पोरगी बगायला गेलो पण......
पोरगी बगायला गेलो पण......




सकाळी नऊची येळ . मी मस्तपैकी गोट्या खेळत व्हतो . अंघोळ बाकी व्हती . पण मी ऑल टाईम ऑटोमैटिक फ्रेश प्राणी असल्यामुळं मी ताजातवानाच व्हतो ! डाव लै रंगात आलेला .
" थांब आत्ता तुपल्या गोटीचा भुगाच करतो..."
असं म्हणून मी खाली दोन पायांवर तोल सावरत नेम धरुन बसलो . आता फक्त समोरची गोटी बगायची . फुल्टू अर्जूनासारखी एकाग्रता केली . एक डोळा झाकला . मला फक्त समोरची गोटी दिसत व्हती . तितक्यात मपला ईरोधी पाटनर ' आगा बाबो ' असं वरडून तिथून पळून गेला ! म्या मनात म्हनलं , च्यायला... अजून तर म्या गोटी ऊडविलीबी न्हाई ! तरीपण हे बेणं कसं काय पळालं ? मी ईचारात असताना ' धप ' असा लैच डेंजर आवाज आला . कुणीतरी मपल्या पाठीत लैच मोठ्यानं धप्पा हाणल्याचं मला मी पुढं तोंडावर पडल्यावर कळालं ! मला राग यायच्या आतच माझ्या गचांडीला धरुन बापानं ऊठवलं !
" सक्काळी सक्काळी पुस्तक-बिस्तक वाचायचं सोडून ईकडं गोट्या खेळत बसलास फुकनीच्या..."
बापानं रंगेहाथ पकडून पाठ लाल केली व्हती ! लैच मुंग्या ऊठत होत्या पाठीतून.. शेजारच्या हापश्यावर पाणी भरायला आलेल्या बाया-पोरी फिदीफिदी हासत होत्या . मला लैच बेक्कार फिल झालं .
" आंगूळ करायचे कष्टपण घेत जा कवा कवा... निट घासून काढला तर किलूभर मळ निघंन तुपल्या आंगातून.. च्यायला ! लग्नाचं वय झालं तरी गोट्या खेळत बसलंय येडं.."
बाप मला काहीबाही बोलत बखोटीला धरुन घराकडं ओढीत नेत व्हता . मी खाली मान घालून गप चालत व्हतो . त्या तिथल्या बायका-पोरी हासत आसल्याचे दर्दनाक आवाज मला जास्तच श्याड करत व्हते...
एकांद्या पोलिसानं चोर पकडून लॉकअपमंदी फेकून द्यावा तसं बापानं मले घरात फेकलं . मी पडता पडता वाचलो !
" चल आवर लौकर... आपल्याला पोरगी बगायला जायचंय..."
बापानं मपल्यावर डायरेक्ट बाँबच टाकला ! आगा बाबो ! पोरगी बगायला ! हे ऐकून मी सगळा मार , दर्द आणि आपमान ईसरुन गेलो .
" हो दादा लग्गेच आवरतो ! "
असं म्हणून लगबगीनं अंघोळीला पळालो .
" मी येतुया भायेरुन.. तवर तुबी आवरुन बस.."
मपल्या आईला आवरायचं सांगून बाप भायेर गेला . मला तर काय करु अन् काय नकू असंच झालं व्हतं ! आयच्यान्... सोंगच झालंय हे.. आपून आपल्या बापाला कधी समजूनच घेतलं न्हाई... किती काळजी करतो तो आपली... आज तर थेट पोरगी बगायलाच नेतुया.. ईश्श... मला तर ब्वा लाजच वाटतिया... मी घसाघसा घासून आंगूळ केली . शैम्पूच्या दोन पुड्या रिचवून केस ऑल क्लियर केले . एकदम धावतच घरात गेलो . मपला हा कैच्याकै ऊत्साह बगून आईलापण बरं वाटलं !
" हे गाढव आज घोड्यागत चपळ झालंय..."
बाजावर बसून ईक्सपायरी डेट जवळ आलेल्या आजीनं टोमणा मारला ! मला त्याच्याशी कैच घेणंदेणं नव्हतं . मी माझ्याच नादात तल्लीन व्हतो . एरव्ही आजीच्या टोमण्यांना भसाभस ऊलट जवाब देणारा आपला पोरगा आज एवढा गप कसा याचं आईला आश्चर्यच वाटलं .
" लेकरु मोठं झालंय आता.."
आई माझ्याकडं बगत प्रेमानं म्हणाली . ' हो तर.. मी मोठाच झालोय.. ऊगाच का माझ्यासाठी पोरगी बगायला जायचंय..' मी मनातल्या मनात बोल्लो ! मस्तपैकी ठिवून दिलेला दिवाळीचा नवा ड्रेस घातला . बॉडी स्प्रे चे पन्नास स्प्रे मारले . तायडीच्या मेकअप किटमधून फ्यारनलवलि काढून आगूदर हातावर आन् नंतर थोबाडावर घोळासली ! केसाला जेल लावलं . आईपण आवराआवर करत होती . ते करता करताही ती माझ्याकडं आश्चर्यमिश्रित कौतुकानं बगत होतीच . आज मी आयुष्यात पयल्यांदा नटत होतो ! एरव्ही एका मिंटात अंघोळ अन् एकाच मिंटात तयारी व्हायची ! पण आज मात्र मी त्या गोष्टीतल्या चिमणीच्या पिल्ल्यावाणी कैच्याकै मेकअप करत व्हतो ! पोरगी बगायला जायचंय भौ... जोक नाय ! आईनंपण मस्त नवीक्याट साडी नेसली व्हती . सगळं आवरलं !
" तू कशाला रं एवढा नट्टापट्टा करायलास ? तूपण येणार हायेस का आमच्याबराबर ? "
आईनं ईचारलंच...
" मंग ! मपल्याबिगर जमलंच कसं..?"
मी ऊत्तरलो . आई फक्त हसली .
" बरं चल जेवून घी.."
- आई
" कशाले ? आता तिकडंच जेऊ.."
- मी
" आरं पण तिथं पोरगी बगायची का जेवत बसायचं ? "
- आई
" आगूदर पोरगी बगू.. नंतर निवांत जेवू.."
- मी
मला खरंतर भूक लागूच शकत नव्हती . असल्या टैमाला का कुणी जेवायचा ईचार करतं ? पोटात नुस्ते धडाधड लड्डू फुटत व्हते . तितक्यात दादाबी भायेरुन आले .
" चला.. निघूत आता.."
मी , दादा आन् आई घराभायेर पडलो . मला तर पंख फुटल्यागतच वाटत व्हतं...
आमी एस्टीश्टँडकडे निगालो . मला ऊगाचच लै मोठं झाल्यासारखं वाटत व्हतं . मी एकदम तुरुतुरु चालत व्हतो . चालताना नेहमीची मरगळ आजाबात नव्हती . आई-दादांच्या मागोमाग एकदम आज्ञाधारक कुत्र्यासारखा मी अदबीनं चालत व्हतो . आयुष्यात पयल्यांदाच पोरगी बगायला जायचा बाका प्रसंग आलेला व्हता . धाकधूकपण व्हतीच . आमी बसश्टँडवर पोचलो . तिथं एका फळवाल्याच्या गाड्यावरुन दादांनी दोन किलू सफरचंद , एक डजन केळं आन् एक किलू द्रांक्षे घेतले ! तिथूनच एक कापडी पिशवी ईकत घेतली . त्यात ते सगळे आयटम टाकून ते लोढणं मपल्याकडं दिलं . मला ह्याचा काईच अर्थ लागत नव्हता . आपली पयलीच येळ हाय . आसंल शगूनबिगून... पिच्चरमधल्यासारखं ! मी ती फळांची थैली पकडली . आता आम्ही यष्टीचा वेट करत होतो . मला तर कुठल्या गावाला जायचंय तेपण म्हाईत नव्हतं . ईचारायची हिंमतपण नव्हती . ऊगाच कशाले फालतू चौकशा करायच्या ? बापाले राग आला तर ? त्यानं हा कार्यक्रम रद्द केला तर ? त्यापेक्षा येडा बनून पेडा खाण्यात काय अडचण हाय ? असं चांगल्या कामात टोकाटोकी करणं बरं न्हाई ! तितक्यात एक यष्टी आली . मी ती थैली आईकडं देत यष्टीकडे पळालो . गपकन खिडकीत चढून एक्या रिकाम्या शिटावर मपला रुमाल टाकला आन् ईजयी मुद्रेनं परत मुळ ठिकाणी आलो . बाप रागानं बगत व्हता .
" दादा , जागा पकडून आलोय.."
म्या मपल्या कृतीचं क्लेरिफेकेशन दिलं .
" अस्सं... तुमाला कंच्या गावाला जायचंय सायेब ? "
बापानं एकदम जळजळीत सवाल टाकला . हात् तिच्या आयला ! मला तर कुठं जायचंय तेच म्हाईत नव्हतं ! मग जागा कंच्या यष्टीत पकडायच्या ते कसं म्हाईत असणार ! मी अतिऊत्साहात गाढवपणा करुन बसलो व्हतो . मी रुमाल आणायला माघारी वळालो पण ती यष्टी बऱ्याच लांब निघून गेली व्हती . आता मात्र मले घाम फुटला . भर बसश्टँडात बाप झोडापतो की काय असं वाटू लागलं . मी खाली मान घालून बापासमोर ऊभा ठाकलो .
" पंचीस रुपायचा रुमाल गेला ! आता एक काम कर मलाबी एकांद्या यष्टीत न्हेऊन टाक.."
बाप दबक्या आवाजात मले झाडत व्हता .
" तुला नसली तरी मला ईज्जत हाये . आत्ता जाऊ दी.. तुला घरी गेल्यावर दावतो . पंचीस रुपै बराबर वसूल करतो ! "
बाप दबक्या आवाजात दातओठ खात माझ्यावर बरसत व्हता . खाऊ का गिळू अशा नजरेनं मपल्याकडं बगत व्हता . चला.. म्हंजि भर बसश्टँडमंदी मार खाणं तर टळलं.. वाचलो ! मी आईच्या हातातली फळांची थैली घेतली आन् गपगुमान ऊभा राहिलो . आता दुसरी बस आली . मी जागचा हाल्लो न्हाई .
" चला हिच्यातच जायचेय.."
बापानं हुकूम सोडला . आई आन् मी बापाच्या मागोमाग यष्टीत चढलो . एकदम मागं जागा भेटली .
" ह्या हरामखोराला लांब बसव . ह्याला बस लागली की भडाभड ऊलट्या करतंय ! गेल्याबारीस तर मपल्या आंगावरच ऊल्टाल्तं ! "
बापानं आईला सुचना केली . ती सुचना अर्थातच माझ्याबद्दल व्हती . मी गप जाऊन लांब बसलो . खिशातून एक सुपारीची पुडी काढली आन् ती फोडून सुपारी चघळू लागलो . एश्टीत सुपारी खाल्ली की ऊलट्या होत न्हाईत ही आयड्या मला आज्जीनं सांगितली होती . पण गेल्याबारीस दादाबराबर जाताना सुपारीच ईसरलो व्हतो . त्याच्यामुळंच त्यांच्या आंगावर ऊलटालो . पण ह्या बारीस मले बस लागली तर बाप मले घोडे लावीन हे फिक्स होतं !
बस चालू झाली . मी फळांची थैली साईडला ठेवली . डोक्यात ईचार फिरु लागले..
पोरगी कशी आसंल ? किती शिकली आसंल ? लैच सुंदर आसली तर ? कमी सुंदर आसली तर ? तिला काय ईचारावं बरं ? नाव-गाव-शिक्षण ईचारणं झाल्यावर तिचा एकांदा छंद ईचारावा ? तुला कविता आवडत्यात का हे ईचारु का ? तुझं वजन किती हाय ? छ्या.. असलं कशाला काय ईचारायचं ? एखादी कविता म्हणून दाखवावी का ? कविता ऐकून तिनं मला मारलं तर ?
डोक्यात कैच्याकै ईचार धुमाकूळ घालत व्हते .
" चला सायेब तिकीट ईथपरेंतच हाये . आता कुठं चद्रावर जाता का ? "
बाप खिडकीच्या भायेर ऊभा व्हता .
" दादा तुमी भायेर कवा गेलात ? "
मी ईचारांतून खडबडून भायेर आलो .
" एश्टी कवाच थांबलीया . तू काय झोपला व्हतास का ? "
बाप ऊखडला . मी पटकन ऊठून भायेर पडलो . च्यायला.. हे तर आपल्या मामाचंच गाव हाये ! म्हंजि ज्या गावात बापानं स्वतःचं जमवलं त्याच गावात त्यो आपलंबी जमवतोय ! व्वा वा... आमी निघालो . रस्त्यात एक दवाखाना लागला . बाप थेट आत शिरला . आई मागोमाग.. मी फळांची थैली घेऊन सगळ्यात मागे ! भानगड काय हाय ? दवाखान्यात कशाला ? एकांदी डाक्टरीण बगितला का काय मपल्यासाठी ? मी पार आतून सुखावलो . आत एका वॉर्डात गेलो . मामा , मामी , आजी , आजोबा असे सगळे तिथं हाजर व्हते ! चांगली जोरदार तयारी व्हती . मला ऊगाचच लाज वाटाया लागली... आता कोण ती डाक्टरीण पोरगी एवढीच ऊत्सुकता बाकी होती . तितक्यात माझं लक्ष तिथं कॉटवर पडलेल्या मामाच्या पोरीकडं गेलं . ती नुकतीच आई झाली व्हती . आता माझे डोळे माझ्या भावी मिशेस् ला शोधू लागले . सगळे एकमेकांची ईचारपूस वगैरे करु लागले . बापानं ती आणलेली फळं त्या मामाच्या माय झालेल्या लेकीला दिली ! पाच.. दहा..पंधरा मिनिटं झाली तरी पोरगी यायचा वाण दिसंना ! मी लैच कदारलो ! शेवटी आईला बाजूला घेऊन ईचारलं ,
" आये.. आपून पोरगी बगाया आल्तोत् ती पोरगी कुठंय ? "
आई म्हणाली ,
" आरं ती पलिकडं पाळण्यात झोपलीया... तुझ्या मामेबहिणीला पोरगी झाली ना... आपून तिलाच बगायला आलोत...! "
THE END
.
.
.
अशी वाचनाची आवड हवी...