Priti Dabade

Romance Inspirational Others

3  

Priti Dabade

Romance Inspirational Others

जिद्द

जिद्द

4 mins
131



पावसाची रिपरिप चालूच होती. मस्त आल्याचा चहा करत काव्याने वाफाळलेला चहा कपात ओतला आणि ती खिडकीत येऊन बसली. पावसाकडे बघताबघता अचानक ती भूतकाळात हरवली.अगं,काव्या, भिजू नकोस असे म्हणत समीरने हळूच काव्याला स्वतःकडे छत्रीत ओढले. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. काव्या शाळेत होती तेव्हा. समीर फारसा शिकलेला नव्हता. वडिलांचा चपलांचा पारंपरिक व्यवसाय त्याने पुढे नेला.चांगलं कमवत होता. दोघांमध्ये जरी वयाचे थोडे जास्त अंतर होते तरी समजूतदारपणाला कोठे कमी नव्हती. तिच्या प्रेमात समीर अगदी वेडा झाला होता आणि तिला खुश ठेवण्याचा तो अतोनात प्रयत्न करायचा.

काव्याला पण समीर फार आवडायचा. तो किती छान बोलतो. तो लाल रंगांच्या शर्टात काय भारी दिसतो, असे ती तिच्या मैत्रिणींना वारंवार सांगायची. दिवस मजेत चालले होते. हे सगळं करत असताना काव्या अभ्यासात कधीच कमी पडत नव्हती. पण तिला सतत दडपण असायचं. त्यांची जात वेगळी होती. म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. जरी मुलगा चांगला असला तरी घरून लग्नाला परवानगी मिळेल,असे तिला वाटत नव्हते.

गाव तसं छोटं होतं. एव्हाना त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गावात होऊ लागली. बारावीच्या अभ्यासाची काव्याने कसून तयारी केली. रोज दोघे भेटत होते. भेटल्याशिवाय दोघांचा दिवस चांगला जात नव्हता.

बारावीचा निकाल लागला. ९०% गुण घेऊन काव्या बारावी झाली होती. आईच्या मागे लागून तिने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. शिकण्याची फार हौस होती काव्याला. आईने पण मुलीला साथ दिली.

काव्याची द्विधा मनस्थिती झाली होती. एकीकडे तिची शिक्षणाची हौस पूर्ण होणार होती आणि दुसरीकडे ती दुसऱ्या गावाला शिकायला जाणार असल्याने तिला समीर रोज भेटणार नव्हता. काव्या पेचात पडली होती.

समीरला कसे सांगावे हेच तिला कळत नव्हते. अश्रू अनावर होत होते. पण काव्याने शेवटी सांगितले त्याला.समीर म्हणाला,"अगं, वेडाबाई, एवढी चांगली बातमी आणि चेहऱ्यावर हसूच नाही. काय करावे आम्ही राणी सरकारला मनवण्यासाठी?" 

त्याचे हे लडिवाळ बोलणे ऐकत काव्या फक्त समीरच्या डोळ्यांत पहात होती. डोळे गच्च पाण्याने भरले होते त्याचे.लपवता आले नाहीत त्याला. ताटातूट होणार ह्या विचाराने थोडा थांबला तो बोलताना. पण काव्याला छान वाटावे म्हणून लपवण्याचा प्रयत्न करत होता.

एवढे चांगले गुण मिळवलेत. काय भेट हवी तुला काव्या? तिने मान हलवून काही नको असे सांगितले. फक्त तू...असे म्हणत काव्याने रडायला सुरुवात केली. तिची समजूत काढताना समीरला खूप अवघड गेलं.मी येईन ना तुला भेटायला, असे म्हणत त्याने काव्याचे डोळे पुसले. अगं बास, पूर आला बघ, असे म्हणत तिला हसवले.

घरी अजून काहीच माहित नव्हते. तिच्या जाण्याची सगळी तयारी झाली. काव्याने मनावर दगड ठेवत प्रवासाला सुरुवात केली.काव्या अभ्यासात चांगलीच रमली. समीर तिला पत्र लिहायचा.महिन्यातून एकदा भेटायचा तिला.आणि नेमकं जे व्हायला नको तेच झाले. काव्याची आईने काव्या आणि समीरला एकत्र पाहिले. काव्यावर खूप चिडली ती. तो मुलगा कोण होता ते तिला चांगलंच माहित होतं.तुमचं कधीपासून चालू आहे हे? अभ्यासाच्या नावाखाली हे सगळं सुरू आहे तर म्हणून दोघांवर खूप चिडली ती.

काव्या बारीक आवाजात म्हणाली, "आई, आम्ही लग्न करणार आहोत." काव्याच्या आईची तळपायची आग आता मस्तकात गेली.लग्न? काय बोलतेस? काही कळतं का तुला? असे म्हणत काव्याला तिच्या आईने ओढतच नेले.

तिचा प्रवेश रद्द करून तिला घरी आणले. घरातील वातावरण खूपच तापले होते. काव्याने आणि समीरने भेटू नये आणि एकमेकांचा नाद सोडावा म्हणून अतोनात प्रयत्न करण्यात आले. पण ते दोघे सगळ्यांना हुलकावणी देत भेटतच होते.

आता ही अशी नाही ऐकणार म्हणून काव्याच्या आईने काव्याला तिच्या बहिणीकडे पाठवून दिले. मुलगा चांगला असला तरी नातेवाईक काय म्हणतील म्हणून काव्याच्या आईने हे पाऊल उचलले. तिला सगळं कळत होतं. पण तिच्या हातात काहीच नव्हतं. 

सहा- सात महिन्यात काव्याचे लग्न ठरवण्यात आले. काव्याला समीरशिवाय दुसरे कोणी आवडत नव्हते. कोणता मुलगा तिच्याशी बोलायला लागला की तिला डोळ्यासमोर फक्त समीर दिसायचा. शेवटी घरच्यांसाठी तिने लग्नाला होकार दिला. दोघांनी सजवलेली सगळी स्वप्नं धुळीला मिळाली होती.

थोड्या दिवसांत काव्या सासरी रमली. आठवण आली तरी कोणाला सांगणार होती. आता सगळं संपलं होतं. कधीकधी एकटी असली की खूप रडायची काव्या.काव्याचा नवरा खूप चांगला आणि प्रेमळ होता. काव्याच्या सौंदर्याने मोहित होऊन तो सुद्धा खूप जपायचा तिला.काव्याने पण आपले हेच नशीब आहे, असे मानत नेटाने संसार सुरू केला.


काव्याला दोन मुलं झाली. त्यांच्या संगोपनात तिला समीरचा जवळजवळ विसर पडला. मुलांचा अभ्यास घेताना आपले शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत तिला सारखी बोचत रहायची. 

मुले जसजशी मोठी होत गेली, तसतसे ती आपले स्वप्न पण विसरत गेली. मुलांची बारावी झाल्यावर तिला आता करमेना.म्हणून तिने शिकण्याचा निर्णय घेतला. आपला विचार नवऱ्याला सांगितला. नवऱ्याने पण क्षणाचाही विलंब न करता तिला प्रोत्साहन दिले.पण इतक्या वर्षात सगळेच तर बदलले होते. तिचा लिखाणाचा सराव नव्हता. बरोबर आजूबाजूच्या लोकांचे टोमणे, आता ह्या वयात शिकून काय करायचे? डोकं थोडंच चालणार? 

काय करावं काव्याला कळत नव्हतं. पण तिचा निश्चय पक्का होता. परत सगळी बारावीची पुस्तके रात्रंदिवस जागून वाचून काढली. लिखाणाचा सराव केला. बी.एस्.सीला प्रवेश घेतला.सोपं तर काहीच नव्हतं. अभ्यास करायला लागली की दडपण यायचं. जमेल ना? नाहीतर सगळ्यांसमोर हसू व्हायचं.पण अनंत अडचणींचा सामना करत ती ७०% घेऊन बी.एस्.सी पास झाली.

काव्याच्या आईला फार गहिवरून आले. तिनेच काव्याच्या शिक्षणाला पूर्णविराम दिला होता. आनंदाअश्रूने डोळे भरले होते. काव्याने आईला मिठी मारली. पुढे काव्याने शिक्षण चालू ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर काव्याने नोकरी पण मिळवली.हे सगळं शक्य झालं ते काव्याच्या जिद्दीमुळे. तिने जगासमोर तिचा वेगळाच आदर्श ठेवला. शिक्षणाला वयाचे बंधन नाही.

वाऱ्याची झुळूक तिच्या अंगाला स्पर्श करून केली. कपातील चहा केव्हाच गार झाला होता. हळूच गालात हसून काव्या परत घरातील कामाला लागली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance