माझी आई
माझी आई
शाळेत असताना सर्वात आवडता निबंध असायचा माझी आई बरोबर ना! प्रत्येक व्यक्तीला सर्वाधिक जवळची वाटते ती म्हणजे आई हल्ली तिलाच आपण मम्मी, माॅम असं म्हणत असलो तरी माया, ममता, जिव्हाळा, ओढ, आपुलकी तिचं आहे. ग्रामीण भागात या आईला कुणी ताई म्हणत कुणी अक्का तर कुणी बाई अजून अशीच वेगवेगळ्या प्रकारची हाक मारली तरी आई च महत्त्व सर्वांना सारखेच असते.
आम्ही आमच्या आई ला बाई म्हणून हाक मारतो का ते माहीत नाही. आमच्या आईचे माहेरचे नाव *झुंबर* कारभारी शेळके (आडगाव बु. लोणी) असं होतं पण लग्ना नंतर तिचे नाव सासरी लक्ष्मी असे ठेवण्यात आले. पुर्वी लग्न होऊन आलेल्या मुलीचं नाव सासरी बदलले जात होते. अजूनही काही ठिकाणी ही पध्दत असेल सुध्दा, किंवा बंद पडली असेल. तर आमची बाई *झुंबर* ची *लक्ष्मीबाई* वाळुबा निंबाळकर (सांगवी भुसार) झाली.
आमचे वडील वाळुबा निंबाळकर यांच्या गरिबीच्या संसारात
आनंदाने मिळून मिसळून गेली. सुरुवातीला माझे आजी अनुसया व आजोबा आनंदा निंबाळकर हे पंडितराव आण्णा जाधव यांच्या वस्तीवर सालगडी म्हणून असल्याने तेथेच वस्तीवर रहात होते. तो काळ मला आठवण्याचा संबंध नाही कारण माझा जन्म झाला नव्हता. पुढे काही वर्षांनी हे निंबाळकर कुटुंब गावात खळवाडी ला राहू लागले ( आता ही खळवाडी नामशेष झाली. )
लक्ष्मी आणि वाळुबा यांना आम्ही पाच अपत्य आहोत. चार मुली आणि एक मुलगा म्हणजे मी स्वतः अर्थात पंडित आणि चार मुली मोठी भारती, दुसरी मिना, माझ्या पाठची लंका (ज्योती), आणि छोटी ज्योती (छाया) असे आम्ही पाच भावंडे आहोत. कोरडवाहू शेती असल्याने उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी शिवाय पर्याय नव्हता. आमची बाई अशा परिस्थितीत खंबीरपणे कुटुंबा सोबत उभी राहिली आणि हिमतीने, नेटाने, काटकसरीने संसार उभा केला. दोन बैल , बैलगाडी, गायी वासर, शेळ्या असा कुटुंब कबिला वाढत गेला. कुडाच्या भिंती आणि पाचटाचे छप्पर असलेली कोपी, सिमेंट च्या पत्रे आणि भेंडा मातीच्या भिंतीत बदलली. पुढे वाळुबा आणि मधुकर या दोन भावांची कुटुंब विभक्त होऊन दोन कुटुंबे झाली.
संसाराचा गाडा हाकताना कधी एखादं साल (वर्षं) चांगले असायचे तर कधी अगदी दुष्काळ पडायचा मग मुला बाळांपेक्षा मुकी जनावरे पोसायची कशी असा प्रश्न पडायचा. अशा वेळी ऊस तोडी करून जनावरे आणि कुटुंब चालवण्याचा धाडसी निर्णय घेतला. तेव्हा आमची बाई आमच्या वडिलांसोबत साथ देण्यासाठी तत्पर असायची. आमच्या आईच्या आयुष्यात इतके कष्ट लिहिले तरी ती मागे हटली नाही.आणि कसली तक्रार सुध्दा केली नाही.
पुढे नशिबाने घात केला आणि आमचे वडील वाळुबा निंबाळकर यांच्या पायाला कोयता लागला आणि कायमचे पायाने अधू झाले. तरीही गरिबीचा संसार हाकताना बैलगाडी मोडुन शेळी पालन व्यवसाय सुरू केला. पण तेथेही चालण्यासाठी अडचण येऊ लागली. तर बाईने त्यांना साथ दिली. आई शेळी पालन व्यवसायाची जबाबदारी स्वतः घेतली. परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याने मोठ्या मुलीचे लग्न करून दिले. नंतर थोड्याच दिवसात नियतीने आमचे पितृछत्र हिरावून घेतले.
आमची बाई ला आता संपूर्ण कुटुंबाचा भार एकटीने उचलावा लागला. मग मुलींच्या शिक्षणाची परवड होऊ लागली. एक एक करत शिक्षण अर्धवट सोडावे लागले. पण मुलगा म्हणून माझं शिक्षण मात्र बंद होऊ दिले नाही. प्रसंगी व्याजाचे पैसे घेऊन माझी फी व शिक्षणाचे साहित्य आदिंचा खर्च भागवला.
पुढे शेळी पालन करणे कठीण होऊ लागले मग एक गाय घेऊन दुध व्यवसाय सुरू केला. एक एक करत तीन मुलींची लग्न जमेल तशी साध्या पध्दतीने करून दिली. त्यांचा संसार सुरू असताना आई आणि बाप अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकटीने सांभाळत असताना किती त्रास आमच्या बाईला सहन करावा लागला हे शब्दात व्यक्त करता येणार नाही.
माझं शिक्षण आणि पार्ट टाईम ग्रामपंचायत क्लर्क म्हणून काम सुरू झाले. पुढे प्रायव्हेट मध्ये नोकरी सुरू झाली. आमच्या बाईने केलेला संघर्ष माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझ्या आईचे अर्थात बाईचे आशिर्वाद आणि शुभेच्छा सदैव आमच्या सोबत आहेत.
आई म्हणजे ममतेचा झरा
आई म्हणजे आशिर्वादाचा साठा
आई म्हणजे देवाचेच रूप
आई म्हणजे स्वर्ग सुखाच्या वाटा
