Pandit Nimbalkar

Drama Others

3  

Pandit Nimbalkar

Drama Others

गावची जत्रा

गावची जत्रा

11 mins
573


भाग दोन 


      तुम्हाला या लेखाची आतूरता लागलेली असेल असे मला वाटते. मागील लेख वाचून अनेक प्रतिक्रिया आल्या त्यांत विशेष प्रतिक्रिया आली ती सुनिल श्रीपत कुलकर्णी यांची होती.ते जुन्या आठवणीत रंगून गेले होते. अनेक गावातील घटना त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यांचा परिवार नोकरी मुळे नाशिक येथे स्थलांतरित झाला असला तरी गावाविषयी त्यांच्या मनात येथील माणसां विषयी आजही प्रेम, जिव्हाळा आहे. माझ्या छोट्या लेखामुळे त्यांना झालेला आनंद यातच लिखाणाचे सार्थक झाले असे मी मानतो. तसेच अनेक जाणकार आणि मित्र परिवार छान प्रतिसाद देतात. त्यामुळे अजून नव नविन लिखाण करण्यास प्रेरणा मिळते. असो 

    होळी नंतर पाचव्या दिवशी येणारा महाराष्ट्रीय सण रंगपंचमी हा असतो. त्यामुळे एकूणच राज्यभर आनंदी वातावरण असते. रंगपंचमीला सर्वांगाने रंगी बेरंगी झालेली माणसं, मुलं, माता भगिनी पाहून आपुलकी स्नेहाचे वातावरण निर्माण झालेले असते. याचं रंगपंचमी सणाच्या दिवशी सांगवी भुसार येथील ग्रामदैवत बिरोबा महाराज आणि ग्राम दैवत मलिक्षा बाबा यांची यात्रा सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहाने संपन्न होते. दोन देवांची यात्रा एकत्र कशी असा प्रश्न साहजिकच पडतो. ते उलगडून सांगावेच लागेल पण अजून थोडा खोलात जाऊन विचार करू. या लेखातून तुम्हाला यात्रेची अगदी बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर प्रतेक गावात लहान मोठी अनेक मंदिर असतात पण यात्रा मात्र एकाच देवाची असते. अपवाद काही गावांमध्ये दोन किंवा अधिक ही भरत असतील पण तरीही त्यातही मुख्य आणि पुरवा पार चालत आलेली एकच असते.

    कदाचित इतर मंदिरा पेक्षा ग्रामदेवतेचे मंदिर छोटं असले तरी यात्रा त्याचीच का? असे वाटू शकते, तर सर्वांत अगोदर कुणी एक दोन कुटुंब तेथे राहण्यास सुरुवात झाली. कितेक पिढ्या अगोदर त्यांनी आपली आस्था म्हणून पहिले जे मंदिर उभारलेले असते. त्यालाच ग्रामदैवत असा मान असतो. म्हणून नंतर इतर मंदिर कितीही भव्य दिव्य असली तरी ग्रामदैवत हा शब्द त्यांना वापरला जात नाही.

   आता राहिला प्रश्न दोन किंवा अधिक देवतांच्या यात्रेचा तर एकाच कालावधीत दोन वेगवेगळ्या वस्ती समूह उदयास आले. पण पुढे कालांतराने त्यांचे एकाच गावात रूपांतर झाले. किंवा पुर्वीच्या एका गावाचे दुसर्या ठिकाणी स्थलांतर केले पण दोन ठिकाणचे दोन प्रमुख देवांवर आस्था असल्याने असे घडतं असावे, किंवा नैसर्गिक आपत्ती येऊन पुर्वीच्या ग्रामदेवतेच्या मंदिराचे नुकसान झाले त्यामुळे दुसर्या मंदिरात काही काळ यात्रा झाली. अशी विविध कारणांमुळे एकाहून अधिक देवतांची यात्रा भरते. 

    सांगवी भुसार हे गांव पुर्वी अगदी गोदावरी नदीच्या काठावर होते. तेव्हा तेथील सर्व प्रथम स्थापन झालेल्या मलिक्षा बाबा ची यात्रा सालाबाद प्रमाणे भरत होती. पण अनेकदा आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब स्थलांतरित झाले. पुढे सन १९६९ ला एकाच वर्षांत तीन वेळा पुर आला आणि पुनर्वसन योजनेतून गावाचे स्थलांतर झाले. या पुनर्वसन होण्या अगोदरच आताच्या नवीन ठिकाणी शेळ्या, मेंढ्या पाळणार्या भगत समाज बांधवांची वस्ती होती आणि त्या सर्वांची आस्था असलेले बिरोबा मंदिर सुध्दा स्थापलेले होते. साधरण ४ ते ५ पिढ्यां पासून हे मंदिर होतेच किंवा अधिक काळापासून तेथेच असेल. कारण मागील ३ पिढ्या पासून घोडे परिवाराकडे पुजेचा मान आहे. गणपत घोडे, नामदेव घोडे आणि आता सोन्याबापू घोडे ही पुजा सांभाळत आहेत. सर्वांत पहिले भगत कुशानबा भगत होते. असा पुरावा वाण म्हणताना दिला जातो. बिरोबा या देवाला बिरदेव, वीरभद्र, बिरूबा, बिरण्णा आदी नावांनी सुध्दा ओळखले जाते. पट्टण कडोली ता. हातकणंगले जि. कोल्हापूर हे विठ्ठल बिरदेवाचे मुख्य ठिकाण आहे. आपल्या परिसरातील शिर्डी, राहता, कोपरगाव आदी ठिकाणी सुध्दा प्रसिध्द बिरोबा मंदिर आहेत. विठ्ठल बिरदेव महात्म्य हा ग्रंथ संपूर्ण कहाणी इतिहास सांगतो. एकदा तरी वाचला पाहिजे. खूप प्रयत्न केल्यावर तो मला मिळाला, मित्र सुनिल शिंदे यांच्या कडून घेऊन काही अध्याय वाचून झाले. एकूण ४२ अध्याय असलेल्या या ग्रंथाचे पारायण मंदिर जिरणोध्दार वेळी गावात झालेले आहे. त्यावेळी बिरोबा महात्म्य सांगणारी पत्रिका छापलेली होती ती आवर्जून मला भगत बिच्चू नाना जाधव यांनी दिली.  

   आपल्या सांगवी भुसार गावातील यात्रेचा मुख्य दिवस रंगपंचमी हा आहे. दोन दिवस अगोदर पासून पै पाहूणे प्रतेक कुटुंबात आलेले असल्याने आनंद आणि उल्हासाचे पुर्ण वातावरण संपूर्ण गावात असते. होळी नंतर पंच मंडळीं वर्गणीला सुरवात करतात. आदरणीय राजेंद्र बापू जाधव आणि नानाभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेची तयारी केली जाते. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे ज्या वर्षी अधिक पिक पाणी त्या वर्षी अधिक वर्गणी जमा होते. मुख्य दिवसा अगोदर मंडप, पताका, वाजंत्री, भगतांना आमंत्रण, लाईटिंग, डागडुजी, रंगरंगोटी, आवश्यक खरेदी, आदी प्राथमिक तयारी झालेली असते. मुख्य पाहूणे भगत मंडळी कनोली मनोली येथील असतात. त्यांना भंडारा देऊन आमंत्रण दिले जाते. जुन्या पिढीतील लक्ष्मण शिंदे, भागुनाथ शिंदे, नबाजी शिंदे, गयाजी शिंदे, गेणूजी शिंदे, विठ्ठल शिंदे, चांगदेव शिंदे, दगूजी शिंदे, नामदेव शिंदे, आबाजी शिंदे, भिमाजी शिंदे, गोविंद जाधव, म्हातारबा शिंदे,रखमाजी शिंदे, शिवराम शिंदे इ.परिवाराने यात्रा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या परिवारातील नवीन पिढी सुध्दा तितक्याच उत्साहाने आजही विधी मार्ग पुर्ण करतात.

