हेल्मेट आणि हेअरकट
हेल्मेट आणि हेअरकट
हेअरकट करायचा होता मला. त्यावेळेस गेले अशीच दुपारच्या वेळेस. मस्त हेअरकट करून झाला अभिरुची मॉल मध्ये. किक मारली आणि निघाले घराकडे यायला टू व्हीलर वर. गाडी सिग्नलला थांबवली. तेवढयात ट्राफिक पोलीसाने माझी गाडी अडवली आणि बाजूला घ्यायला सांगितली. कोसत होते मी स्वतःला. कुठून बुद्धि सुचली केस कापायची वगैरे.
सिग्नल सुटला. इतर गाड्या जात होत्या. त्यात हेल्मेट न घालणारे पण होते. त्यांना बघून मी म्हणाले, "ह्यांना का नाही पकडलं तुम्ही ? मलाच का पकडलं." ते म्हणाले, "कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे ना." आणि पुष्कळ सुनावलं मला. चला पाचशे रुपयाचं चलन फाडा." माझं लायसन आणि गाडी दोन्ही जप्त केलं होतं. बरं त्या दिवशी जास्त पैसे घेतले होते मी पाकिटात. मी ठीक आहे म्हणाले. घ्या पाचशे रुपये आणि दया माझी गाडी आणि लायसन. ते म्हणाले की कॅश चालणार नाही. तुम्हाला कार्डने पेमेंट करावे लागेल. मी म्हणाले माझ्याकडे कार्ड नाही. ते म्हणाले घरी जाऊन घेऊन या. मी विचार केला अजून रिक्षाला शंभर रुपये कशाला घालवायचे. त्यापेक्षा कोणाकडे तरी कार्ड आहे का ते विचारावे. बऱ्याच लोकांना विचारले. पण कोणीच तयार होईना. त्याच गर्दीतील माझ्यासारखा पकडला गेलेला माणूस तयार झाला कार्ड वापरायला. त्याचं कार्ड वापरलं मी. पाचशेची नोट इच्छा नसतानाही हातावर टेकवली. गाडीला किक मारली. मनात पुटपुटत म्हणाले हेल्मेटची ऐसी की तैसी. घरी आले नवऱ्याला म्हणाले, "मी आज ७०० रुपयांचा हेअरकट करून आले."नवरा खुश होऊन म्हणाला," अरे वा! दाखव." मग मी झालेला सारा प्रकार सांगितला. नवरा इट्स ओके म्हणत हसला माझ्यावर. मला मात्र हेअरकट चांगलाच लक्षात राहिला.
पुढे वर्ष गेलं. मैत्रिणीकडे गेले होते हडपसरला. जाताना डोक्यावर हेल्मेट चढवून. पूर्वीचा अनुभव लक्षात ठेवून.
तासभर गाडी चालवली. बाराची वेळ होती. बरंच ऊन लागलं. शेवटी एकदाची मी घरी पोहोचले योगीताच्या. योगिता माझी मै
त्रीण. खूप दमले अगं मी योगिता म्हणतं पाणी दे मला असं म्हणाले मी. तिने पाणी दिलं. मला ती म्हणाली काय खायचं तुला? मी म्हणाले नको. मी आता खाऊन आले. आमच्या गप्पा छान रंगल्या होत्या. तीन वाजले. मी म्हणाले, "आता मी घरी जाते." ती म्हणाली थांब आपण जाऊ. एस कुमार वडापाव स्नॅक्स सेंटरकडे. दोन वडापाव घेतले तिने. जंबो होते वडापाव. मी म्हणाले,"अजून एकेक खाऊ ना वडापाव. मला खूप भूक लागली आहे." ती म्हणाली नको अगं प्रिती खूप होतंय.पण मी आपले माझेच खरं करत दुसरा पण घ्यायला सांगितला तिला.
वडापाव खाल्ला दुसराही. खाने के बाद चाय तो बनती है म्हणून प्रेमाचा चहा पण पिला. आता बाय म्हणायची वेळ आली होती. तरी गाडीच्या जवळ उभा राहून गप्पा आमच्या सुरू होत्या. दहा मिनिटांनी मीच म्हणाले बराच वेळ झाला आपण बोलतोय. निघते मी आता. मी हेल्मेट चढवले आणि आपल्या गाडीवर स्वार झाले. तिने हेल्मेट घातले नव्हते. तिला उपदेशाचे डोस पाजत गाडी पुढे नेली. मला काहीतरी होतंय असं वाटलं. गाडीतळाच्या खाली येऊन पोहोचलो. ती मला सांगत होती की कुठे वळायचं ते. तेवढ्यात अचानक मला चक्कर आली आणि मी खाली पडले आणि माझ्याबरोबर तीही गाडीवरून पडली. तिच्या गाडीवर पडली होती माझी गाडी. मला कळालंच नाही पडले मी ते. चक्कर आली होती मला. शुद्धीवर आल्यावर सगळे लोक जमा झालेले पाहून फक्त एवढेच कळलं खाली पडले. मात्र किती लागलं हे नाही कळलं. हात लावून बसली होती जखमेला योगिता माझ्या. तुला चक्कर आली का प्रिती,असं तिने मला विचारलं? कोच पडली होती मला डोळ्याच्या तिथे.थोडक्यात डोळा वाचला होता माझा.अगदी २ मिलिमीटरने. रक्तबंबाळ झाले होते मी. स्कार्फ डोळ्याजवळ दाबून ठेवला होता योगिताने. खूप दुखायला लागलं होतं. असह्य झालं होतं मला आणि मी रडायला सुरवात केली.
सगळे म्हणाले हेल्मेट होतं म्हणून बरं झालं नाहीतर खूप मोठी इजा झाली असती. जीवावर बेतलं असतं. हेल्मेट नसते तर काय झाले असते?