Jyoti gosavi

Thriller

3  

Jyoti gosavi

Thriller

पावसाळ्यातला तो एक दिवस

पावसाळ्यातला तो एक दिवस

4 mins
195


सकाळपासून धो धो पाऊस पडत होता.पण मुले मात्र एकदम खुश होती, कारण धो धो पाऊस पडला की शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळत असे, मुलांचे लक्ष शिकवण्याकडे नव्हते कारण शाळेमध्ये जेमतेम सात आठ शिक्षक आले होते.बाकीचे शिक्षक पावसामुळे आलेच नव्हते.मग दोन दोन इयत्ता एकत्र करून त्याच्यावरती एक एक शिक्षक नेमला.आणि ते शिक्षक पण टाईमपासच करत होते.

कुठे गाण्याच्या भेंड्या लाव, कुठे इंग्रजी स्पेलिंगाच्या भेंड्या लाव ,कुठे मुलांना एखादा पॅरेग्राफ घोकायला लाव ,असे चालू होते.


पावसाचा जोर वाढतच होता ,गावाबाहेर ओढ्याच्या पलीकडे शाळा, ओढ्याला हमखास पूर येई, त्यामुळे मुलांना एकटं सोडता येत नव्हतं .शिवाय त्या काळात काही मोबाईल वगैरे नव्हते, आणि शाळेकडे फोन देखील नव्हता. कारण तशी गरज पडायची नाही.


ओढ्याला पूर आला असं माहित झालं की,पालक आपोआपच ओढ्याच्या या काठाला येऊन उभे राहात, आणि आप आपली मुले त्या पुरातून बाहेर काढून घेऊन जात .

पण आज पावसाचा रंग काही वेगळाच होता ,तो काही थांबायचे नावच घेत नव्हता. त्यामुळे हेडमास्तर पण अजून अर्ध्या दिवसाची सुट्टी डिक्लेअर करत नव्हते. 


बरं! ही मुलं कशी सांभाळायची, आणि पुन्हा आपल्या पालकांच्या हाती व्यवस्थित कशी सुपूर्त करायची, हा प्रश्नच होता. 

बहुतेक मुलांकडे पावसाळ्याची व्यवस्था म्हणून, बारदानाची खोळ किंवा खताच्या प्लास्टिक पिशवीची खोळ डोक्यावरती असायची. 

उगाच एक दोन पोराकडे छत्र्या असायच्या, आणि शिक्षक लोकांकडे छत्री असायची. 

काही मुलांकडे तर काहीच नसायचे, पावसाचे एकंदरीत रौद्ररूप पाहून हेडमास्तरांना देखील चिंता पडली, 

आता काय करायचं?  मुलं शाळेतच सेफ होती बाहेर काढली असती तर संकटात

पडली असती .

पण गावाकडे निरोप तरी गेला पाहिजे होता..

दोन शिक्षक हिंमत करून बाहेर पडले, आणि ओढ्याच्या या काठाला उभे राहिले. पलीकडे गावकरी जमलेले होतेच, पण ओढा एवढा ,दुथडी भरून वाहत होता आणि एवढा खळखळाट होता की, इकडचे तिकडं, आणि तिकडचे इकडे काही ऐकू येत नव्हते. 

नुसता गढूळ तांबड्या लालसर रोरावत येणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू येत होता. 

त्यांच्या शाळेमध्ये नववीच्या वर्षाला गोरक्षनाथ नावाचा एक मुलगा होता, उंचापुरा आडदांड ,दोन-चार वर्ष नापास झाल्यामुळे चांगला अठरा वर्षाचा बाप्या होता. तो शिक्षकांबरोबर गेला होता, तो म्हणाला 


"सर मी पलीकडे जातो" मला चांगलं पोहायला येतं. पण शिक्षकांनी नाही म्हणून सांगितले. शेवटी शाळेमध्ये बॅटरीवर चालणारा भोंगा होता, तो पावसात आणला. त्याच्यावरती ओरडून सांगितले की, "मुलांना आज शाळेतून सोडणार नाही "एवढ्या मोठ्या पुरामध्ये त्यांचा जीव धोक्यात घालणार नाही. त्यापेक्षा तुम्ही गावातून 20/25 किलो तांदूळ, दोन किलो बेसन, आणि तेल मसाला काहीतरी, कसं पण पाठवा .आम्ही मुलांना येथे शिजवून खाऊ घालतो. जमले तर थोडासा सुका लाकूड फाटा देखील पाठवा. 

गावकरी पुन्हा गावात गेले प्रत्येकाच्या घरून किलो, अर्धा किलो, तांदूळ गोळा केले .दोन किलो बेसन पीठ वाण्याने फुकट दिले. किलोभर तेल, मसाला, सगळं काही खताच्या प्लास्टिकच्या बारदानात बांधलं. त्याच्यावर अजून दोन-चार पिशव्या चढवल्या, 

पण पलीकडे कस सोडायचं? 

मग त्या सामानाला एक मोठी रश्शी बांधली. तिला एक दगड बांधला, तो दगडपलीकडे ताकत लावून फेकला. तो इकडे मास्तरांनी पकडून धरला, इकडे दोर खेचल्या बरोबर ,पोतं हळूहळू पुढे सरकत होतं. पण ते मध्येच अडकलं, आणि पुराच्या पाण्याबरोबर थपडा खाऊ लागलं .

आता काय करायचं ?

गोऱ्या म्हणाला "मास्तर मी जातो, मी सामान घेऊन येतो "

मग त्याच रश्शीचे टोक गोऱ्याच्या कमरेला बांधले. मास्तरांनी ते ताणून धरले, तिकडे गावकऱ्यांनी रश्शी ताणून धरली, आणि सगळे श्वास रोखून पाहू लागले. गोऱ्या हळूहळू पावलं टाकत ओढ्याच्या मध्यभागी गेला ,पण त्याचे देखील पाय लटपटू लागले, तोल जाऊ लागला ,आणि एका क्षणी गोऱ्याचे दोन्ही पाय अधांतरी झाले, पण तो चांगला पोहणारा असल्यामुळे ,तो पाण्यातून तिरका तिरका पोहत गाठोड्यापर्यंत पोहोचला . त्याने गाठोड्याला हात घातला, त्याबरोबर दोन्ही काठावरून, 

शाब्बास! भलेबहादर !हुर्रे$$$ असे शब्द निघाले. आणि इकडचे चार-पाच शिक्षक, आणि नववी दहावीची मोठी मुले, यांनी गोऱ्याला गाठोड्या सकट या काठाला ओढून घेतला. 

त्यानंतर रात्री शाळेमध्येच पिठलं भात शिजवला. शाळेकडे दरवर्षी स्काऊट साठी कुठेतरी जंगलात, माळारानावर एक दिवस मुलांना घेऊन जात असत, त्यामुळे मोठी मोठी पातेली सुके सरपण सर्वकाही एका खोलीमध्ये होते. 

शिक्षकांनी ते बाहेर काढले शाळेच्याच एका खोलीमध्ये चुली मांडल्या. 

एका पातेल्यात भात शिजवला, एका पातेल्यात बेसन केले, आणि मुलांनी दुपारी आणलेल्या डब्यामध्ये, गरमागरम पिठलं भात वाढला. 

आता बाहेरचा वाढलेला पाऊस, आणि नदीचा पूर सगळे जण विसरून गेले. 


आत मध्ये दे धमाल सुरू झाली. कोणी गाणे म्हटले, कोणी नाच केला, नंतर चार पाच गटात विभागणी करून अगदी छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या, 

ज्यात एक रुमाल मध्ये टाकून धावत जाऊन कोणीतरी आधी आणायचा, असे छोटे छोटे खेळ वर्गातल्या वर्गात घेतले. 

दोन तीन च्या नंतर मुले पेंगायला लागली आणि तिथेच आपापल्या दप्तरांवर डोके टेकून झोपी गेली. 

दुसऱ्या दिवशी कालच्या वातावरणाचा मागमूस देखील नव्हता. 

छान सूर्यप्रकाश पडला आणि शाळा सकाळी नऊ वाजता सुटली. 

*********************

त्यानंतर सरकारकडे पाठपुरावा करून, आता त्या ओढ्यावरती पूल बांधलेला आहे .

परंतु पुरातून क्रॉस करून येण्याची "मजा " इकडे गाववाले, तिकडे शाळा वाले, मधी एक रस्सी बांधणार आणि त्याला धरून धरून सगळी शाळा क्रॉस करून पलीकडे जाणार ,ते दिवस खूप भारी वाटत होते. 

शिवाय आता शाळेच्या रस्त्याला आता एसटी देखील जाते. 

त्यामुळे चालत जाण्याचा प्रश्न येत नाही. 


असो तो दिवस मात्र आयुष्यात कधी विसरता येणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller