सखा आणि तुका
सखा आणि तुका
"सोनखेळ" नावाचे एक छोटेसे गाव होते. गाव लहान होते तिथले माणसं खूप प्रेमळ व मायाळू होते, त्याच गावातिल एक कथा...
जमिनदार बापुराव सोनार खूप श्रीमंत होता. त्याच्या कुटूंबात त्याचा एक मुलगा सखाराम, एक मुलगी मंजुळा, त्याची पत्नी शेवंता असे छोटेसे कुटूंब होतं.
त्याच्या कडे शंभर एकर जमीन, दोन ट्रॅक्टर, तीन बैलाच्या जोड्या आणि कामाला सहा माणसं होती. असा त्याचा कारभार होता. सखाराम अतिशय खोडकर होता व तो मंजुळापेक्षा मोठा होता किमान तीन वर्षाने. तो शाळेमध्ये पाचव्या वर्गात होता.
बापुराव सकाळी ऊठून काही कामानिमित्त शेताकडे निघाला आणि चालता-चालता एक आवाज त्याच्या पत्नीला दिला.
बापू-"शेवंते, ये शेवंते...”
शेवंता - “कायवं काय झालं ओरडाया...”
बापू - “म्या म्हंतू शेतात आज लई काम हाय मला यायले दोन अडीच वाजल तवर मई भाकर शेताकडंच घेऊन ये...”
शेवंता - “आवं धनी म्या नाई येनार आज घरात बि लइ काम हाय...
आज तुक्याले शाळा बि नाय त्यालेच लावते शेतात...”
बापु - “बरं, बरं मग एकलाच का....?”
शेवंता - “सख्या हाय ना वं संगतिला, नायतरी गावात हूडकत रायते...”
त्या दिवसाचा रविवार होता. बापुराव पहाटे पाचला उठून शेतावर गेला होता. बघता - बघता सकाळचे सात वाजले, शेवंताने अंगणात शेणाचा सडा, सारवण, रांगोळी टाकली आणि मुलांसाठी चहा ठेवला चुलीवर तेच तुक्याच्या बहिणची हाक आली.
"आयेच्या मांडला काय वं..."
शेवंता - “हो गं बये त्या तुक्याले ऊठिव म्हनावं च्या गार हूतोय....”
मंजुळा - “दादा ए ऊठ ना....”
"आये हा नाय ऊठत मी त्याला पाणी टाकूनच ऊठिवते!!"
मंजुळा एका तांब्याच्या पातेल्यात पाणी आणून तुकारामाच्या चेहऱ्यावर टाकते तेवढ्यात तुकाराम जोरात ओरडतो...
“आये, या मंजीले दूसरा धंदा सांग बरं वं..!”
शेवंता - "झाली काय रे चालू तुमची किरकीर, काय करावं या पोरइचं...
तुक्या च्या पिऊन घे रे आंदी गार हूतोय!!”
तो सकाळचा थंडगार वारा, पूर्वेकडच्या डोंगरातुन निघणारा सूर्य, कोंबड्याचा ओरडण्याचा आवाज, ते किलबिल करणारे पाखरं, गोठ्यातुन एेकू येणारी बैलाची घंटी, मंजुळ कोकिळेचा आवाज, सकाळच्या हवेत पसरलेले धूर अतिशय सुंदर रम्य वातावरण होते. रोज सखारामच्या मागे शाळेची धावपळ असायची. पण आज रविवारचा दिवस मस्त जाम सुट्टीचा दिवस असल्यामुळे, तुकाराम व सखाराम त्याचा मित्राला रानात फिरायला जायचं होतं म्हणून त्याने त्याच्या आईला सांगितले.
"आये आज म्या अण् सख्या बाहेर जानार तू मले शिदोरी बांधून दे...”
शेवंता - "व्हय रं देते आंदी तुया बाची भाकर घेऊन जा शेतात...”
तुकाराम जाम खुश झाला आज आपण रानात फिरायला जाणार, मस्त मज्जा करणार... असाच बडबड करत सखारामाकडे निघाला. गाव अगदी छोटे होते. तुकारामचा वाडा ओलांडून चार घर अंतरावर
एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या पलीकडे दोन चिंचेचे झाडे होती. ती झाडे सखारामाच्या अंगणात होती.
सखारामचे घर अगदी छोटे होते,
त्याच्या घरी त्याची आई, वडील, बहिण व एक म्हातारी आज्जी होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याचे वडील प्रपंच चालवत होते. सखारामकडे दोन म्हशी होत्या व त्या दूभत्या होत्या, म्हणून गावातील दहा-बारा लोक त्याच्याकडे दूधाला यायचे.
सखारामचे वडिल तुकारामच्या वडीलाकंडे मोल-मजुरी करत असत. आणि त्याची आई म्हशी पाळत असे, त्याची बहिण पाचव्या वर्गापर्यंत शिकली होती. कारण, समोर शिकवण्यासारखी त्याची परिस्थिती नव्हती. ती घरातील कामं बघत होती. ती बारा वर्षाची होती. म्हणजे सखारामपेक्षा मोठी होती. सखाराम अतिशय गुणी, चंचल व प्रामाणिक मुलगा होता. सखारामला सकाळी सहाला ऊठायची सवय होती. त्यामुळे घरातील कामाला पण हातभार लावायचा. सखाराम पहाटे ऊठून आपल्या म्हशीच्या गोठ्याकडे गेला आणि गोठ्यातील शेण काढून बाहेर ऊकर्ड्यावर टाकून दात घासत होता तेवढ्यात तुकारामची हाक ऐकू आली.
"सख्या रे सख्या..."
सखा - "काय रे तुक्या काय चावलं सकाळ सकाळी..."
तुका - "आरं आज आपल्याला रानात जायचं हाय इसरला की काय लेका...”
सखा - "थांब म्या गोठ्यातुन म्हशी बाहेर काढतू अण् वैरण टाकतो..."
तुकाराम स्वत:शीच पुटपूटत होता. तो खाली बसला होता, त्याच्या हातात बारीक दगड होते आणि तो त्या दगडांबरोबर खेळत होता.
तेवढ्यात सखारामची आई घरातून बाहेर आली तिच्या हातात दोन मातीचे कप होते, बहूतेक चहाचे असावेत.
सखारामची आई तुकारामला म्हणाली..
"तुक्या आज काय शाळा नाय का रं..."
तुक्या - "नाय वं काकी आज सुट्टि हाय!”
"बरं, बरं च्या पि अण् सख्याले बि पि म्हनावं, तवरं म्या काम आवरते लइ पसारा हाय पडलेला..."
सखारामचे काम आवरून तो तुकारामकडे आला आणि तुकारामच्या बाजूला ठेवलेला चहाचा कप घेऊन चहा पिऊ लागला, नंतर सखारामने आंघोळ केली. आंघोळ करत असताना त्याने तुकाराम काहि तरी म्हटले...
"काय रे तुक्या म्या आयकलंय की रानात मोठा वाघ हाय... खरं हाय काय रं.....?”
तुका - "आपल्याला लई लांब नाय जायचं, फकस्त ओढ्यापर्यंत जायचं हाय...”
घराबाहेर सखा व तुक्याच्या गोष्टी चालू होत्या व तिकडे सखारामची आई ओरडत होती,
"सख्या जंगलात नाय जायचं, जंगलात मोठी, मोठी जनावरं हाय अण् पाण्या पावसाचे दिवस हाय ओढ्याला बि पाणी लई हाय..."
पण् सखाराम ऐकायला तयार नव्हता त्याने त्याच्या आईची थोडीफार समजुत घातली म्हणाला...
सखा - "आये म्या लय लांब नाय जानार ते ओढ्याकडचं देऊळ हाय नव्ह स्तवरं जानार फकस्त..."
हे ऐकून सखारामच्या आईला थोडे बरे वाटले, कारण सखाराम कधी खोटं बोलत नसे. पण् या वेळला तो खोटं बोलला होता नाहीतर त्याला रानात जायला मिळाले नसतं...
क्रमश: