फजिती
फजिती


रिटा त्यावेळी एका खाजगी कंपनीत काम करत होती. कंपनीत दिवाळी सेलिब्रेशन म्हणून 'सारी डे' ठेवला होता. ती प्रथमच साडी नेसून स्कुटीवर कंपनीत गेली होती. जाताना व्यवस्थित गेली. येताना दुपारची वेळ होती. ऊन होतं. तिला दुसऱ्या गाडीचा इंडिकेटर दिसलाच नाही आणि तिची गाडी त्या गाडीला जाऊन धडकली. ती हाताच्या कोपऱ्यावर पडली. लगेच लोक जमा झाले. तिला कोठे लागले ते पाहिलं. लोकांना वाटलं फ्रॅक्चर असेल म्हणून त्यांनी तिला लगेच रिक्षात बसवून जवळच्या रुग्णालयात पाठवले. ती आणि ज्यांच्या गाडीला तिची टक्कर झाली ते गृहस्थ पण तिच्याबरोबर आले होते. तिने त्यांना तिच्या चुलत भावाला फोन करायला सांगितला. तो लागलीच आला.
एक्स रे, इंजेक्शन वगैरे झाल्यावर जोराचा मार लागला व विश्रांती म्हणून डॉक्टरांनी हाताला प्लास्टर लावले. नशीब फ्रॅक्चर नव्हते. आता गाडीवर मागे बसायलासुद्धा तिला भीती वाटली. म्हणून ती रिक्षाने घरी आली. तिच्या भावाला सांगितलं की तिने अमूक अमूक ठिकाणी स्कुटी लावली आहे. गाडीचा नंबरपण ती सांगायला विसरली. त्यावेळी मोबाइल नव्हता तिच्याकडे. तो तिथे गेला तेव्हा तिथे दोन स्कुटी होत्या. त्यातील एका स्कुटीला किल्ली लावली आणि तो स्कुटी घेऊन घरी आला.
तिने त्याला विचारले, "एवढा वेळ का लागला?" तिला मनात वाटलं आता गाडी
नेली तिची कोणीतरी.
तो म्हणाला, "कशी गाडी चालवतेस तू? गाडीचं लॉक उघडत नाही. गाडीला आरसा नाही. अक्षरशः त्या लॉकमध्ये मी ऑइल घातले. मग कशीबशी किल्ली घालून गाडी सुरु केली. इथपर्यंत आणली." त्याचे बोलणे ऐकून तिला खूप वाईट वाटले. आपल्या गाडीची अवस्था आपल्या या अपघातामुळे अशी झाली. म्हणून ती पार्किंगमध्ये गाडी पाहायला गेली. पाहिलं तर दुसरीच कोणाची तरी स्कुटी तिथे होती. तिने त्याला खाली बोलवलं.
म्हणाली, "ही माझी गाडी नाही."
तो म्हणाला, "काय? मला वाटलं अपघात झाल्याने तुझी गाडी अशी झाली."
परत तो स्वतःला कोसत स्कुटी घेऊन तिथे गेला. तोपर्यंत ज्या मुलीची स्कुटी तो घेऊन आला होता, तिने रडून लोक गोळा केले होते. तिची गाडी दिसली नाही म्हणून. अचानक स्वतःची गाडी पाहून खूप आनंद व्यक्त करण्यापेक्षा शिव्यांचा भडीमार सुरू केला तिने.
तरीही सॉरी म्हणाला तो आणि तिची स्कुटी घेऊन घरी आला. रिटाला तिची गाडी परत मिळाल्यामुळे आनंदाला पारावर राहिला नाही. तो तिला म्हणाला, "ताई, मी आयुष्यात एवढ्या शिव्या कधी खाल्ल्या नाहीत. तुझ्या आणि त्या मुलीच्या." अशी झाली त्याची फजिती आणि परत तो सुद्धा हा प्रसंग खूप रंगवून सांगू लागला एक गंमत म्हणून. आजही तो प्रसंग तिला आठवला की हशा पिकतो.