जग्या या कथासंग्रहा विषयी
जग्या या कथासंग्रहा विषयी
आता माझा लेख कधी येतो आणि कोणत्या जुन्या आठवणी सांगीतल्या जातील याची सर्व जण आतुरतेने वाट बघत असतील, असे मला वाटते. "दर रविवारी माझ्या गावातील जुन्या आठवणींचा लेख वाचायची सवय झाली असेल नाही का?", "खरं आहे ना!". बघता बघता १० लेख झाले सुध्दा. असो
आपल्या गावाला साहित्यिक वारसा आहे. असे म्हणता येईल कारण जुन्या पिढीतील आपल्या गावातील लेखकांने लिहीलेलं एक पुस्तक माझ्या हाती लागले. म्हणतात ना एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की मार्ग आपोआप सापडतं जातात आणि मला लिखाणासाठी नवीन विषय मिळतो. तर आपल्या गावातील प्रो. प्रमोद लोहकरे सरांनी *जग्या* नावाचा कथासंग्रह लिहीला आहे. अनेकांनी तो यापूर्वी वाचलाही असेल. कदाचित काही व्यक्तीं कडे तो संग्रही असावा. माझ्या कडे सुध्दा आहे पण त्याची सुरवातीची पानं फाटून गेल्या मुळे प्रकाशक, प्रस्तावना आणि मनोगत या विषयी सांगता येणार नाही. पण हे पुस्तक त्यांनी १९८० ते १९९० या काळात लिहिलेले असावे. त्या पुस्तकाची जीर्ण झालेली पानं आणि कडक पुठ्या सारखं कव्हर यावरून हा अंदाज मी लावला आहे. आपल्या पैकी कुणाला निश्चित सालं माहिती असेल तर कमेंट करून जरूर कळवा.
प्रो प्रमोद लोहकरे म्हणजे आपल्या गावातील देवराम चांभार (लोहकरे) यांचा गुणवान, बुध्दिमान मुलगा. देवराम चांभार हे त्याकाळी चांबड्याच्या(कातडी) वस्तू बनवण्यात पंचक्रोशीत फेमस होते. जातीचा उल्लेख कुणाचे मन दुखावण्यासाठी नाही तर त्याकाळी आडनावा पेक्षा माणूस काय कामं करतो यावरून त्याची ओळख असायची. अगदी प्रतेक गावात असंच होतं, म्हणजे सुतार बाबा, लोहार बाबा, बाम्हण बाबा, वाणी बाबा असेच लोक म्हणायचे. ( आज रोजी दोघेही आपल्यात नाहीत.) सिताराम लोहकरे हा दुसरा मुलगा शिक्षणा पेक्षा व्यवसायत रमला. सिताराम लोहकरे यांचा मुलगा पिंट्या ही तुम्हाला आठवला असेल. एक मात्र खरं या घरात वारसा हक्का प्रमाणे उत्कृष्ट कला सुध्दा होती. हे मान्य करावे लागेल. असो.
प्रमोद लोहकरे हे १९७२ साली छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा येथून मराठी विषय घेऊन एम. ए. झाले होते. नोकरी करत असताना त्यांनी मराठीत पिएचडी सुध्दा केली होती. सांगवी भुसार सारख्या खेड्यातला मुलगा परिस्थिती अत्यंत गरिबीची, कुटुंबात शिक्षणाचा वारसा नाही. तरीही मोठ्या हिमतीने शिक्षणाचा घेतलेला वसा टाकला नाही. गडी मोठ्या पदावर पोहचला पण उतला नाही, मातला नाही. पनवेल सारख्या श्रीमंताच्या शहरात राहून आपली स्वतःची ओळख निर्माण केली. पनवेल येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मराठीचे शिक्षक म्हणून आपली सेवा दिली. ते छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी येथून एस.एस.सी झाले. तर बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे बी. ए .पर्यंत शिक्षण घेतले होते.
एकदा नंदकिशोर लांडगे यांना पनवेल चा माणूस भेटला तर बोलण्याचा ओघानेच लोहकरे सरांचा विषय निघाला. आता इतक्या मोठ्या शहरात एखाद्या माणसा बद्दल विचारपूस करून माहिती काढणे म्हणजे तसं फार कठीण, पण प्रमोद लोहकरे सरांच्या वक्तृत्व शैलीमुळे तो माणूस म्हणला, " खरं सांगू का? लोहकरे सरांना मी पाहिले नाही, पण त्या माणसाच्या वक्तृत्व, आणि नावलौकिक या बद्दल खूप ऐकून आहे. " या दोन वाक्यातून त्यांच्या कतृत्वाचा पुरावा भेटतो. तसे आदरणीय राजेंद्र बापू जाधव, नानाभाऊ ( विजय) जाधव यांचे लोहकरे सरां सोबत मैत्रीचे संबंध होते. अगदी एकमेकांच्या सुख दुःखात आवर्जून हजर असायचे. त्याला कारणही तसेच होते म्हणा!, पंडितराव आण्णांनी त्याकाळी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी हवी ती मदत केली होती. अगदी वडीलकीच्या प्रेमाने शिक्षणासाठी मुलांना आण्णांचा आधार असायचा. म्हणून तर १९७०-७२ च्या काळात सांगवी भुसार सारख्या लहानश्या खेड्यातून २९ ग्रॅज्युवेट झालेली मुलं होती. हा तेंव्हाचा तालुक्यातील कोणत्याही खेड्यातला उचांक होता. आदरणीय बापूं या गोष्टीचा अभिमानाने उल्लेख करतात. ( पंडितराव आण्णां विषयी भविष्यात लिहीणार आहेच, सध्या त्यांच्या विषयी माहिती संकलन चालू आहे. आण्णां विषयी एखादा लेख नव्हे तर एखादं पुस्तक लिहिले जाईल इतकं कर्तृत्व, नेतृत्व मोठं आहे.) प्रमोद लोहकरे सरांनी आण्णांच्या दहाव्याच्या दिवशी केलेलं भाषण आजही अनेकांच्या लक्षात असेल. आण्णा गेले पण गावाची काय अवस्था झाली याविषयी ते म्हणाले, " शेतात वैरणीच पेंडक बांधताना ताटव (दोरी) तुटावं आणि एकत्र आलेली वैरण सैरभैर व्हावी तशीच अवस्था आज आमची अन् आमच्या गावातील माणसांची झाली आहे. " इतके समर्पक दाखले देणाराची वक्तृत्व शैली अफलातून म्हणावी लागेल.
प्रो प्रमोद लोहकरे यांना गावा विषयी फार आपुलकी आणि प्रेम होतं याचा प्रत्यय त्यांचं लिखाण वाचताना येतो. गावातील रंग पंचमीला ते आवर्जून गावी येतं असायचे. गावातील माणसांच्या सवयी वर सुंदर, विनोदी वान म्हणायचे. असे माझे मित्र नंदकिशोर लांडगे यांनी त्यांची आठवण सांगीतली. पुस्तकातील जग्या हे पात्र लोहकरे सरांचे आदर्श होतं याचा ते आवर्जून उल्लेख करतात. जग्या म्हणजे आपले जगनराव जाधव साहेब. या कथासंग्रहातील प्रतेक कथा आपल्या गावातील माणसांची सत्य जीवन कहाणी आहे. तसं काल्पनिक कथा लिहीन सोपं कारण आपल्या मर्जी प्रमाणे रंग चढवता येतो, पण सत्य कथेला प्रामाणिक राहून स्वभाव सांभाळून रंगवनं मोठं धैर्याच कामं, कारण जरा कुठे कमी जास्त झालं तर लोकांचा रोष ओढवला जावू शकतो. आज या पुस्तकातील अनेक पात्र काळाच्या पडद्याआड गेली आहेत. पण त्यांच्या आठवणी पुस्तक रूपाने चिरःकाल आबाधित राहतील.
