माझे आवडते शिक्षक
माझे आवडते शिक्षक
मला सांगावसं वाटतं नूतन कुलकर्णी मॅडम बद्दल. शिक्षिका म्हणून ज्ञानगंगा शाळेत रुजू झाले तेव्हा असं वाटलं की बी.एड् मध्ये जे केले त्यापेक्षा प्रत्यक्षात शिकविणे थोडे वेगळे आहे. मुले कसा प्रतिसाद देतील, ते आपलं ऐकतील का, एकदम चाळीस-पन्नास मुलांचा अभ्यासाचा पस्तीस मिनिटे वेळ आपल्याला रंजक करता येईल का? या सार्या प्रश्नांचा जणू मनावर भडिमार होऊन दडपण आले होते. पण मॅडमनी मला जसे सांगितले तसे मी करत गेले. "अगं, सगळ्यांचीच ही स्थिती असते. अगदी माझी अशीच होती," असं त्यांनी सांगितल्यावर माझी अर्धी काळजी कमी झाली. त्यांची प्रत्येक शिक्षिकेबरोबर मुद्देसूद बोलण्याची सवय, हवं ते काम बरोबर गोड बोलून वेळेवर करून घेण्याची पद्धत, कितीही कामाचे दडपण असले तरी सतत हसतमुख राहण्याची कला, रागवलं थोडसं कोणी तरी पटकन जवळ घेऊन चला कामाला लागू म्हणून विषयात बदल करण्याची सवय खूप छान वाटायची आणि अगदी त्यांच्या ह्या गुणांचे मी अनुकरण केले. जेव्हा मी स्वतः प्रिन्सिपल झाले तेव्हा. त्यांच्या गुणांचा फायदा मला एखाद्याची क्षमता ओळखून त्या व्यक्तीला त्या पद्धतीने काम द्यायला झाला. त्यामुळे ती व्यक्ती पण खूष झाली तसेच उत्पादकता पण वाढली. आजही मी त्यांना फोन करून सांगते की मी जी काही आहे ती तुमच्या प्रभावामुळे.
