फसलेला फराळ
फसलेला फराळ
एक तर मला स्वयंपाकात फारशी गती नाही, . आवड ही नाही ,एखादा स्पेशल पदार्थ करायला आवडतो, पण रोजचा स्वयंपाक नाही.
शिवाय माहेरी घरात माझ्या डोक्यावर दोन मोठ्या बहिणी, आणि आई त्यामुळे दिवाळीच्या फराळाची आणि माझी गाठ लग्न झाल्यावरच पडली. तोपर्यंत आईच्या हाताखाली कधी साधी भाजणी देखील भाजली नव्हती. मी वडिलांचा लाडका आसोबा (आशा) मग स्वयंपाक घरात कशाला जातोय?
फक्त आईबरोबर बसून करंज्या भरणे ,काटून देणे एवढे प्रकार केले होते.
शिवाय चिमटा असताना हात भाजून कोण घेईल ?तसं स्वतःहून अंगावर स्वयंपाकाचे काम ओढून कोण घेईल?
त्यामुळे इकडे लग्न झाल्यावर मी सासूबाईंना सरळ सांगितले, मला यातलं काही येत नाही.
तुम्ही शिकवा मी करेन! आणि त्यांच्याकडूनच बरेच दिवाळीचे पदार्थ बनवायचे मी शिकले.
सुरुवातीला त्यांनी मला शिकवला बेसन लाडू, कारण तो त्यांच्या मुलाला, म्हणजेच माझ्या नवऱ्याला खूप आवडतो. अगदी इतका की तो म्हणतो, "कोणीही माझ्या लाडवाला हात लावायचा नाही, मी बँकेत नेऊन ठेवीन लॉकरमध्ये, आणि रोज एक जाऊन खाईन" तर अशी आपली मज्जा!
त्यामुळे मी बेसन भाजायला बसले ,बेसन भाजता भाजता हाताला चटका बसला, मी किचन मधून ओरडले "आई भाजलं! त्यावर सासूबाई म्हणल्या "अजून भाजू दे! "कारण त्यांना वाटलं मी बेसन बद्दल बोलत आहे.
मग दिराने सांगितलं, आई! वहिनीचा हात भाजला आहे, आणि सगळे हसायला लागले. माझं भाजलेलं राहिलं बाजूला!
पण त्यांच्या हाताखालीच मी हळूहळू भाजणी भाजण्यापासून, ते चकल्या, करंज्या, रवा लाडू, बेसन लाडू , शिकले.
तीन वर्षे एकत्र होतो, तेवढ्यात सारं काही शिकले. पण अजून एकटी वरती लोड घेऊन कधी केलं नव्हतं.
मग तिथून आम्ही वेगळे राहिलो, क्वार्टर्स ला आलो, आणि पहिल्यांदाच मी सोपा ॲटम म्हणून शंकरपाळी करायला घातली.
कारण कामावर गप्पा मारताना ,किंवा जेवताना मैत्रिणींनी सांगितलेलं सगळ्यात सोपी शंकरपाळी!
अश्शी! करायची, अश्शी टाकायची
दोन तासात काम तमाम
मग काय मी पहिले शंकरपाळीच करायला घेतली.
एक वाटी तूप ,एक वाटी साखर ,एक वाटी दूध
सारं एकत्र केलं गॅस वरती उकळलं ,आणि अर्धा रवा अर्धा मैदा एकत्र मळला. आईची रेसिपी बघितली होती, माझी आई रवा मैदा एकत्र करून शंकर पाळ्या करायची .
पण इतक्या खुसखुशीत की तोंडात घातल्या घातल्या विरघळायच्या,
तसंच करायला गेले, पण काय बिघडलं माहित नाही. शंकरपाळी तेला मध्ये टाकली की, सगळी उकलून यायची आणि बारीक बारीक कण होऊन तरंगत राहायची.
मग कोणीतरी सांगितलं की अजून त्यात मैदा घालून मळून घ्या! मग पुन्हा वाटीभर मैद्याला, चांगलं तूप चोळून शंकरपाळ्या करायला घातल्या.
मग काय त्या होऊ लागल्या, मला अगदी आनंद झाला; चला आता शंकरपाळ्या वठत आहेत.
पण कसंच काय खायला गेल तर सगळ्या कडकडीत ,आणि दाताने कुडूम् कुडूम् आवाज करत खाव्या लागत होत्या. म्हणजे नंतर त्यांना माझ्या एकटी शिवाय कोणी वाली नव्हते. मी बिचारी चहात बुडवून ठेवून ,पंधरा दिवस खात होते.
अजून एक किस्सा आहे रव्याच्या लाडूचा,
रव्याचा लाडू मला पाकातला शिकायचा होता. पुष्कळ लोक पाकातले रव्याचे लाडू आजही करत नाहीत ,त्याला घाबरतात. कारण तो एक तारी /दोन तारी पाक करताना कधी नरम होऊन पडतो, तर कधी फेकून मारावा असा होतो.
त्यामुळे भरपूर तुपात लोक रवा भाजून घेतात, आणि त्यातच पिठीसाखर घालून, गरम असताना लाडू वळतात. पण ते लाडू खाताना कच्चट लागतात, आणि तोंडात त्याचा टोठरा बसतो. सगळा भुसा एक घास चावल्या बरोबर अख्या तोंडात पसरतो.
आमच्या शेजारी एक वहिनी होत्या, त्या चांगल्या सुगरण होत्या, त्यामुळे त्यांना बोलावले आणि मला एक तारी पाक करून त्यामध्ये लाडू कसे बनवायचे सांगा? अशी विनंती केली.
वहिनी आल्या, त्यांच्यासमोर पाक बनवायला ठेवला, आणि त्या माझ्याशी बोलत बोलत पाक हलवतच राहिल्या. उकळी मारून बराच वेळ झाला होता, मी म्हणाले
" वहिनी" झाला असेल बघा!
नाही ग ज्योती! थांब अजून व्हायला पाहिजे.
पुन्हा एकदा मी आठवण केली, तरी तसंच
नाही ग ज्योती! थांब अजून होऊ दे.
आता मला वाटलं मी पहिल्यांदा करते आहे. या चांगल्या सुग्रण आहेत, यांना नक्की अंदाज असेल. नंतर त्यांनी स्वतःची जीभ चावत, गडबडीने रवा त्या पाकामध्ये ओतला.
आणि पूर्ण मिश्रण एकमेकात एकजीव झाल्यावरती गॅस बंद करून झाकण ठेवलं.
नंतर अर्ध्या पाऊण तासाने उघडायला गेलो तर!
कसंच काय
पूर्वी दुष्काळात सुकडी मिळायची ना! त्या पद्धतीचा तो रवा झाला होता. म्हणजे लाडू वळण्याची तर सुताराम शक्यता नव्हती.
असा सगळा भुसा भुसा हातात येत होता.
वहिनी फारच गडबडल्या, 'अग असं ज्योती! पहिल्यांदाच झालंय"
असं माझं कधी होत नाही. असं माझं कधी फसत नाही. त्या मला जीव तोडून सांगत होत्या.
बर त्या गुजराथी, त्यामुळे त्यांचे उच्चार माझं च्या जागी माझ्य! मला त्याचीच गंमत वाटत होती.
अहो वहिनी राहू द्या!
नाही नाही आपण त्यावर दुधाचा हपका मारून बघूया!
मग पुन्हा दूध गरम केले, त्याचा हपका मारला .कसे बसे लाडू केले ,पण ते खायला कडकच झाले. आणि मग शेवटी घरच्यांना जबरदस्ती वाढून वाढून संपवायला लावले.
