आखाड मास महिना खास
आखाड मास महिना खास
ग्रामीण जीवन ज्यांनी अनुभवले आहे की जवळून पाहिले आहे. त्यांना आषाढ महिना किती महत्त्वाचा आहे हे माहीत असेल. ग्रामीण बोली भाषेत आखाड लागला असं म्हणत गृहीणींची लगबग सुरू होते. धार्मिक रितीरिवाज पाळावे म्हणून या महिन्यात अनेक गोष्टी केल्या जातात किंवा अनेक गोष्टी टाळाव्यात अशा प्रथा परंपरा गावाकडचे लोक पाळत असतात. प्रथा परंपरा या संस्कारांनी परिपूर्ण होत्या पण आजकाल धावपळीच्या युगात त्या परंपरा पुढे चालू ठेवणे कठीण होतं असल्याने मोडकळीस आल्या अनेकांनी त्या अंधश्रद्धा म्हणून सोडून दिल्या आहेत. पण आपल्या अगोदरच्या पिढीने त्या जिवापाड जपल्या होत्या. सासुरवासीन सुन आखाढ सुरू झाल्या बरोबर नव्या बांगड्या भरून घेई. सडा रांगोळी काढून या महिन्याचे स्वागत केले जाई. "आज आखाड तळून घे ग" असा सज्जड दम भरून सासू सुनेला भजे कुरडया इत्यादी तळलेले पदार्थ करायला सांगे त्याचं कारण म्हणजे वर्षभर आपल्या घरात गोडा धोडाचे जेवण बनले जावे, सुखाचे दिवस चालू रहावे आणि दुःख आपल्या परिवाराच्या वाट्याला येऊ नये म्हणून असे तळून घ्यावे . शिवाय आपल्या घरी असलेल्या गायी, वासरे,बैल, शेळी, कुत्रं, मांजर अशा सर्वांना धिरडे गुळवणी खाऊ घालण्याची पद्धत होती. नविन लग्न झालेल्या सासुरवाशीण सुनांना महिनाभर माहेरी पाठवले जात होते. हल्ली चार पाच दिवस पाठवतात. नोकरी करणाऱ्या सुना मात्र जाऊ शकत नाहीत. नविन वस्तू म्हणजे कपडे, साड्या ह्या नव्या न घालता अगोदर धुन करून घेणे आणि नंतर ती अंगावर घातली जाई. तसेच अनेक गावांमध्ये महिलेने दोन हंडे घेऊन पाणी भरायचे नाही असा अ लिखित नियम होता. गवऱ्यांचा कलवड फोडून ठेवणे ही प्रथा सुध्दा होती. कारण पावसाळा सुरू असल्याने ओल्या सरपणामुळे चुल पेटत नसायची. मोढा पाळला जात होता. म्हणजे एक दिवस गाडी बैल,ओत इत्यादी शेतीच्या कामांना एक दिवस विश्रांती दिली जात असे. आजकाल ही पद्धत सहसा दिसत नाही. आखाड एकादशी हा वारकरी संप्रदाय आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात देवशयनी एकादशी म्हणून साजरा केला जातो. वारकरी परंपरेतील अत्यंत मोलाचा दिवस आखाड महिन्यात असल्याने याचे महत्त्व अधिक वाढते. या दिवशी देव झोपी जातात ते पुढील चार महिने ज्याला आपण चातुर्मास असे सुध्दा म्हणतो. देव झोपी गेले असल्याने कुटुंबात लग्न, किंवा इतर मंगल विधी केले जात नाही. फक्त देवाचे नामस्मरण आणि भक्ती मय कार्यक्रम, आराधना केली जात असे. आखाड महिन्यात पोर्णिमेला गुरू पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरू शिष्य परंपरेत हा अत्यंत आदराचा, सन्मानाचा दिवस म्हटला जातो. नविन आणि जुनी अशा सर्व पिढीने हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत आजही आहे. महिना अखेरीस दिप अमावस्या हा सुद्धा गृहीनींसाठी अत्यंत मोलाचा दिवस आहे. दिवे स्वच्छ धुवून त्यांची पुजा केली जाण्याचा हा दिवस आहे. तसेच चुल मांडण्यासाठी ग्रामीण भागात या दिवसाला खूप महत्त्व आहे. अशा विविध प्रथा आणि परंपरा पाळल्या जात असल्याने या आखाड महिन्याला विशेष महत्त्व आहे. अजूनही खेड्यातील लोक या पाळत असतील काही परंपरा भाग बदलत जाईल तशा थोड्या फार फरकाने बदलत जातात. आपल्या सांगवी भुसार गावातील लक्ष्मी आईची यात्रा सुध्दा आखाड महिन्यात तिसऱ्या मंगळवारी भरवली जाते. महिला वर्ग तर लेकरा बाळांना सुख मिळावे म्हणून आषाढी मंगळवार उपवास सुध्दा करतात. गावातील अनेक लोक ७ किंवा ९ सुवासिनींना जेवण करण्यासाठी बोलावतात. सन्मान केला जातो. लक्ष्मी आईची यात्रा असल्याने मंजुरीसाठी बाहेर गेलेले लोक आवर्जून परत गावी येऊन लक्ष्मी आईचे दर्शन करतात. संपूर्ण यात्रेवर पुर्वी एक लेख लिहिला आहे. पंडित निंबाळकर या नावाच्या फेसबुक पेज वर नक्की वाचा. लहान मुलांना या दिवसात जुलाबाचा त्रास अधिक होत असतो. त्याला ग्रामीण लोक आखड लागला असे म्हणतात. महत्वाचे म्हणजे या दिवसात पावसाचे पाणी नदीत, विहीरीत जमा होते मग हे नविन पाणी पिऊन हा त्रास होतो. पण ग्रामीण भागात काही विशेषण लावून बोलण्याची सवय असल्याने आखड लागला असे म्हणतात. असो एका वाचकाने केलेल्या विनंती वरून हा लेख लिहिला गेला. त्या वाचकांना खूप धन्यवाद 🙏 अजूनही काही प्रथा तुम्हाला माहिती असतील तर जरूर कळवा 🙏 थांबतो धन्यवाद 🙏 *लेखक पंडित निंबाळकर* मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहिल्यानगर
