एका प्रवासाची गोष्ट
एका प्रवासाची गोष्ट
एका प्रवासाची गोष्ट
आयुष्याचा प्रवास आणि मी एकटीने केलेला विमान प्रवास यांच्यात तफावत असली तरी साधर्म्य आहेच आणि दोन्हीतील जगण्याची गंमत सारखीच असते अनेकदा! . थोडंसं मीच माझं कौतुक करून घेत असले तरी सुख दुःखाचे अनेक प्रसंग अनुभवले असताना छोट्या छोट्या क्षणांना कुरवाळत मोठे संकटांचे डोंगर सुध्दा पार करता येतातच नाही का?.
बाई माणूस अर्थात स्त्री म्हटलं की संघर्ष आलाच!, पण प्रवासाची जशी उत्सुकता असते तशीच आयुष्याची उत्सुकता असेल तर प्रवासाची गंमत येते बरोबर ना! तुम्हाला समजावे म्हणून आणि कदाचित हाच प्रवास तुमच्या आयुष्यात आनंद समाधान मिळवण्यासाठी कामी आला तर माझ्या मनाचं ओझं हलकं झालं असंच वाटेल मला. असो
ही माझ्या विमान प्रवासाची कहाणी, मी कोण हा प्रश्न पडला असेल तुम्हाला कुटुंबाने आणि गावाने प्रेमाने मला *बाई* म्हणून हाक मारली तिचं हाक अस्तित्व होऊन बसली, अर्थात याला माझी हरकत नाही, माझं नाव लिलाबाई असलं तरी बाई म्हणून मारलेली हाक मला तितकीच प्रिय आहे. भारावल्या सारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि वागण्यात, बोलण्यात देखणे पणा मिरवणारे माझे यजमान पंडितराव जाधव यांच्या अर्धांगिनी म्हणून कुटुंबाने मला स्विकारले. आणि मोठ्या कुटुंबात असताना जबाबदारी आणि आपलेपणा यांची सांगड घालताना बाई हे पद मिळाले. जसं लेकरांची आई तसंच राबता असणार्या घरात आणि गावात दरारा असणाऱ्या मालकांच्या पाठीशी लोकांना जवळची आणि हक्काची छाया धरणारी माय हवी होती. ते जपण्यासाठी बाई पद मिळाले असावे, असेच मला कायम वाटत राहिले.
मुंबई ला जज साहेब असलेल्या सुनबाई साधनाताई जाधव यांच्या कडे काही दिवस राहिल्या नंतर पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली होती. वैभवाने नटलेले शहर अनुभवता आले, इतिहासाच्या पाऊलखुणा जपलेल्या अनेक वास्तू बघितल्या, ठिकाणं बघितली. हा अनुभव हळूहळू कंटाळवाणा होत जातो. गावाकडची शांतता आणि शहरातील धावपळ या जणू दोन टोकाच्या भूमिका जसं तरूणपण आणि म्हातारपण असं मला राहून राहून वाटत होते. झगमगाट आणि लखलखाट दुरून दिसत असला तरी फक्त जगण्यासाठी चाललेली धावपळ, स्पर्धा किती जिवघेणी आहे. आपलं गाव,इथली माणसं कसं हळूहळू, सावकाश जे आणि जसं मिळेल त्यात समाधान शोधत जगत असतात.
परतीचा प्रवास विमानाने छत्रपती संभाजी महाराज नगर ( औरंगाबाद पुर्वीचे) आणि तेथून पुढे कारने सांगवी भुसार असे नियोजन केले होते , पण ऐनवेळी जज असणाऱ्या सुनबाईंना कोर्टात काम निघाले. त्यांनी काही दिवस अजून रहा असा आग्रह केला पण माझं मन काही येथे रमत नव्हते मग मी पुढाकार घेऊन सांगितले अग तू मला फक्त विमानतळापर्यंत पोहचवले तरी मी जाईन तेथून पुढे. आता अनेकदा विमान प्रवास सोबत केला आहे की. खरं तर मनात धाकधूक होतीच पण तसं दाखवून उपयोग नव्हता. कारण या गुदमरून टाकणाऱ्या बंदिस्त वातावरणात आपण जर आजारी पडलो तर आपणास गावी जाता येईल का ही भिती मनात घर करुन बसली होती.
आयुष्याचही अगदी असंच काहीसं आपलं घर, आपली माणसं, आपलं छोटंसं विश्व आपलं गाव, आपली माती हवी हवीशी वाटतं राहते. नवी नवरी माहेर सोडून सासरी जाताना हुंदका दाटून रडू लागते पण नंतर सासर तिला आपलसं वाटायला लागलं की, तिचं लेक सासरी जाताना अनामिक ओढीने जायला निघते. तशी गत व्हावी माझी. तस माझं माहेर आणि सासर सांगवी भुसार गावातच असल्याने त्या अनुभवाची कसर या मुंबई मधुन गावी जाताना भरून निघाली असंच म्हणावं लागेल.
अगदी घाई गडबडीत आम्ही विमानतळ येथे पोहोचलो लगेचच फ्लाईट असल्याने सामान पुढे पाठवून मी विमानाकडे गेले खरे आता येथून माझा एकटीने प्रवास सुरू झाला. खरं तर आज जगात असंख्य बायका एकटीने प्रवास जगभर फिरतात आपण टिव्ही वर बघतोच पण ज्या स्त्री ने घोडागाडी, बैलगाडी, फार फार तर बसने तालुक्याच्या ठिकाणी जावं तेही सोबत यजमान असतिल तर अन्यथा नाही. अशी मी वयाच्या ८४-८५ वयात हे नसतं धाडस केलं हे मला जाणवू लागलं पण आता माघार घेता येणार नाही मग होईल ते होईल या आशेने परमेश्वराची आठवण काढत विमानात बसले.
आयुष्याचा जोडीदार निवडताना सुध्दा आमच्या पिढीने कधी इतका विचार केला नाही. घरातील प्रमुखाने एखादा निर्णय घ्यावा आणि आम्ही सुद्धा त्यांचा निर्णय रास्त मानून आयुष्य समर्पित करावं इतकं सोपं, मात्र जर जोडीदार चुकला तर ती आयुष्यभराची शिक्षा समजून जगत राहणाऱ्या असंख्य बायका माझ्या परिचयात, गावातील होत्या. माणूस कसाही असला तरी बाईला त्याचा संसार सांभाळून घ्यावा लागतो हीच गावाकडची शिकवण. आमच्याकडे शेतावर मजुरी करणाऱ्या किती तरी बायका रोज गाऱ्हानी घेऊन येत असायच्या. नवरा मारतो, दारू पितो, माहेरी जाऊ देत नाही, सासू त्रास देते, मुल होत नाही, मुलीचं झाल्या, आजारी असते अशा अनेक तक्रारी ऐकून त्यांचं सांत्वन करण आणि यजमानांना सांगुन तिच्या नवऱ्याला समज घडवणे हा माझा नित्यक्रम झाला होता.
जसं प्रवासात वाईट माणसे भेटतात तशी चांगली माणसं सुध्दा भेटतात फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजे, मुंबई विमानतळावर लिफ्टमध्ये बसताना वयोमानानुसार त्रास होत होता तेव्हा एका भल्या माणसाने मदत केली. असाच गुणी एक मुलगा माझ्या नातवाच्या वयाचा २५-२६ वर्ष विमान प्रवासात माझ्या शेजारच्या सीटवर बसलेला होता. जेव्हा सिट बेल्ट लावताना मी गोंधळून गेले तेंव्हा त्यांने मला मदत केली. चहा कॉफी मागवता आली नाही तेव्हा एअर होस्टेस कडून ते त्याने मागवून दिले. थोडी विचारपूस केली तेंव्हा कळले तो बुलढाणा येथील चिखली चा आहे व सध्या दुबईत राहतो. आई वडीलांना भेटायला चालला आहे. हे ऐकून समाधान वाटलं कारण हल्ली ची पिढी शिक्षणासाठी परदेशात गेली की येथेच स्थायिक होऊन जातात आणि आई वडीलांना विसरून जातात. त्यांचा संसार तेथे सुरू असताना आई वडील मात्र त्यांच्या भेटी साठी आस लावून बसतात. बातमीपत्रात अशा कितीतरी घटना रोज वाचतो आपण नाही का!. " बाळा आई वडीलांकडे अधुनमधून येत जा, त्यांची काळजी घे, तुझ्या आठवणीत त्यांचं म्हातारपण हरवून जायला नको. " असा सल्ला मी त्याला दिला.
