Pandit Warade

Comedy Horror

5.0  

Pandit Warade

Comedy Horror

पाटलाचा वाडा

पाटलाचा वाडा

8 mins
4.2K


.    "संध्या, अगं तुला किती वेळा सांगितलं, इथे पाणी टंचाई आहे. बेसिन मधली तोटी बंद करत जा म्हणून. रात्रभर सुरूच ठेवलीस. बघ किती पाणी वाया गेलंय." श्याम मास्तर सकाळी उठल्या उठल्या बाथरूमला जातांना किचनमध्ये पाण्याचा आवाज ऐकून ओरडले आणि तोटी बंद करायला गेले. 

    "अहो, मी तर आठवणीने तोटी बंद केली होती. काय होतंय काही कळेना, मी रोज बंद करते पण रात्री कुणीतरी तोटी सुरू करतंय." संध्या बोलली. 

      "अगं, बघ ना, मी आता माझ्या हाताने बंद केलीय. मी काय खोटं बोलतो का?" मास्तर तक्रारीच्या सुरात बोलले. 

      लटपटे गुरुजी या दोघांचे बोलणे ऐकून मध्ये पडले, बोलले..

     "जाऊ द्या हो सर, विसरल्या असतील वहिनी. रात्री उशिरा पर्यंत आपले जेवण सुरू होते."

      "नाही हो भावोजी, मी बिलकुल विसरले नाही. नक्कीच येथे काही तरी भुताटकी असली पाहिजे. गेले पंधरा दिवस झाले इथे येऊन, असंच होतंय. मी आठवणीने तोटी बंद करते आणि रात्री कुणीतरी तो पुन्हा सुरू करतंय." संध्या.

     हे ऐकताच लटपटे गुरुजींना काहीतरी आठवले. रात्री बाथरूमला जातांना जिन्यावरून पावलांचा आवाज आल्याचा भास झाला होता. 'तो खरा असेल का?' त्यांच्या मनात आले. 

    शाम मास्तरांनी पंधरा दिवसांपूर्वीच हे घर घेतले होते. गावाच्या थोडेसे बाहेर, नदीच्या काठावर, बाजूला मोठे पिंपळाचे,चिंचेचे झाड, खिडकीतून गॅलरीतून दिसणारे निसर्ग दृश्य, हे सारे बघून त्यांना हे घर खूप आवडले होते. तिथे कुणी राहत नसले तरी, पाला पाचोळा, कचरा असला तरी सौंदर्य दृष्टीच्या मास्तरांचे मन बसले होते. पाटलाच्या त्या वाड्याच्या वारसदाराने जराही आढेवेढे न घेता मास्तरने सांगितल्या किमतीत ते घर देऊन टाकले होते. घर घेतल्यापासून मात्र मास्तर पत्नी संध्याला या घरात फारसे प्रसन्न वाटत नव्हते. रात्री चित्रविचित्र आवाज यायचेत, पण नवीन ठिकाणी आल्यामुळे तसे होत असेल असे समजून ती शांत बसली होती. मात्र या पाण्याच्या तोटीने तिचे मन अज्ञात भीतीने बावरले होते. मास्तर मात्र असं काही नसतं. या विचाराने निश्चिन्त होते. 

     रात्री नव्या घराची पार्टी म्हणून चार पाच शिक्षक मित्रांना जेवायला बोलावले होते. उशिरापर्यंत जेवणाचा कार्यक्रम चालला होता. जेवण झाल्यावर सर्व शिक्षक मित्र निघून गेले, लटपटे गुरुजींना जाण्यासाठी साधन नसल्यामुळे ते इथेच थांबले होते. सर्वांचे जेवण झाल्यावर संध्याने भांडी धुवून आवरून घेतले आणि झोपायला गेली. बेसिन मधील तोटी आठवणीने बंद केली होती. तरी ती सकाळी सुरू कशी? तिलाही कळत नव्हते.

    "मला तरी वाटतं, इथं काहीतरी भुताटकीचा प्रकार असावा. म्हणून तर त्यांनी आपण सांगितल्या किमतीत घर दिले असावे. तिथे कुणी रहातही नव्हते." संध्याने आपल्या मनातला संशय बोलून दाखवला.

    "अरेच्च्या! वेडी कुठली. असं काहीच नसतं. भूत बित काही नसतं, या साऱ्या आपल्या मनाच्या कल्पना असतात." अजूनही मास्तरांच्या मनात संशय नव्हता. 

    त्यांची चर्चा सुरू असतांनाच एक वृद्ध गृहस्थ त्या वाड्या समोरून जात होते, त्यांची चर्चा ऐकून थांबले. "काय मास्तर, बरं हाय का?" त्यांनी विचारले.

    "या आबा, चहा घेऊ थोडा थोडा. अगं संध्या चहा टाक सर्वांसाठी."मास्तरांनी आदेश दिला. आणि आबांसाठी बसायला चटई टाकली. आबा चटईवर बसले.

    "मास्तर, छान सजवलंय घर." घराचा अंदाज घेत आबा बोलले. 

    संध्याने सर्वांसाठी चहा आणला. आबांच्या हातात कप ठेवतांना मनातली शंका बोलून दाखवली. 

     "आबा, हे घर एवढे सुंदर असूनही इथे कुणी का बरं रहात नव्हतं?"

     "बाई, त्याची लई लंबी कहाणी हाय." इति आबा.

     "आबा, वेळ असेल तर सांगा ना काय घडलं या वाड्याच्या बाबतीत. हे गाव, हा वाडा, मला सारं काही ऐकायचं आहे." संध्या.

    "बाई, आज म्या जरा घाईत हाय. एक दोन दिसानं सांगतलं तं चालंन का?"

    "चालल ना आबा, तुम्ही तुमच्या सवडीनं या. काही घाई नाही आम्हाला." मास्तरलाही याची चर्चा नकोच होती. त्यांनी लगेच स्वयंपाकाची तयारी करायला संध्याला सांगितलं. 

     संध्या स्वयंपाक घरात जाताच लटपटे सरांनी पुन्हा तो विषय छेडलाच. 

    "शाम सर, तुम्हाला नाही वाटत का की वहिनी म्हणतात तसं काही असेल म्हणून?" लटपटे. 

    "अहो लटपटे, तुम्ही पण? तुम्हालाही वाटतं असं? अहो, आपण शिक्षकांनी तर समाजातली अंधश्रद्धा दूर करायचं काम करायला पाहिजे. या असल्या खुळचट कल्पना काढून टाकायला पाहिजे." मास्तर.

    "पण मी काय म्हणतो, असं काही नाहीच असं आपण ठामपणे कसं काय म्हणू शकतो? काही लोकं त्यांना आलेले अनुभव सांगतात ते खोटे असतील असं तुम्हाला वाटतं का? अहो रात्री मलासुद्धा कुणी तरी जिन्यावरून चालत गेल्याचा भास झाला." लटपटे सरांनी आपली शंका मांडली.

     "लटपटे, एखादी गोष्ट मनात ठसली ना की सर्वत्र तसंच दिसायला लागतं बघा. जो पर्यंत कुठल्याही स्थळाबद्दल काही ऐकलं नसेल तोपर्यंत कुठलीही भीती वाटत नाही. मात्र एखाद्या जागेबद्दल काही ऐकायला मिळाले की त्या जागेवर गेल्यावर हमखास जे काही ऐकलं त्याची आठवण येते आणि माणूस घाबरतं. मानवी मन फारच विचित्र असतं. मी यापूर्वी ज्या शाळेत होतो तिथला एक किस्सा सांगतो, म्हणजे समजेल तुम्हाला भुताचा जन्म कसा होतो ते?" मास्तरांनी सांगितलेला किस्सा असा,...

    शाम मास्तर यापूर्वी ज्या शाळेवर मुख्याध्यापक होते ती शाळा अशीच गावाच्या बाहेर होती दाट झाडीच्या मध्ये एक सुंदर अशी शाळेची इमारत होती, दोन ओळीत असलेल्या पाच पाच खोल्या. एका बाजूला एक मुख्याध्यापकांची खोली तर समोरच्या बाजूला सर्व शिक्षकांसाठी एक खोली. दुसऱ्या टोकाला कार्यालय तर त्याच्या समोरच्या रांगेत शेवटी ग्रंथालय अशी सुबक रचना असलेल्या इमारतीची मधली बोळ मात्र फक्त दहा फुटांचीच होती. वरती स्लॅब मात्र संपूर्ण होता म्हणजे मधल्या बोळी वरही स्लॅब होता. पूर्व पश्चिम असलेल्या त्या बोळीत एकदा हवा घुसली की एखाद्या रहस्य पटातल्या सारखा सूं$$$सूं असा आवाज विशेषतः रात्रीच्या वेळी ऐकू यायचा. रात्रीच्या वेळी त्या शाळेजवळ सहसा कुणी फिरकायचेच नाही. अशातच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत नेमके काय झाले कुणास ठाऊक, शाळेच्या एका खोलीतून खट खट असा आवाज ऐकू यायला लागला. एकाने ऐकला, दुसऱ्याने ऐकला, असे करत साऱ्या गावाला कळले. शाळा सुरू झाल्यावर सर्व शिक्षकांनाही ते कळलं. सर्वांनी ती खोली बंद ठेवायचं ठरवलं पण शाम मास्तर म्हणाले.....

    "सर, आपण ती खोली उघडून तर बघू. नेमके काय आहे?. एखादे वेळेस काहीच नसायचं."

    " सर, गावकऱ्यांच्या सांगण्यावर थोडेच आपण ती खोली बंद ठेवलीय. तुम्ही येण्या अगोदर आम्ही सर्वांनी त्या खोलीतून येत असलेला आवाज स्वतःच्या कानांनी ऐकला. एवढंच नाही तर खोली उघडूनही बघीतली. खोली उघडली की आवाज बंद होतो, बंद केली की आवाज सुरू होतो. हा आमचा सर्वांचा अनुभव आहे." सर्व शिक्षकांचे मत. 

     "तरी पण सर, आपण जे बघतो ते सारे खरंच तसं असतंच असं नाही. आपण मुलांना शिकवतो, झुक झुक गाडी. गाडी सुरू झाल्यावर आतल्या लोकांना बाहेरची झाडं पळतांना दिसतात, तेव्हा झाडं थोडेच पळतात? आपण रात्रीच्या वेळेस पायी चालत असतांना चंद्रही आपल्या सोबत चालतांना दिसतो, तसंच हा ही भास असू शकत नाही का?" शाम मास्तरांचा युक्तिवादही तसा बरोबरच होता. 

      शाम मास्तरांनी रविवारचा दिवस पाहून ट्राय करायचं ठरवलं. आणि सर्व शिक्षकांना सोबत घेऊन शाळेत गेले, त्या खोलीजवळ जाऊन ती खोली उघडली. आवाज बंद झाला. बंद केली पुन्हा आवाज सुरू झाला. शाम मास्तरांनी दोन तीन वेळेस तसे करून बघितले. बारकाईने खोलीचे निरीक्षण केले. आणि त्यांच्या लक्षात आले, समोरच्या खिडकीची एक कांच थोडीशी उघडी होती, तिच्यातून हवा आत यायची आणि दार बंद असले तर परत त्या काचेवर जाऊन आदळायची, काच ढिली असल्यामुळे वाजायची. दार उघड केले तर हवा दारावाटे निघून जायची. त्यामुळे आवाज यायचा नाही. सर्वांचा त्या खोली संदर्भातला गैरसमज दूर झाला.

     लटपटे मास्तरांनी हे सारे ऐकले पण त्यांचे मन काही मानायला तयार नव्हते. संध्यालाही काही पटत नव्हते. 

    जेवण तयार झाल्यावर, साऱ्यांनी सोबत जेवण केलं. लटपटे सर निघून गेले.

    त्यांनतर एक दिवस ठरल्या प्रमाणे आबा आले. चहापान झाल्यावर सांगायला लागले,.....

    "मास्तर, तुमचा भुताखेतावर इस्वास हाय का तुमचा?" आबांनी मास्तरांना विचारलं.

    "छे! छे! भुतंबीतं काही नसतात आबा. हा सगळा आपल्या मनाचा खेळ असतो." मास्तरांनी खुलासा केला.

    "मास्तर, खरं खोटं देव नारायणालाच म्हाइत, पर जे काय या कानानं आयकलं, जे पाह्यलं, ते सांगतु. पटलं तर घ्या न्हायतर द्या सोडून." 

   "आबा, कुणी ऐको अगर नाही पण मला ऐकायचं आहे. तुम्ही सांगा सगळं." संध्यानं आग्रह केला.

    "बाई, या गावचं पोलीस पाटील लई मोठ्ठी आसामी. धा बारा बैलं, दोनशे एकर शेत, सांभाळायला चार सालदार, त्येयच्या ऱ्हाण्याची येवस्था समदी शेतातच केल्याली. हीर, तिच्यावर इंजिन. हिंडाया फटफटी. असा लई थाट व्हता. 

    ह्या पाटलाची लक्षुमी, आगदी खरुखरची लक्षुमी व्हती. गड्यांला, त्याह्यच्या लेकरायला लई जीव लावायची. मातर पाटलाच्या करणीनं बीच्यारी लवकरच गेली देवाघरी."

    "असं काय झालं की ज्याच्यामुळे पाटलीन बाईंना मृत्यू आला?" दोघांनीही एकदाच विचारलं.

     "त्याचं काय झालं, पाटलाचं एका बाईवर पिरेम बसलं. पाटलीन बाईनं लई इरोध केला पर पाटलानं काय आयकलं न्हाई. त्या बाईसाठी पाटलानं ह्यो वाडा बांधला आन दोघबी इथं ऱ्हायाला लागले. पाटलीन बाईनं त्या बाईला समजून पाह्यलं पर काय फरक पल्डा न्हाई. उल्टं ती बया हिच्यासंग लई भांडली. बाईच्या जीवाला लागलं, घरी येऊन पाटलीन बाईनं आथरूनच धरलं. आन एक दिस साऱ्यांला सोडून गेली. त्येच्या बाद पाटील घरी मुलाकडं बी पाह्यना झाला. मुलगा त्येच्या बायकू बरुबर ऱ्हाऊ लागला. पाटील तिच्यासंग वाड्यावर ऱ्हायला लागला. पर एक दिस काय झालं काय म्हाइत, अचानक ती बया वाड्याच्या गच्चीवर बसल्याली आसतांना एकाएकी नदीत पल्डी आन म्येल्यी. कोण्ही म्हंन्तं पाटलीन बाईनंच ढकललं. तिच्यी तिलाच म्हाइत. त्येच्या बाद एक दिस पाटीलबी नदीत उडी घेऊन म्येला. तवापसून या वाड्याकडं कोण्ही बी फिरकत न्हाई. लई कस्ये तरीच आवाज आयकायला येत हुतं इथं. आता तुम्ही ऱ्हायाला आल्यापस्नं कायबी आयकू येत न्हाई. वाडा बी लई झ्याक दिसाया लागला बगा." आबानं सांगीतल्यावर बराच वेळ दोघेही स्तब्ध झाले होते. बऱ्याच वेळेनं संध्याने चहा केला सर्वांनी चहा घेतला आणि आबा निघून गेले. 

    "बघा मी म्हणत होते ना, इथं काही तरी गडबड आहे म्हणून. नको बाई इथं राहायलाच नको. विकून टाका हा वाडा आपण भाड्याच्या घरातही राहू शकतो." संध्या मास्तरांना म्हटली. 

     "काही गरज नाही. मला नाही वाटत यात काही खरं असंल म्हणून. या साऱ्या सांगीवांगीच्या गोष्टी असाव्यात. आज मी बघतोच यात काय खरं खोटं आहे ते." शाम मास्तर काही त्यांचा हेका सोडायला तयार नव्हते. 

    "अहो, त्या गोष्टी सांगी वांगीच्या आहेत असं थोडावेळ खरं मानलं तरी आपल्या घरात जे घडतंय ते काय आहे?" संध्याने प्रश्न केला.

    "तू काही काळजी करू नकोस. मी आज रात्री या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावतो बघ. तू मात्र रात्री न चुकता तोटी बंद कर. मग बघतो परत कशी सुरू होते ती?" मास्तरांनी तिला आश्वस्त केले.

    मास्तरांनी त्या दिवशी शाळेतून येतांनाच चार cctv कॅमेरे आणून गेट मध्ये, जिन्यात, किचन आणि बेसिन जवळ बसवून घेतले. रात्री सर्वांचे जेवण झाल्या वर दोघेही निवांत झोपले. संध्याला काही शांत झोप लागत नव्हती ती अधून मधून दचकून उठत होती. एकदा तिला कसला तरी आवाज आला म्हणून तिने मास्तरला उठवायचा प्रयत्न केला परंतु मास्तर उठले तर नाहीच, तिलाही अंगावर पांघरून घेऊन झोपायला लावले. ती घाबरून तशीच पांघरून ओढून झोपली. सकाळी तोटी पुन्हा सुरू असलेली दिसली.

    सकाळी मास्तरने सारे cctv फुटेज बघायला घेतले. फुटेज पाहिले अन् मास्तर खो खो हसत सुटले. संध्याला काही कळेना, मास्तरला नेमके काय झाले? ती बावरून मास्तरां कडे पाहू लागली. मास्तरांनी संध्याला जवळ बोलावले आणि ते फुटेज दाखवले..

    'साधारण अर्धीरात्र झाली असेल, फुटेजमध्ये रात्रीच्या एक वाजेची नोंद होती, एक घुस दरवाजातून आत आली. हळूच किचन मध्ये घुसली. त्या ठिकाणी बेसिनमध्ये ठेवलेल्या भांड्यांचे खरकटे हळूच चाटले. मग हळूच तोटीला तोंड लावले अन् जोर लावून सुरू केले. पाणी प्यायली अन् आल्या पावली परत गेली. तोटी मात्र तशीच सुरू होती.'

    "बघ मी म्हणत होतो ना.  काही घाबरण्या सारखे नाही म्हणून. अगं असंच काही तरी होतं, पण माणसं उगाच काहीतरी एकाचे दोन सांगत सुटतात अन् नसलेल्या भुताचा जन्म होतो." मास्तर सांगत होते अन् संध्या ऐकत होती. तिच्या मनातला संशय आता दूर झाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy