Pandit Nimbalkar

Others

2  

Pandit Nimbalkar

Others

गावगुर

गावगुर

7 mins
158


   हल्ली गावगुर हा शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, कारण हा व्यवसाय करणारे लोक राहीले नाहीत. खर तर हा धंदा आता परवडत नाही. तसही पशू पालन करणारांचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे. याला आमचे सांगवी भुसार गाव तरी कसे अपवाद असणार म्हणा!. एकेकाळी गावात प्रत्येकाच्या घरी दहा-वीस जनावरं हमखास असायची अन् प्रतेक घरातला एक गडी माणूस जनावरं चारण्यासाठी नेमलेला असायचा. काही कुटूंबात माणसं कमी असायची मग त्यांची ढोरं एखाद्या माणसाकडे राखोळी घातली जायची. किंवा काही जमीनदार एखादा सालगडी ठेवून घ्यायचे. हा सालगडी एकाच मालकाकडे वर्षोंवर्ष कामाला असायचा. 


   राखोळी करणारा काय किंवा सालगडी काय त्यांचं मुख्य काम गुर ढोरं सांभाळने पाच दहा घरची बैल, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडी, गाढव जी काय जित्राब असतिल ती एकत्र करून दिवसभर माळरानात चरायला घेऊन जायची. एखाद्या ओढ्याला, नाल्याला, नदीवर पाणी पाजायला आली कि ते विलोभनीय दृश्य पाहून येणारी जाणारी तृप्त होऊन जायची. आमच्या गावात काही असे जनावरं चरायची क्षेत्र होती ज्यांची नावे फार गमतीशीर वाटतात वटपाळी, बरड, ढोकमाळ, ईनाम, चाहूर, खापरटेक, कुंभारखाणी, चिचपटटी, बारण्या ,लांड्या, काळधोंडी, मळई, तांबोळी, लेंडी गावचारी अशी काही माहिती आहेत अजूनही बरेच विचित्र नांव ठेवलेली असायची. तर अशा मोकळ्या पडिक रानात जनावरं चरायची आणि संध्याकाळी घराकडं आणायची. वाटेने ज्याच्या त्याच्या गोठ्यात, खळ्यावर ती सोडत सोडत जायचं. जनावरांना आपल्या गोठ्याची इतकी सवय झाली असायची कि ती आपोआप मालकाच्या दावणीला जायची. माणसांचा इतका लळा असायचा की त्यांच्या आवाजा वरून जनावरं इशारा समजायची. इतकंच नाही तर मालकाच्या घरात सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांच्याही डोळ्यात अश्रु यायचे. लहान मुलांना तर घरची जनावरं खूप जपायची कारण मालक सुध्दा त्यांना आपल्या लेकरा वानी सांभाळायचे.


   माझ्या लहानपणीचा एक प्रसंग मला आठवतो कारण हा प्रसंग नेहमी आमच्या घरी सांगीतला जात होता. मी पहिली किंवा दुसरी मध्ये असेन वडिलां सोबत बैलगाडी मध्ये बसून गाडी हाकत चाललो होतो. बैल पळवत असताना एका खड्यात चाक आदळले आणि माझा तोल गेला. तसा मी चाका जवळ पडलो. पण त्या मुक्या जनावरांना याची चाहूल लागली अन् गप्पकन उभी राहिली. क्षणभर तर वडिलांना सुध्दा काय झालं ते कळाले नाही. पण जेंव्हा त्यांनी मला उचलून घेतलं तेंव्हा त्या बैलांना किती धन्यवाद दिले हे शब्दांत सांगता येणार नाही. असो


    हा गावगुर व्यवसाय गावातील दोन तीन गडी माणसं करायची तशी ती आमच्या गावात सुध्दा होती. महत्वाचे म्हणजे जुन्या गावात हा गावगुर लक्ष्मीआईच्या मंदिरा समोर मोठ्या मोकळ्या पटांगणात भरायचा. महादू माळी त्याकाळी गावगुर सांभाळत असायचे. त्यांची धर्मपत्नी या कामासाठी त्यांना मदत करायची. त्या बदल्यात आधुली भर, शेर किंवा चिटक भर बाजरी, जवारी मिळायची. एखादं दुसरा बागायतदार सणावाराला कपडा लत्ता किंवा गोड धोड खाऊ घालायचा. पण आख्या गावातील ढोरं सांभाळून आणायची म्हणजे मोठं नवलच म्हटलं पाहिजे. गावातील मंडळी आपल्या विश्वासावर त्यांचं गौधन पाठवतात. ते ईमाने इतबारे जपल पाहिजे. असं दोघां नवरा बायकोला वाटायचे. त्याकाळी माणसं गरिब होती पण प्रामाणिक आणि स्वाभिमानी होती. गावगुर हा गावाच्या वैभवात भरच घालतं होता. काही गावात तर मोकाट जनावरांना कोंडवाडा सुध्दा बांधलेला असायचा. काही बे वारस जनावरं देवाला सोडलेली सुध्दा असायची.  अशा देवाच्या जनावराला हाकलायच नाही अन् मारायचं नाही हा अलिखित नियम सुध्दा होता. 


   पंडित दगू जाधव आणि पोपट दगू जाधव ही भावंड गावरान गायी, बैल राखण्यासाठी गावातच नाही तर पै पाहूण्यांत आणि पंचक्रोशीत सुध्दा फेमस म्हणजे किमान त्यांनी गावात आणि पाहूण्या रावळ्यात इतक्या गायी वासर दान केली त्याची मोजदाद ठेवली असती तर आजच्या हिशोबाने काही लाखात नक्कीच गेली असती. गाय किंवा वासरू अस एखाद्याला दिलं तर त्याला आनंद दिल असे म्हटले जायचं. आमच्या आईने दिड आण्याला एक गाय माहेरा वरून आणली आणि तिचा वंश इतका वाढला असं सांगताना पंडित दगू बाबाच्या नकळत डोळ्यातुन पाणी टपकले. माझी गायी वासर हाच माझा जीव की प्राण आहे. याचा अभिमान त्यांना आहे. दोघा भावंडांनी ८० गव्हाची पोती घरा पासून रस्त्या पर्यंत वाहून आणत ट्रक भरून पाठवली याची कथा त्यांच्या तोंडून ऐकताना माणूस हरखून जातो. त्या गाडी सोबत आलेली हमाल मंडळी गाडी भरण्यास तयार नव्हती. मग त्यांना जेवणं करायला घरात बसवून दिलं आणि तेवढ्या वेळात आम्ही पोती वाहून गाडी भरली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. असं ते हसून सांगत होते. तुझी आजी आनसाबाई ही मला बहिणी सारखी होती. असं ते म्हणाले. तर आनंदा निंबाळकर म्हणजे मोठा आवाज असलेला माणूस एकदा तर कुणाला तरी शेतातून बोलवायचे होते तेंव्हा आनंदा बाबा ने अशी आरोळी ठोकली कि त्या माणसाला ऐकू गेली असही पंडित दगू बाबांनी सांगितले. आजही त्यांच्या कडे थोडी खुट्यावर पांढऱ्या शुभ्र गायी आणि वासरं आहेत.


    या जनावरं चारण्यांच्या सुध्दा वेगवेगळ्या तऱ्हा होत्या. म्हणजे हेच बघा बाजीराव शिंदे (भगत) फक्त मेंढ्या आणि शेळ्या राखायचे.एखादं दुसरं घोड किंवा घोडी सुध्दा सोबतीला असायची. पंडित आणि पोपट दगू यांचेकडे गायी, बैल, तर श्रीपत माळी, दादा माळी, शेळ्या वळायची, त्या नंतर अर्जुन माळी, बाबूराव माळी, देवमन माळी यांनीही शेळ्या सांभाळल्या. घोडे आणि गाढव यांचा वापर कुंभाराना अधिक मग ती वळायला आनंदा सोनवणे आणि पुंजा सोनवणे हे असायचे. आण्णांच्या वस्तीवर जर्शी गायी आणि म्हशीचा मोठा गोठा होता. त्यासाठी दहा बारा माणसं संभाळायला असायची. विहिरीतून मोट बांधून त्या जनावरांना पाणी पाजणं मोठ्या कष्टाचे काम असायचं. हांडे मास्तर कडे मोठं मोठी खिलारी बैल असायची. माझे आजोबा म्हणजे आनंदा बाबा ती संभाळायला असायचे. बैलजोडी असल्या शिवाय एकही शेतकरी नव्हता आता चित्र बदलले आहे. कासरे, माठोटी, मुसके, येसन हे बनवून घेण्यासाठी तुकाराम मिसाळ यांच्याकडे खूप गर्दी असायची. तसीच गर्दी पांभर, वखर, जू, लाकडी चाक, गाडीचा साठा, शिवळ इत्यादी साठी उखा (मिस्तरी) जाधव यांच्याकडे होती. लोखंडी आख, चाक बसवने यासाठी वामन भालके परफेक्ट होते. प्रत्येक कुटुंबाला पोटा पुरता व्यवसाय गावातच असायचा. आता प्रगती झाली खरी पण पोटं भरण्यासाठी गांव सोडावं लागतं. असो 


    गावगुरातील समद्या गुरा ढोरांचा चरायला जायचा आणि घरी यायचा वेळ बहुतेक ठरलेला असायचा मग अशा वेळेला बाया माणसं आपल्या लेकरा बाळांना सांभाळून घरात कोंडून घ्यायच्या. कारण जर एखादं जनावरं बिथरल तर उगाच दुखापत व्हायची म्हणून त्या काळजी घ्यायच्या. तरी पण एखादं जनावरं मारक असायचच आणि त्यांने कितेकांना शिंगावर घेतलं किंवा पायाखाली तुडवल याच्या रस भरित गोष्टी बऱ्याच आहेत. तशाच एखाद्या हुशार, शांत स्वभाव असलेल्या बैल, गायी यांच्या सुध्दा आहेत. आणि प्रत्येक खळ्यावर आपल्या विश्वासू राखनदार कुत्र्याच्या असंख्य आठवणी मनावर कोरलेल्या आहेत. 


    काही जनावरांना एकमेकांना शिंगाने मारण्याची भारी हौस अशी एखादी लढाई जुंपली कि सांभाळणाऱ्या माणसांची भारी तारांबळ उडायची. कुणाला आवरू अन् कुणाला हाकलू अस होऊन जाई. अशात एखाद्या जनावराचा पाय मोडे, जखम होई. मग तो पाय बसवायचा म्हटलं की केरू बाबा गायकवाड हा एकच वैद गावात असायचा. पाय कितीबी मोडेल असो एकदा का बांबूच्या कामटीने केरू बाबाने बांधला कि बरा होई पर्यंत सुटायचाच नाही. तसंच एखादं जनावरं अडलं (म्हणजे जन्म घालते वेळी) तर केरू बाबा शिवाय मोकळ होणार नाही हे सर्वांना ठाऊक झालेलं. त्याकाळची ही दिलदार माणसं बिन पैशाचं मदतीला धावून जायची. रानोमाळ पडलेला झाडपाला हीच औषधी असायची फक्त त्याचं प्रमाण आणि गुणधर्म काही जाणत्या माणसांला माहीत असायचे. असा माणूस म्हणजे वैद्य ठरायचा. अनेक गुणकारी औषधी वनस्पती जमा करून घरात ठेवलेल्या असायच्या. वेळ प्रसंगी कुणाकडे काय मिळेल ते प्रतेकाला ठाऊक असायचे आणि मुख्य म्हणजे बिना मोबदला वेळेला मिळवायचं. असो 


  कनाळ्या बाबा म्हणजे मना बाबा क्षीरसागर असेच पंचक्रोशीत फेमस जनावरांच्या डोळ्यात कणू अर्थात खडे, काडी कचरा गेला तर या कनाळ्या बाबा शिवाय पर्याय नसायचा. विशेषतः बैल माती काम करायची मग त्यांनाच दुखापत झाली तर सगळी कामं बंद पडायची. हा कनाळ्या बाबा सुध्दा एक कवडी न घेता मदत करायचा. या कनाळ्या बाबा कडे प्रवास करण्या साठी एक घोडी होती तिची तर गंमतच कारण समोरून येणाऱ्या माणसाने रामराम ठोकला कि घोडी आपोआप उभी रहायची मग एक गप्पांची मैफिल झाली का पुन्हा रामराम म्हणताच चालू लागायची. आहे की नाही गंमत! 


  पानं लागन किंवा तिव्ह येणं हे तर नेहमीच घडायच मग शिवराम बाबा बगाटे यांत वाकबगार त्यांनी मंतर टाकला कि जनावरं ठनक्यावर पळायला लागले म्हणून समजा. तिव्ह काढण्याची पध्दत तर लय भारी ज्या माणसाची करंगळी आणि अंगठ्या जवळचे बोटं मागून जुळले तो तिव्ह काढू शकतो. सोबत काही तरी म्हणायचं असतं अता मला ते नीटसं सांगता येणार नाही. पण ही माणसं म्हणजे अनुभवाने डाक्तर झालेली. पण गुण मात्र हमखास यायचा. कधी तर ढोरक्याला सुध्दा पानं लागायचं मग त्याला बैलगाडीत घालून बिरोबा मंदिरा पुढं आणायचं. मंतर टाकायचा. वनस्पतीचा रस डोळ्यात टाकायचा. मिरची खायला द्यायची अशा काही उपायांनी गुण पडायचा. तर कधी हातचा माणूस गमवावा लागायचा पण करणारं काय डाक्टर पर्यंत पोहचण शक्य नसायचे, तसही असे डाक्टर खूपच कमी असायचे. अंगात येणं हा कायद्यान अंधश्रध्देचा भाग आहे. पण एक काळ असाही होता. जेंव्हा मनातली भीती घालवून अनेकांना जगायची उमेद मिळायची. मी या जुन्या अंधश्रध्देला समर्थन करत नाही पण त्याकाळी गावोगांव याच्या शिवाय काही पर्याय नसायचे. असो 


    या गावगुराच्या आणि जनावरांच्या अनेक कहाण्या आजही जुणी माणसं आवडीने सांगतात. एखादा लांडगा किंवा बिबट्या कसा कळपात शिरला आणि कस फस्त करून पसार झाला. किंवा अमक्या न लांडग्या सोबत झुंज देऊन कशी ढोरं वाचवली अशा आहेत. तर चोरांना अद्दल घडवल्याच्या घटना ही आहेत. काही दांडग्या माणसांच्या सुध्दा आहेत. तसाच एक किस्सा मुद्दाम सांगतो. आबाजी बाबा शिंदे म्हणजे पहिलवान गडी, कसलही धान्याच पोतं (सोळा पायलीच बरका!) या पठ्ठ्यान काखेत घालाव आणि थप्पी मारावी असा हा रांगडा गडी. या माणसांचा खुराक भलताच चर्चेचा विषय होता. म्हणजे एका दमात चरी भर दुध पिऊन घेणारा हा माणूस होता. (चरी म्हणजे आताच्या कळसी पेक्षा थोडी मोठी) (साधारण सहा सात लिटर दुध) आज असे धाडस जिवावर बेतू शकत. असो 


   खरं तर इतकी पाळीव प्राणी असल्याने दुध, दही, तूप, लोणी, खवा, खरवस, खीर, कढी असे दुधाचे पदार्थ रोजच जेवणात असायचे त्यामुळे एक प्रकारचे धष्टपुष्ट शरीर ही त्यावेळची ओळख असायची. भेसळ हा प्रकार होण्याचा प्रश्नच नव्हता कारण घरच्या दुधात असे कुणी करणार कशाला? बैल ही प्रतिष्ठेची गोष्ट होती तसंच घोड्याचा टांगा सुध्दा श्रीमंतीच लक्षण होता. बैलगाडी हे प्रवासाचे मुख्य साधन, काळ किती झटक्यात बदलला नाही का!. आता असं चित्र आपण फक्त चित्रपटात पाहू शकतो किंवा पुस्तकात वाचू शकतो. कारण माणसा पेक्षा पैसा मोठा झाला. असो 


   गावगुर आता नामशेष झाले तरी त्यांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. शेण मातीचा सडा रस्त्याने पडलेला असायचा. शेतीसाठी खत व्हावे म्हणून तो गोळा करायला झुंबड उडायची. अजूनही आपण गायी पालन या व्यवसायात नव्याने प्रगती करतो आहोत. फक्त स्वरूप बंदिस्त गायी पालन असे झालं आहे. हा लेख त्या एका गावगुर अनुभवलेल्या पिढीला समर्पित वंदन म्हणून ठरावा. थांबतो धन्यवाद.


Rate this content
Log in