एकादशी
एकादशी
कोरोनापेक्षा थोडं वेगळं लिहीतोय, मला कळतंय आपण सर्व जण संकटाचा सामना करतोय रोज मनावर एक एक आघात होतोय. ही आठवणसुद्धा जिवाभावाची, सुखदुःखाची आहे. माझ्या लहानपणीची कहाणी आहे.
मी तेव्हा चौथी पाचवीत असेन, आमचं सर्व सामान्य शेतकरी कुटुंब आमच्याकडे तेव्हा एक बैलजोडी, बैलगाडी, एक गाय एक वासरू, दोन-तीन शेळ्या असा लवाजमा होता. अर्थात प्रत्येक शेतकरी कुटुंबात हा गोतावळा असतोच म्हणा.
आता अशी जिवाभावाचे मैतर म्हटल्यावर त्यांची सुंदरशी नाव तर असणारच ना! होय तर एका बैलाचे नाव देवळ्या (का ते विचारू नका) , एकाचे काज्या, गायीचे नांव एकादशी (हो हो तिच्या विषयीच लिहीणार आहे) वासराचे नाव हरणी, शेळ्यांची होती आता निश्चित सांगता येणार नाही कारण नंतरच्या काळात 20 22 शेळ्या आमच्याकडे होत्या त्यामुळे नांव अंदाजे सांगण्यात अर्थ नाही.
तर मी सांगणार आहे तुम्हाला एकादशी या गायीविषयी. आमची आई (आम्ही बाई म्हणतो, आईला आक्का, ताई असेही ग्रामीण भागात म्हटलं जातं , हल्ली मम्मी हा एकच शब्द काॅमन झाला आहे.) सांगायची तिचा जन्म एकादशी च्या दिवशी झाला म्हणून आम्ही तिचं नांव एकादशी ठेवले. अर्थात ही नावं ठेवण्याची ग्रामीण भागातील पद्धत खूप छान आहे. कारण त्यामुळे एक घटनाक्रम आपोआप आपल्या लक्षात राहतो.
त्या वेळी मोबाईल नावाचं यंत्र नव्हतं नाही तर एकादशी चे फोटो खूप दाखवता आले असते. असो तर ही गाय गावरान होती म्हणजे गावठी ( हा ग्रामीण शब्द आहे) किंवा महाराष्ट्रीयन गाय म्हणू शकता. या गायी आता फारच दुर्मिळ झाल्या आहेत.
तर एकादशी ही गाय रंगाने एकदम पांढरी शुभ्र होती, तीचे शिंग एकदम सरळ समांतर रेषा ओढाव्या तसे म्हणजे खिलारी बैलांचे असतात अगदी तसे. डोळे पाणीदार जवळ जाऊन बघितलं तर आतील शीरा स्पष्ट दिसायच्या आणि आपण थोडा वेळ तिच्या कडे बघितलं तरी माणूस भुलून जायचा इतकी दिसायला रूबाबदार देखणी एकादशी होती.
आम्ही या गायी चे दुध विकत नसायचो फक्त घरच्यांसाठी राखून ठेवायचो. आजही अनेक शेतकरी गावरान गायीचे दुध डेअरीला न पाठवता घरीच ठेवतात कारण हे दुध खूप पौष्टिक असते. आणि महत्वाचे म्हणजे चवीला अतिशय गोड असल्याने वरून साखर टाकायची गरजच पडायची नाही.
एकादशी ही गाय आमची खूपच लाडकी होती. अगदी जेवताना तिला आमच्या ताटातला घास भरवल्या शिवाय आम्ही बहिण-भावंड जेवायचे सुध्दा नाही. इतका लळा लागला होता. घरचे सांगायचे तीचे ५ ते ६ वीतं (वासरं जन्माला येण्याच्या वेळा याला जोप असाही एक शब्द वापरला जातो) आपल्या खुट्यावर झाली. ती जेव्हा जन्माला आली तेंव्हा पासून आपल्या घरात सुख समाधान आले, अशी आमची आजी म्हणायची.
एकादशी या गायीला कधीच विकायचे नाही असे आमच्या घरातील सर्वांचे एकमत झाले होते. आमच्या घरी कुणी आजारी पडले तर आमच्या एकादशीच्या डोळ्यातुन घळाघळा धारा वहायच्या आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत. माझी आई तर आम्हाला नेहमी एक गाणं म्हणून दाखवायची...
माझी गौळण गाय बरी हो
दूध भरून देते चरी
चराचरात गोविंदा हरी हो
गाया राखितो गोविंदा हरी
माझ्या गौळण गाईचे शिंग
जसे महादेवाचे लिंग
माझ्या गौळण गाईचे डोळे
जसे लोण्याचे गोळे
माझ्या गौळण गाईची शेप
जशी नागिणीची झेप
असे एक एक करत प्रत्येक अवयवांचे साधर्म्य गाण्यात असायचे. हे गाणं जणू आम्हाला आमच्या एकादशीवरच रचलंय असं वाटायचं. कुणाचं आहे मला माहीत नाही. कदाचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रिवाजाप्रमाणे चालत आले असावे.
एकादशी वार्धक्याकडे झुकली, दूध देणं बंद झालं, पण आम्ही तिला काही कमी पडू दिले नाही. शेवटी प्रत्येकाला जावं लागतं तस आमची एकादशी गेली. योगायोग पहा जिचा जन्म एकादशीला झाला तिचा मृत्यूही एकादशीला झाला. आम्ही त्या दिवशी खूप रडलो, अन्नपाणीसुद्धा खायची इच्छा झाली नाही.
एकादशीचा शेवटचे क्षणही आठवतात आमच्या आईच्या हाताने तिने शेवटे ताटातले गहू खाल्ले होते आणि अर्धे तसेच राहिले होते. तिला आईने भरल्या डोळ्यांनी हळद-कुंकू लावले. पाणी पायांवर टाकून दर्शन घेतले. गाडीला बैल जुंपून तिला गाडीत घातले. आईने एक पेटीतले नवे लुगडे तिच्या अंगावर टाकलं.
गावाच्या बाहेर एका पडीक गावठाण शेतात वडिलांनी दोन-तीन माणसांच्या मदतीने मोठा खड्डा घेतला. त्यात भरपूर मीठ टाकलं आणि एकादशीला अलगद ठेवून वरून मातीने झाकून टाकले. त्या वयात मला काही समजले नाही. पण आता त्या प्रसंगाचे महत्त्व कळते. पूर्वी बहुतेक लोक असेच आपल्या पाळीव प्राण्यांना निरोप देत होते. आता माणूस इतका व्यस्त झाला की रस्त्यात मरून पडलेल्या माणसाकडेसुद्धा दुर्लक्ष करून निघून जातो तिथे या प्राण्यांचा विषयच नाही.