माझ्याकडे कुठलाच मोबाईल प्रवासात नसल्याने नातवाचा पत्ता कागदावर लिहून घेतला होता. नातू अॅड. सतेज जाधव छत्रपती संभाजी नगर ला राहतो. त्याला अगोदरच फोन करून मी येणार आहे हे कळवले आहे. पण ऐनवेळी चुकामूक झाली तर पत्ता असेल तर टॅक्सी करून पोहचता यावे म्हणून हि तयारी केली होती.
आयुष्याचा प्रवास करताना सुद्धा सत्कर्म आणि नामजप आदी चे गाठोडे सोबत असले पाहिजे असे साधु संत आपल्याला नेहमीच सांगत असतात. थोडा वेळ डोळे मिटून घेतले आराम करत असताना डोळ्यासमोर आयुष्याचा प्रवास झरझर सुरू झाला. बालपण, शिक्षण, लग्नं, मुल-मुली, नातवंडे त्यांचा संसार, यजमानांची साथ, राजकरणातील भारावलेले दिवस आणि यजमानांचा विरह सगळ काही आज आठवत होतं पण कुणाला सांगता येणार आणि सांगुन तरी काय होणार आहे, कारण प्रत्येकाचा वेगळा प्रवास सुरू असतोच की असे अनेक प्रसंग आपण अनुभवले असतातच की , विचारचक्र सुरू असताना डुलकी लागली होती. पण पुन्हा आपण एकटे आहोत ही जाणीव झाली आणि झोप मोडली. एव्हाना विमानतळावर आगमन झाले असल्याचा संदेश आला. सर्व सह प्रवासी आप आपलं गाठोडे घेऊन मार्गस्थ झाले. मीही एअर होस्टेस च्या मदतीने बाहेर आले. व्हिल चेअर वर बसून बाहेर जात असताना माझी पर्स मी त्या मुलाकडे दिली होती. पण मी विसरून गेली होते त्या मुलाने धावत येऊन ती मला आणून दिली. किती गुणी मुलगा असं माझ्या मनात आलं. मला घेण्यासाठी बाहेर नातसून शरयू सतेज जाधव आणि पतवंड शरण्या आणि शैलवीर माझ्या अगोदर हजर होते. त्यांना बघितले आणि खूप बरे वाटले.
आम्ही घरी आलो पण मनाला एक रुखरुख लागून राहिली की प्रवासातल्या माणसांची नावे मात्र आपल्या लक्षात राहीली नाही. हा विमान प्रवास छोटासा होता. हे कळे पर्यंत वेळ निघून गेलेली असते. तसंच काहीसं आयुष्याचं सुध्दा आहे.
मी हे स्वगत मांडले खरे पण जे अनुभवले ते व्यक्त करता येत नसते. आपले आपल्याला त्या अनुभवातून शिकत पुढे जावे लागते. एका तारखे पासून दुसऱ्या तारखे पर्यंतचा आपला प्रवास अविरतपणे सुरू असतोच.
*अनुभव कथन लिलाबाई पंडितराव जाधव*
शब्दांकन पंडित निंबाळकर
सांगवी भुसार ता कोपरगाव
जि अहिल्यानगर
