Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

नवरात्रोत्सव स्पर्धेसाठी श्रे

नवरात्रोत्सव स्पर्धेसाठी श्रे

8 mins
126


रंग सफेद पांढरा :-श्वेतांबरा


  आज श्वेतांबरा पांढरी साडी नेसून अधिकच सुंदर व सोज्वळ दिसत होती.नावाप्रमाणेच ती शांत सुस्वभावी व निर्मळ मनाची होती.आज अश्विन नवरात्र देवीची घटस्थापना म्हणून ती झपाझप पावले टाकीत घटाचे साहित्य घेण्यासाठी घरातलं सारं काम आवरुन भर दुपारीच उन्हातून निघालेली होती.आक्टोबर हिट चांगलीच वाढली होती.निघतांना तिनं सोबत गार पाण्याची बाटली जवळ ठेवली होती.रिक्षातून उतरून तिनं तिला लागण-या सामानाची यादी वाचून आपली खरेदी सुरू करणार तेवढ्यात तिचं लक्ष एका कोपऱ्यात बसलेल्या गरीब आजीकडे गेले. गर्दीमुळे व जागेच्या कमतरतेमुळे भर उन्हात त्या वयस्कर आजीला सामान विकायची वेळ आलेली होती.तिला इतरांसारखे गि-हाईक पण नव्हतं सर्व जिथे गार सावली तिथंच साज सामान घेत होते.

  ते पाहून श्वेतांबरा त्या आजीकडे गेली तिनं त्यांच्याकडे उपलब्ध तिला हवं असलेलं सर्व साहित्य खरेदी केलं. त्यांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम त्यांना दिली. आजीची विचारपूस केल्यावर तिला समजलं की त्यांच्या खाष्ट सुनेने या वयात त्यांना उपाशीपोटी हे काम करायला भाग पाडलेलं. श्वेतांबरानं हे ऐकलं आणि तडक जाऊन जवळच्या रेस्टॉरंट मधून आजींसाठी मिसळपाव खरेदी करुन खायला दिला.अन् सोबतचं गार पाणी पण पाजलं.आजींनी तिला भरभरून आशीर्वाद दिला.

 आज जणू काही देवीनंच आपल्याला आशीर्वाद दिलाय असा क्षणभर भास तिला झाला. तिही समाधानाने आल्या पावली घराकडे परतली.


रंग लाल :- वज्रेश्वरी


    लाल रंगाची जरीकाठाची साडी नेसून वज्रेश्वरी आज देवी चामुंडामातेच्या दर्शनासाठी निघाली.आज देवीची दुसरी माळ संध्याकाळची घरच्या घटाची आरती करूनच ती मंदीरात जायला निघाली दर्शनासाठी खुप रांगा असल्यानं तिथून निघायला खुप अवधी लागला.चामुंडा मातेला लाल रंगाची रत्नजडीत 

नऊवारीत पाहून तिला आपल्यावर काहीतरी शक्ती संचय ती करीत असल्याचे जाणवताच ती निर्भयपणे बाहेर पडली.  

    सोबतीला कुणी नव्हतं.पण धीट व करारी स्वभावाच्या वज्रेश्वरीला तशी भीती माहितच नव्हती.रस्ता निर्मनुष्य असला तरी घरापासून मंदीरात चालत जायला अवघा अर्धा तास लागे. एका सीटासाठी जायला एकही रिक्षावाला तयार होईना.शेवटी तिनं घरी चालतच जायचा निर्णय घेतला.काही अंतर चालून गेल्यावर तिला तिच्या मागोमाग काही अंतरावर पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला.त्यांच्या गलिच्छ कमेंटवरुन ते तिघंही वासनांध पूर्णत: नशेत असल्याचं तिच्या लक्षात आलं.गावाकडचा रस्ता त्यात अंधूक प्रकाश त्यामुळे एकाकी स्री पाहून ते तिचा हळूहळू वेध घेत होते.तिला पुढच्या धोक्याची जाणीव झाली पण ती मात्र खंबीरपणे झपाझप पावले टाकत राहिली.तसा त्यांनीही वेग वाढवला आता आपली धडगत नाही असं लक्षात येताच तिचं लक्ष रस्त्यावर पडलेल्या मोठ्या लोखंडी रॉड कडे गेले.क्षणार्धात जाऊन तिनं तो हातात घेतला आणि पुन्हा आपला चालण्याचा वेग वाढवून अंधारात एका रस्त्याला लागून असलेल्या भल्यामोठ्या वृक्षाच्या मागे जाऊन लपली.मागून चालणा-या बेवड्यांच्या हे लक्षात आले नसल्याने ते बेसावधपणे तिचा पाठलाग करतच होते.तिनं शिताफीने ती सळई एकाचवेळी त्वेषाने तिघांच्या डोक्यांत मारली अन् तिघांना काही कळायच्या आत चांगलाच चोप दिला.

  मागून येणा-या काही दुचाकीस्वारांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्या मदतीने तिने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.अशाप्रकारे त्या नराधमांना शासन करून आज तिनं तिचं नाव ख-या अर्थाने सार्थ केलं होतं.तिच्यातली चामुंडा आज तिनं दाखवून दिली होती.


रंग निळा रायल ब्लू :- निलिमा


  आज निलिमा खुप खुश होती. रायल ब्लू रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं होतं.नावाप्रमाणेच उत्साहानं ती ओतप्रोत होती. 

  घरातल्या वयस्कर सासू सास-यांचे खाणंपिणं करुन पतीला वेळेत टिफीन देऊन तयार करून आपल्या दोन्ही जुळ्या मुलींचा ती व्यवस्थित सांभाळ करी.आज देवीची तिसरी माळ. घराजवळच परिसरातील भुवनेश्वरी मंदिरात दोन्ही जुळ्या मुलींना घेऊन तिला नवरात्रीच्या गरबा स्पर्धेसाठी जावे लागणार होते म्हणून ती तेवढ्याच चापल्याने आपली नित्याची आवराआवर करत होती. सारं काही आवरुन झाल्यावर सासूसास-यांना लागणा-या औषधी व गोळ्या देऊन तिनं त्यांच अंथरुण पांघरुण घातलं. दोन्ही साजि-या गोजिरवाण्या जुळ्या मुलींना सुंदर सजवून तिनं तितक्याच वेगाने जाऊन जिंकून येणारच या ताकदीनं स्पर्धेसाठी मंचावर उभे केले.देवी भुवनेश्वरीची निळ्या रंगाची भरजरी नक्षीदार साडी तिला आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण करतेय याची तिला अनुभूती झाली.आज तिच्यातली एक वेगळीच चुणूक पाहून तिचे सासू सासरेही मनोमन सुखावले होते खरे!


रंग पिवळा:- आनंदी


    आनंदी नावाप्रमाणेच खुप आनंदी समाधानी स्री! लग्नाला सहा वर्षे झाली तरी मुलबाळ होत नव्हते म्हणून सासू सासरे व नवरा खुप घालून पाडून बोलत असत. आसपासच्या स्त्रिया तिला आता वांझ म्हणून कुठल्याही ओटीभरणाच्या कार्यक्रमाला तिला बोलावणं मुद्दाम टाळत.तिला आता ह्याची सवय झाली होती.पण तिचा आशावादी व आनंदी स्वभावात बदल होत नव्हता. 

 आज नवरात्रातील देवीची चौथी माळ म्हणून पिवळ्या रंगाची पैठणी नेसून आनंदी संतोषीमाता मंदिरात देवीदर्शनासाठी गेली.खुप वेळानं तिला प्रवेश मिळाला. तिनं पिवळ्या खण नारळाचं मातेची ओटी भरली हातातलं पिवळं कन्हेरीचं फुल मातेला वाहून साश्रू नयनांनी मातेला आपल्या ओटीत एखादं मूल घाल म्हणून प्रार्थना केली.पितांबरातील संतोषी मातेच्या मुर्तीवरील उजव्या बाजूचं एक झेंडूचं फुल तिच्या समोर पडलं.जणू काही मातेनं तिला उजवा कौलच दिला असा क्षणभर भासच तिला झाला. ती तेवढ्याच नव्या उमेदीने मंदिरातून बाहेर पडून घराकडे परतली. 

        रस्त्याच्या कडेला तिला कसलातरी आवाज आला म्हणून पाहिलं तर काही कुत्री दुपट्याजवळ घुटमळत असतांना तिनं पाहिलं अन् तिला धक्काच बसला त्यात तिला नवजात शिशू असल्याचं दिसताच ती त्वरेने तेथे गेली व आरडाओरडा करुन भटक्या कुत्र्यांना पिटाळून लावले.सुदैवाने रस्त्यावर कुणीही नव्हते.ती तडक बाळाला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेली. त्वरीत उपचार मिळाल्याने बाळ वाचलं होतं.आता तिनं त्या बालकाला देवीचा प्रसाद म्हणून आपलं बाळ मानून ममतेने सांभाळ करण्याचा निर्धार पक्का केला.आज तिच्यातलं मातृत्व तिनं जागृत केले होते.


रंग हिरवा:- अवनी


   अवनी आज हिरवा शालू नेसून जणू काही पृथ्वीमातेसमान दिसत होती. तिचं धारदार नाक सावळावर्ण व शरीर सौष्ठव अधिकच खुलून दिसत होते.   आज देवीची पाचवी माळ म्हणून ती अन्नपुर्णा मातेच्या दर्शनासाठी निघाली होती.

  सांपत्तिक स्थिती सर्व साधारण असुनही ती फार मोठ्या मनाची होती.घरातील सदस्य व घरी येणा-या प्रत्येक अतीथीचं आदरातिथ्य ती यथोचित सन्मानपुर्वक करत असे. स्वयंपाकात ती सुगरण होतीच जणूकाही साक्षात अन्नपुर्णेचा वरदहस्तच लाभलेला.आज ती तिच्या संसारात सुखी होतीच पण तिला तिच्यातली इतरांना सुग्रास भोजन घालणारी स्त्रीसुलभ भावना स्वस्थ बसू देत नव्हती. तिला आपले स्वत:चे असे परिपूर्ण एखादे नीटनेटके उपहारगृहाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अन्नपुर्णा मातेकडून आशीर्वाद हवे म्हणून तीनं सृष्टीच्या रूपात हिरव्याशालूत शोभायमान अन्नपुर्णा मातेला साकडे घातले.मातेनं तिला भरभरून आशीर्वाद दिल्याचा तिला भ्रम झाला.

  खुप दिवसांपासुन शोध घेत असलेली परिपुर्ण जागा तिला त्याच अन्नपुर्णा मातेच्या परीसरात मिळाली.कारण तिनं अन्नपुर्णा मातेला नेलेला घरगुती लाडवांचा प्रसाद सर्वांनीच कौतुकानं ग्रहण केला होता.अन् तिथल्या ट्रस्टींनी तिला तेथेच उपहारगृहासाठी भाडेतत्त्वावर जागा देऊ केली होती.हा तिच्यातल्या देवीभक्ती व शक्तीचा चमत्कार होता.


रंग राखाडी:-कालींदी


   पक्का काळा वर्ण घेऊन जन्मली म्हणून सर्वच तिला हिणवत होते.पण न्याय व पावित्र्य,सत्याला जागणारी अन्यायाची प्रचंड चीड असलेल्या तिला तिची आईनं मात्र कालिका मानून म्हणून तिचं नाव कालिंदी ठेवलेलं. 

  आज मातेची पाचवी माळ म्हणून ती षोडषवर्षी युवती राखाडी रंगाचा ड्रेस घालून कालिका मातेच्या दर्शनासाठी गेली.तिला आज रात्रीचा दांडीया बघण्याची घरुन परवानगीही मिळाल्याने ती अधिकच खुश दिसत होती. तिनं राखाडी वस्त्रांत अधिकच खुलून दिसत असणारं कालिकेचं दर्शन घेतले व या जगातल्या दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध ठाम उभे राहण्याची शक्ती मिळावी अशी मातेकडे याचना केली.मातेनं तिला खड्ग दाखवून प्रतिसाद दिल्याचा भास तिला झाला व ती त्वरेने परीसरातल्या दांडियाचं विलोभनीय दृश्य पाहू लागली.  

   अचानक तिचं लक्ष कोपऱ्यात जाऊन बसलेल्या चार मुलां मुलींकडे गेले.त्यांच्यात आपापसात काहीतरी वाद विकोपाला गेल्याचं तिला कळलं. तिनं त्यांच्यावर काही काळ लक्ष ठेवलं.काही वेळानंतर त्या दोन्ही मुली तिला तिथेच हताशपणे बसलेल्या दिसल्या.ती हळूच त्यांच्या जवळ गेली व त्यांना काय झालंय ते विचारलं.त्यांनीही त्यांच्यावर अकस्मात कोसळलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठीचा आधार म्हणून तिला सारंकाही सांगितले.ते ऐकून तिच्यातली कालिका जागी झाली.तिनं त्या मुलींना काही सुचना देऊन कृती करायला सांगितली.काही वेळानंतर त्या मुलींसवे ती मुलं बाहेर पडली हि पण त्यांचा मागोवा घेत हळूच बाहेर पडली.दोन्ही तरुण त्या दोन्ही मुलींना घेऊन एका उच्चभ्रु वस्तीतील प्रशस्त कफेमध्ये शिरलेली पाहून तिनं पोलिसांना फोन लावला.काही क्षणातच साध्या वेशातील पोलीसांनी त्या कफेवर धाड टाकली तेव्हा कित्येक युवा युवती मुली तिथे गैरवर्तन करतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडली.ड्रग्स,नेले पदार्थ व गर्भनिरोधक साहित्य अतिप्रमाणात आढळून आले.आणखीही अनेक असा गैरवापर होणा-या ठिकाणांचा पोलिसांना सुगावा लागला.

  कालिंदीमुळे आज कित्येक नीतीभ्रष्ट युवकांवर पोलिस कारवाई होऊन अश्या कित्येक फसवणूक झालेल्या युवतींना व त्यांच्या पालकांना बोलावून त्यांची चांगली कान उघाडणी करण्यात आली होती.आज तिनं वाईटावर ख-या अर्थाने विजय प्राप्त करुन अंगचा कालिकेचा गुण सर्वांना दाखवून आपलं कालिंदी नाव सार्थ ठरवलं होतं.


रंग नारिंगी :-सारंगी


   तिचं सारंगी नाव ठेवण्या मागचं कारण तिच्या आईनं म्हणे ती गर्भात असताना खुप खुप संत्रं खाल्ली.जन्मानंतर बालिकेचा नारिंगी रंगाकडे कल पाहून ‌तिचं नावं नारिगी व संत्र योगातून सारंगी ठेवण्यात आलेलं. 

  सारंगी जन्मापासूनच अतिशय तेज बुद्धिची आणि चुणचुणीत मुलगी.कला साहित्य क्रीडा या सर्वच क्षेत्रात ती यशस्वी वाटचाल करत असलेली पाहून तिच्या मातापित्यांना समाधान वाटत राही.आज सारंगीची तिच्याच जिल्ह्यात जिल्हाधिकारीपदी नेमणूक होऊन तिनं आपल्या कार्यालयात जाण्यापूर्वी शारदा मातेच्या मंदिरात प्रवेश केला.

   आज सहावी माळ असल्याने नारिंगी रंगाच्या भरजरी बुट्टेदार नववारीत मातेची मूर्ती अधिकच तेजःपुंज दिसत होती.आज जणू काही तिच्या नेत्रांतलं तेज ती आपल्याला आपल्याच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रदान करीत आहे असा ठाम विश्वास निर्माण झाल्याने सारंगीनं आत्मविश्वासाने पहिली स्री जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कार्यालयात प्रवेश केला.


रंग मोरपंखी:- मयुरी


   मयुरीला जन्मल्यापासून मोर पिसांचे प्रचंड आकर्षण.तिला त्या श्रीधराची आवडही त्यातूनच निर्माण झालेली. म्हणुन कौतुकानं तिचं नाव मयुरी ठेवले.मयुरीला मोरपंखी रंगाची साडी परिधान केलेलं पाहून तिची सुयोग्य वराची इच्छा पूर्ण होईल अशीच सर्वांची खात्री पटली. 

  आज तिच्या विवाहासाठी पसंतीस उतरलेले वराकडील पाहुणे तिला बघायला येणार म्हणून ती गौरी मातेच्या मंदिरात गेली.आज सातवी माळ मातेच्या अंगावरची मोरपंखी रंगाची मोराची पैठणी मातेला अधिकच मोहक दिसत होती.तिच्या त्या सात्विक शालीनरुपानं मयुरीला जणू आपल्यात बंदीस्त केल्याचा भास होऊन ती गौरीमातेशी प्रार्थनेनं एकरुप झाली.

  महादेवासारखा सांब सदाशिव प्राप्त झालेल्या त्या गौरीचा जणू काही कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय या जाणीवेने ती स्वगृही परतली.नंतर तिला नव-या मुलासह सर्वांची पसंती मिळून तिचा विवाह सुयोग्य वराशी जुळला.आज तिची इच्छा गौरीमातेनंच पूर्ण केली होती.


रंग गुलाबी:- पंकजा


    पंकजाला जन्मजात कमळपुष्पांचे त्यातही गुलाबी रंगाचं प्रचंड वेड.साहजिकच तिला कमळावर विराजमान देवी लक्ष्मीचं भारीच आकर्षण. शुद्ध सोन्यानं मढलेल्या आणि चारित्र्यवान असलेल्या माता लक्ष्मीचं ते सुंदर रुप तिला भारीच प्रिय होते.

  आजही नवव्या माळेला अखेरच्या दिवशी पंकजानं गुलाबी रंगाची भरजरी रेशमी साडी नेसून आवश्यक शुद्ध सोन्याचं मंगळसूत्र घालून महालक्ष्मी मंदीराकडे प्रस्थान केले.तिचं तिच्या पतीवर निरातिशय प्रेम होतं. पण कमी आवक असल्याने तिच्या सात्विक रुपाला शोभून दिसतील असे शुद्ध सोन्याचे दागिने घडवण्या पलिकडे तो काहीही करु शकत नव्हता. उत्तम स्वर्णकाराच्या कुळात जन्म अंगी कलानिपुणता असुनही दुस-या संपन्न मारवाड्यांच्या पेढीवर राबणाऱ्या त्याच्या अल्पवेतनात त्याला बायकोची लक्ष्मीस्वरुपात दागिन्यांनी मढविण्याची हौस पुरवता येत नव्हती.तिच्यातीली स्त्रीत्वाचा,विमलतेचा त्याला मुळीच विसर पडत नसे. तिच्यासाठी तो खुप मेहनत घेऊन राबत राही.तिही त्याच्या या गुणांमुळे त्याचाच विचार करी.आज तिनं लक्ष्मीला गुलाबी रंगावर सोन्यानं नक्षीकाम केलेल्या अव्वल दर्जाच्या पैठणीत अंगभर शुद्ध सोन्याच्या अलंकारांनी सजलेलं पाहून तिच्या डोळ्यांच पारणं काही केल्या फिटेना! ती कितीतरी वेळ मंत्रमुग्ध होऊन लक्ष्मी मातेचं हे मोहक लावण्य ऐश्वर्य डोळ्यांत

साठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.अन् आपल्या मंगळसूत्राच्या खालीच तिला महालक्ष्मी हार गळ्यात असल्याचा तिला साक्षात्कार झाला. ती भानावर आली तिनं लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करुन ती घरी आली. आल्या आल्या तिच्या पतीनं आपण स्वतंत्रपणे स्वर्ण व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतल्याची शुभवार्ता तिला दिली.जणूकाही लक्ष्मीनं तिच्या घरीच प्रवेश केला होता.


नवरात्रोत्सव स्पर्धेसाठी प्रत्येक कथा नऊ दिवसांत त्या रंगाचे वैशिष्ट्ये सांगून भगवती देवीचे रुप व त्याचे गुणवैशिष्ट्ये सांगणारी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract