वळही
वळही
*वळही* (सुकलेल्या चाऱ्याची गंजी)
भागा भागात वळही ला वेगवेगळी नावं असतील पण तिचं अस्तित्व मात्र एकसारखच होतं. आजही अनेक दुष्काळी पट्ट्यात तिच अस्तित्व आहे. पण बागायती भागातून ती दिसेनाशी झाली आहे. कारण ओल्या चाऱ्याची कुट्टी करून बॅगा भरून ठेवण्याची नवी पद्धत आली आहे. असो
खरं तर हा विषय मला सुचवला आमचे मित्र एकनाथ जोर्वेकर यांनी, काही काळ आम्ही खडकेश्र्वर हॅचरिज मध्ये शिरूर येथे एकत्र काम केले होते. सध्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. तर वळही हा विषय लिखाणाचा असू शकतो का? असा प्रश्न काहींना पडु शकतो पण ग्रामीण भागातील लोकांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मुळात हा शब्द वळई / वळयी/ वळही यातही मत मतांतरे असतिलच पण यातला भाव समजून घेऊ.
एकेकाळी म्हणजे ३५ ते ४० वर्षांपूर्वी ज्या कुटुंबाच्या शेतात, खळ्यात किंवा घराच्या आसपास अशी वळही असेल तर त्या घरी पोरगी देण्यास कोणताही शेतकरी बाप तयार असायचा बरोबर ना!; पण आता जर असा एखादा शेतकरी असेल तर मुलीचा बाप तेथे मुलगी देणार नाही,कारण येथे तिला खूप कष्ट करावे लागतील असा सर्वसाधारण समज आहे. मुळात मुलगा शेती करतो हे माहीत असेल तर त्याचं लग्न जमणे आताच्या काळात कठीणच आहे. असो हा एक गहन विषय आहे आपण अधिक खोलात न जाता आपल्या वळही या विषयाकडे वळू.
वळही म्हणजे ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांच्या कापणी नंतर उरलेला सुका चारा असतो. तो गोळा करून एका माणसाला सहज उचलता येईल इतक्या चाऱ्याची पेंढी बांधून तो गोळा केला जातो. मग आपल्या शेतात पडीक जागेवर, खडकावर, खळ्यात, मळ्यात, गावठाण हद्दीत किंवा घराच्या आसपास मोकळ्या जागेत वळही रचली जाते. सुक्या चाऱ्याला कडबा / सरमड असे सुध्दा म्हटले जाते.
चारा बैलगाडी मध्ये रचून घरी आणणे हे एक कुशल शेतकर्यांचे काम, किंवा एखाद्या मजुरालाच ते जमू शकतं होते. म्हणजे इतरांनी रचलेली वळही आणि कुशल व्यक्तीने रचलेली वळही यात किती तफावत होती हे बहुतेकांना माहीत असेल.
वळही रचन्या अगोदर जागा हावर करून घ्यावी लागे. (ह्यावर म्हणजे व्यवस्थित सारखी करून घेणे, खड्डे, दगड माती सारखी करून घेणे) अन्यथा रचलेली वळही कधी कलंडुन जाईल याची शाश्वती नसे. तर जागा तयार झाली की, चाऱ्याला उधई लागू नये म्हणून त्याखाली जाड लाकडाचा किंवा दगड विटा आदींचा एक समान थर लावून घेतला जाई (उधई म्हणजे चाऱ्याला किड लागने किंवा माती मुळे चारा खराब होणे)
आता ग्रामीण भागात काही पट्टीचे लोकं असतील तर त्यांना या सिझन मध्ये खूप मागणी असायची मग ते छोट्या शेतकऱ्यांना फक्त पहिला चाऱ्याचा थर रचून देत पुढे नवख्या माणसांनी ती रचायची. आडव्या आणि उभ्या पेंढ्या टाकून अशी रचना करायची की वादळ आले तरी वळही हलणार नाही आणि पाऊस आला तरी चारा भिजणार नाही. शिवाय हा चारा जनावरांना खाऊ घालण्यासाठी काढताना अलगद काढता यावा यासाठी सुध्दा सोया करून ठेवावी लागते. शिवाय डुक्कर आदींनी उपद्रव करू नये म्हणून किरळ ही काटेरी वनस्पती किंवा बोराटीच्या फांद्या चारही बाजूंनी लावून ठेवाव्या लागत.
वळही मध्ये कितीही चारा बसवता येत होता. म्हणजे चार दोन गाड्या पासून शंभर गाड्या सुध्दा एकाच वळही मध्ये बसवता येतात फक्त आकार वाढत जातो. गडी माणसं या कामासाठी नेहमी तयार असायची कारण तसा हा कमी वजन उचलण्याचा कामधंदा होता शिवाय वळही रचणारांना चांगला पाहुणचार शेतकरी वर्गाकडून केला जाई.
तसं पाहिलं तर वळही रचण्याच्या तीन ते चार पध्दती मी स्वतः पाहिल्या आहेत. कदाचित जास्त असू शकतील. पण चौकोनी पध्दतीने रचलेली वळही सर्वोत्कृष्ट असायची, गोलाकार रचलेली वळही दिसायला सुंदर असायची, मोठी वळही आयताकृती असायची. आणि चौथा प्रकार म्हणजे खोपा पध्दत म्हणजे चारा समान उंचीचा नसेल तर हा प्रकार वापरला जाई यात खुरटा चारा आतमध्ये आणि लांबीला मोठा चारा बाहेरून रचला जाई. काही भागात अजूनही वेगळ्या पद्धती नक्कीच असतील. शिवाय वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी वळही असायची. शिवाय मिठाचे पाणी मारून कडब्याचा गोडवा टिकवला जाई. भुशाचा गंज आणि वळही यांची सोबत सुध्दा केली जायची कारण भुसा हवेने उडून जातो म्हणून तो जर वळही सोबत असेल तर उडण्याचा धोका कमी असतो.
वळही चा मुख्य उद्देश म्हणजे जनावरांना वर्षभर पुरेल इतका अन्न साठा होता. पुर्वी जल सिंचनाच्या इतक्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने आणि दुष्काळी परिस्थिती अनेकदा निर्माण होत असल्याने बैलं, गायी, म्हशी इत्यादींसाठी चारा नसेल तर जनावरं विक्री करावी लागत किंवा सोडून द्यावी लागे
काही शेतकरी पै पाहुण्यांकडे जनावरे सोडून येतं होती किंवा आपल्या कुटुंबाला घेऊन इतर गावात जाऊन रहात होती. आजकाल फक्त मेंढपाळ अशा प्रकारे पशुपालन करतात. त्यांचेही प्रमाण खूपच कमी झाले आहे. पडिक जमीन सहसा कोठेही शिल्लक राहिलेली नाही. असो
वळही सोबत घडलेल्या अनेक आठवणी आजही मनात घर करून बसल्या असतील. म्हणजे एखाद्या वेळी चारा काढताना वळही अंगावर पडली असेल. एखाद्या वेळी चाऱ्यामध्ये विंचू, साप निघाला असेल. एखाद्या वळही ला आग लागली असेल आणि त्यामुळे झालेला गदारोळ असेल. वळही मुळे झालेली भांडण सुध्दा असतिल.
वळही जितकी मोठी तितकाच तो शेतकरी मोठा, श्रीमंत समजला जाई . अशा शेतकऱ्यांकडे दुध आणि दुधाचे पदार्थ भरपूर प्रमाणात असत. म्हणजे खरपूस दुध भाकरी हा न्याहारीचा ( नाष्टा) प्रकार होता.
दही भात, कढी भात ही दुपारची शिदोरी होती. खवा, लोणी, तुप घरोघरी तयार केले जात होते.
जशी वळही हद्दपार झाली तशी गावाकडची भरभराट हद्दपार झाली अस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज आपण आधुनिक शेती करून अधिक उत्पादन घेतो आहोत खरं पण भेसळयुक्त गोष्टी खाऊन शारीरिक अधोगती कडे वाटचाल करत आहोत हेही तितकेच खरे आहे. अजूनही वळही विषयी माहिती तुम्हाला असेल तर कमेंट करून जरूर करा. थांबतो
धन्यवाद 🙏
लेखक पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहिल्यानगर