      मुख्य दिवशी पहाटे उठून ग्रामस्थ, भगत मंडळीं सुर्योदयापुर्वी बिरोबा मंदिराची उंचच उंच मानाची काठी घेऊन नदीवर येतात. वाद्य, पताका, ध्वज घेऊन गोदामाईच्या पवित्र अन् स्वच्छ पाण्यात अत्यंत आदराने काठीला अंघोळ घातली जाते, सोबतच सर्व भक्त सुध्दा गंगा स्नान करून प्रसन्न होतात. गंगेच्या पाण्यात गंध अक्षदा वाहून श्रीफळ अर्पण केला जातो. अभ्यंगस्नान झालेल्या काठीला शेंडा असलेल्या बाजुला मोर पंख असलेला मोठा गोंडा किंवा गुच्छ किंवा पवित्र झाडू असा भगव्या कापडांने बांधला कि सोबत नव्या कापडी पट्टीने संपूर्ण काठी झाकून घेतली जाते. अजून मंदिराच्या कळसावर असतो तसे ध्वज बांधत पुर्ण काठी नव्या नवरी सारखी सजते. सर्वांगाने सजलेल्या काठीला फुलांचा हार घातला जातो. काही सुवासिनी या काठीला हळद, कुंकु,अक्षदा वाहून स्वतःही आणि सोबत असलेल्या एकमेकींना हळद, कुंकू लावून मांगल्याचा वसा घेतात.

    आता आबालवृद्ध बिरोबा महाराज की जय आणि मलिक्षा बाबा की जय असा जयघोष करतात. आणि सनई, डफ, ढोल, ताश्या,टाळ, पखवाज वाजवला जातो. ही काठीची मिरवणूक आणि सुर्यनारायणाचे आगमन एकाच वेळी होते. वाजत गाजत, नाचत या मिरवणूकीला सुरुवात केली जाते. गावातील भजनी मंडळाची साथ संगत अधिक शोभा वाढवते. बाबासाहेब बगाटे आणि ज्ञानेश्वर बंद्रे ही जोडी सुरेख भजने म्हणतात. सर्वांत अगोदर ही काठी जुन्या गावातील ग्रामदैवत मलिक्षा बाबा या देवस्थानाला भेटवून पहिल्या दर्शनाचा मान येथे दिला जातो. मलिक्षा बाबा ची पुजेचा मान मुलाणी कुटुंबाकडे होता. आता हुसेन तांबोळी यांच्या कुटुंबाकडे आहे. मलिक्षा बाबा ला गलफ, चादर अर्पण केली जाते. 

   पावित्र्य लाभलेली काठी नाचवत तरूण भक्त मंडळी महादेव मंदीर, जुने हनुमान मंदिर अशी दर्शन भेट घेत गावात प्रवेश करते. वाटेत नजर उतरवण्यासाठी लिंबू उतरवून टाकले जातात. एका एका मंदिरात जाऊन देवाच्या भेटीचा हा सोहळा अत्यंत देखणा सुखदायी, आनंददायी असतो काठीचा प्रवेश होताच संपूर्ण गावातील लहान मोठे स्वागताला तयार असतात. सोबत रंगाची उधळण एकमेकांच्या अंगावर केली जाते. त्यामुळे चेहरे ओळखणे अवघड होऊन बसते. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी, मार्गावर फुलांचा सडा, पंचारती घेऊन सुवासनींची आरती, पाण्याचा अभिषेक, गुलाची, भंडार्याची उधळन , नारळ, खोबरे आदींच्या नवस पुर्तीचे हार घालत ही मिरवणूक कासव गतीने पुढे पुढे सरकत जाते. मध्येच फटाके आदींनी परिसर दणाणून जातो. गावातील सर्व मंदिरात दर्शन घेऊन काठी बिरोबा मंदिरा समोर येते. मग काठी नाचवण्याठी पुरूष मंडळीं एका मागे एक असे येतच राहतात. मध्ये काही सुवासनीं ओवळणी करतात. भगत मंडळी पारंपरिक नृत्य करतात. या नृत्याला पवित्र नृत्य असे म्हटले जाते. साधारण दुपारी १२ वाजता मिरवणूक थांबते आणि काठी बिरोबाचे दर्शन घेते. एक प्रदक्षिणा पूर्ण करून सभा मंडपाच्या खांबाला बांधून घेतात. नंतर देवाला आणि काठीला सौभाग्यवतींनी आणलेला नैवेद्य अर्पण केला जातो. मेथीची भाजी पोळी हा नैवेद्य बिरोबाला आवडतो. 

     बिरोबाचा शेंदुर लावलेले मनमोहक रुप अधिक उजळून दिसते. अंगावर पांघरलेली मेंढीच्या लोकरीची घोंगडी देवाचे मानाचे वस्त्र आहे. डोक्यावर तरूडाचा पिवळ्या फुलांचे तोरण शोभून दिसते. हा तरूडाचा पाला (पत्रिका) देवाला अधिक प्रिय आहे. जसे महादेवाला बेल पानं तसंच बिरोबा ला तरूडाचा पाला (पत्रिका) प्रिय असे भगत मंडळी सांगतात. कापुराच्या ज्योती सोबतच हिल्लळ (विशिष्ट आकार असलेला दिवा) पेटवलेला असतो. बिरोबा देवाच्या मुख्य पुजेचं साहित्य म्हणजे पायरेखा ( लोखंडी खिळे असलेल्या पादुका) , वेत (वेळूची काठी) परंपरेने जतन केलेला वेत १०० हुन अधिक वर्षांपूर्वीचा आहे अशी माहिती मिळाली. व्हईक म्हणताना वेत हा लागतोच जसा देवीला साठ तसाच बिरोबाला वेत अशी परंपरा आहे. अगरबत्ती, धुप, दीप, कलस, होम ,हवन फुल, हार, नारळ, खोबरे आदींचा वापर खूप केला जातो. गावातील लोकांची बिरोबा वर अपार श्रद्धा आहे. पुर्वी कुणाला पान लागलं तर मंदिरा समोर घेऊन येतं मंतर टाकणाऱ्या कडून मंतर टाकला जातं होता. (आता असे प्रकार कुणीही करू नये. दवाखान्यात लवकर उपचार होऊन रूग्ण वाचतो.) 

     दुपारी नवस फेडण्यासाठी आनलेले बोकड, कोकरू, जावळी (मेंढराचे कोकरू) आदींच्या मांसाहारी जेवणाच्या पंगती अनेक कुटुंबात असतात. (मी या प्रथेचे समर्थन करत नाही पण यात्रेची खरी माहिती पुरवण्यासाठी लिहावं लागतं. ज्याच्या त्याच्या श्रध्देवर ही बाब सोडू ) ज्यांना बकरा शक्य नसेल ते कोंबडा अर्पण करतात. मग ती माणसांची गर्दी भरपेट जेवणाचा आस्वाद घेतात. विशेष अतिथी भगत मंडळींची जेवणाची सोय ग्रामस्थांनी केलेली असते. काही कुटुंब शाकाहारी पुरणपोळी चा बेत करतात. एकंदर संपूर्ण गाव सहभागी झालेला असतो. त्या जेवणाच्या पंगतीचे वर्णन केले तर तोंडाला पाणी सुटेल म्हणून मी स्वतःला आवर घातला. रात्री उशिरा पर्यंत या पंगती सुरू असतात. सोबतच मुलांचा रंगपंचमीचा खेळ रंगात आलेला असतो. गावात येणारा प्रत्येक माणूस रंगलाच पाहिजे असा त्यांचा बालहट्ट असतो. त्यांत छोट्या मोठ्या घटना घडून जातात मग जेष्ठ माणसांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात . 