जग्या या कथासंग्रहात एकूण १३ वेगवेगळ्या कथा आहेत. छोट्या वही च्या आकारातील हे १०० पाणी पुस्तक सांगवी भुसार गावातील अनमोल ठेवा आहे. तो जतन केला पाहिजे. १) पहिली जग्या ही कथा आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक प्रगती या विषयी प्रेरणादायी आहे. २) श्यामकुमार ही कथा कारभारी तात्या चा श्यामकुमार काॅलेज काळात कसा वाहवत वाया गेला याची उनाड पोराची कथा आहे. ३) कुऱ्हाड या कथेत राम्या आणि संभ्या या शेतकर्यांचा वाद पण रागाने ,चुकीने आपल्या भावाचा आणि मुलाचा कसा अंत झाला ते लिहीले आहे. ४) आप्पा या कथेत तरूणपणातील पंडितराव आण्णांचा जोशात घडलेला किस्सा चितारला आहे. आण्णांचा स्वभाव कडक होता पण आतून खूप दयाळू होते. फणस जशा वरून कडक, काटेरी पण आतून गोड मऊ गरे तसेच काहीसे, असे मला वाटते. ५) खंडू रतन ही दोन भावांची गोष्ट, मुंबई ला जावून पैसा कमवून आई च्या हालाखीच्या जगण्याचं सोन केलं अशी आहे. ६) झिंगाड्या नाना ही कथा दारू मुळे वाया गेलेला नवरा आणि बायकोची गंमतीशीर भांडण सांगणारी विनोदी कथा रंगवली आहे. ७) जत्रा या कथेत मित्रां सोबत मायगांव देवी च्या यात्रेत केलेल्या गमती जमती सांगीतल्या आहेत. ८) बी के मामा ही कथा काॅलेज मधील मित्रांची एकमेकांच्या खोड्या कशा काढल्या जात यावरून आहे. ९) पानात फडफडे प्राण ही कथा जयवंती बाई यांच्या जीवनावर आधारित आहे. घर जळाले तेंव्हा जयवंती बाई चा जीव पठ्ठे बापूराव आणि परसरामी लावण्या लिहीलेल्या वही मध्ये अडकला होता. ही अगदी रंजक कथा आहे. या जयवंती बाई वर एक कादंबरी लिहीण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माहिती संकलन चालू आहे. १०) पान लागल ही कथा चांग्या आणि काभ्या या दोन बेवड्या मित्रांना पान लागतं पण पिलेले असल्याने ते कसे वेडे चाळे करतात याची अफलातून कथा आहे. ११) हातात हात ही लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात यावर आधारित आहे.
१२) मना बाबा ही कथा डोळ्यातले कणू काढणाऱ्या कनाळ्या बाबाची कथा आहे. या कथेतच बिरोबा यात्रे विषयी रंजक माहिती दिलेली आहे. वान म्हणायच्या पध्दती विषयी सविस्तर माहिती आहे. १३) झक ही कथा जुन्या गावाचे, शाळेचे सुंदर वर्णन आणि लहान मुलांची निरागसता विनोदी शैलीने लिहीली आहे.
असा हा जग्या या कथासंग्रहाचा भावार्थ माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. गोड मानून घ्या. महत्वाचे म्हणजे लिखाणाची ग्रामीण शैली मनावर दरवळत रहाते. आपले पणाचा गोडवा या प्रतेक कथेत भरला आहे. प्रसंग रंगवत असताना त्यातला खरे पणा जपला आहे. एकंदरीत *जग्या* हा कथासंग्रह आवर्जून वाचावा असाच आहे.
प्रो प्रमोद लोहकरे हे आपल्या गावातील पहिले साहित्यिक असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा वारसा पुढे कवी नंदकिशोर लांडगे, कवी बाबासाहेब बगाटे, कवी, लेखक दयाशंकर बगाटे (अर्थात विलास दादा बगाटे) यांनी चालवला. तिचं पताका घेऊन मीही साहित्य वारी करू लागलो. हा प्रवास कुठवर घेऊन जातो हे येणारा काळ ठरवेल. असो.
प्रो प्रमोद लोहकरे यांचा परिवार पनवेल येथे स्थायिक झाला असला तरी गावा विषयी वाटणारी ओढ कायम आहे. त्यांचा मुलगा डाॅ आहे आणि मुलगी प्राध्यापक आहे. एक दोन वर्ष एस एस जी एम काॅलेजला त्यांनी नोकरी केली आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. लवकरच तो होईल अशी आशा करू या. थांबतो, धन्यवाद
