सार्थक
सार्थक


गणपतीचे दिवस होते. गौरीचे आगमन झाले. पण यंदा कोवीडमुळे अंकीताला सवाष्ण घालता आली नाही. तिच्या मनाला कुठेतरी रुखरुख लागली. काय करावे काहीच कळत नव्हते. बघता बघता गणेशोत्सवाची सांगता व्हायची वेळ आली. त्यादिवशी तिने छान मोदक केले होते. सहज तिचे लक्ष सोसायटीमध्ये काम करणाऱ्या कामगाराकडे गेले. मग तिच्या मनात एक विचार आला. आपण ह्यांना प्रसाद दिला तर?
तिने त्या कामगाराला हाक मारली. त्याला वाटलं काहीतरी काम आहे म्हणून बोलवलं असेल. तिने पटकन त्याच्या समोर मोदकाची प्लेट ठेवली. त्यानेही मोठया आवडीने खाल्ली आणि अंकीताला मोदक छान झाल्याची पावती सुद्धा दिली. अंकीताला खूप हायसे वाटले आणि मोदक करणे सार्थकी लागले असे वाटले. कोणाला तरी खाऊ घालण्याची तिची इच्छा सुद्धा पूर्ण झाली होती.