STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

3  

Jayshri Dani

Classics

पाऊस हवासा पाऊस नकोसा

पाऊस हवासा पाऊस नकोसा

3 mins
127

     मी लपून आडोशाला उभे होते . वडील काळ्या कोटांच्या वकिलांच्या गर्दीत . वर नभही काळेच भरून आलेले . केव्हा कोसळेल याचा नेम नाही . तेव्हढ्यात वडिलांच्या डोळ्यातून अश्रुचा एक टपोरा थेंब खाली टेबलवर ठेवलेल्या कागदावर पडला. आजूबाजूचे वकील , आमचे घर विकत घेणारे कुटुंब , साक्षीदार मूक , स्तिमितच झाले . 


     त्यांनी धिराचा , आपुलकीचा हात वडिलांच्या खांद्यावर ठेवला . गलबललेल्या मनाने डोळ्यातले आभाळ घट्ट पुसून वडिलांनी विक्रीपत्रावर सही केली . आणि त्यांच्या डोळ्यात धावून आलेला पाऊस सरसर माझ्या गालावर वाहू लागला . आज आमचे घर विकल्या गेले होते .


      खरे तर पावसाळ्यात इथे तिथे काही ना काही सतत रुजत असते .पुढे तेच फळा - फुलांच्या रूपात फुलून येते . पण आमच्या नशिबाचा फेरा उलटा होता . जिथे आम्ही जन्मलो , वाढलो , रुजलो तिथे आमचे आम्हालाच उपडून काढून आज स्थलांतर करावे लागत होते . स्थलांतर नुसते शरीराचेच नसतेच . त्यासोबतच बदलत असतात गल्ली , गाव , माणसे , शेत - शिवार ,ओळख - पाळख , जुनी संस्कृती आणि बरेच काही .  

 

    नवीन जागेत रुजणे , नवीन जागेला आपलेसे करणेही तितकेच कठीण असते . तिथल्या शेजारी- पाजारी , नव्या संस्कृतीने आपल्याला स्वीकारले नाहीतर एकटे पडण्याची शक्यता अधिक असते . शिवाय नव्या जागेत , नव्या शहरात जाताना जुन्या आठवणींचा पुनरउच्चारही जपूनच करावा लागतो . कारण आपल्या आठवणींचा लळा केवळ आपल्यालाच असतो . त्या आठवणींना छातीत पक्के दफन करून नवीन जागी नवीन होऊन वावरावे लागते .


      आमचे गावातले जुने ऐसपैस घर विकल्यानंतर आम्ही हा जीवघेणा अनुभव घेतला . उघड कोणी दाखवत नसले तरी गाव सोडताना आमच्यातील प्रत्येकजण अनेक आठवणींनी मनात ढसाढसा रडत होता . आणि त्या आसवांचे प्रतीक म्हणूनच की काय पण त्या दिवशी , त्या क्षणी प्रचंड ढगफुटी झाल्यासारखा धो - धो पाऊस कोसळला . पूर्ण रस्ताभर चिंब भिजवत राहिला . गाडीतून आत येणारे पावसाचे तुषार अंग ओले करत होते . हृदय हुडहुडी भरलेल्या पाखरासारखे कापत होते . 


      ते घर विकताना आमच्यापेक्षा आमच्या वडिलांना किती दुःख झाले असेल . ते तर आमच्याही आधी त्या वास्तूत वास्तव्यास होते . घराच्या प्रत्येक भिंतीला , प्रत्येक खिडकीला , मागच्या - पुढच्या दरवाजाला आमचे सुख - दुःख माहिती होते . भर पावसात , तीव्र उन्हात , कडाक्याच्या थंडीत घराने आई होऊन सुरक्षित निवारा दिला होता .

त्या घराचे ऋण अननुभूत होते . कधीही न फेडण्यासारखे आहे हे पावसाला ठाऊक होते .


      त्या घरात पुढे भाऊबंदकी माजली होती . लहान - सहान कारणांवरून कटकटी व्हायला लागल्या होत्या . मनाची - घराचीही शांती पार ढळली होती . ज्या गावाने घडवले ,मोठे केले त्या गावात काही राम नाही , नोकरी - व्यवसायाची विशेष संधी नाही म्हणून जो तो घरापासून लांब पळू लागला होता . वडील गंभीर झाले होते , वास्तू भेदरून गेली होती . पिल्लांना पंख फुटल्यावर पाखरांना दूर दूर गगनापार झेप घ्यावी , आकांक्षांच्या नव्या कक्षा स्पर्शाव्यात असे वाटावे हे शंभर टक्के कबूल आहे परंतु ज्या घराने जपले , वाढवले त्या घराला नावे ठेवीत ? त्या वास्तूत काहीच सत्व नाही असे सांगत ? वास्तूचा जीव कळवळत होता . वास्तूला भावना होत्या पण वाचा नव्हती , दृष्टी होती पण प्रकट अभिव्यक्ती नव्हती . वास्तू निमूटपणे सगळे आरोप झेलत गेली . आणि एकदिवस घरातील काही लोकांच्या अट्टाहासापायी तिनेही घरच्यांना ओले होत निरोप दिला . काळीज पिळवटणारे ते अबोल रुदन , तो पाऊस सदैव स्मरणात राहिला .


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics