Pandit Nimbalkar

Others

3  

Pandit Nimbalkar

Others

लक्ष्मीआईची यात्रा आणि होम

लक्ष्मीआईची यात्रा आणि होम

7 mins
235


    रविवारी नवा लेख आला नाही कारण थोडी माहिती घेणं बाकी होतं, माझा पर्यंत हा होता की शक्य तेवढी अधिक माहिती देता यावी. म्हणून हा उशीर झाला. खरंतर वाचनावर, लिखनावर प्रेम करणारी अनेक माणसे आहेत. आणि महत्वाचे म्हणजे आपल्या गावावर प्रेम करणारी अनेक माणसंच प्रेरणादायी ठरत आहेत लिखाणासाठी. त्यांच्या प्रेमामुळे हा उपक्रम सुरू आहे. अजून एक कोरोना काळात असंख्य माणसं क्षणात निघून गेली. कोणत्या क्षणी कोणाचा नंबर लागेल याची खात्री राहीली नव्हती. मग आपल्या परीने काय करता येईल याचा विचार केला तर आपण लिखाणा शिवाय कोणतीच मदत करू शकत नाही हे लक्षात आलं आणि ही लिखाणाची मालिका सुरू झाली. असो.

    लिखाण वाचताना काही गोष्टी अगोदर स्पष्ट केलेल्या बऱ्या असा माझ्या जिवलग मित्राचा सल्ला आहे. तर नावांचा एकेरी उल्लेख लिखाणाचा भाग असतो. कधी कधी माहितीचा श्रोत कमी पडल्यामुळे काही चांगले गुण दुर्लक्षित राहू शकतात. तसेच स्पष्टता यावी म्हणून जातीचा उल्लेख करावा लागतो. तेवढ्या पुरत समजून घ्या. असो


     आखाड महिन्यात मंगळवार किंवा शुक्रवार हा यात्रेचा दिवस असतो. जस जसी लक्ष्मी आईची यात्रा जवळ येवू लागे तसा फाशे बाबा(दावल अमृता माळी), धोंडीबा भवर भगत, संतू माळी, सिताराम माळी हे जुन्या पिढीतले तर नव्या पिढीतले देवराम भगत (पवार), मोतीराम बाबा, सोपान (भगत) माळी , भास्कर माळी, छबू माळी( भगत) यांची लगबग सुरू होई. तसा संपूर्ण आदिवासी (भिल्ल) समाजात उत्साह येई. मग पाच- सहा माणसं मिळून आण्णांच्या वस्तीवर जाणार. त्यांत जुन्या पिढीतील बिरू दादा माळी, होशीराम माळी, अर्जुन माळी, देवमन माळी, हिरामण माळी, बाबूराव माळी, शिवराम माळी इ. मंडळी असायची. यंदा काय काय कार्यक्रम होणार खर्च कसा भागवणार, यात्रेच स्वरूप काय असणार याची सगळी माहिती देणारं. मग पंडितराव आण्णां म्हणायचे, " बरं बरं , खूप छान नियोजन करता तुम्ही दरवर्षी, आई वर तुम्हा सर्वांची फारच श्रध्दा त्यामुळे आई तुम्हाला काही कमी पडू देतं नाही, लागा तयारीला जे काही लागलं ते कळवा आणि होम करताना बाया बापड्यांची, लहान मुलांची काळजी घ्या. सगळी तयारी झाली का कळवा!, आईच्या दर्शनाला नक्की येईन मी! " असा एकदा आण्णांचा शब्द मिळाला की समद्यास्नी कसं हायसं वाटे. आण्णां प्रमाणेच आदरणीय राजेंद्र बापूंनी व नानाभाऊनीं (विजय जाधव) ही परंपरा मनोभावे जपली आहे. अगदी बिरोबा यात्रा असो, मलिक्षा बाबा यात्रा असो किंवा लक्ष्मीआईची यात्रा इतकंच नाही तर आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला आवर्जून मदत करणारच शिवाय उपस्थित राहून कार्यक्रमाला रंगत आणणार, त्यामुळे आपसुक लोकांच्या मनात आपले पणाची भावना निर्माण होते. नेतृत्वाने लोकं भावना कशा सांभाळाव्या याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. 

     मंडळी जायच्या तयारीत तर आतून बाईंचा आवाज (लिलाबाई पंडितराव जाधव), "यमुनाबाई, गोदाबाई इकडे या , आलाच आहास तरं लक्ष्मी आईचं लेणं घेऊन जा गं, कामाच्या गडबडीत राहून जायचं.", असं म्हणून बाई हसतमुखानं लेणं द्यायच्या. लेणं म्हणजे साडी,(नऊवारी पातळ), चोळी, हळदी-कुंकू, नारळ आणि धान्याची ओटी अस सगळ साहित्य दिलं की त्यांना फार बरं वाटायचं. तसंच लेणं द्यायचा मान पाटील घरण्याला सुध्दा असायचा. त्याकाळी बाळासाहेब भाऊराव जाधव पाटील आणि अन्नपुर्णाआई बाळासाहेब जाधव हे दाम्पत्य मोठ्या भक्ती भावाने ते द्यायच्या, इतकं नाही तर गावातील सुताराकडून आईसाठी लाकडी गाडा, लोहारा कडून त्रिशूळ, कासारा कडून हिरवा चुडा हमखास मिळायचे, काही काळ अगोदर आपल्या गावात डोक्यावर आईची परडी घेऊन रोज चार पाच घरी जोगवा( पुजेचं साहित्य, नैवेद्य) मागायची पध्दत सुध्दा आठवली असेल. जोगवा मागयचा मान दरवर्षी वेगवेगळ्या सात सवासनी स्त्रीयांना मिळतो. जुन्या काळी यमुनाबाई मना माळी, चंद्रभागा बाळा माळी, साळूबाई भिमा माळी, तुळसाबाई गबा माळी, गोदाबाई लक्ष्मण माळी, कमळाबाई बन्सी माळी, रखमाबाई रंगनाथ माळी या माऊलींचा असायचा. आता ही पध्दत बंद झाली, पुरूष मंडळी जोगवा मागतात. 

 पुर्वीच मंदिर खूप छोटं होतं, तिथे एक लिंबाच झाडं होतं, नंतर मंदिर बांधल्यावर ते झाडं नष्ट झालं. शाळेत असताना मुलं डिंक आणायला तेथेच जायचे. यात्रा सुरू होण्या अगोदर पासूनच आदिवासी भक्त मंडळी रोज संध्याकाळी आईच्या वह्या म्हणायला एकत्र येतं. काही व्यक्तींच्या तोंडपाठ तर काहींनी लिहून ठेवलेल्या वह्या असायच्या. सध्या विक्रम माळी, संजू माळी, शशिकांत माळी, नारायण माळी, गौतम रजपूत, दिलीप माळी, बाळू माळी, माणिक माळी या तरूण मंडळींनी त्या आपल्या गायनाने आजही जपल्या आहेत. या वह्या ईतक्या ताला सुरात असायच्या की घरी बसलेली मंडळी सुद्धा त्या सहज गायला लागतं असे. वह्या म्हणताना वाजवली जाणारी झांज, ढोलक किंवा पखवाजाचा आवाज कानात घुमत असायचा. मी (पंडित निंबाळकर) आणि परसराम कासार अनेकदा वह्या ऐकायला जायचो. वह्या म्हणजे एक प्रकारे भक्ती गीतच पण आदिवासी (अहिराणी) बोलीत असल्याने वह्या असे म्हटले जातं असावे असे मला वाटते. त्यातली एक आवर्जून सांगावी वाटते. " उठ ग अंबाबाई झाली सोन्याची ग पहाट, चल ग अंघोळीला, सजली ग गंगेची वाट, शोभतो ग तुला सौभाग्याचा साज, आले ग बघाया थाट." अशा सुंदर वह्या म्हटल्या जातं असे. लहानपणी भाऊसाहेब माळी, संतोष पवार, शशिकांत माळी, श्रावण माळी हे माझे खास मित्र होते. म्हणजे अगदी श्रावणच्या घरचे बाजरीच्या पिठाचे पिठलं, शशिकांत च्या घरचा गुळाचा कोरा चहा, संतोषच्या घरचे यात्रेच्या निमित्ताने पुरण पोळी चे जेवणं आणि भाऊसाहेब च्या घरचा माश्याचे कालवण आजही जीभेवर रेंगाळते आहे. रावसाहेब देवमन माळी हे माझ्या वडीलांचे खास दोस्त त्यामुळे त्यांच्या घरी अनेकदा जेवणाचे आमंत्रण असायचे. काॅलेजच्या काळात आनंदा माळी, अनिल माळी, उमाकांत माळी यांच्याशी सुध्दा छान मैत्री जुळली. क्रिकेट खेळताना तर दौलतची टीम असल्या शिवाय मज्जाच यायची नाही, बरोबर ना!. असो.

    आमच्या सांगवी भुसार गावातील हर एका घरातून लक्ष्मीआई साठी धान्य दिलं जायचं, पुर्वी यात्रेला पैसा पेक्षा धान्याचा अधिक मान असायचा.  लक्ष्मीआईच्या मंदिरात धान्याची थप्पी लागायची. मग यात्रा काळात भंडारा केला जायचा. हा प्रसाद घेण्यासाठी सर्व गावातील लोक आवर्जून येणार. कुणाच्या घरची आली नाही तर त्यांच्या घरी आवर्जून प्रसाद पोहच केला जाई, कारण आईची कृपा, आशिर्वाद सर्वांना मिळावा हाच हेतू असायचा.

   आईच्या मुर्ती समोरचा त्रिशूळ सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा कारण त्यावर लिंबू खोचून ठेवलेले आणि हिरव्या बांगड्याचा साज असा चढवला जाई कि बघताना जणू कुणी रुपवान मुलगीच लक्ष्मी बनून उभी आहे, की काय असा भास होई. सुरेख सजवलेली, साज शृंगाराने मढवलेली लक्ष्मीआईची मुर्ती पाहून मन भरून येई. कुंकवाचा मळवट, कमरेला आलवणचा कमरपट्टा, हातात मोर पिसांचा गुछ, दुसऱ्या हातात साट, बघताना वाटायचं किती दिवसांची माय लेकराची भेट झाली नाही. असा भाव मनात उभा राही. आजही मंदिरात गेल्यावर मोर पिसांचा मोठा गुछ किंवा झाडू दिसायचा आणि खुंटीवर टांगलेला साट किंवा चाट ( म्हणजे तो अंगावर मारायचा दोरीचा गुंडा) असायचा. तेथून हलूच नये असे वाटत राही. आया बाया ओटी भरण्यासाठी जमतं असायच्या, प्रत्येकीच्या ताटात तळलेल्या कडकण्या, सांजोरी असायच्या, पुजा झाली की त्या देवीला वाहील्या जातं आणि राहिलेल्या प्रसाद म्हणून बाळ गोपाळांना दिल्या जाई . मग काय मुलांची झुंबड उडायची. नारळाचं खोबरे तर इतकं जमायचं की आता याचं काय करायचं हा प्रश्न भक्त मंडळींना पडायचा. नवरात्रीच्या उत्सव काळात गावातील प्रतेक समाजातील महिला मंदिरात घटी बसायच्या अशी आठवण माझी आजी आनसाबाई (अनुसयाबाई निंबाळकर) नेहमी सांगायची हे चांगले आठवते. म्हणूनच गावी गेल्यावर देवीच्या दर्शनासाठी मन आपसुकच धाव घेते. गावातील नवरी मुलगी अजूनही आईची ओटी भरण्यासाठी आवर्जून जाते. इतका आईचा महिमा मनावर कोरलेला आहे. 

  यात्रेच्या दिवशी रात्री केला जाणारा होम मुख्य आकर्षण असायचा. आता बऱ्याच वर्षा पासून ही परंपरा खंडीत झाली. शासनाने ही यांवर बंदी घातली आहे. अंधश्रद्धा वाढते असा समज होऊन आज मितीस अशा अनेक परंपरा नष्ट झाल्या आहेत. यावर माझा जास्त अभ्यास नाही त्यामुळे अधिक बोलणं उचित ठरणार नाही. हा होमाचा विषय मी एक आठवण म्हणून सांगतो आहे. समजून घ्यावं. श्रध्दा, अंधश्रद्धा हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा विषय आहे. असो. यावरून मला ग्रामपंचायत कर्मचारी राणू बाबांची आठवण येते. आईचे भक्त धोंडीबा बाबांचा चिरा बसवायचा राहिला व काही पुजा विधी करायचे राहिले म्हणून त्यांनी डोक्यावर जपलेले केस हे खूप मोठे झाले तरी तसेच होते, पण परिस्थिती मुळे ती पुजा त्यांना करणे शक्य नव्हते. पुढे पटाईत भाऊसाहेब यांनी त्यांच्या सतत मागे लागून, आर्थिक मदत करून ती पुजा करवून घेतली. त्यासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला, मदत केली. तेंव्हाच त्यांनी डोक्यावरचे केस कापले होते. असे मला आठवते. काही गोष्टी लेख वाचून तुम्हाला नक्कीच आठवतील. असो. 

     आईच्या मंदिरा समोर आयता कृती मोठा खड्डा खणून त्यात, पवित्र अग्नी पेटवला जाई, असंख्य नारळ यांत टाकली जातं, शिवाय तूपाचा शिडकावा केला जाई. भगत मंडळी पुजा विधी करत, ज्यांच्या अंगात येई त्यांच्या हजऱ्या घेतल्या जाई. अनेक लोकं आपल्या इडा पिडां विषयी उपाय विचारत. सर्वांत अगोदर आई चे भक्त या होमातून जायचे, त्या नंतर इतर मोठ्या माणसांना जाऊ दिलं जाई. असाच होम एकदा गिरीधर मेहरखांब यांच्या घरा समोरील म्हसोबा मंदिरा समोर केल्याचेही आठवते. शक्यतो लहान मुलांना होमातून जाण्याची परवानगी दिली जातं नसायची. जायचंच असेल तर मोठ्या माणसांच्या कडे, खांद्यावर बसून जायचं असा रिवाजच पडून गेला होता. 

    आईचा गाडा गावातून मिरवला जाई. घरातील सवासनी आईला आरती ओवाळी, आशिर्वाद घेई. अशा प्रकारे लक्ष्मी आईचा उत्सव साजरा केला जाई. उत्सव आजही साजरा केला जातो पण आता अनेक प्रथा बंद पडल्या. गावातील जाणकार मंडळींनी त्यांत आवश्यक बदल सुध्दा केले. आदरणीय राजेंद्र(बापू) जाधव यांच्या मार्गदर्शनाने अंबादास माळी, लक्ष्मण माळी, सोपान माळी, भास्कर माळी, पुंजाराम माळी,उत्तम माळी,छबू माळी यांनी किर्तनाचा कार्यक्रम घेण्याचा सर्वांनुमते निर्णय घेतला आहे. किर्तनाद्वारे आईचं महत्त्व भक्तांना सांगीतले जाते. कोरोना काळामुळे सर्वंच मंदिर बंद झाली. उत्सव बंद झाले. अनेक मर्यादा आल्या. शेवटी कितीही नाही म्हटलं तरी आपल्या हिताचे नियम पाळलेच पाहिजे. हा कोरोना काळ लवकर संपवा अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो. हा लेख लिहीण्यासाठी मोलाची मदत मित्र आनंदा माळी सरांनी केली तसेच अनिल माळी, उमाकांत माळी, अमित माळी यांचेही सहकार्य मिळाले. सर्वांचे आभार. थांबतो. धन्यवाद


Rate this content
Log in