पळा पळा नाव बुडाली
पळा पळा नाव बुडाली
आता लगेच नका पळू हि जुनी घटना सांगतो आहे. १० ते १२ वर्षापुर्वीची. नाव म्हणजे होडी बरं का!, नाहीतर गोंधळ होईल, तर सांगवी भुसार गाव हे गोदावरी नदीच्या (गंगा) कडेला असल्याने पुर आदींचा नेहमी संपर्कात असणारे गाव. तसं जुनं गाव पुरात वाहून गेल्याने नवीन गाव बसवले हे तर तुम्हाला माहीत असेलच म्हणा!. असो
गावातील लोकांचे प्रवासाचे संपर्काचे , जवळचे आणि महत्वाचे असलेले शहर म्हणजे कोळपेवाडी होते आणि आहे सुध्दा. आता तुम्ही म्हणाल ते का शहर आहे का? पण साधारण तीस चाळीस वर्षे मागे जा मग पटेल तुम्हाला!. साखर कारखाना, डिस्लरी, पेपर मील, कामगारांची रहिवासी वसाहत. पाटपाणी असलेला संपन्न, समृद्ध परिसर, शिवाय उत्कृष्ट चित्रपटगृह (पिक्चर टाकी) पेट्रोल पंप , बॅंक आदी सुविधा असलेलं एकमेव ठिकाण होते ते. आता बोला आहे का नाही शहर.
अहो आपल्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी कोळपेवाडी चे छत्रपती शिवाजी महाविद्यालय हा एकमेव पर्याय होता. दुसरं म्हणजे दर रविवारी भरणारा आठवडे बाजार हा जीवन जगण्यासाठी आवश्यक होता. कारण दैनंदिन वापरातील वस्तू म्हणा किंवा सण उत्सव साजरे करण्याची सामग्री असो किंवा लग्न,बस्ता किंवा इतर धार्मिक कार्य असो किंवा आयुष्यात येणारे सुख दुःख खरेदी साठी एकमेव पर्याय होता कोळपेवाडी चा बाजार. पण हल्ली वाहतूकीची साधण अधिक असल्याने आपल्या गावाचा संपर्क कोळपेवाडी सोबत कमी झाला. पण या बाजाराची गरज संपलेली नाही बरं का! असो
अजून एक म्हणजे आजारपणासाठी दवाखाना जवळपास कुठेच नव्हता, एकमेव ठिकाण म्हणजे कोळपेवाडी, तसंच कोळपेवाडी कारखाना असल्याने कामगार वर्ग ही नेहमीच ये- जा करायचा. विशेष म्हणजे बॅंक, बस स्थानक, आदी व्यवस्था असलेले जुने कोळपेवाडी आठवले तर शहर सुध्दा फिके पडेल असेच होते. म्हणजे मला चांगले आठवते आम्ही मामाच्या गावाला जाताना कोळपेवाडीला पायी जाऊन पुढील प्रवास कोळपेवाडीच्या स्टॅण्ड समोर लागलेल्या जुन्या काळ्यापिवळ्या जिप गाडीने जायचो. तिथे समोरच एक भेळवाला होता. तिथे बसून भेळ खायचो. पुर्वी तर कोळपेवाडी - येवला- लासलगाव ही बस सांगवी मार्गे जातं होती (बरोबर ना)
तर मुख्य मुद्दा काय तर आवश्यक गोष्टी साठी कोळपेवाडी ला जावं लागतं असे, पण आडवी होती गोदामाई मग प्रवास कसा करणार तर त्यासाठी वापरली जात होती होडी अर्थात नाव. गोदावरी ला पुर्वी बारा महिने वहाते पाणी असायचं. म्हणजे उतार असायचा पण पाण्यातून जाण्याचं धाडस अंगावर यायचं म्हणून लोक होडीने जायचे.
आता होडी चालवण्याचे कसब तर काय सर्वांना असणार नाही मग या साठी क्षिरसागर परिवार होता. त्यांना या व्यवसायामुळे नावाडी हे नाव पडले. म्हणजे बहुतेक जाती आणि पध्दती या व्यवसायामुळे पडल्या आहेत. म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती असणार गावं म्हणजे प्रतिष्ठीत गाव हे आपण शाळेत शिकलो आहोत.
आम्ही त्या बाबांना ( सावळीराम मनाजी क्षिरसागर) नावाडी बाबा म्हणायचो. (मना बाबा विषयी जग्या या कथासंग्रहात एक धडा आहे.त्यांच्या कडे एक घोडी होती प्रवासासाठी तो संपूर्ण प्रसंग जग्या कथासंग्रहात लिहीलेला आहे,लेखक प्रमोद लोहकरे) सावळीराम बाबांच्या असंख्य गोष्टी आजही म्हातारी माणसे रंगवून सांगतात. त्यांनी एकदा पुरातून असंख्य माणसं वाचवली होती त्याची सविस्तर माहिती मायगाव देवी महात्म्य या राजाभाऊ माळवे लिखित ग्रंथात आलेली आहे. तुम्ही वाचली असेलच म्हणा! सावळिराम बाबा नंतर ही जबाबदारी बाबासाहेब क्षिरसागर यांनी सुध्दा उत्तम पध्दतीने सांभाळली.
तर आपल्या सांगवी भुसार गावासाठी होडी हा दळणवळणाचा अविभाज्य भाग होता. रोज प्रवास करून कोळपेवाडी ला जाणारे मुलं, शिक्षक, कामगार आदी होती तर दर रविवारी मात्र संपूर्ण गाव पलिकडे जाऊन यायचे अस म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
आता कारखाना कामगार सिफ्ट नुसार असल्याने त्यांच्या वेळा ठरलेल्या त्यामुळे ते बरोबर होडीच्या टाईमाला हजर असायचे. तसेच कोळसेवाडी ला शाळेत जाणारे विद्यार्थी सुध्दा ठरलेल्या वेळी उपस्थित असायचे कारण नाव एका किनार्या वरून पुढे गेली तर मागे वळवता येतं नसायची. आणि ते खूप मेहनतीची कामं होते, तसेच मागे फिरणे हा अपशकून मानला जाई. आणि नावेत प्रवासी नसताना एका काठावरून दुसऱ्या काठावर आणली जात नसायची. त्यामुळे वेळ सांभाळून जावे लागायचे.
रविवारी मात्र गर्दी असल्याने होडी दिवस भर सुरू असायची. अशाच एका रविवारी सायंकाळी बाजार घेऊन आलेली बाया- माणसं नावेची वाट पहात सुरेगाव च्या बाजुने होती. नाव सांगवी बाजूला असल्याने या काठावरून कुणी प्रवासी आहेत का म्हणून थांबलेले, पण बराच वेळ होऊनही कुणी आलं नाही, मग नावाडी बाबा एकटेच नाव घेऊन आले. नाव थोडी जुणी असल्याने पाणी आत मध्ये येतं असायचे ते ड्रममध्ये भरून बाहेर सुद्धा काढावे लागयचे. ही नाव लाकडी फळ्यांपासुन बनवलेली असल्याने वजनाने सुध्दा खूप होती. एका वेळी २५- ३० माणसं सहज जा ये करु शकत होती. लाकडी आवले हाकायला चार माणसं लागायची. शिवाय बांबू ठेकवणारा हुशार असावा लागतो. कारण नांव पुढे जात असताना दिशा दाखवून योग्य ठिकाणी नाव उभी करणे. कौशल्याचं कामं होत. बरं या नावेला समोर असलेला घोडा (लाकडी मुखवटा बसवलेला) खूप आकर्षक असायचा, एखादा राजहंस पाण्यात डोलदार पणे विहार करतो आहे असाच भास होत असायचा. ( जुनी लोक म्हणतात कधी नदीला पुर येणार असला की हा लाकडी घोडा खिसतो. (म्हणजे घोड्या सारखा आवाज काढून इशारा देतो.) शिवाय नावेला मागील बाजूस शेपटा सारखी फळी असायची.( तिला काय म्हणतात आठवत नाही) म्हणजे फार पूर्वी दिशा बदलण्यासाठी वापरली जायची पण बंधारा झाल्यामुळे पाणी स्थिर होऊन गेले त्यामुळे या फळी चा हवा तसा उपयोग होतं नाही म्हणून तर बांबू मारावा लागतो.
गावातील नावाडी बाबा ने तर या टोकापासून त्या टोकापर्यंत जाड नाडा दोन्ही बाजूला असलेल्या मोठ्या झाडाच्या खोडाला बांधून गेलेला जुगाड सर्वांहून भारी कारण एकटा माणूस सुध्दा सहजपणे नाव (होडी) घेऊन जाऊ शकत होता. फक्त दोर ओढत जायची शिवाय दोरी सहज ओढता यावी म्हणून नावेच्या दोन्ही टोकांना लोखंडी चाक बसवली त्यामुळे तर अजून कामं सोपं झालं. असो. आमचे मित्र निवृत्ती घोडे सांगतात की "मी अनेकदा एकट्याने ही नाव दोरीने ओढून नेली. सुरुवातीला भिती वाटायची पण नंतर सवयीचे झाले. कित्येकदा नावाडी बाबा नसताना प्रवासी ने आण सुध्दा केली. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा एक रुपया भाडे एका बाजूने असायचे."
त्या दिवशी रविवारी संध्याकाळ झाली असल्याने बाजार करून आलेली सगळी मंडळी घाई घाईत होडीत बसली. जो तो आपल्याला जागा मिळेल का म्हणून धावा धाव करू लागला. माणसं बसली की नाव पाण्यात जोराने हलु लागली. बाया बापड्या नावेत बसताना पाया पडुन बसत होत्या शिवाय होडीत बसल्यावर पायातील चप्पल काढून बसायचं, अशी अलिखीत परंपरा जपली जात होती. जवळ जवळ ३५ ते ४० माणसं दाटीवाटीने होडीत बसली तशी काठावर आलेली होडी काठावर टेकली. म्हणजे काठावर पाणी कमी असलेल्या जागी उभी केलेली होडी मातीत आणि वाळू मध्ये रूतुन बसली. हलेच ना बहुतेक तिलाही होणाऱ्या अपघाताची चाहूल लागली असावी. नावाडी बाबा म्हणाले काही लोक खाली उतरा वाटल्यास परत एक चक्कर मारू पण आता ऐवढा बोजा घेऊन जाता येणार नाही. पण कुणी खाली उतरायला तयार होत नव्हते कारण सर्वांना घरी जाण्याची ओढ लागली होती. मग एक दोघांनी खाली उतरून होडीला धक्का देऊन जास्त पाण्यात ढकलली आणि पटापट होडीत बसली. तशी नांव इकडून तिकडे हलली एक दोघं तर पडता पडता वाचली. दोन्ही बाजूला सारख्या प्रमाणात बसा कमी जास्त बसू नका नाव हेलकावे खात आहे असा आदेश नावाडी देवू लागला. चार दोन माणसं त्यांना होडी ओढण्यासाठी मदत करू लागली. अंधार सुध्दा होऊ लागला. पाण्या मधुन जात असताना नदी मध्ये सिमेंट कडे टाकून विहीर केलेल्या असतात त्या कुठे आहेत याचा अंदाज घेऊन होडी बाजुने न्यावी लागते. तसेच समोर चा नेहमीचा ठेपा सुध्दा लक्षात घ्यावा लागतो. अशी सर्व कसरत करत असताना वजना मुळे होडी थोडी नेहमी चा रस्ता चुकवू लागली याचा अंदाज येताच नावाडी सर्वांना म्हणाले सावध बसा आणि पटापट पट होडी ओढा आपली नाव बाजूला जाते आहे. तसे सगळे सावध झाले. चार दोन माणसं अजून दोरी ओढु लागली नाव जेमतेम सांगवी बाजुच्या कठड्यावर पोहचणार तोच एक दहा फुटांवर आधीच कलंडली तसा एकच गलका झाला. कुणाला काही समजेना. एक दोघांनी तर पाण्यात उडी सुध्दा घेतली. नावाडी बाबा धिर देत म्हणाला माणसं उतरा पटकन होडी ढकला पण वजन जास्त असल्याने ते ही जमेना अशातच घाबरलेल्या महिला एका बाजूला झाल्या तशी नाव अजुन एक हेलकावा घेत पाण्याने भरून गेली. तसा वाचवा वाचवा असा एकच गलका झाला.
नदीच्या काठावर अनेकांच्या पाण्याच्या मोटार असतात त्यामुळे काही माणसं नेहमी नदी काठावर असतात त्यांनी हा गलका ऐकताच धाव घेतली. एक दोघे गावात माहिती देण्यासाठी पळाली. तस गाव नदी काठावर असल्याने अनेक पुरूष पोहू शकत होते. आणि जास्त खोल पाण्यात होडी नसल्याने बहुतेक लोक बाहेर आले. दोन तीन महिला बुडू लागल्या होत्या पण त्यांनाही वेळीच बाहेर काढण्यात आले. एव्हाना खबर गावात पोहचली तसा माणसांचा लोंढा नदीकडे धावला. इतकी गर्दी झाली की कोण नावेत होते आणि कोण गावातून आले काही कळेना. शेवटी सर्व बाहेर आले कोणतीही जिवितहानी झाली नाही याचं समाधान मानावे लागले. नुकसान फक्त भाजी पाला, अन्न धान्य, वह्या पुस्तके, कपडे लते आदींचे झाले. एक दोघांना थोडं खरचटले. नावाडी बाबा अगोदरच सर्वांना सांगत होते इतके लोक बसू नका. वाटल्यास आपण डबल खेप करू पण कुणीही खाली न उतरल्यामुळे आणि सर्व लोक परिचयातील असल्याने कुणाला दुखवता न आल्याने ते तसेच सर्वांना घेऊन आले. पण नशीब कोणाला काही झाले नाही.
परंतु चार पाच दिवसांनी बातमी आली की एक म्हातारी यांत बुडाली होती तिचे प्रेत तरंगत साधारण दोन तीन किमी अंतरावर काट्यामधे आढळले, आणि कोणतीही जिवितहानी न झालेल्या घटनेत एक मृत्यू झाला होता. त्या दिवशी गर्दी इतकी झाली की कुणी राहिले तर नाही ना याचा अंदाज आला नाही. शिवाय म्हातारी एकटीच रहात होती. आणि गेल्या आठ दहा दिवसांपासून पाहुण्यांकडे गेली असल्याने कुणाला शंका सुध्दा आली नाही. बबई वाहुळ असे त्या महिलेचे नाव होते. वय ७० ते ७५ असेल कदाचित.
ही घटना आजही बहुतेक गावातील लोकांना आठवत असेल. अशाच प्रकारची अजून एक घटना घडली होती. याच्याही पुर्वी साखर कारखाना कामगार नेहमी शिफ्ट नुसार जा ये करत होते. एक दिवस सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान काही कामगार आणि एक दोन प्रवासी होडी घेऊन जात असताना सुरेगावच्या काठावर होडी पोहचण्या अगोदर अचानक एक फळी तुटली आणि पाण्याने होडी भरून गेली. आणि बुडाली पण दैव बलवत्तर म्हणून बहुतेक प्रवासी पुरूष आणि पोहणारे होते. तसेच ज्यांना पोहता येत नव्हते त्यांना इतरांनी वाचवले. पण ही घटना घडून गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा कामगार घरी आले तेंव्हा ही घटना गावात समजली. अशी माहिती विजय शिंदे यांनी सांगितली.
तर अशा छोट्या मोठ्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण सहसा जिवितहानी कधी झाली नाही. लोकही सावधगिरी बाळगुन असायचे त्यामुळे प्रसंगातून बाहेर काढण्यात यशस्वी होत होते. आता कोळपेवाडी ला प्रवास करताना बहुतेक लोक मोटारसायकल ने चास मार्गे किंवा मळेगाव मार्गे जातात. आणि तसेही बहुतेक लोक कोपरगाव कडे खरेदी साठी जात असल्याने असे प्रसंग घडत नाहीत. मागे एका वर्षी पुर परिस्थिती आल्याने नवीन पध्दतीची मोटार बोट होडी आल्याने प्रवास सुखकर झाला. जुनी होडी इतिहास जमा झाली. फारसे त्यावेळी काढलेले फोटो कुणाकडे मला सापडले नाही. एक दोन सोबत जोडले आहे. त्यासाठी शुभम क्षिरसागर यांनी सहकार्य केले. तुमच्याकडे या घटने विषयी अजून काही माहिती असली तर नक्की कळवा. धन्यवाद