     संध्याकाळ जवळ येतं असताना खेळणी, पाळणे, खाऊची दुकान फुल्ल होऊन जातात. पंचक्रोशीतून अनेक श्रध्दाळू देव दर्शनासाठी येतात. माता भगिनीं सौदर्य प्रसाधने खरेदी, लहान मुलांसाठी, कुटुंबासाठी लागणारे साहित्य आवर्जून खरेदी करतात. पुर्वी तुकाराम गाडेकर यांचे भेळ, जिलबी चे दुकान हमखास असायचे. सध्या संजय पावडे आणि बाबासाहेब गोसावी यांची खाऊची दुकान असतात. तसेच शाबुदीन भाऊ पुर्वी बंदुकतून गोळी मारून फुके फोडण्याचे खेळ भरवत आता खेळणीचे दुकान असते. एकिकडे सालाबाद प्रमाणे सुपारी देऊन आणलेला तमाशा आपली तयारी करत असतो. गावकरी मंडळी तकतराव मिरवणूकीची तयारी करतात. तर तांबोळी,पठाण,शेख परिवार संदल मिरवणूकीची तयारी जोरदार करतात. संदल मिरवणूक वाजत गाजत मलिक्षा बाबा मंदिराकडे जाऊ लागते. आणि तकतराव मिरवणूक वाजत गाजत बिरोबा मंदिरा समोर मुख्य चौकात येते. एक दोन पिढ्या पुर्वी आपल्या गावातील मंडळींची छोटी तमाशा पार्टी होती. ज्यात किसन तारू, नरहरी सोनार, तुकाराम लव्हार, सावळेराम कुंभार,मनोहर बंद्रे आदी आजोबा पंजोबाच्या पिढीतील मंडळी होती. नंतर पर्बत बंद्रे, सकाहरी थोरात, शंकर थोरात आदी हौशी तमाशा मंडळ चालवायची. अजूनही काही होती पण त्यांची पुरेशी माहिती मिळाली नाही. 

  ही तकतराव मिरवणूक गावात आलेल्या तमासगीर बायकांच्या दिलखेच अदाकारीने बहरत जाते. जयवंती बाई सोनवणे यांना तकतराव मध्ये बसण्याचा मान दिला जाई. सांगवी भुसार गावातील तमासगीर म्हणून त्यांना पंचक्रोशीत ओळखले जाई. अस्सल परसरामी लावण्या गोड गळ्याने म्हणणाई ही देखणी स्त्री गावाचे भुषण ठरावे अशी होती. त्रिंबक लाड ही व्यक्ती लावणी रचना करायची. तकतराव मिरवणूकीत तरूण तर असतातच पण म्हातारी माणसंही असतात. बाया मात्र दुरून, घरातून हा सोहळा बघतात. कारण हौसे, गौसे, नवसे या मिरवणूकीला असतात, मग त्यांच्या नाना तऱ्हा सुरू असतात. पंच मंडळी या संपूर्ण मिरवणूकीत बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देतात. ८ ते ९ वाजे पर्यंत ही मिरवणूक सुरू असते. तोपर्यंत संदल मिरवणूक मलिक्षा बाबा मंदिराकडून पुन्हा गावात येऊन जाते.

   संध्याकाळी मानाचे नैवेद्य आणि पंचक्रोशीतील पुजाऱ्यांना डफ वाजवत मिरवणूकीने मंदिरात आणले जाते. या दिवशी संध्याकाळी बिरोबा मंदिरासमोर व्हईक म्हणतात. भगत मंडळीच्या अंगात येते व ते पुढील वर्षात घडणाऱ्या घटनांचे भविष्य सांगतात.( आज आपण वैज्ञानिक प्रगती केली त्यामुळे या घटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परंपरा म्हणून लोकं याकडे बघतात) काही माणसं लहान मोठे वाण म्हणतात. हे वाण पौराणिक कथा किंवा सामाजिक विषयांवर असतात. तर काही विनोदी वाण सुध्दा असतात. हे वाण म्हणण्याची पद्धत खूप भारी असते. वाण म्हणण्यासाठी दोन व्यक्ती असाव्या लागतात. एक व्यक्ती वाण म्हणतो दुसरा त्याला साथ देतो. "ये ऽऽऽ हात्र... भाई ऽऽऽ" अस पहिला म्हणतो, दुसरा त्याला साथ देतो " भले ऽऽ भाऊ भले ऽऽ" असे म्हणतो. एक एक वाक्य लय आणि ठेक्यावर पहिला म्हणतं असताना दुसरा भले म्हणून साथ देत जातो. बिरोबाची कहाणी सांगणारा वाण मुख्य असतो त्यातलं फक्त एक कडवं येथे देतो. 

 बिरदेव अवतार कली युगाशी, भल्ले

  वैशाख वद्य चतुर्थी ते दिवशी भल्ले

  सूर्योदय होता निर्जन वनाशी भल्ले

  सुरवंती पोटी आला जन्माशी भल्ले

 ये ऽऽऽ हात्र.. भाई ऽऽऽ

 भले ऽऽ भाऊ ऽऽ भले

प्रमोद लोहकरे यांनी रचना केलेले वाण अप्रतिम असायचे. दरवर्षी यात्रेला येऊन वाण म्हणण्याचा नित्य क्रम त्यांच्या होता. बाळाभाऊ कासार आणि कैलास गाडेकर आदी मंडळी परंपरा चालवत आहेत. मीही एक छोटा प्रयत्न केला तो समोर ठेवतो.

   सांगवी भुसार गावाची यात्रा

  जोडू पाहतो पंडित वाणाच्या मात्रा

 ग्रामदैवत बिरोबा अन् मलिक्षा बाबा

 गुणगान गाण्या आज राहिलो उभा

 ये ऽऽऽ हात्र.. भाई ऽऽऽ

 भले ऽऽ भाऊ ऽऽ भले

जुनं गांव गेले पुरात वाहून

नव गांव उभे केले पंडित आण्णा न

राजा बापू तोच वसा चालवती छान

गावकरी देती त्यांना नेहमी सन्मान

 ये ऽऽऽ हात्र.. भाई ऽऽऽ

 भले ऽऽ भाऊ ऽऽ भले

साथीच्या रोगाने झाली होती दुर्दशा

अभियान काळात सापडली दिशा

गावकरी अधिकारी जमले एकत्र

स्वच्छ करती गांव सारे दिवस रात्र

 ये ऽऽऽ हात्र.. भाई ऽऽऽ

 भले ऽऽ भाऊ ऽऽ भले

गोदामाई सारखी वाहू लागली विकास गंगा

धीर धरा दोस्तहो, नव्या कल्पना सांगा

जीवा भावाने एकमेकां सोबत वागा

जोडून ठेवेल आपल्याला यात्रेचा धागा

 ये ऽऽऽ हात्र.. भाई ऽऽऽ

 भले ऽऽ भाऊ ऽऽ भले

नविन वाण रचना शिकतोय पंडित

प्रेरणा देई त्याला कुशानबा भगत

मार गणाचा डफावर ठणका

बोल बिरोबा की जय, बोल मलिक्षा बाबा की जय


      अनेक ठिकाणावरून यात्रेसाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या हजऱ्या होतात. थोडा वेळ पांरंपारीक नृत्याचे खेळ सुरू असतात. बिरोबा मंदिरा समोर जमलेली गर्दी हा सोहळा ह्रदयात साठवून घेतं असते. रात्रीचा चंद्र दिसे पर्यंत हा सोहळा सुरु असतो. चंद्र दिसला कि सुवासिनी अनेक दिवे लावलेल्या पंचारतीने चंद्राची आरती करतात. बिरोबा महाराजांची आरती केली जाते. या आरतीला विशेष महत्त्व असते. संपूर्ण आरती सोबत जोडली आहे. 

    त्यानंतर गावात आलेल्या तमाशाचा फड रंगतो तो दिवस उगवे पर्यंत चालतो. गण गोळण, पोवाडा, शाहिरी, कलगी तुरा,  रंगबाजी, लावणी, वग, अशा पद्धतीने तमाशा चालू असतो. पुर्वी पासून आमच्या गावात आबालवृद्ध ,तरूण सहभागी होतात. अनेक तमाशा मंडळ येथे कधीच तमाशा मंडळाला त्रास होत नाही असे आमच्या गावा विषयी आपुलकीने बोलतात. या कार्यक्रमाची ग्रामपंचायत ने तालुका पोलिस कार्यालयातून परवानगी घेतलेली असते. त्यांचे प्रतिनिधी गावात वाद होवू नये म्हणून हजर असतात.

   दुसऱ्या दिवशी यात्रा सुरू असते. सकाळी मलिक्षा बाबा मंदिरा समोर तमासगीर मंडळी हजऱ्या घेतात. हा सुध्दा तमाशाचा छोटा खेळ असतो. दोन देवतांची यात्रा असल्याने ही हजऱ्यांची परंपरा सुरू झाली असावी बहुतेक असे वाटते. रात्रीचे तमाशा मंडळ जाण्याची तयारी करत असताना दुसऱ्या दिवशीचा तिकीट बारीचा तमाशा गावात दाखल होतो. हा तमाशा म्हणजे झगमगाट, आधुनिक साहित्य वापरून रंगदार झालेला असतो.अधिक कलाकार असल्याने स्वरूप भव्य दिव्य असते. त्यांची तयारी चालू असते. गावची मंडळी कुस्ती चा फड भरवण्याची जय्यत तयारी करतात. कधी नदीवर कधी शेतातील मातीत,तर कधी गावठाण हद्दीत कुस्ती भरवली जाते. गावाला कुस्ती, कबड्डी, हाॅलिबाॅल ची मोठी परंपरा आहे. पंचक्रोशीतून शेकडो पहिलवान या आखाड्यात उतरतात. शेव रेवडी च्या लहान मुलांच्या कुस्तीने सुरुवात होते. नंतर नारळ कुस्ती, रू. ११, २१, ५१, १०१,२०१,५०१,१००१,२००१, ३००१,५००१ अशा रकमेच्या कुस्त्या लावल्या जातात. मातब्बर पहिलवान मंडळी अधिक रकमेच्या कुस्त्या खेळतात. कै. तुकाराम मिसाळ यांचा डफ रिंगणात वाजला की पहिलवानाला जोर चढतं होता. मायगांव, महालखेडा, मळेगाव, वेळापूर, कोळपेवाडी, सुरेगाव आदी ठिकाणचे मल्ल आवर्जून उपस्थित असतात. लंगोट बांधलेला पहिलवान कुस्ती खेळण्या अगोदर आपल्या वस्तादाचा आशिर्वाद जरूर घेतो. कुस्ती जिंकल्यावर तो वस्ताद त्याला उचलून घेतो. शेवटी मानाची कुस्ती होते. या कुस्तीचा मान आमच्या सांगवी भुसार गावातील प्रतिष्ठित मल्ल, पहिलवान, वस्ताद आण्णासाहेब शिंदे यांना दिला जातो. ही कुस्ती सर्वाधिक रकमेची असते. ती जिंकून गावाचा मान वाढवण्याचे काम आण्णा पहिलवान करतं असतो. तीन चार पिढीतील अनेक उत्कृष्ट पहिलवान गावात घडले आहेत. आखाडा संपला की सगळी गर्दी तिकीट बारीचा तमाशा बघायला हजर असते. दत्तू तांबे यांचा तमाशा कितेक वर्षी सातत्याने येत होता. नंतर इतरही अनेक तमाशा मंडळ आवर्जून येतात.पठ्ठे बापूरावांच्या कवनांनी रंगत वाढत जाते. तमाशा नेहमी च्या क्रमांकाने सादर केला जातो. उत्कृष्ट वग दाखवणारा तमाशा लोकांच्या कायम लक्षात राहतो. त्यांना कुवती प्रमाणे देणगी दिली जाते. पण कुठलाही त्रास होत नसल्याने आवर्जून येण्याचं वचन दिले जाते. अशा पध्दतीने गावची यात्रा अनेक आठवणी देऊन जाते. पुढच्या वर्षीच्या यात्रेची ओढ लावुन जाते.  


सर्वांना यात्रेच्या खूप शुभेच्छा

लेख खूप मोठा झाला तरीही काही गोष्टी राहून गेल्या असतील तर माफी मागतो. वाचून छोटीशी प्रतिक्रिया जरूर द्यावी 

सोबत काही फोटो जोडले आहेत. धन्यवाद 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama