोबर मोठे मोठे फोटो लावले‌ होते!'

 'उगा काही तरी नवी टूम काढू नको संगे' पप्पा गरजले

'आधीच तुझा तो हावरट सासरा बसलाय संधी शोधत मला कसं लुबाडू‌ म्हनून! आनि डिंपीदीदीच्या लग्नाचा थाटमाट तेव्हढा पाह्यला पन् ती किती शिकली ते‌ न्हाई पाह्यलं!' आजीच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटले. मम्मी अन् संगीच्या वर्मावरच पप्पांनी घाव घातल्यावर दोघीजणी चवताळल्याच

 मम्मीने तर दुर्गेचा अवतार धारण केला.

 नणंदेच्या मुलीचं कौतुक! केव्हढा हा घोर अपराध! 'तुमाला कसली म्हनून हाऊसच न्हाई. तुला सांगते संगे, दिवसरात्र बी बियानं, खतं, कीटकनाशक फवारनी या पलिकडे या मान्साला काय बी दिसत न्हाई.. वरसातून एक डाव देवीच्या दरसनाला न्हेलं की झालं, 'मम्मी नाकानं सूं सूं करीत बोलत होती 'त्या बिगर का ह्यो दोन मजली बंगला झालाय? राहतीयास की महारानीवानी 'पप्पा पण आता इरेस पेटले. नेहमीप्रमाणे घरात तुंबळ युद्ध होणार हे लक्षात येऊन संगीने नेहमीची खेळी खेळली. 'पप्पा, मी आता जास्त दिवस न्हाई या घरात' रडवेला चेहरा करून संगी म्हणाली तशी पप्पा पाघळले. 'काय म्हनत हुतीस त्या फोटुंचं?' मासा गळाला लागला याचा अंदाज संगीला आला आणि ती उत्साहाने सांगू लागली.'अवो पप्पा, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढायचे. तलावात बोटिंग करत एकमेकांवर पानी उडीवतांना...या बया' संगीने लाजून तोंड झाकले.' ह्यॅ कायतरीच संगे तुजं, 'पप्पा या आयडियेला झटकून टाकत म्हणाले. 'आपला भाग दुष्काळी,शंबर फूट खोदलं तरी पान्याचा टिपूस गावत न्हाई.. आन् म्हने बोटिंग करायचं!' पण संगीचं पप्पांकडे लक्षच नव्हतं.'मिथुन सिग्रेटच्या धुराची वर्तुळं काढनार आनि त्या वर्तुळात माजा चेहरा दिसनार',संगी सांगतांना हरखून गेली होती.'पप्पा, मिथुन शिग्रेटी ओढतो?' जॅकी संतापाने लाल झाला. मला तंबाखू खाताना पकडलं तवा पायतानानं तुमी मार मार मारलंत आनि आता शिग्रेटी फुकनारा जावाई चालतोय व्हय!' पप्पा विचारात पडले. 'तरीच म्हनलं ह्यो पोरगा वीतभर छातीचा कसा म्हनून! न्हायतरी मला त्यो पसंतच न्हवता. एका कानात डूल घालनारा, टेकाडावर गवत उगवल्यागत केस राखल्याला, बायांवानी हातावर गोंदवून घ्याटलेला',गाडी भलतीकडेच वळलेली बघून संगी अस्वस्थ झाली.'पप्पा, आपल्या राघू फोटोवाल्याला बोलवू या का?'अन् पप्पांच्या होकाराची वाट न बघता ती मिथुनला फोन करायला पळाली.'काय जाणेमन,माझी कंगणा रानवट,'मिथुनने फोनवर संगीला म्हटले आणि मुका घेतल्यासारखा चुक् आवाज केला.तशी 'जावा तिकडं'म्हणत संगी लाजेनं चूर झाली.

 प्री वेडिंग शूट ची आयडिया मिथुनला भारीच पसंत पडली पण धूर्तपणे त्याने माझ्या डॅडींना असलं काही आवडणार नाही या सबबीखाली खर्चाची जबाबदारी संगीच्या पप्पांच्या गळ्यात अलगद टाकली. राघू फोटोग्राफरने सांगितलेले एक लाखाचे बजेट पप्पांनी ‌वाटाघाटी करत पंचवीस हजारांवर आणले.आता फोटो कुठे कुठे काढायचे? पहिला फोटो शूट मिथुनच्या बाईकवर दोघे बसलेत आणि वेगाने जातानाचे झाले. दुसरा फोटो ‌मिथुन संगीच्या केसात गजरा माळतोय असा काढला. तिसरा फोटो शूट खरं तर गावातील देवळाच्या दीपमाळेवर दिव्यांच्या जागी बसून दोघे करणार होते पण देवळाच्या पुजाऱ्याने कडाडून विरोध केल्याने तो नाद सोडून द्यावा लागला. मग शेतावरील आंब्याच्या झाडावर झोका बांधून दोघे उंच उंच झोका घेत आहेत असे फोटो शूट करावयाचे ठरले. त्याप्रमाणे डहाळीवर झोका बांधला. संगी बसली. मिथुन तिच्या मागे उभा राहून उंच उंच झोके घेऊ लागला तोच...काड काड आवाज झाला आणि डहाळीसकट झोका खाली ‌कोसळला.

 'शुभ मंगल सावधान' भटजींच्या खड्या आवाजातील मंगलाष्टके संपली आणि अंतरपाट दूर झाला. पायाला प्लॅस्टर घातलेला, व्हिल चेयरवर बसलेला मिथुन आणि कपाळभर चिकटपट्टया व हाताला प्लॅस्टर घातलेल्या संगीता यांनी एकमेकांना हार घातले. अशा रीतीने'प्री वेडिंग शूट' सुफळ संपूर्ण झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy